Post Details
Listen
Animal husbandary
पशु ज्ञान
DeHaat Channel
20 Feb
Follow

जनावरांमध्ये अफ्लाटॉक्सीन विषबाधा (Aflatoxin poisoning in animals)


जनावरांमध्ये अफ्लाटॉक्सीन विषबाधा (Aflatoxin poisoning in animals)

नमस्कार पशुपालकांनो,

हवेत आणि मातीत आढळुन येणारे Aspergillus प्रजातीचे मृतोपजीवी सुक्ष्मजीव हे पाणी किंवा हवेतील आर्द्रतेच्या सहाय्याने हळुहळु अन्नघटकाचे विघटन करून जो एक विषारी द्रवपदार्थ निर्माण करतात त्या पदार्थाला अफ्लाटॉक्सीन (Aflatoxin) असे म्हणतात. अशा काही प्रकारच्या बुरशींपासून दुय्यम पदार्थ तयार होऊन त्यापासून जनावरांना विषबाधा होते. अशा प्रकारच्या विषबाधा जास्त प्रमाणात झाल्यास काहीवेळा मृत्यू देखील होतो.

बुरशीजन्य विषबाधेविषयी (About fungal Infections):

  • बुरशीजन्य विषबाधेचा प्रसार हा संसर्गजन्य आजारासारखा एका जनावरापासून दुसऱ्या जनावराला होत नाही. बुरशीजन्य विषबाधा ही विशिष्ट ऋतूमध्ये दिसते.
  • बऱ्याच बुरशी जनावरांची प्रतिकारशक्ती कमी करतात. त्यामुळे अशी जनावरे जिवाणूजन्य आणि विषाणूजन्य आजारांना बळी पडतात.
  • बुरशीजन्य विषबाधेवर प्रतिजैविकांचा परिणाम होत नाही.
  • काही बुरशीची वाढ विशिष्ट पशुखाद्यामध्ये होते.

अफ्लाटॉक्सीन (Aflatoxin) मुळे काय होते?

  • हे विष खाद्यातून प्रथम जनावराच्या शरिरात जाते व नंतर दुधात येते.
  • गायींचे दूध उत्पादन कमी होते व दुधाची गुणवत्ता घसरते त्यामुळे दुध व्यवसाय तोट्यात जातो तसेच त्याचे ईतरही अनेक गंभीर दुष्परिणाम उद्भवतात.
  • अफ्लाटॉक्सीनचा अंश दुधात येऊन असे दूध सेवन करणाऱ्यांना सुद्धा अशा प्रकारच्या दुष्परिणामांचा सामना करावा लागतो यामुळे असे विषयुक्त दूध मानवी आरोग्यास धोकादायक ठरतात.
  • यावर उपाय म्हणून दूध उत्पादकांनी वाळला चारा वैरण, कडबा, काड चारही बाजुंनी झाकून घेणे तसेच मुरघास असेल तर तो हवाबंद स्थितीत ठेवणे आवश्यक असते परंतु प्रत्यक्ष निदर्शनास असे येते की चारा पुर्णपणे झाकलेला नसतो त्यामुळे बुरशी पुर्ण झाकलेल्या चाऱ्यालाही खराब करते.
  • पावसाने जनवारांचे खाद्य खराब होते.
  • दमट, पावसाळ्याचे किंवा हवेत आर्द्रता असेलेले वातावरण बुरशीसाठी पोषक असल्याने खाद्यावर बुरशीची वाढ झपाट्याने होते.

अफ्लाटॉक्सीनसाठी अनुकूल वातावरण:

ज्याठिकाणी पाण्याचे तलाव, नदी, धरण आहे अशा ठिकाणी वातावरण दमट असते ते Aflatoxin साठी अनुकुल असते. अशा ठिकाणी कोणत्याही खाद्याविषयी जास्त काळजी घेणे गरजेचे असते.

अफ्लाटॉक्सीनची (Aflatoxin) विषबाधा:

  • जनावरांमध्ये अफ्लाटॉक्सीनमुळे होणाऱ्या विषबाधेचे प्रमाण अधिक आहे.
  • अफ्लाटॉक्सीन हा दुय्यम पदार्थ असून तो ॲस्परागस फ्लावस आणि ॲस्परागस परासायटीकास या बुरशीपासून तयार होतो. यामुळे होणारी बुरशीजन्य विषबाधा सर्व पाळीव प्राण्यांमध्ये होते.
  • याचे प्रमाण साठवलेले धान्य जसे की, गहू, ज्वारी, तांदूळ, सोयाबीन, सरकी पेंड, शेंगदाणा पेंड आणि इतर सर्व पेंढीमध्ये अधिक प्रमाणात असते.
  • जेव्हा वातावरणातील आद्रता 15 टक्के आणि तापमान 25 ते 32 अंश सेल्सिअस असते, तेव्हा धान्यामध्ये तयार झालेले अफ्लाटॉक्सीन जास्त काळ राहते.
  • या बुरशीची वाढ पीक शेतात असताना, धान्य तयार करताना किंवा धान्याची अयोग्य साठवण केल्यास होते.

अफ्लाटॉक्सीन (Aflatoxin) विषबधेची लक्षणे:

तीव्र प्रमाणात:

  • जनावरांनी अफ्लाटॉक्सीनयुक्त धान्य किंवा पशुखाद्य अधिक प्रमाणात खाल्लेले असते यामुळे काही जनावरांचा तत्काळ मृत्यू होतो.
  • जनावरे अशक्त बनतात.
  • जनावरे चारा, पाणी खात नाहीत. सुस्त बनतात.
  • काही जनावरांच्या तोंड, नाक आणि शेणातून रक्त पडते.
  • काही जनावरांना जुलाब लागतात.

मध्यम प्रमाणात:

  • या प्रकारची विषबाधा जनावरांच्या आहारातून हळूहळू तीन महिन्यांपर्यंत अफ्लाटॉक्सीन गेल्यास होत असते.
  • जनावरांना कावीळ होते, झटके येतात.
  • अंगाला खाज सुटते.
  • शरीरांतर्गत रक्तस्राव होऊन मृत्यू होतो.

कमी प्रमाणात:

  • जनावरांनी अफ्लाटॉक्सीन कमी प्रमाणात पशुखाद्यातून सहा महिन्यांपर्यंत खाल्ल्यास विषबाधा होते.
  • ही विषबाधा जनावरांमध्ये अधिक प्रमाणात दिसते. जनावरांची पचनशक्ती, कार्यशक्ती कमी होते.
  • तब्येत कमी होत जाते.
  • दुभत्या जनावरांची दूध देण्याची क्षमता कमी होते.
  • गाभण जनावरांचा गर्भपात होतो.
  • प्रतिकार शक्ती मोठ्या प्रमाणात कमी होते.
  • कोंबड्यांच्या अंडी उत्पादनात घट होते.
  • मांस उत्पादन कमी होते.

अफ्लाटॉक्सीन (Aflatoxin) विषबाधा टाळण्यासाठी उपयोजना :

  • बऱ्याच वेळेस काळजी घेऊनसुद्धा किंवा बुरशी दिसत नसल्यामुळे एफ्लाटाॅक्सिनचा काही भाग हा जनावराच्या पोटात जाण्याची शक्यता असते यासाठी,
  • विषबाधेवर खात्रीशीर उपचार उपलब्ध नसल्यामुळे उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्त्वाच्या आहेत.
  • बुरशीयुक्त चारा, पशुखाद्य जनावरांना खाऊ घालणे बंद करावे.
  • काही शेतकरी कमी खर्चात पशुखाद्य, खुराक बनविण्यासाठी कमी प्रतीचे धान्य खरेदी करतात. हे धान्य बुरशीयुक्त नाही याची खात्री करून घ्यावी.
  • पिकाची कापणी, मळणी करतानाच बुरशीयुक्त चारा वेगळा करून ठेवावा. तो चांगल्या चाऱ्या सोबत मिसळू नये.
  • पशुखाद्याची साठवण ओलसर ठिकाणी करू नये.
  • बुरशीयुक्त धान्याचा भरडा, मुरघास चारा जनावरांना खाऊ घालू नये.
  • बाधित जनावरांना जादा प्रोटीनयुक्त पशू खाद्य द्यावे.
  • बाधित जनावरांना जीवनसत्त्व ई, सेलेनीयमचा पुरवठा करावा.
  • बाधित जनावरांना दुय्यम प्रकारचा आजार झाल्यास तातडीने पशुतज्ज्ञांकडून उपचार करावेत.

तुमच्या जनावरांमध्ये अफ्लाटॉक्सीन विषबाधेची कोणती लक्षणे दिसून आली? व तुम्ही काय उपाययोजना केल्या? याविषयीची माहिती इतर पशुपालकांसह शेयर करा. या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, अशा अजून माहितीसाठी "पशु ज्ञान" चॅनेलला फॉलो करा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. अफ्लाटॉक्सीन विषबाधा म्हणजे काय?

अफ्लाटॉक्सीन हा दुय्यम पदार्थ असून तो ॲस्परागस फ्लावस आणि ॲस्परागस परासायटीकास या बुरशीपासून तयार होतो. यामुळे होणारी बुरशीजन्य विषबाधा सर्व पाळीव प्राण्यांमध्ये होते.

2. अफ्लाटॉक्सीन विषबाधा कशामध्ये अधिक प्रमाणात असते?

अफ्लाटॉक्सीनचे प्रमाण साठवलेले धान्य जसे की, गहू, ज्वारी, तांदूळ, सोयाबीन, सरकी पेंड, शेंगदाणा पेंड आणि इतर सर्व पेंढीमध्ये अधिक प्रमाणात असते.

3. जनावरांना अफ्लाटॉक्सीन विषबाधा किती कालावधीत होते?

जनावरांनी अफ्लाटॉक्सीनयुक्त धान्य किंवा पशुखाद्य अधिक प्रमाणात खाल्ले असेल तर काही जनावरांचा तत्काळ मृत्यू होतो तसेच जनावरांच्या आहारातून हळूहळू तीन महिन्यांपर्यंत किंवा सहा महिन्यांपर्यंत अफ्लाटॉक्सीन गेल्यास जनावरांना विषबाधा होते.

47 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor