डाळिंब पिकातील आंबिया बहार व्यवस्थापन (Ambia Bahar management in Pomegranate crop)

नमस्कार शेतकरी मित्रांनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
डाळिंब हे एक प्रमुख कोरडवाहू फळपिक असून हलक्या जमिनीत आणि कमी पाण्यावर घेता येणारे एक महत्वाचे पीक आहे. महाराष्ट्र राज्यात गेल्या दोन दशकांपासून डाळिंब एक महत्वाचे नगदी पीक बनलेले आहे. महाराष्ट्रात साधारणपणे सद्यपरिस्थितीत एक लाख वीस हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र या फळपिकाखाली लागवडीस आले आहे. राज्यात सध्या सोलापूर, नाशिक, अहमदनगर, पुणे, सांगली, सातारा, धुळे, बुलढाणा, उस्मानाबाद आणि लातुर जिल्ह्यांमध्ये डाळिंबाची लागवड व्यापारी तत्वावर केली जाते. शेतकरी मित्रांनो, डाळींबाच्या झाडास तीन बहार येतात. आंबिया बहार, मृग बहार, हस्तबहार यापैकी कोणत्याही एका बहाराची फळे घेणे फायदेशिर असते. डाळिंब पिकाचा बहार दोन वर्षांतून 3 वेळाच धरला जात असल्याने खूप काटेकोरपणे व्यवस्थापन करणे गरजेचे असते. आजच्या आपल्या या लेखात आपण डाळिंब पिकातील आंबिया बहार व्यवस्थापनाविषयी जाणून घेणार आहोत.
डाळिंब पिकातील प्रमुख तीन बहारांचा कालावधी (Three Bahar periods of pomegranate crop):
- मृग बहार - मे ते जून
- हस्त बहार - सप्टेंबर ते ऑक्टोबर आणि
- शेवटचा आंबिया बहार - जानेवारी ते फेब्रुवारी
डाळिंबामध्ये बहाराचे नियोजन करताना डाळिंब बागाईतदारांनी पुढील बाबी विचारात घ्याव्यात:
- डाळिंबाचा पहिला बहार दोन वर्षांनंतरच धरावा.
- वर्षांतून फक्त एकच बहार घ्यावा.
- बहार घेतल्यानंतर बागेला 3 ते 4 महिने विश्रांती द्यावी.
आंबिया बहार (Ambia Bahar):
- फळबागेपासून फळांचे उत्पादन वाढविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध पद्धतींपैकी महत्त्वाची पद्धती म्हणजे बहार प्रक्रिया.
- ज्यावेळी महाराष्ट्रातील थंडी कमी होते आणि डाळिंबाला मोहोर येतो, अशावेळी केलेल्या डाळिंब फल उत्पादन व्यवस्थापनाला आंबिया बहार असे म्हणतात.
- डाळिंब पिकात आंबिया बहार धरणे अधिक चांगले मानले जाते कारण यामध्ये किड आणि रोगाचे प्रमाण कमी असते आणि एक महत्वाची गोष्ट, ज्यांच्याकडे पाणी मुबलक प्रमाणात आहे त्यांनी तर आंबिया बहार आवश्य घेतला पाहिजे.
- पाण्याची कमतरता असल्यास मृगबहार धरण्याचा सल्ला दिला जातो.
आंबिया बहाराचा कालावधी (Ambia Bahar Period):
- आंबिया बहाराचा कालावधी हा साधारण सहा ते सात महिन्यांचा असतो.
- आंबिया बहार हा साधारणपणे नोव्हेंबर महिन्यात सुरू होतो.
- आणि जास्तीत जास्त ऑगस्ट महिन्यापर्यंत त्याचा शेवट होतो.
आंबिया बहारामध्ये तीन क्रिया अत्यंत महत्वाच्या आहेत त्या पुढीलप्रमाणे:
- पहिली क्रिया विश्रांती
- दुसरी क्रिया ताण आणि
- तिसरी महत्वाची क्रिया पानगळ
आता जाणून घेऊया, विश्रांती काळातील महत्वाची काम आणि विश्रांतीकाळ किती दिवस असावा याविषयी:
- विश्रांती काळ हा कमीत-कमी 3 महिन्यांपर्यंत असावा.
- या काळात पूर्वीच्या बागेतील किड आणि रोग ग्रस्त झालेली फळे, फांद्या छाटणी करून, पाने गोळा करून, बिनकामाच्या फुलाची बागेच्या बाहेर योग्य प्रकारे विल्हेवाट लावून बाग स्वच्छ ठेवावी.
- नंतर बेडला दोन्ही बाजूंनी नांगराच्या साहाय्याने रेषा मारून त्यामध्ये बहाराच्या वेळी जो आपण खताचा डोस टाकतो त्यामधील 10% डोस अवश्य टाकून द्यावा.
- तसेच बागेचं पाणी हळू-हळू कमी करत जावे, हळू-हळू म्हणजेच अर्धा-अर्धा तासाने ही प्रक्रिया करावी.
- विश्रांती काळात फवारणीकडे दुर्लक्ष न करता एक-दोन अधून-मधून बुरशीनाशक किंवा बोर्डो मिश्रणाच्या फवारण्या केल्या पाहिजेत.
काडी मध्ये स्टोरेज बनवण्यासाठी काही फवारण्या:
पहिली फवारणी : 00:52:34 (देहात-MKP) - 5 ग्रॅम + मायक्रोन्यूट्रीएंट्स - 1 ग्रॅम
दुसरी फवारणी : 00:00:50 (देहात न्यूट्री-पोटॅशिअम सल्फेट) - 5 ग्रॅम + मायक्रोन्यूट्रीएंट्स - 1 ग्रॅम
तिसरी फवारणी : 00:52:34 (देहात-MKP) - 10 ग्रॅम + मायक्रोन्यूट्रीएंट्स - 1 ग्रॅम
चौथी फवारणी : 00:00:50 (देहात न्यूट्री-पोटॅशिअम सल्फेट) - 10 ग्रॅम + मायक्रोन्यूट्रीएंट्स - 1 ग्रॅम
आपल्याला या चार फवारण्या आलटून पालटून कराव्या लागतात.
विश्रांती नंतर येतो तो ताण देण्याचा काळ जाणून घेऊया याविषयी:
- यामध्ये आपण पहिले तर बागेचे पूर्ण पाणी बंद करतो.
- हे पाणी आपल्याला आपल्या जमिनीनुसार 1 ते 2 महिने बंद करावे लागते म्हणजेच पिकाला ताण द्यावा लागतो.
- ताण काळात सर्वात महत्वाचे असते ते काम म्हणजे पाणी बंद करणे आणि बागेतील पानांची परिपक्वता करणे .
- ही झाली दोन कामे आता आंबिया बहारातील शेवटचे काम म्हणजे पानगळ.
पानगळ:
पानगळ हा दुर्लक्ष न करता येणारा मुद्दा आहे यामध्ये किती टक्के पानगळ होते यानुसार इथ्रेल (बायर) चा डोस ठरवावा लागतो, जाणून घेऊया डोसबद्दल:
पहिला डोस : 30 ते 40 % - इथ्रेल (बायर) - 2 मिली + 00:52:34 (देहात-MKP) - 5 ग्रॅम +स्टिकर - 0.5 मिली / लिटर
दुसरा डोस : 40 ते 50 % - इथ्रेल (बायर) - 1.5 मिली + 00:52:34 (देहात-MKP) - 5 ग्रॅम +स्टिकर - 0.5 मिली / लिटर
तिसरा डोस : 50 ते 60 % - इथ्रेल (बायर) - 1 मिली + 00:52:34 (देहात-MKP) - 5 ग्रॅम +स्टिकर - 0.5 मिली / लिटर
चौथा डोस : 60 % असेल तर - इथ्रेल (बायर) - 0.5 मिली + 00:52:34 (देहात-MKP) - 5 ग्रॅम +स्टिकर - 0.5 मिली / लिटर
आपण पानगळीच्या वेळेतील डोस बघितला, आता छाटणी विषयी जाणून घेऊया.
छाटणी:
- छाटणी आपण सॉफ्ट करू शकतो कारण हार्ड छाटणी योग्य नाही त्यामागचे कारण असे की, पेन्सिल काडीमध्ये स्टोरेज असते. ही छाटणी इथ्रेल (बायर) फवारणी अगोदर किंवा नंतर पण करू शकतो .
- इथ्रेल फवारणी च्या 10 दिवसांच्या आता पहिले पाणी द्यावे, बेसल डोस देताना जमीन जास्त काळ उघडी न ठेवता लवकर खत घालून झाकून पाणी द्यावे कारण उघडी राहीली तर हवेतील नत्र जमिनीत प्रवेश करून बाग तगारीवर जाते.
- शेणखत - 20 ते 30 किलो
- 10:26:26 (ईफको-एनपीके) - 500 ते 700 ग्रॅम
- नीम पेंड - 1 किलो
- गांडूळ खत - 1 किलो
- फुरदान - 25 ते 30 ग्रॅम
- बाकी खते आपण ड्रीप ने देतो अवस्थेनुसार.
या तीन प्रमुख कामांनंतर पुढे पहिलं पाणी दिल्यानंतर 10 ते 15 दिवसात चौकी अवस्था असते नंतर 2 ते 2.5 महिने सेटिंग काळ व तिथून पुढे 1.5 महिन्यांनी साईज वाढ आणि कलर हिरवा होतो आणि त्यानंतर पुढे 1.5 ते 2 महिने कलर आणि गोडे भरणे अवस्था चालू होते. या सर्व प्रक्रियेला पहिल्या पाण्यापासून ते काढणी पर्यंत 6 ते 6.5 महिने जातात.
डाळिंब आंबिया बहार मुख्य रोग व कीटक व्यवस्थापन:
डाळिंब पिकामध्ये नवीन पालवी निघाल्यानंतर रस शोषक किडी जसे की पांढरी माशी, मावा, मिलीबग आणि फुलकिड्यांचा तसेच तेल्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. या किडी पानांमधील रस शोषून घेऊन काळसर चिकट पदार्थ बाहेर सोडतात. चिकट पदार्थावर काळया बुरशीची वाढ होते परिणामी प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते. झाडाची अन्नग्रहण करण्याची क्षमता कमी होते तसेच फळाची गुणवत्ता कमी होऊन उत्पादनामध्ये 10 ते 15 टाक्यांची घट होऊ शकते. तर तेल्या हा रोग पाने, फुले, फळ, फांदी आणि खोड यांचे नुकसान करतो. या रोगामुळे 30 ते 50% नुकसान होते, परंतु वाढीस पोषक वातावरण असताना अतिरोगग्रस्त बागेत 80 ते 100% नुकसान होऊ शकते. म्हणूनच वेळीच उपाययोजना करणे महत्वाचे असते.
रस शोषक किडींवर उपाय:
- पालवी फुटताच बागेमध्ये 25 पिवळे आणि निळे चिकट सापळे प्रति एकर लावावेत.
- नीम ऑइल 400 मिली किंवा व्हर्टिसिलीम लेकॅनी 500 मिली प्रति 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
- थायोमिथोक्सम 25% डब्ल्यूजी (देहात-असेर) 80 ग्रॅम 200 मिली किंवा
- एसिटामिप्रिड 20 % एस पी (टाटा-मानिक) 100 ग्रॅम 200 ली पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी.
तेल्या रोगावर उपाय:
- तेल्या रोग नियंत्रणाकरिता कॉपर ऑक्सीक्लोराइड 50 % डब्ल्यू पी 45 ग्रॅम प्रति 15 लिटर पंप फवारावे.
तुमच्या डाळिंब पिकात तुम्ही आंबिया बहार व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “बागायती पिके” चॅनेलला फॉलो करा. ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. डाळिंब पिकातील बहारांचा कालावधी कोणता?
मृग बहार - मे ते जून, हस्त बहार - सप्टेंबर ते ऑक्टोबर आणि शेवटचा आंबिया बहार - जानेवारी ते फेब्रुवारी
2. आंबिया बहाराचा कालावधी किती दिवसांचा असतो?
आंबिया बहाराचा कालावधी हा साधारण सहा ते सात महिन्यांचा असतो.
3. आंबिया बहारात बहार येण्याचा काळ कोणता?
जानेवारी-फेब्रूवारी हा आंबिया बहारात बहार येण्याचा काळ आहे.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
