आवळा लागवडीविषयी संपूर्ण माहिती (Amla Cultivation)

नमस्कार शेतकरी बंधूंनो,
देहात परिवारात आपले स्वागत आहे!
आवळा पिकाचे झाड अत्यंत काटक असते. आवळ्याच्या झाडाची फारशी काळजी न घेताही या फळझाडापासून चांगले उत्पादन मिळते. आवळ्याचे झाड सदाहरित असून 20 ते 22 मीटर उंचीपर्यंत वाढते. महाराष्ट्रात कोरडवाहू भागात, हलक्या मुरमाड जमिनीत आवळ्याची मोठ्या प्रमाणात लागवड करणे सहज शक्य आहे. तसेच महाराष्ट्रातील सह्याद्री, सातपुडा, अकोला, बुलढाणा, सातारा, कोल्हापूर, अमरावती, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, जळगाव, यवतमाळ या भागात जंगलात ही झाडे आढळतात. आवळ्याच्या शेतीतून कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवणे शक्य आहे. हा वृक्ष आकाराने मध्यम, कठीण, जास्त फांद्या असतात. साधारणपणे 10 ते 15 मीटर उंच वाढते. जानेवारी ते मार्च महिन्यामध्ये पर्णपाती होते. फेब्रुवारी ते मार्च महिन्यात फांद्यांवर फुले येण्यास सुरुवात होते. म्हणूनच आजच्या आपल्या या लेखात आपण आवळा लागवडीविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.
आवळा लागवडीसाठी अनुकूल हवामान(Weather) :
- साधारणपणे ज्या भागात उन्हाळा आणि हिवाळ्याच्या तापमानात फारसा फरक नसतो अशा ठिकाणी आवळ्याची शेती केली जाऊ शकते.
- सुरुवातीला, आवळ्याला सामान्य तापमानाची आवश्यकता असते, परंतु वाढल्यानंतर, ते 0 ते 45 अंश तापमान ते सहन करू शकते.
- आवळ्याच्या वाढीसाठी उष्ण हवामान आवश्यक आहे, दीर्घकाळापर्यंत थंडी असल्यास नुकसान होण्याची शक्यता वाढते.
- हे फळझाड कोरड्या उप-उष्णकटिबंधीय, उष्ण व समशीतोष्ण हवामानात सर्व ठिकाणी येते.
- जुलै-ऑगस्ट महिन्यांमधील उबदार हवामान फळांच्या वाढीस अनुकूल असते.
आवळा लागवडीसाठी उपयुक्त माती:
- लागवडीसाठी सुपीक चिकण मातीचे प्रमाण जास्त असलेली व पाण्याचा निचरा योग्य होणारी जमीन उत्तम असते.
- परंतु हे फळझाड विविध प्रकारच्या जमिनींमध्ये, कॅल्शिअमयुक्त जमीन आणि सामू 6 ते 9.5 असणाऱ्या जमिनीमध्ये वाढू शकते.
- चुनखडीयुक्त किंवा रेताड जमिनीत लागवड करू नये.
आवळा लागवडीसाठी योग्य वेळ:
- आवळा वनस्पतीला सुरुवातीला सामान्य तापमान आवश्यक आहे, म्हणून आवळ्याची लागवड सहसा जुलै ते सप्टेंबर दरम्यान केली जाते.
- मात्र, अनेक ठिकाणी जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यानही आवळ्याची लागवड केली जाते.
आवळा लागवडीसाठी सुधारित वाण:
महाराष्ट्रामध्ये आवळा लागवडीसाठी कृष्णा, कांचन, एनए-10 व एनए-7 या जातींची शिफारस केली जाते.
अभिवृद्धी तंत्रज्ञान:
- बियांपासून तयार केलेली रोपे प्रामुख्याने रूट्स्टॉक म्हणून कलमे तयार करण्यासाठी वापरली जातात. कारण बियांपासून तयार केलेल्या रोपांपासून आकाराने छोटी झाडे तयार होतात व खूप कालावधीनंतर फळे मिळतात, म्हणून व्यापारीदृष्ट्या लागवडीमध्ये ही पद्धत वापरत नाहीत.
- देशी जातीपासून परिपक्व फळे नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत काढली जातात. फळे सावलीमध्ये सुकवून व नंतर दाब देऊन बिया काढल्या जातात. एका फळामध्ये सरासरी सहा बिया असून, जवळ जवळ 300-500 बिया प्रति 10 ग्रॅम असतात. बियांना 12 ते 24 तास पाण्यामध्ये किंवा 500 पीपीएम जीए3 च्या द्रावणामध्ये 24 तास भिजवाव्यात. गादी वाफ्यावर वसंत ऋतू किंवा पावसाळी हंगामात, 2 ते 3 सेंटिमीटर खोल बिया (दोन ओळींमध्ये 15 सेंमी अंतर ठेवून) पेराव्यात. 40 दिवसांनंतर पिशव्यांमध्ये रोपे भरावी. या पद्धतीच्या लागवडीसाठी गादीवाफ्यावर किंवा रोपवाटिकेमध्ये पुरेशी सावली असावी.
- 6 ते 8 देशी आवळ्याच्या रोपांवर मृदकाष्ठ किंवा ढाल पद्धतीने डोळे भरून कलमे तयार केली जातात.
लागवड:
- जून ते जुलै महिन्यामध्ये लागवड केल्याने रोपांची उत्तम वाढ होते.
- लागवडीपूर्वी, उभी-आडवी खोल नांगरणी करून जमीन तयार करावी.
- 60 x 60 x 60 सेंमी आकाराचे खड्डे खोदून प्रत्येक खड्डयात 10-15 किलो कुजलेले शेणखत, 250 ग्रॅम निंबोळी खत आणि २५० ग्रॅम एनपीकेचे मिश्रण (19:19:19) मातीमध्ये मिसळून खड्डे भरून घ्यावेत.
- कठीण खडकाळ जमिनीमध्ये 1 × 1 x 1 मीटर आकाराचे खड्डे यंत्राच्या साह्याने खोदून त्यामध्ये 1:1:1 या प्रमाणात मूळ माती, काळी किंवा पोयटा माती आणि स्पेंट मशरूम सबस्ट्रेट यांचे मिश्रण भरल्याने कलमांची चांगली वाढ होते.
- लागवड 6 × 6 मी. 8 × 8 मी. किंवा 8 × 6 मी. अंतरावर करावी.
- लागवड करताना परागीभवन आणि जास्तीत जास्त उत्पादनाच्या हेतूने 2:2:1 च्या गुणोत्तरामध्ये किमान तीन जातींची लागवड करावी.
पाणी आणि खत व्यवस्थापन:
- नवीन कलमे जगविण्यासाठी गरजेनुसार 20 ते 30 लिटर पाणी प्रति झाड 10 ते 15 दिवसांच्या अंतराने द्यावे.
- जून, जुलै महिन्यांत पाऊस नसेल तर बागेला पाणी द्यावे.
- उन्हाळ्यामध्ये 15 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
- आंतरपिके घेतल्यास पाणी व खते देण्याची विशेष गरज भासत नाही.
- जुलै महिन्यामध्ये पूर्ण शेणखत आणि अर्धी रासायनिक खताची मात्रा द्यावी.
- अर्धी रासायनिक खतांची मात्रा ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये पावसाचा अंदाज घेऊन द्यावी.
- खतांचा वापर केल्यानंतर (जानेवारी/फेब्रुवारी) प्रथम पाणी दिले जाते.
- फूलधारणेच्या कालावधीत म्हणजेच मार्च - एप्रिल दरम्यान पाणी तोडावे.
- फळगळती कमी करण्यासाठी संरक्षित प्रमाणात पाणी द्यावे.
फळ तयार होण्याचा कालावधी:
- कलम केलेली झाडे लागवडीनंतर तिसऱ्या वर्षापासून फळे देण्यास सुरुवात करतात, तर बियांपासून लागवड केलेल्या झाडांना 6 ते 8 वर्षे लागतात.
- आवळ्याला मार्च-एप्रिल महिन्यात फुले येतात. फूल ते परिपक्व फळासाठी सामान्यपणे 5 ते 6 महिने लागतात.
- फळधारणा झाल्यानंतर फळे सुप्तावस्थेत जातात. या काळात कोणत्याही प्रकारची आंतरमशागत करू नये.
- मृगाचा पाऊस पडल्यानंतर फळाची वाढ होण्यास सुरुवात होते.
तोडणी हंगाम:
- तोडणीचा हंगाम जातिपरत्वे सप्टेंबरपासून डिसेंबरपर्यंत चालतो. चांगली तयार झालेली फळे काढावीत.
- फळे आकडीने किंवा बांबूने हलवून काढावी लागतात. तोडणीच्या विलंबामुळे काही जातींच्या बाबतीत फळे मोठ्या प्रमाणात गळतात.
उत्पादन:
पूर्ण वाढलेल्या 10 वर्षांपुढील झाडापासून 100 ते 120 किलो फळे मिळतात. हेक्टरी 15 ते 20 टन उत्पादन मिळते.
अशा प्रकारे योग्य रित्या, आपल्या शेतातील मातीनुसार योग्य हवामानानुसार आवळ्याची लागवड केल्यास भरपूर उत्पादन मिळू शकते. तुम्ही तुमच्या आवळा पिकाच्या लागवडीकरता कोणते तंत्र वापरता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. आवळा पिकास कोणते हवामान अनुकूल आहे?
जुलै-ऑगस्ट महिन्यांमधील उबदार हवामान आवळा वाढीस अनुकूल आहे.
2. आवळ्याचे पीक कोणत्या जमिनीत घेता येते?
आवळ्याचे पिक सुपीक चिकण मातीचे प्रमाण जास्त असलेल्या व पाण्याचा निचरा योग्य होणाऱ्या जमिनीत घेता येते.
3. आवळा पिकासाठी तोडणीचा हंगाम कोणता?
आवळ्याच्या पिकाची जातिपरत्वे सप्टेंबरपासून डिसेंबरपर्यंत काढणी करता येते. चांगली तयार झालेली फळे काढावीत.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
