पोस्ट विवरण
उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे जनावरांना होणारा त्रास आणि उपाय (Animal problems and solutions in Summer)
उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे जनावरांना होणारा त्रास आणि उपाय (Animal problems and solutions in Summer)
नमस्कार पशुपालकांनो,
राज्यात उन्हाळा सुरु झाला आहे. वाढत्या तापमानात माणसांसह जनावरांना देखील उष्माघाताचा धोका संभवत असतो. त्याचा विपरीत परिणाम हा गाई, म्हशींच्या आरोग्य, कार्यक्षमता, प्रजनन व उत्पादकतेवर होतो. ज्या वेळी वातावरणातील तापमान कक्षेबाहेर जाते म्हणजे कमी किंवा जास्त होते अशा वेळी जनावराला आपल्या शरीरावर होणाऱ्या विपरीत परिणामांचा ताण सहन करावा लागतो.
वाढत्या उन्हामुळे जनावरांना होणाऱ्या त्रासाची लक्षणे (Symptoms):
- वाढत्या उन्हामुळे जनावरे भरपूर पाणी पितात. कोरडा चारा खात नाहीत.
- जनावरांच्या हालचाली मंदावतात.
- जनावरे सावलीकडे धाव घेऊन सावलीत स्थिरावतात.
- जनावरांच्या शरीराचे तापमान वाढते, जोरात श्वास घेणे, भरपूर घाम येणे, अशी लक्षणे दिसू लागतात.
रक्तस्राव:
- अति उष्णतेमुळे जनावरांच्या नाकातून रक्तस्राव होतो.
- नाकातून लाल-गडद रंगाचे रक्त वाहते.
उपाय:
- जनावरांच्या डोक्यावर थंड पाणी ओतावे.
- भरपूर थंड पाणी पिण्यास द्यावे.
- हिरवा चारा द्यावा.
- जनावरे झाडाखाली किंवा गोठ्यात बांधावीत.
- रक्तस्राव थांबत नसेल, तर पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने आहारातून जीवनसत्त्व क किंवा औषधाच्या माध्यमातून द्यावे.
विषबाधा:
- हिरव्या वैरणीच्या कमतरतेमुळे जनावरे मिळतील त्या हिरव्या वनस्पती खातात. यामुळे विषारी वनस्पती घाणेरी, गुंज, धोतरा खाण्यात येऊन विषबाधा होते.
- जनावरे गुंगल्यासारखी करतात, खात नाहीत, खाली बसतात, उठत नाहीत.
- पाय सोडून ताबडतोब मरतात.
उपाय:
- विषबाधेची लक्षणे दिसताच पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने उपाय करावेत.
उष्माघात:
जनावरांच्या उष्माघाताची कारणे:
अति तापमान, आर्द्रता, अतिरिक्त स्नायू काम, मालवाहक जनावरांद्वारे केली जाणारी जड कामे, उन्हात अतिरिक्त काम, पिण्याचे पाणी वेळेवर न मिळणे किंवा पुरेसे न मिळणे, उपाशी जनावरांकडून कामे करून घेणे, बैलगाडीसह उन्हात उभे ठेवणे, बैलांवरील ओझे कमी न करता त्यांना उन्हात उभे ठेवणे, बांधणे. गोठ्यांचे नियोजन व्यवस्थित नसणे, खेळत्या हवेचा अभाव, कोंदटपणा, पत्र्याचे छत. दुपारच्या वेळी जनावरांची वाहतूक करणे. सूर्यप्रकाश सरळ गोठ्यात शिरणे. गाई, म्हशींना भर उन्हात रानात चरायला नेणे. चरून आल्यावर मुबलक पिण्याचे पाणी न मिळणे. ही सर्व उष्माघात होण्याची कारणे आहेत.
उष्माघाताची लक्षणे:
- वाढलेले शारीरिक तापमान हे उष्माघाताचे प्रथम लक्षण असते.
- जनावरांच्या हृदयाचे ठोके वाढतात, श्वसनाचा वेग वाढतो व जनावर धापा टाकते, तोंडावाटे श्वास घेतो.
- त्वचा कोरडी व गरम पडते.
- जनावरे खुराक, चारा खाणे कमी अथवा बंद करतात.
उपाय:
- जनावरांच्या अंगावर थंड पाणी ओतावे.
- ओले कापड किंवा गोणपाट जनावरांच्या डोक्यावर ठेवावे. त्यावर वारंवार पाणी मारावे.
- जनावरांना झाडाखाली, गोठ्यात बांधावे.
- भरपूर प्रमाणात स्वच्छ थंड पाणी, चारा द्यावा.
कडव्या:
- अति प्रखर सूर्यप्रकाशामुळे जनावरांच्या कातडीला हा आजार होतो.
- ज्या जनावरांच्या चामडीचा रंग पांढरा असतो, त्यांना हा आजार होतो. कारण पांढरा रंग असणाऱ्या जनावरांच्या कातडीत मेलेनीन नावाचा घटक कमी प्रमाणात असतो.
- चाऱ्याच्या अभावामुळे भुकेपोटी जनावर गाजर गवत खाते. असे जनावर सूर्यप्रकाशात अधिक वेळ राहिल्यास हा आजार होतो.
- या गवतातील विषारी घटक आणि सूर्यप्रकाशाचा परिणाम कातडीवर दिसतो.
उपाय:
- जनावरांना सावलीत बांधावे.
- भरपूर प्रमाणात थंड पाणी द्यावे.
- उपचारासाठी पशुवैद्यकाचे मार्गदर्शन घ्यावे.
कॅल्शिअम कमतरता:
- हिरव्या चाऱ्याअभावी जनावरांना ऊसाचे वाढे दिले जातात.
- जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे वाढ्यामधील ऑक्झेलेट खनिज आणि जनावरांच्या शरीरातील कॅल्शिअम एकत्र होऊन लघवीवाटे निघून जाते, त्यामुळे कॅल्शिअमची पातळी कमी होते.
- जनावरांना मिल्क फिव्हर आजार होतो.
- जनावरे थकून खाली बसतात.
- शरीराचे तापमान कमी होते.
- जनावरांचे रवंथ करणे बंद होते.
- जनावरे खात नाहीत, दूध देणे कमी करतात, शरीर थंड पडते, जनावरे मान टाकून बसतात.
उपाय:
- तातडीने पशुवैद्यकाकडून उपचार करावेत.
उन्हाळ्यात चारा व पाण्याचे व्यवस्थापन:
- जनावरांना दिवसभरात लागणारा चारा एकाचवेळी देण्याऐवजी समान विभागणी करून 3 ते 4 वेळेस द्यावा.
- चाऱ्याची नासाडी टाळण्यासाठी त्याची बारीक कुट्टी करावी. चारा तसाच टाकला तर 30 टक्के वाया जातो.
- हिरवा चारा उपलब्ध असल्यास वाळलेला चारा यांचे मिश्रण करावे.
- वाळलेल्या गवतावर किंवा कडब्यावर मिठाचे किंवा गुळाचे पाणी शिंपडल्याने जनावरे अधिक आवडीने चारा खातात.
- अति उष्णतेचा जनावरांच्या आहारावर, दूध उत्पादनावर व प्रजननक्षमतेवर प्रतिकूल परिणाम होतो, म्हणून जनावरांना रांजणातील पाणी पाजावे.
उन्हाळयात करावयाचे प्रतिबंधात्मक उपाय (Preventive measures) :
- शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी स्वच्छ व थंड पाणी मुबलक प्रमाणात द्यावे.
- दिवसातून एक ते दोन वेळा पाणी पाजण्याऐवजी चार ते पाच वेळा पाणी पाजावे.
- भर उन्हामध्ये जनावरांना चालवणे टाळावे.
- दुपारच्या वेळी उष्ण तापमान जास्त असते अशावेळी जनावरांद्वारे अतिरिक्त स्नायूकाम करून घेतल्यास त्याचा विपरीत परिणाम हा त्यांच्या शरीराच्या तापमान नियंत्रण क्षमतेवर होतो.
- सकाळचा खुराक न देता उपाशीपोटी जड कामे करून घेतल्यास उष्माघाताची शक्यता दाट असते.
- जनावरांचा गोठा हा सुद्धा उष्माघात, ताण तणाव याचा एक प्रमुख घटक आहे. त्याचे योग्य व्यवस्थापन करून वातावरणातील तापमान नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करावा.
- शक्य असल्यास गोठ्यामध्ये स्प्रिंकलर किंवा फॉगरचा वापर करावा.
- छताच्या पत्र्यांवर शेतातील तुराट्या, पराट्या, कडबा किंवा इतर वनस्पतींचा पालापाचोळा अंथरल्यास गोठ्यात तापमान कमी होते.
- जनावरांच्या शरीरावर दिवसातून 2 ते 3 वेळ थंड पाणी फवारावे.
- गोठ्यांमध्ये हवा खेळती राहावी यासाठी पंखा, कूलरची सोय करावी.
- दुपारच्यावेळी वातावरणातील उष्णतेच्या झळा लागू नये म्हणून गोठ्यामध्ये पाण्याने ओले केलेले गोणपाटाची पडदे लावावीत. यामुळे गोठ्यातील वातावरण थंड राहील.
- चाऱ्याची कमतरता असल्यास खाद्यामध्ये हरभरा, भुईमुगाची टरफले, गव्हाचा भुस्सा, ऊस वाढ्याचा गरजेनुसार वापर करावा.
- अपुरा चारा व निकृष्ट आहारामुळे जनावरे अशक्त बनतात. त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे पशुतज्ज्ञांकडून लाळ्या-खुरकूत, घटसर्प, फऱ्या नियंत्रणासाठी लस टोचावी.
- पशूतज्ज्ञांच्या सल्याने जंतुनाशक पाजावे.
- माजावर असलेल्या गाई, म्हशींना सकाळी, सायंकाळच्या वेळी कृत्रीम रेतन करावे.
- दूध देणाऱ्या जनावरास दोन्ही वेळी दूध काढण्यापूर्वी थंड पाण्याने धुतल्यास त्यावरील शारीरिक ताण हा कमी होतो. दूध उत्पादनात वाढ होते.
उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे तुमच्या जनावरांना काय त्रास होत आहे आणि तुम्ही काय उपाय केले? याविषयीची माहिती इतर पशुपालकांसह शेयर करा. या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, अशा अजून माहितीसाठी "पशु ज्ञान" चॅनेलला फॉलो करा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. उन्हाळ्यात जनावरांना काय त्रास होतो?
रक्तस्राव, विषबाधा, उष्माघात, कडव्या तसेच कॅल्शियम कमतरतेचा त्रास जाणवतो.
2. उन्हाळ्यात जनावरांसाठी काय सोय करावी?
शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी स्वच्छ व थंड पाणी मुबलक प्रमाणात द्यावे तसेच गोठ्याचे छप्पर गवत, भाताचा पेंढा, नारळाच्या झावळ्यांनी झाकून घ्यावे. उन्हाच्यावेळी पाणी पडेल अशी व्यवस्था करावी.
3. जनावरांमध्ये उष्माघाताचे प्राथमिक लक्षण?
वाढलेले शारीरिक तापमान हे उष्माघाताचे प्राथमिक लक्षण आहे.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ