पोस्ट विवरण
सुने
कृषि
बागवानी
कृषि ज्ञान
बेर
बागायती पिके
DeHaat Channel
17 June
Follow

बोराची शेती (Ber Cultivation)

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे.

भारतातील शेतकरी पारंपारीक शेतीच्या किंवा ठरलेल्या पिकाच्या मागे न लागता नवनवीन यंत्राचा वापर करुन वेगवेगळी पिके घेत आहेत. त्यामुळे सध्याची शेती ही आधुनिकतेकडे वळताना दिसत आहे. यामध्ये महत्त्वाचे फळबाग पिक म्हणजे "बोर". बोराचे झाड अतिशय कणखर, चिवट. आणि दुष्काळी परिस्थितीवर मात करणारे आहे. आहाराच्या दृष्टीने बोर पिकाला विशेष महत्त्व आहे. कारण बोरामध्ये माणसाला आवश्‍यक असणारे अन्नघटक आढळतात तसेच ‘क’ जीवनसत्त्वाचे प्रमाण तर सफरचंदापेक्षाही जास्त आहे. त्यामुळे बोराची बाजारपेठेतील मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तसेच बोर हे नाशवंत फळ असल्यामुळे त्यावरील प्रक्रिया उद्योगांना भारतामध्ये आता वेग आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यान अहमदनगर, धुळे, बुलढाना, सांगली, सातारा, पुणे या जिल्ह्यामध्ये हे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. चला तर मग जाणून घेऊया या महत्वाच्या फळाच्या लागवडीविषयीची माहिती.

हवामान (Suitable Climate for Ber) :

  • बोराची वाढ उष्ण आणि कोरड्या हवामानात चांगली होते.
  • हवेत जास्त आर्दता असलेल्या भागात बोराच्या झाडावर रोग आणि किडींचा मोठ्या प्रमाणावर उपद्रव होतो.
  • बोराची झाडे अती उष्ण हवामान सहन करू शकतात.

जमीन (Suitable Land for Ber) :

  • बोराचे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत येते.
  • अत्यंत हलक्या, मुरमाळ, जमिनीपासून ते भारी जमिनीत बोराचे पीक चांगले येते.
  • पाणथळ आणि क्षारयुक्त जमिनीतही बोराचे पीक चांगले येऊ शकते.
  • डोंगर-उताराच्या जमिनीत बोराचे पीक यशस्वीरीत्या घेता येते.

सुधारित जाती  (Varieties for Ber):

  • उमराण
  • कडका
  • इलायची
  • चुहारा
  • सुन्नूर नं 2

अभिवृद्धी आणि लागवड पद्धत:

  • बोराची अभिवृद्धी बियांपासून अथवा डोळे भरून करतात.
  • बियांपासून अभिवृद्धी केल्यास फळे उशिरा लागतात तसेच झाडांचे गुणधर्म मातृवृक्षासारखेच असतील याची शाश्वती देता येत नाही. म्हणून बोराची अभिवृद्धी नेहमी डोळे भरून करावी.
  • बोराच्या गावठी झाडांचे सुधारित जातींमध्ये रूपांतर करण्यासाठी मार्च-एप्रिल महिन्यात गावठी बोराची झाडे जमिनीपासून 20-25 से.मी. उंचीवर करवतीने कापून टाकावीत.
  • या कापलेल्या खोडापासून वाढलेले झाड आणि खोडाभोवती विखुरलेल्या किमान फांद्या ठेऊन इतर फांद्या कापून टाकाव्यात.
  • या फांद्यावर जुलै-ऑगस्ट महिन्यात पंच पद्धतीने डोळा भरावा. अशा रीतीने डोळा भरून मूळ गावठी झाडांचे सुधारित जातीत रूपांतर करता येते.
  • रोपांची नियमित लागवड करावयाच्या ठिकाणी हलक्या जमिनीत 5.0 x 5.0 मीटर अंतरावर, मध्यम जमिनीत 6.0 X 6.0 मीटर अंतरावर आणि भारी जमिनीत 7.0 X 7.0 मीटर अंतरावर बोराची लागवड करावी. त्यासाठी 60 X 60 X 60 से.मी. आकाराचे खड्डे खणावेत.
  • खड्ड्‌याच्या तळाला 10-15 से.मी. पालापाचोळ्याचा थर द्यावा. त्यानंतर 15-20 किलो चांगले कुजलेले शेणखत, 1 ते 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि मातीच्या मिश्रणाने खड्डे भरून घ्यावेत.
  • वाळवीचा आणि मुंग्यांचा त्रास होऊ नये यासाठी प्रत्येक खड्ड्याच्या वरच्या थरात 50 ग्रॅम फोरेट किंवा कार्योफुरोन हे कीटकनाशक चांगले मिसळावे आणि पावसाळ्यात जून-जुलै महिन्यात कलमांची लागवड करावी.

वळण आणि छाटणीच्या पद्धती:

  • बोराच्या नवीन झाडांना सुरुवातीपासूनच योग्य वळण देणे आवश्यक असते.
  • डोळा फुटल्यानंतर खुंटरोपावर येणारी नवीन फुट वेळच्या वेळी काढून टाकून डोळ्यातून येणारी नवीन फुट जोगदारपणे वाढू द्यावी.
  • नवीन फुटींना बांबूच्या काठीचा आधार द्यावा.
  • मुख्य खोड आणि 3-4 फांद्या व त्यावरील उप फांद्याचा मजबूत सांगाडा तयार करून घ्यावा.
  • वळण देण्याचे काम पहिल्या तीन वर्षात पूर्ण करावे.
  • बोराचा बहार नवीन फुटीवर येत असल्यामुळे अधिक उत्पादनासाठी झाडांवर जास्तीत-जास्त नवीन फुट असणे आवश्यक आहे. त्यामुळे बोराची छाटणी उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाची आहे.
  • यासाठी झाडाची पानगळ झाल्यानंतर मे महिन्याच्या पहिल्या आठवळ्यात सांगडा कायम ठेऊन सांगड्‌यावरील मागील हंगामातील फांद्याची छाटणी करावी.
  • छाटणी करताना दाटी करणाऱ्या तसेच अति लहान फांद्या तळापासून काढून टाकाव्यात.
  • झाडाच्या सांगड्‌यावरील चार उपफांद्यावरील छाटणी करावी.
  • चार उपफांद्यापर्यंत छाटलेल्या फांदीवर 14-18 डोळे येतात.

आंतरपिके आणि तणनियंत्रण:

  • बोराची लागवड हलक्या जमिनीत केली जात असल्यामुळे अशा जमिनीचा पोत टिकविण्यासाठी पहिली दोन-तीन वर्षे खरीप हंगामात मुग, मटकी यासारखी द्वीदल पिके आंतरपिके म्हणून घेणे फायद्याचे ठरते.
  • तणांचा योग्य वेळी बंदोवस्त न केल्यास बोराच्या झाडांची वाढ योग्यरीत्या होत नाही आणि उत्पादनही कमी होते. म्हणून तणे वेळच्या वेळी खुरपून काढून टाकावीत.

महत्वाच्या किडी:

  • फळमाशी
  • साल पोखरणारी अळी
  • केसाळ अळी
  • पिठ्या ढेकूण

महत्वाचे रोग:

  • भुरी
  • तांबेरा
  • पानांवरील ठिपके
  • पानांवरील काजळी
  • फळकुज

काढणी आणि उत्पादन:

  • बोराच्या डोळा भरलेल्या झाडाला साधारणपणे दुसऱ्या वर्षापासून फळे येतात.
  • सुरुवातीचे उत्पादन कमी असते. नंतर झाडाच्या वयाप्रमाणे उत्पादनात वाढ होते.
  • सर्वसाधारणपणे पावसाळी हंगामात जुलै, ऑगस्ट महिन्यात फुलोरा येऊन नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यापर्यंत फळे काढणीसाठी तयार होतात.
  • सर्वच फळे एकाच वेळी पक्व होत नाही त्यामुळे 3-4 वेळा फळांची तोडणी करावी.
  • बोराच्या पाच वर्षाच्या झाडापासून सरासरी 40-50 किलोपर्यंत तर 8-10 वर्षाच्या झाडापासून 80-100 किलोपर्यत उत्पादन मिळते.

अशा प्रकारे योग्य रित्या, आपल्या शेतातील मातीनुसार योग्य हवामानानुसार बोराची लागवड केल्यास भरपूर उत्पादन मिळू शकते. तुम्ही तुमच्या बोर पिकाच्या लागवडीकरता कोणते तंत्र वापरता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “बागायती पिके” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. बोर लागवडीसाठी योग्य हवामान कोणते?

बोराची वाढ उष्ण आणि कोरड्या हवामानात चांगली होते.

2. बोर लागवडीसाठी कोणती जमीन योग्य असते?

बोराचे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत येते.

3. बोराच्या झाडापासून किती उत्पादन मिळते?

बोराच्या पाच वर्षाच्या झाडापासून सरासरी 40-50 किलोपर्यंत तर 8-10 वर्षाच्या झाडापासून 80-100 किलोपर्यत उत्पादन मिळते.

29 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ