पोस्ट विवरण
सुने
उर्वरक
कृषि
कृषि ज्ञान
शेतकरी डॉक्टर
DeHaat Channel
1 Oct
Follow

पिकांमध्ये कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे आणि उपाय (Calcium deficiency symptoms and remedies in crops)

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

वर्षानुवर्षे एकाच जमिनीमध्ये सलग पीक घेतल्यामुळे जमिनीतील अन्नसाठा कमी होऊन जमिनीची उत्पादकता कमी होत जाते. जमिनीतील अन्नद्रव्यांचे योग्य प्रमाण आणि उत्पादन वाढविण्यासाठी पिकात प्रत्येक पोषक घटकाचा संतुलित वापर करणे आवश्यक असते. पिकाच्या योग्य वाढीसाठी लागणारे पोषक घटक वेळीच उपलब्ध न झाल्यास पिकाच्या अंतर्गत क्रिया व्यवस्थित चालत नाही. आज आपण याच पोषक घटकांपैकी महत्वाच्या अशा कॅल्शियमच्या कमतरतेच्या लक्षणांविषयी आणि उपायांविषयी जाणून घेणार आहोत.

कॅल्शियम म्हणजे नेमकं काय?

कॅल्शियम हे नत्र, स्फुरद व पालाश अन्नद्रव्याप्रमाणेच पीक पोषणात महत्त्वाचे असे दुय्यम अन्नद्रव्य आहे. त्याच्या वापरासंदर्भात माहिती जाऊन घेणे आवश्‍यक असून, त्याचा डोळसपणे वापर केल्यास पीकपोषण चांगल्या प्रकारे होते. कॅल्शियम पिकांच्या महत्त्वाच्या शरीरक्रियांमध्ये महत्त्वाचे अन्नद्रव्य आहे. त्याचप्रमाणे नत्रयुक्त खतांचा (युरिया) कार्यक्षम वापर वाढविण्यासाठी विद्राव्य कॅल्शियममुळे मदत होते. त्यामुळेच खताद्वारे पिकांना कॅल्शियम देणे गरजेचे असते. (उदा. कॅल्शियम नायट्रेट) मात्र पिकांना कॅल्शियमचा पुरवठा हा कमतरतेची लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसून आल्यानंतरच करावा लागतो.

कॅल्शियमची जमिनीत किती प्रमाणात व कशा स्वरूपात उपलब्ध असते?

  • निसर्गात कॅल्शियम सुमारे ३.६ टक्के असून, तो ॲम्फीबोल, ॲपेटाइट, कॅलसाइट, डोलोमाइट, फेल्डस्पार, जिप्सम आणि पायरॉक्सिन यासारख्या स्वरूपामध्ये आढळते. जमिनीमध्ये चुना किंवा कॅल्शियम कार्बोनेट निसर्गतः आढळणारे संयुग आहे. जमिनीत कॅल्शियम साधे क्षार, विद्राव्य स्वरूपात व विनिमययुक्त कॅल्शियम इत्यादी स्वरूपात उपलब्ध असते.
  • जमिनीत कॅल्शियम (Ca++) हे रासायनिकदृष्ट्या धनप्रभारित असते. कॅल्शियम मातीच्या व सेंद्रिय घटकांच्या कणांवर घट्ट चिकटून राहिल्यामुळे पाण्याद्वारे नत्राप्रमाणे कॅल्शियमचे वहन होत नाही.
  • कॅल्शियम जमिनीचे भौतिक व रासायनिक गुणधर्म चांगले ठेवण्यास मदत करते. ज्या जमिनीत कॅल्शियमचे प्रमाण मॅग्नेशिअम व सोडिअमपेक्षा जास्त असते, तिथे जमिनीची मशागत सोपी व सहज होते. कॅल्शियममुळे जमिनीची पाणीनिचरा क्षमता चांगली राहते. मुळांसाठी हवा खेळती राहते.
  • जमिनीचा सामू ७ ते ८.५ दरम्यान असल्यास कॅल्शियमची उपलब्धता जास्त असते, तर आम्लयुक्त जमिनीत (६ पेक्षा कमी सामू) कॅल्शियम कमी प्रमाणात असते.
  • आम्लधर्मी जमिनीप्रमाणेच चोपण जमिनीत सोडियमचे प्रमाण अधिक असल्यामुळे पिकांना कॅल्शियमची उपलब्धता कमी होते. अशा जमिनीसाठी पिकांना कॅल्शियमयुक्त खताचा वापर फायदेशीर ठरतो.

कॅल्शियमची वनस्पतीच्या शरीरांतर्गत कार्ये खालीलप्रमाणे आहेत:

  • पेशी मजबूत ठेवणे:

पेशी भित्तिका (सेल वॉल) मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियम मदत करते. कॅल्शियममुळे पेशी भित्तिका मजबूत व जाड बनतात. पेशीमध्ये पेक्टिन व पॉलिसॅकराइड आधारक तयार होण्यासाठी कॅल्शियम गरजेचे असते. या घटकांमुळे पेशींना मजबुती येते. पिकांच्या पेशी, उती व अवयवांची लवकर वाढ व पिकांना मजबुती कॅल्शियममुळेच मिळते.

  • फूल व फळधारणा:

पिकांमध्ये फूल, फळधारणाक्षमता वाढविण्यासाठी कॅल्शियम मदत करते.

  • पिकांची प्रत:

पिकांची प्रत उत्तम राहण्यास व उत्पादन अधिक काळ टिकून राहण्यास कॅल्शियम मदत करते.

  • उष्णतेपासून पिकांचे संरक्षण:

पिकांमध्ये सर्वांत महत्त्वाची वातावरणातील प्रकाश संश्‍लेशण क्रिया असते. वातावरणातील तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक झाल्यास प्रकाश संश्‍लेषण क्रिया मंदावते. अति उष्णतेमुळे झाडांचे खोड लांब होते, तर पानांचा आकार लहान होतो. या सर्व घटकांशी लढा देण्यासाठी पिकांना कॅल्शियम गरजेचे असते. कॅल्शियममुळे पिकामध्ये उष्माघातविरोधी प्रथिने तयार केली जातात.

  • रोगप्रतिकारक क्षमता:

कॅल्शियम पिकांमध्ये बुरशीजन्य व जिवाणुजन्य रोगांविरुद्ध रोगप्रतिकारक क्षमता वाढवते. पिकांमध्ये कॅल्शियमची कमतरता असल्यास, बुरशींचा प्रादुर्भाव होऊन पाणीवहन करणाऱ्या नलिकेवर (xylem) विपरीत परिणाम होतो. पेशीभित्तिकांना पाणी व अन्नपुरवठा करणाऱ्या अवयवांची झीज होऊन मर रोगाची लक्षणे पिकांत दिसून येतात.

  • अन्नद्रव्याचे शोषण:

अन्नद्रव्ये शोषण करणाऱ्या प्रथिनांच्या कार्यात कॅल्शियम महत्त्वाची भूमिका बजावते, त्यामुळे अन्नद्रव्यांचे मुळांद्वारा शोषण होऊन पिकांच्या प्रत्येक भागाला अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो. कॅल्शियम नायट्रेट किंवा कॅल्शियम अमोनियम नायट्रेट पाण्यात सहज विरघळत असल्याने पाण्याद्वारे व ठिबक सिंचनाद्वारे दिल्यास फायदा होतो.

  • भूसूधारक:

कॅल्शियमचा वापर भूसुधारकांमध्येही होतो. कॅल्शियमयुक्त खतांचा वापर जमिनीची आम्लता कमी करण्यासाठी आणि मातीची जडणघडण चांगली राखण्यासाठी केला जातो.

कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे:

  • कॅल्शियम पिकांच्या मुळांची व पिकांची वाढ लवकर करण्यास मदत करते.
  • कॅल्शियममुळे नत्र, लोह, बोरॉन, जस्त, तांबे आणि मँगेनिजचे पिकांमध्ये शोषण वाढवले जाते.
  • कॅल्शियममुळे पिकांच्या गुणसूत्रांना स्थिरता येते.
  • कॅल्शियममुळे पिकांमध्ये शर्करेचे वहन चांगले होण्यास मदत होते.
  • कॅल्शियममुळे बीजोत्पादन चांगले होते.

पीकनिहाय लक्षणे:

  • मका पिकात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे नवीन पाने चिकटतात, पानांची वाढ चांगली होत नाही, तसेच नवीन पाने गुंडाळतात.
  • टोमॅटो पिकाला फळांच्या वरच्या भागापासून तडा जातो व नंतर फळे काळी पडतात.
  • भुईमूग या पिकात शेंगा पोकळ व लहान बनतात. शेंगांच्या आतून काळा पदार्थ निघतो. शेंगबिया व्यवस्थित भरत नाहीत. भुईमूग पिकाला कॅल्शियमची योग्य मात्रा दिली असता शेंगकूज रोग उद्‍भवत नाही. तसेच शेंगा चांगल्या भरल्या जातात.
  • गाजर फळांवर खवले पडतात. गाजरे डागाळतात.
  • बटाटा पिकात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे फळांच्या आतला भाग लालसर तपकिरी किंवा काळा होतो, तसेच साठवण क्षमता कमी होते.
  • कोबीच्या आतील पानांच्या कडा जळतात. पाने कुजतात.
  • फळांची प्रत कमी होते व फळे लवकर खराब होतात.
  • कॅल्शियममुळे फळ पिके, भाजीपाला पिके यांचाही बुरशीजन्य व जिवाणुजन्य रोगांपासून बचाव होतो. पिथियम, रायझोक्टोनिया, फ्युजारियम, कोलोट्रोटिकम, बोट्राइटीस, ब्लाइट, स्लेटोटिनिया, हैलमिथेस्पारियम यासारख्या रोगापासून संरक्षण मिळण्यास मदत होते.

कॅल्शियम योग्य प्रमाणात मिळावा यासाठी उपाय:

  • कॅल्शियम नायट्रेट (देहात न्यूट्री - CaNO3) 3 किलो प्रति एकर द्यावे.
  • कमतरतेची लक्षणे दिसू लागताच चिलेटेड कॅल्शियम 10% (आनंद ऍग्रो केअर-इन्स्टा प्रोचेल) 15 ग्रॅम 15 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

तुमच्या पिकांमध्ये कॅल्शियमच्या कमतरतेची कोणती लक्षणे दिसून आली व तुम्ही काय उपाययोजना केल्या? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी डॉक्टर” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. कॅल्शियम म्हणजे नेमकं काय?

कॅल्शियम हे नत्र, स्फुरद व पालाश अन्नद्रव्याप्रमाणेच पीक पोषणात महत्त्वाचे असे दुय्यम अन्नद्रव्य आहे.

2. अन्नद्रव्यांची कमतरता आढळून आल्यास काय करावे?

शक्य तितक्या लवकर कमतरता असलेले अन्नद्रव्य घटक असलेल्या खताची फवारणी करावी किंवा जमिनीतुन द्यावे.

3. मका पिकात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे काय लक्षणे दिसून येतात?

मका पिकात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे नवीन पाने चिकटतात, पानांची वाढ चांगली होत नाही, तसेच नवीन पाने गुंडाळतात.

22 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ