पोस्ट विवरण
पावसाळ्यात घ्या जनावरांची अशी काळजी (Care of Animals in Rainy season)
नमस्कार पशुपालकांनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
सध्या पावसाला सुरुवात झाली आहे. राज्याच्या विविध भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. या परिस्थितीत जनावरांची मोठी गैरसोय होते. प्रत्येक ऋतूमध्ये वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. विशेषतः पावसाळ्यात जनावरांची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. कारण पावसाळ्यात हवेतील वाढलेल्या आर्द्रतेमुळे जीवजंतूचा प्रादुर्भाव वाढतो. तसेच खाद्यामध्ये बदल झाल्यामुळे पोटाचे आजार उद्भवतात. ओलसरपणामुळे गोठ्यात विविध रोगजंतूंची वाढ होऊन जनावरे आजारी पडण्याची शक्यता असते. त्यासाठी पावसाळ्यात गोठा, खाद्य आरोग्यावर भर देऊन जनावरांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. म्हणूनच आजच्या या भागात आपण पावसाळ्यात जनावरांची कशी काळजी घ्यावी याविषयी जाणून घेणार आहोत.
गोठा व्यवस्थापन:
- गोठ्यात पाणी येणार नाही याबाबत काळजी घ्यावी.
- पोटॅशियम परमँगनेटच्या द्रावणानी गोठा धुवून घ्यावा.
- पावसाचे पाणी गोठ्याच्या आत येऊ नये, यासाठी ताडपत्रीचे पडदे बाजूने लावावे. त्यामुळे पाणी आत येऊन गोठा ओला होणार नाही.
- गोठ्यात सुर्यप्रकाशासोबतच हवा खेळती राहण्यासाठी खिडक्या असणं गरजेचे आहे. त्यामुळे गोठ्यातील जागा कोरडी राहण्यास मदत होईल व गोठ्यातील जनावरे एकाच ठिकाणी जास्त वेळ बसून रवंथ करतील.
- गोठ्यात पडलेले छोटे-छोटे खड्डे मुरम किंवा रेतीने भरून घ्यावे.
- जनावरांचे मलमूत्र वेळीच स्वच्छ करून गोठा कोरडा करावा.
- निश्चित कालावधीत गोठ्याचे निर्जंतुकीकरण करावे.
चारा व्यवस्थापन:
- जनावरांना पावसाने भिजलेला ओला चारा खाण्यासाठी देऊ नये.
- ओले गवत मऊ असल्यानं जनावरे ते कमी वेळेत अधिक प्रमाणात खातात. परंतू, त्यात पाण्याचे प्रमाण अधिक आणि तंतूमय पदार्थ कमी असल्यानं जनावरांची पचनक्रिया बिघडून त्यांना जुलाब होतात. त्यामुळं जनावरांसाठी देण्यात येणारं पशुखाद्य किंवा सुका चारा कोरडा राहील याबाबत दक्षता घ्यावी.
पाऊस असताना जनावरांची अशाप्रकारे घ्या काळजी:
- जनावरांना बाहेर चरण्यासाठी घेवून जाताना विशेष काळजी घ्यावी.
- जनावरांना पाऊस किंवा विजा पडत असताना झाडाखाली घेवून थांबू नये.
- जवळपास निवारा असल्यास त्याठिकाणी घेवून थांबावं.
- पावसाळ्याच्या सुरुवातीस बागायती क्षेत्रात फुलीचे गवत मोठ्या प्रमाणात आढळून येते. जनावरांनी फुलीचे गवत खाल्ल्यास विषबाधेमुळे कॅल्शियमचे प्रमाण कमी होऊन जनावरे दगावतात. विशेषत मेंढ्यामध्ये हा प्रकार आढळून येतो. त्यामुळे पशुपालकांनी योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे.
पावसाळ्यात जनावरांना होणारे संभाव्य आजार:
पोटफुगी:
पावसाळ्यात जनावरांनी नव्याने उगवलेला हिरवा चारा जास्त प्रमाणात खाल्ल्यास जनावरांमध्ये पोटफुगी दिसून येते. तसेच पोट फुगण्यामुळे अति वजनाचा हृदय आणि फुफ्फुसावर ताण येऊन जनावर दगावण्याची शक्यता असते.
उपाय:
- पोटफुगी टाळण्याकरिता पावसाळ्यात जनावरांना हिरव्या चाऱ्यासोबत सुके खाद्य दोन ते तीन किलो या प्रमाणात द्यावे. त्यामुळे जनावरांची पचनसंस्था व्यवस्थितरीत्या कार्य करते.
- जनावरांना दिवसभर फक्त कोवळा हिरवा चारा खाऊ घालू नये.
पायाच्या खुरांना जखमा होणे:
पावसाळ्यात बाहेर जनावरे चरायला सोडल्यामुळे चिखलामध्ये चालून त्यांच्या खुरांना जखमा होण्याची शक्यता असते. त्यामुळे पायांना वेदना होऊन जनावर लंगडते.
उपाय:
- जखम झालेली जागा पोटॅशिअम परमॅग्नेटच्या साह्याने स्वच्छ धुऊन मलमपट्टी करावी. जनावरे जास्त चिखल असलेल्या ओबडधोबड ठिकाणी चरायला सोडू नयेत.
- गोठ्यातील खड्डे बुजवून घ्यावेत. गोठा स्वच्छ आणि कोरडा ठेवावा.
बुळकांडी:
- हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे पावसाळ्यात याचा संसर्ग झपाट्याने होतो.
- बाधित जनावरांच्या जिभेवर, आतड्यांवर तसेच त्वचेवर लहान फोड येतात. तसेच शेणाला दुर्गंधीयुक्त वास येतो.
- जनावराला ताप येऊन डोळ्यांतून व नाकातून सतत पाणी वाहते.
- डोळे लालसर होतात.
उपाय:
- प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण करून घ्यावे.
- गोठ्याची नियमित स्वच्छता राखावी.
- बाधित जनावरांना इतर जनावरांपासून वेगळे ठेवावे.
तुम्ही पावसाळ्यात तुमच्या जनावरांची काळजी कशाप्रकारे घेता? या विषयीची माहिती इतर पशुपालकांसह शेयर करा. या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, अशा अजून माहितीसाठी "पशु ज्ञान" चॅनेलला फॉलो करा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. जनावरांच्या गोठ्याचे प्रकार किती व कोणते?
जनावरांचे गोठे तीन प्रकारचे असतात. आधुनिक पद्धतीचा बंदिस्त गोठा, अर्धबंदिस्त गोठा आणि मुक्त संचार गोठा.
2. जनावरांमध्ये पोटफुगी कशामुळे दिसून येते?
पावसाळ्यात जनावरांनी नव्याने उगवलेला हिरवा चारा जास्त प्रमाणात खाल्ल्यास जनावरांमध्ये पोटफुगी दिसून येते.
3. जनावरांच्या पायाच्या खुरांना जखम झाल्यास काय करावे?
जनावरांच्या पायाच्या खुरांना जखम झाल्यास जखम झालेली जागा पोटॅशिअम परमॅग्नेटच्या साह्याने स्वच्छ धुऊन मलमपट्टी करावी.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ