पोस्ट विवरण
सुने
कृषि
गाजर
कृषि ज्ञान
कृषी ज्ञान
DeHaat Channel
23 Feb
Follow

गाजर लागवड तंत्रज्ञान (Carrot Cultivation)


गाजर लागवड तंत्रज्ञान (Carrot Cultivation)

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

एकंदरीत बाजारपेठेचा विचार करता गाजर हे कायम चांगली मागणी असलेले कंदवर्गीय पीक आहे. गाजर महाराष्ट्रातच नाही तर भारत देशात लोकप्रिय आहे त्यामुळे गाजर लागवडीतून आपल्याला चांगला नफा मिळू शकतो. या लेखामध्ये आपण गाजर लागवड तंत्रज्ञानाविषयी जाणून घेणार आहोत.

हवामान (Weather) :

  • गाजर पिकासाठी 8 ते 28 अंश सेल्सिअस तापमान योग्य असते.
  • गाजराला आकर्षक रंग येण्‍यासाठी तापमान 15-20 अंश से. असावे लागते.
  • 10 ते 15 अंश से. तापमानाला तसेच 20 ते 25 अंश से. तापमानाला गाजराचा रंग फिक्‍कट असतो.
  • उत्‍तम वाढीसाठी 18 ते 24 अंश से. तापमान अतिशय पोषक आहे.
  • जास्त उष्ण तापमान असलेल्या भागात गाजराची वाढ होत नाही.
  • गाजर हे थंड हवामानातील पीक आहे.

जमीन (Soil) :

  • गाजर हे कंदवर्गीय पीक असल्यामुळे गाजराची वाढ व्यवस्थित होण्यासाठी जमीन मऊ आणि भुसभुशीत असणे गरजेचे आहे.
  • प्रामुख्याने यासाठी खोल, भुसभुशीत तसेच गाळाची व पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी.
  • तर पाणी साचलेल्या जमिनीत मुळे कुजण्याची व पीक निकामी होण्याचा धोका राहतो.

लागवड कालावधी (Cultivation) :

  • महाराष्‍ट्रात गाजराची (Carrots) लागवड खरीप आणि रब्‍बी या दोन्ही हंगामात केली जाते.
  • रब्‍बी हंगामातील (Rabbi season) गाजरे जास्‍त गोड आणि उत्‍तम दर्जाची असतात.
  • खरीप हंगामातील लागवड जून ते जूलै महिन्‍यात करतात.
  • आणि रब्बी हंगामात लागवड करायचा विचार असल्यास ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत करणे फायद्याचे ठरते.

गाजर लागवडीसाठी योग्य जाती (Varieties) :

गाजर लागवड करण्यासाठी आपल्याला याच्या योग्य जाती माहीत असणे गरजेचे आहे. गाजर पिकातून चांगल्या उत्पादनासाठी कंट्री रेड - ऍडव्हांटे सीड्स, न्यू कुरोडा - टोकीटा सीड्स अश्या अनेक जाती आहेत त्यातील आपण आपल्या विभागानुसार निवडून लागवड करू शकता.

लागवड पध्‍दती (Cultivation methods) :

  • गाजराच्‍या लागवडीसाठी जमिन खोल उभी-आडवी नांगरुन घ्‍यावी व सपाट करुन घ्‍यावी.
  • बी सरीवरंब्‍यावर पेरावे यावेळी दोन वरंब्‍यातील अंतर 45 सेमी ठेवावे.
  • बियाची टोकून पेरणी करतांना 30 ते 45 सेमी अंतरावर सरी ओढून दोन्‍ही बाजूंनी 15 सेमी अंतरावर टोकन पध्‍दतीने लागवड करावी.
  • पाभरीने बी पेरतांना दोन ओळीत 30 ते 45 सेमी अंतर ठेवावे आणि नंतर विरळणी करुन दोन रोपातील अंतर 8 सेमी ठेवावे.
  • गाजराचे बियाणे उगवून येण्‍यासाठी पेरणीनंतर 12 ते 15 दिवस लागतात.
  • पेरणीपूर्वी बियाणे 24 तास पाण्‍यात भिजत ठेवल्‍यास हा काळ कमी करता येतो.

गाजर लागवडीसाठी एकरी बियाणे (Acre Seed) :

  • एक एकर क्षेत्रासाठी गाजराचे सुमारे 1.6 ते 2 किलो बियाणे लागते.

आंतरमशागत:

  • रोपे तीन ते चार सें.मी. उंचीची झाल्यावर विरळणी करावी.
  • नियमितपणे खुरपणी करून शेत स्वच्छ ठेवावे.
  • पाल्याची वाढ मर्यादित ठेवून मुळांची वाढ जोमदार होण्यासाठी उगवणीनंतर 50 दिवसांनी 500 पीपीएम सायकोसील संजीवक फवारावे.
  • गाजर काढण्यापूर्वी 15-20 दिवस पाणी देणे बंद करावे. त्यामुळे गाजरात गोडी निर्माण होते.

खत व्यवस्थापन (Fertilizer Management) :

  • गाजराच्या पिकाला एकरी 32 किलो नत्र, 24 किलो स्फुरद आणि 24 किलो पालाश द्यावे.
  • नत्राची अर्धी मात्रा आणि स्फुरद व पालाश याची संपूर्ण मात्रा पेरणीपूर्वी द्यावी आणि नत्राच्या उर्वरित अर्धी मात्रा लागवडीनंतर 20 दिवसांनी देणे फायद्याचे ठरते.
  • शेणखत:
  • गाजर पिकासाठी निवडलेल्या शेतात शेणखत टाकणे अत्यंत महत्त्वाचे असते कारण त्यामुळे शेतातील उत्पादन वाढते.
  • शेणखत टाकण्याआधी जमीन 2 ते 3 वेळा नांगरणी करून व्यवस्थित भुसभुशीत करून घ्यावी.
  • शेवटच्या नांगरणीच्या वेळी एकरी 14 टन शेणखत वापरल्यास गाजराचे चांगले उत्पादन येण्यास मदत होते.

पाणी व्यवस्थापन (Water Management) :

  • गाजराची लागवड केल्यानंतर लगेच हलक्या स्वरूपात पाण्याचा पुरवठा करावा व उगवण झाल्यानंतर नियमितपणे पाणी देऊन पिकाच्या साठ दिवसाच्या कालावधीत चांगला ओलावा टिकून राहील याची काळजी तंतोतंत घ्यावी.
  • हिवाळ्यामध्ये विचार केला तर सात ते आठ दिवसांच्या अंतराने जमिनीचा मृदगर आणि पिकांची गरज ओळखून पाणी द्यावे.
  • गाजर काढण्यापूर्वी जवळजवळ 15 ते 20 दिवस पाणी तोडावे. असे केल्याने गाजरामध्ये गोडवा निर्माण होतो.

गाजरामधील कीड व रोग (Pests and Diseases) :

गाजर पिकावर प्रामुख्याने तुडतुडा, मावा आणि भुंगे या किडींचा उपद्रव दिसून येतो तर, करपा, भुरी तसेच मर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो.

काढणी (Harvesting) :

  • साधारणपणे या पिकाची लागवड केल्यानंतर तीन महिन्यात काढणीसाठी हे पीक तयार होते.
  • गाजर पीक काढणीपूर्वी 15 ते 20 दिवस आधी पिकाला पाणी देणे बंद करावे. त्यानंतर कुदळीने खोदून किंवा हाताने उपटून किंवा बैल नांगराच्या साह्याने गाजराची काढणी करावी.
  • व्यवस्थित व्यवस्थापन केले तर एका एकरमध्ये 8 ते 10 टन उत्पादन यापासून मिळते.

तुम्ही तुमच्या गाजर पिकाची लागवड करताना कोणते तंत्र अवलंबता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. गाजर लागवड कधी करावी?

खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात गाजर लागवड केली जाते. खरीप हंगामातील लागवड जून व जुलै महिन्यात करता येते तर रब्बी हंगामातील लागवड ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत करणे फायद्याचे ठरते.

2. गाजर लागवडीसाठी जमिनीचा सामू किती असावा?

गाजर लागवडीसाठी जमिनीचा सामू सहा ते सात असावा.

3. गाजर वाढण्यास किती वेळ लागतो?

गाजर वाढीसाठी तीन महिन्यांचा कालावधी लागतो.

59 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ