मोसंबीचे फळ पिवळे पडण्याची कारणे आणि व्यवस्थापन (Causes and management of yellowing of Sweet Lime/Mosambi fruits)

नमस्कार शेतकरी मित्रांनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
मोसंबी ही फळे भारतातच नव्हे तर जगात प्रसिद्ध आहे. उत्कृष्ट स्वाद, चव व आकर्षक पिवळ्या रंगांसह मोसंबी हे पोषक, उत्साहवर्धक, स्वादिष्ट व स्वास्थवर्धक फळ असल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने देखील महत्वाचे आहे. निसर्गतः मोसंबी फळझाडास वर्षातून तीन वेळा बहार येतो. याच मोसंबी पिकात फळ, पाने पिवळी पडण्याची समस्या दिसून येते आजच्या या भागात आपण त्याची कारणे व करावयाचे व्यवस्थापन याविषयी जाणून घेणार आहोत.
मोसंबीचे फळ पिवळे पडण्याची कारणे (Causes of yellowing of Mosambi fruits):
- काही मोसंबी बागांमध्ये पाण्याचा अतिरिक्त ताण, फायटोप्थोरा बुरशीचा प्रादुर्भाव, क्लोरोसीस विकृती, शेंडे मर यामुळे पाने-फळे पिवळी पडत असल्याचे दिसत आहे. त्याचे नेमके कारण शोधून, योग्य ती उपाययोजना करावी.
- कमी तापमान व पाण्याचा ताण यामुळे झाडाच्या पानाखालील पर्णरंध्राचे (स्टोमॅटा) तोंड बंद होते. प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया अतिशय मंदावते. परिमाणी झाडातील अन्नद्रव्यांचा संतुलित पुरवठा पानांना होत नाही. पानांना मुख्य अन्नद्रव्ये (उदा. नत्र, स्फुरद, पालाश) व जस्त व लोहासारखी सूक्ष्म अन्नद्रव्ये यांची कमतरता भासते. यामुळे शरीरक्रियेतील चयापचयामध्ये बिघाड निर्माण होऊन कर्बोदकांचा पुरवठा कमी होतो.
- संजीवकांच्या असंतुलनामुळे पानातील हरीतद्रव्यांचा क्षय झपाट्याने वाढतो. यामुळे पाने पिवळी पडतात. अशी पाने लवकर गळून पडतात. अशा विकृतीस क्लोरोसीस असे संबोधतात.
- काही बागांमध्ये झाडाचा एकच भाग किंवा एकच फांदी पिवळी पडल्याचे दिसून येते. झाडाचा तजेलपणा नाहीसा झालेला दिसतो. अशा झाडांवर फायटोप्थोरा बुरशीचा प्रादुर्भाव दिसून येतो.
- काही बागांमध्ये कोवळ्या तसेच पक्व हिरव्या फांद्या शेंड्यापासून खाली वाळल्याचे दिसते. फांदीचा शेंड्यापासून खाली वाळत आलेला भाग पांदूरका झालेला व त्यावर सूक्ष्म कळ्या गोल पुटकुळ्या दिसून येतात. या विकृतीला शेंडेमर म्हणून ओळखले जाते.
- ज्या बागेत मोसंबीला मृग बहरासाठी ताण देण्यात आला, परंतु योग्य पाऊस किंवा वातावरणाअभावी मृग बहर फुटला नाही. अशा बागेत पुनश्च आंबिया बहराकरिता ताण दिला असल्यास ताण व अन्नद्रव्यांचे योग्य नियोजन नसल्याने पाने पिवळी पडण्यासोबतच पानगळ वाढण्याची शक्यता असते.
- जुन्या मोसंबी बागेमध्ये त्याच जागेवर व खड्यामध्ये मातीचे निर्जंतुकीकरण न करता नवी लागवड केलेली असल्यास रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्याचप्रमाणे रोगमुक्त कलम वापरण्याऐवजी वाफ्यावरील कलम वापरले असल्यास रोगाची तीव्रता वाढू शकते.
- चुनखडीचे प्रमाण 10 टक्क्यांपेक्षा अधिक असलेल्या जमिनीत मोसंबी लागवड केल्यास स्फुरद, पोटॅश, कॅल्शिअम, झिंक व मॅग्नेशिअम या अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होते. परिणामी वरील लक्षणांची तीव्रता वाढते.
मोसंबी पिवळी पडल्यामुळे होणारे नुकसान (Damage due to Mosambi fruit yellowing):
- पानांवर पिवळे डाग दिसू लागतात.
- वनस्पती पुरेशा प्रमाणात अन्न तयार करू शकत नाहीत.
- पिवळी पडल्यामुळे प्रभावित झाडे सुकतात आणि मरतात.
- उत्पादनात घट झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते
उपाययोजना (Management of yellowing of Mosambi fruits):
- पिवळ्या पडत असलेल्या बागेमध्ये अतिरिक्त ताण देणे टाळावे.
- शिफारशीप्रमाणे अन्नद्रव्याचे व्यवस्थापन करावे.
- झाडाचे वय 10 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असलेल्या झाडांसाठी, 1 किलो अमोनियम सल्फेट, 1 किलो सिंगल सुपर फॉस्फेट व 500 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश किंवा 10:26:26 मिश्रखत 2 किलो प्रतिझाड याप्रमाणे झाडाच्या परिघात द्यावी. झाडांचे वय 10 पेक्षा कमी असल्यास खताची मात्रा अर्धी द्यावी.
- सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढण्यासाठी (मृग व आंबियादोन्ही बहरांकरिता) जमिनिद्वारे ः झिंक सल्फेट 200 ग्रॅम, लोह सल्फेट 200 ग्रॅम, बोरॉन 100 ग्रॅम प्रतिझाड फवारणीद्वारे द्यावे: आवश्यकतेनुसार झिंक सल्फेट, लोह सल्फेट अर्धा टक्के, तर बोरॉन 0.1 टक्के किंवा चिलेटेट सूक्ष्म अन्नद्रव्ये 2 ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
खालील रोगांचे वेळीच नियंत्रण केल्यास मोसंबीच्या फळांना पिवळे पणाच्या समस्येपासून वाचवता येऊ शकते:
शेंडे मर :
- या रोगात कोवळ्या तसेच पक्व हिरव्या फांद्या शेंड्यापासून खाली वळतात व त्यामुळे फांद्यावरील पाने पिवळी पडतात व गळतात.
- फांदीचा शेंड्यापासून खाली वाळत आलेला भाग पांढुरका दिसतो व त्यावर सूक्ष्म काळ्या गोल पुटकुळ्या दिसतात.
- या रोगाचा प्रसार हवेद्वारे होतो.
व्यवस्थापन :
- या रोगाच्या व्यवस्थापनासाठी झाडावरील रोगट वाळलेल्या फांद्या म्हणजे साल पावसाळ्यापूर्वी काढून जाळून टाकाव्यात.
- छाटलेल्या ठिकाणी बोर्डो पेस्ट लावावी.
पाय कुज व मूळकूज :
- या रोगात झाडाच्या कलम युतीचा भाग जमिनीत गाडल्या गेल्यास तेथे या रोगाचा प्रादुर्भाव होतो.
- नंतर हा प्रादुर्भाव खोडावर व मुळावर पसरतो.
- झाडाची मुळे कुजतात व बुंधाची साल कुजते.
- पाने निस्तेज होऊन शिरा पिवळ्या पडतात व फळेही गळतात.
- फांद्या आणि खोडाचा भाग काळसर दिसू लागतो.
- मोठ्या मुळ्या कुजण्याचे प्रमाण हळूहळू दिसू लागते अशावेळी संपूर्ण झाड वाळण्याची शक्यता असते.
व्यवस्थापन :
- या रोगाच्या व्यवस्थापनासाठी रोगग्रस्त झाडाचा संपूर्ण वाफा खोदून झाडाच्या मुळ्या उघड्या कराव्यात व सडलेल्या मुळ्या काढून टाकाव्यात.
- वर निर्देशित उपायोजना झाल्यानंतर सायमोक्सॅनिल 8% + मॅन्कोझेब 64% डब्ल्यूपी ( देहात-Versate ) हे मिश्रण असणारे बुरशीनाशक 25 ग्रॅम + 50 मिली जवस तेल + दहा लिटर पाणी घेऊन झाडाच्या परिघामध्ये मिसळावे किंवा आळवणी करावी व मातीने वाफा झाकून घ्यावा.
ट्रिस्टेझा विषाणू:
- हा विषाणूजन्य रोग असून या रोगाचे मुख्य लक्षण म्हणजे रोगग्रस्त झाडाला नवीन फूट न येणे किंवा नवीन फुट आली तर ती अत्याल्प येणे.
- या रोगात पानाचा हिरवेपणा व ताजेपणा कमी होतो.
- संपूर्ण झाड मलूल झालेले दिसते. अशा झाडाची पाने थोड्या कालावधीत गळून जातात व झाडांचा ऱ्हास होतो.
- दुसऱ्या प्रकारात झाडाची पाने मलूल होऊन शिरांसहित पिवळी पडून हळूहळू गळतात त्यामुळे झाडावरील पाने विरळ होतात व फांद्या शेंड्याकडून मरण्यास सुरुवात होते. याला झाडाचा मंद ऱ्हास म्हणतात.
- रोगग्रस्त झाडांना निरोगी झाडापेक्षा अधिक फुले व फळे लागतात.
व्यवस्थापन :
- रोगमुक्त रोपाची लागवड करावी व रोपे बंदिस्त मावा विरहीत रोपवाटिकेत तयार झाली आहेत याची खात्री करून रोपे तयार करण्यासाठी वापरात येणाऱ्या अवजाराचे सोडियम हायपोक्लोराईड च्या एक ते दोन टक्के द्रावणात निर्जंतुकीकरण करून घ्यावे.
- ट्रिस्टेझा वाहक मावा किडीच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट 30% ईसी (टाटा-टाफगोर) 600 मिलिची 300 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
सिट्रस ग्रीनिंग रोग :
- हा जिवाणूजन्य रोग असून या रोगात प्राथमिक लक्षण म्हणजे प्रादुर्भाव झालेल्या पानावर चट्टे आढळतात.
- हे चटके पानाच्या दोन्ही बाजूस कमी-अधिक प्रमाणात दिसतात.
- पानाच्या खालच्या बाजूच्या शिरा फुगतात व त्यानंतर शिरांमध्ये पानाचा भाग पिवळा होण्यास सुरुवात होते आणि शेवटी पाने संपूर्णपणे पिवळी होतात.
- या रोगाचा प्रसार सायला नावाच्या किडी द्वारे मोठ्या प्रमाणात होतो.
व्यवस्थापन :
- लागवडीसाठी रोगमुक्त कलमाचा वापर करावा.
- रोगग्रस्त फांद्या तीस ते चाळीस सेंटीमीटर निरोगी फांदी सह कट कराव्यात.
- प्रत्येक नवीन पालवी फुटण्याच्या वेळेस शिफारशीप्रमाणे व्यवस्थापन योजना अमलात आणून साइट्रस सिला या किडीचे व्यवस्थापन करावे.
- सिट्र्स सायला या कीडीच्या नियंत्रणासाठी, प्रति 300 लिटर पाणी फवारणी
थायामेथोक्झाम 25 % डब्ल्यूजी (देहात - असेर) 90 ग्रॅम किंवा इमिडॅक्लोप्रिड 17.8 % एसएल (IFFCO-इसोगाशी) 150 मिलि किंवा डायफेन्थ्यूरॉन 50 डब्ल्यूपी (धानुका-पेजर) 300 ग्रॅम किंवा डायमिथोएट 30 ईसी (टाटा-टाफगोर) 600 मिलि.
- निमतेल पाण्यात मिसळत नसल्याने प्रति 100 मिलि निमतेलामध्ये 10 ग्रॅम डिटर्जेंट पावडर किंवा 10 मिलि. स्प्रेडर मिसळावे.
फवारणी करताना घ्यावयाची काळजी:
- फवारणीसाठी गढूळ पाणी वापरू नये. स्वच्छ पाणीच वापरावे.
- फवारणी द्रावण प्लास्टिक बकेटमध्ये करावे.
- शक्य झाल्यास फवारणीच्या वेळेस आपण स्वतः शेतात हजर राहावे.
- फवारणीच्या दिवशी ढगाळ वातावरण असल्यास शक्यतोवर फवारणी करू नये व केल्यास बेस्ट स्टीकरचा वापर अवश्य करावा. तरीही ताबडतोब पाऊस पडल्यास फवारणीचा फायदा होत नाही.
- औषध तयार करताना प्रथम थोड्या पाण्यात घेऊन नंतर जास्त पाण्यात मिसळावे व व्यवस्थित ढवळून घ्यावे.
- फवारणी शक्यतोवर सकाळी व दुपारी 4 नंतर करावी. जास्त उन्हामध्ये कृषी रसायनांचे विघटन होते व पाहिजे तसे परिणाम दिसत नाहीत.
- तणनाशकांचा पंप फवारणीसाठी शक्यतोवर वापरू नाही.
- एकाच औषधाचा किंवा एकाच गटातील औषधांचा सतत वापर करू नये.
- कीटकनाशके, बुरशीनाशके, संजीवके, एकत्र फवारताना त्यांची सुसंगतता पडताळून पाहावी. द्रावण घट्ट झाल्यास, फाटल्यास किंवा न विरघळल्यास फवारू नये.
- फवारणीसाठी तयार करून ठेवलेल्या द्रावणाचा ताबडतोब वापर करावा, ते जास्त काळ ठेवू नये.
- फवारणी सर्व झाडावर खालीवर पानांच्या मागे-पुढे एकसमान होईल याची काळजी घ्यावी.
तुम्ही मोसंबी पिवळी झाल्यास काय व्यवस्थापन करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी डॉक्टर” चॅनेलला फॉलो करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. महाराष्ट्रात मोसंबी कुठे पिकते?
महाराष्ट्रामध्ये मोसंबीची लागवड प्रामुख्याने अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, जळगाव, औरंगाबाद जिल्ह्यात आढळते.
2. मोसंबी बागेतील नवतीचा काळ?
मोसंबी बागेला सप्टेंबर महिन्यात नवती फुटते. नवती पहिले १-२ महिने जुन्या पानांतील व फांद्यातील अन्नद्रव्यांवर जगते.
3. आंबिया बहार येण्याचा कालावधी?
आंबिया बहार हा साधरणतः फेब्रुवारी महिन्यात फुटतो. पण तो फुटण्याची क्रिया मागील सप्टेंबर, ऑक्टोंबर महिन्यातच सुरू झालेली असते.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
