पोस्ट विवरण
सुने
कृषि
कृषि ज्ञान
चीकू
बागायती पिके
DeHaat Channel
3 June
Follow

चिकू लागवड (Chikoo Cultivation)

नमस्कार शेतकरी बंधूंनो,

चिकू या पिकाचे उगमस्थान मेक्सिको हा देश असून तेथून त्याचा प्रसार मध्य अमेरिका, फ्लोरिडा, श्रीलंका, जमैका, फिलिपाईन्स, भारत इत्यादी देशांत झाला. भारतात चिकूची पहिली बाग महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात लावण्यात आली. महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू या राज्यांत चिकूची लागवड मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. चिकू हे अतिशय काटक पीक असून महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या जमिनीत येऊ शकते. चिकू हे पीक कमी पाण्यावरही जगू शकते. म्हणूनच तुलनेने कमी निगा राखून या पिकाच्या लागवडीस महाराष्ट्रात भरपूर वाव आहे. काही वर्षांतच चिकू हे एक प्रमुख फळपीक म्हणून निश्चितच लोकप्रिय झाले आहे. चला तर मग जाणून घेऊया चिकू या लोकप्रिय फळाच्या लागवडीविषयीची माहिती.

चिकू पिकासाठी योग्य जमीन (Suitable Land for Chikoo) :

  • चिकूच्या पिकाला सर्व प्रकारची जमीन मानवते. तथापि नदीकाठची, गाळवट, पोयट्याची, समुद्र किनाऱ्याजवळची जमीन अधिक चांगली असते.
  • काळया व भारी जमिनीत निचऱ्यासाठी चर खणून चिकूची लागवड करावी.

चिकू पिकासाठी योग्य हवामान (Suitable Climate for Chikoo) :

  • महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत चिकूची लागवड यशस्वी होऊ शकते.
  • मूळच्या उष्ण प्रदेशातील या फळाला उष्ण व दमट हवामान चांगले मानवते.
  • चिकू पिकाच्या फुलोऱ्याच्या काळात तापमान 43 अंश सेल्सिअसच्या वर गेल्यास फुलोरा गळतो, तसेच किमान तापमान 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यास झाडाची वाढ खुंटते. अशा वेळी लहान झाडांची विशेष काळजी घ्यावी लागते.

चिकू पिक लागवडीसाठी सुधारित जाती (Varieties for Chikoo) :

महाराष्ट्रात चिकूच्या कालीपत्ती व क्रिकेट बॉल या प्रमुख जाती लागवडीखाली आहेत तसेच कीर्ती भारती, को1,पिली पत्ती, बारमासी, पी के एम 7, पी के एम 2 या सुद्धा चिकूच्या सुधारित जाती आहेत.

चिकू लागवडीचा हंगाम (Chikoo Cultivation Season) :

चिकूची लागवड प्रामुख्याने जुलै आणि ऑगस्ट महिन्यात करावी.

चिकू लागवड तंत्र (Chikoo Cultivation Method) :

  • लागवड करण्यापूर्वी जमिनीची नांगरणी व कुळवणी करून जमीन भुसभुशीत करून घ्यावी.
  • दहा बाय दहा मीटर अंतरावर 1 मीटर बाय एक मीटर बाय एक मीटर आकाराचे खड्डे खोदावेत.
  • या खड्ड्यांमध्ये पोयटा माती, दोन ते तीन पाट्या शेणखत, एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट, निंबोळी पावडर 200 ग्रॅम या मिश्रणाने खड्डे भरावेत.
  • खड्ड्यात कलम लावताना खड्ड्याच्या मध्यभागी कलमाचा जोड जमिनीच्या वर राहील या पद्धतीने लावावा.
  • कलमाला काठीचा आधार द्यावा लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे.

चिकू पिकाच्या अभिवृद्धी, कलमांची निवड आणि लागवड पद्धती:

  • चिकूची अभिवृद्धी बियांपासून, तसेच शाखीय पद्धतीने, गुटी कलम, भेट कलम व मृदकाष्ठ कलम अशा प्रकारे करता येते.
  • चिकूची बियांपासून अभिवृद्धी केल्यास फळे लागण्यास अधिक काळ लागतो आणि सर्व झाडे सारख्या गुणवत्तेची निपजत नाहीत. म्हणूनच शाखीय पद्धतीने अभिवृद्धी करावी.
  • गुटी कलम पद्धत्तीत चिकूची अभिवृद्धी करता येत असली तरी या पद्धतीने यश कमी प्रमाणात मिळते.
  • भेट कलम किंवा मृदुकाष्ठ कलम लावून केलेली लागवड ही झाडांपासून मिळणारे उत्पादन, वाढविस्तार व कणखरपणा या दृष्टीने अधिक फायद्याची असल्यामुळे ह्या पद्धतीने चिकूची अभिवृद्धी मोठ्या प्रमाणावर केली जाते.
  • भेट कलम आणि मृदुकाष्ठ कलम या दोन्ही पद्धतींत खिरणी (रायणी) या खुंटाचा चिकूची कलमे बांधण्यासाठी उपयोग करतात.
  • खिरणीची रोपे अतिशय हळू वाढतात.
  • खिरणीच्या रोपाला भेट कलम करण्यायोग्य जाडी येण्यासाठी साधारणपणे दोन वर्षे लागतात.
  • कलम बांधणीसाठी खुंटरोपाची कमतरता तसेच कलम तयार होण्यासाठी लागणारा काळ ह्यामुळे चिकूची कलमे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीत.
  • चिकूच्या कलमांची खरेदी करताना पुढील काळजी घ्यावी.
  • खुंट आणि डोळकाडी सारख्याच जाडीचे असावेत.
  • कलम सरळ वाढलेले आणि त्यावर भरपूर निरोगी पाने असावीत.
  • कलम केलेला भाग (सांधा) हा एकरूप झालेला असावा. कलमांची उंची अर्धा मीटर असावी.
  • कलम खिरणीच्या (रायणी) खुंटावरच केलेली असावी. मोहाच्या रोपावरील चिकूची कलमे खरेदी करू नयेत.
  • स्वतः तयार केलेली कलमे अथवा शासकीय किंवा कृषी विद्यापीठाच्या किंवा मान्यताप्राप्त नामांकित रोपवाटिकेतील चिकूची कलमे लागवडीसाठी वापरावीत.

चिकूच्या झाडाला वळण आणि छाटणी:

  • झाडाची नियमित छाटणी करावी लागत नाही. मात्र सुरवातीच्या काळात खिरणी खुंटावर येणारी फूट तसेच झाडाच्या खोडावर जमिनीपासून 50 सेंटिमीटर उंचीपर्यंत येणारी नवीन फूट वेळोवेळी काढून टाकावी.
  • झाडाला योग्य आकार देण्यासाठी आवश्‍यकतेनुसार छाटणी करावी.

चिकूचे खत आणि पाणी व्यवस्थापन:

  • चिकूची जलद वाढ होण्यासाठी खताच्या मात्रा दोन समान टप्प्यात विभागून द्याव्या. साधारणतः सप्टेंबर आणि जून या महिन्यात खतमात्रा द्याव्यात.
  • पूर्ण वाढ झालेल्या झाडांना शंभर किलो शेणखत, तीन किलो नत्र, दोन किलो स्फुरद व दोन किलो पालाश द्यावे.
  • झाडांची चांगली वाढ आणि त्यापासून भरपूर उत्पादन मिळविण्यासाठी पाण्याच्या नियमित पाळा द्याव्यात.
  • झाडाच्या फुलोरा धरण्याच्या काळात तसेच फळधारणेच्या अवस्थेत चिकूच्या झाडाला पाण्याचा ताण पडल्यास फळांचा आकार लहान राहतो.

चिकूमध्ये घेता येणारी आंतरपिके:

  • चिकूच्या झाडाची वाढ सावकाश होते त्यामुळे अगोदरच्या पाच ते सहा वर्षाच्या काळात त्यामध्ये आंतरपिके घ्यावीत.
  • चिकू मध्ये टोमॅटो, कोबी, वांगी, मिरची, लिली, निशिगंध या आंतरपिकांची लागवड फायदेशीर ठरते.

चिकू पिकातील महत्त्वाच्या किडी आणि रोग:

पाने आणि कळया खाणारी अळी मोठ्याप्रमाणात तर, खोडकिडा, पिठ्या ढेकूण, तुडतुडे थोड्याफार प्रमाणात दिसून येतात. तसेच कोळशी, मूळकूज आणि पानावरील ठिपके या रोगांचा उपद्रव दिसून येतो.

चिकू पिकाच्या फळांची काढणी आणि उत्पादन :

  • चिकूच्या झाडावर पाचव्या वर्षापासून बहार घ्यावा.
  • महाराष्ट्रातील काही भागांत चिकूच्या झाडास वर्षभर फळे येत असली तरी साधारणपणे वर्षातून दोन वेळा फळे जास्त प्रमाणात मिळतात. म्हणजेच चिकूला बहार येण्याचे दोन मुख्य हंगाम आहेत.
  • फुलांचा पहिला बहार सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्ये येतो व त्यापासून जानेवारीत फळे मिळतात.
  • फुलांचा दुसरा बहार फेब्रुवारीमध्ये येतो आणि यापासून मे-जूनमध्ये फळे मिळतात.
  • चिकूच्या पहिल्या बहाराची फळे महाराष्ट्रातील सर्वच भागात मिळतात; परंतु दुसऱ्या बहाराची फळे ज्या भागात तापमान जास्त वाढते अशा भागात कमी मिळतात.
  • साधारणपणे फुले आल्यानंतर फळधारणा होऊन फळे पक्व होण्यासाठी 5-6 महिन्यांचा काळ लागतो.
  • चिकूचे फळ हाताने देठासह काढावे.
  • पूर्ण वाढलेली फळे झाडावरून काढावीत.

अशा प्रकारे योग्य रित्या, आपल्या शेतातील मातीनुसार योग्य हवामानानुसार चिकूची लागवड केल्यास भरपूर उत्पादन मिळू शकते. तुम्ही तुमच्या चिकू  पिकाच्या लागवडीकरता कोणते तंत्र वापरता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “बागायती पिके” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. चिकू लागवडीसाठी योग्य हवामान कोणते?

चिकूच्या फळाला उष्ण व दमट हवामान चांगले मानवते.

2. चिकू लागवडीसाठी कोणती जमीन योग्य असते?

चिकूच्या पिकाला सर्व प्रकारची जमीन मानवते. तथापि नदीकाठची, गाळवट, पोयट्याची, समुद्र किनाऱ्याजवळची जमीन अधिक चांगली असते.

3. चिकू पिकाला बहार येण्याचे दोन मुख्य हंगाम कोणते?

चिकू पिकाला फुलांचा पहिला बहार सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्ये येतो व त्यापासून जानेवारीत फळे मिळतात तर फुलांचा दुसरा बहार फेब्रुवारीमध्ये येतो आणि यापासून मे-जूनमध्ये फळे मिळतात.

59 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ