नारळाची लागवड (Coconut cultivation)
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
नारळाचे झाड हे वर्षानुवर्षे फळ देणारे झाड आहे. 80 वर्षांचे झाल्यानंतरही नारळाचे झाड हिरवेच राहते. हिंदू धर्मातील धार्मिक विधींमध्ये नारळाची फळे वापरली जातात तसेच अनेक भागात नारळाची पाने देखील धार्मिक विधित वापरली जातात. नारळाच्या झाडाला स्वर्गगातील झाड असेही म्हणतात. भारतात याची लागवड केरळ, महाराष्ट्र, गोवा, पश्चिम बंगाल, ओरिसा आणि किनारपट्टी भागात केली जाते. महाराष्ट्रातील नारळ लागवडीखालील क्षेत्र प्रामुख्याने कोकण विभागापुरतेच मर्यादित आहे. नारळाच्या झाडाची लांबी 10 मीटरपेक्षा जास्त असू शकते. नारळाचा खोड/कणा पान नसलेला आणि फांदीविरहित असतो. नारळाचे फळ अनेक ठिकाणी वापरले जाते. कच्च्या नारळाचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर असते तसेच,कच्चा नारळाचा लगदा खाल्ला जातो. नारळाचे फळ पिकल्यावर त्यातून तेल काढले जाते. त्याचे तेल अन्नापासून शरीरापर्यंत आणि शरीरापासून औषधांपर्यंत वापरले जाते. या व्यतिरिक्त नारळ हे खूपच गुणकारी आहे. म्हणूनच आजच्या या भागात आपण नारळ लागवडीविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.
उपयुक्त हवामान (Weather):
- समुद्राच्या किनाऱ्यावर नारळाची लागवड केली जाते. याशिवाय खारट माती असलेल्या ठिकाणीही त्याची लागवड करता येते.
- उष्णकटिबंधीय आणि उप उष्णकटिबंधीय हवामान नारळाच्या लागवडीसाठी सर्वात योग्य आहे. त्याच्या लागवडीला जास्त पाणी लागत नाही.
- नारळाच्या लागवडीसाठी उबदार आणि उप-उष्णकटिबंधीय हवामान आवश्यक आहे.
- नारळाच्या लागवडीसाठी हवेची सापेक्ष आर्द्रता अधिक महत्त्वाची आहे.
- नारळाच्या फळांना पिकण्यासाठी योग्य उबदार हवामान आवश्यक असते.
नारळासाठी आवश्यक जमीन (Soil):
- रेताड चिकणमाती असलेली जमीन नारळाच्या लागवडीसाठी सर्वात योग्य मानली जाते.
- वालुकामय चिकणमाती व्यतिरिक्त, नारळ चांगले पाणी धारण आणि निचरा करत असलेल्या जमिनीत सहज पिकवता येते. पण जमिनीच्या खाली लगेच कोणताही खडक नसावा म्हणजेच काळ्या आणि खडकाळ जमिनीत त्याची लागवड करता येत नाही.
- नारळ लागवडीसाठी जमिनीचे पीएच मूल्य 5.2 ते 8.8 पर्यंत असावा.
लागवड पूर्वमशागत:
- शेतात नारळाची रोपे लावण्यासाठी प्रथम शेत व्यवस्थित नांगरून तयार केले जाते.
- नांगरणी केल्यानंतर, शेतात फळी मारून जमीन समतल बनवा जेणेकरून पावसाळ्यात शेतात पाणी साचण्याच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही. त्यानंतर शेतात 20 ते 25 फूट अंतर ठेवून एक मीटर लांब, रुंद आणि खोल खड्डे करा; शेतात एका रांगेत सर्व खड्डे करा.
- ओळींमध्ये 20 ते 25 फूट अंतर असावे.
लागवडीचा हंगाम:
- खड्ड्यात नारळाचे रोप लावण्याची उत्तम वेळ जून ते सप्टेंबर आहे. पण जेव्हा या काळात मुसळधार पाऊस पडतो, तेव्हा त्याची लागवड करू नये. कारण मुसळधार पावसाच्या वेळी त्याची लागवड केल्यास झाडे मरण्याची समस्या अधिक वाढते.
- जिथे पाण्याची योग्य व्यवस्था आहे तिथे पावसाळ्याच्या एक महिना आधी लागवड करता येऊ शकते.
- पावसाळी हंगामात ज्या ठिकाणी पावसाळ्यात पूर येण्याची दाट शक्यता असते तेथे पावसाळ्यानंतर त्याची लागवड करणे सर्वात योग्य आहे.
लागवडीसाठी वाण:
- बाणवली प्रताप
- टी×डी
- लक्षद्वीप
- ऑर्डिनरी
- फिलीपीन्स ऑर्डिनरी
- सिंगापुरी
रोपांची निवड:
रोपे कृषी विद्यापीठ, शासकीय आणि शासकीय मान्याताप्राप्त रोपवाटिकेतूनच खरेदी करावीत. रोपांची निवड खालीलप्रमाणे करावी:
- रोपवाटिकेत लवकर रुजलेल्या रोपांची लागवडीसाठी निवड करावी.
- नऊ ते बारा महिने वयाची रोपे लागवडीसाठी निवडावीत.
- रोपांच्या उंचीपेक्षा त्यांचा बुंधा आखूड व जाड असावा.
- नऊ ते बारा महिने वर्षे वयाच्या रोपांना 4 ते 6 पाने असावीत. रोपे निरोगी व जोमदार असावीत.
- रोपे खात्रीशीर रोपवाटिकेतून खरेदी करावीत.
- सध्या अवास्तव उत्पादन देणाऱ्या नारळाच्या जातीच्या रोपांविषयी जाहिराती येतात; परंतु अशी रोपे खरेदी करू नयेत.
नारळ पीक अभिवृद्धीच्या पद्धती:
- नारळाच्या झाडाची अभिवृद्धी रोपापासून करतात.
- नारळाचे झाड दीर्घ काळ फळे देत असल्याने उत्तम प्रतीच्या झाडांच्या रोपांची निवड करणे अत्यंत आवश्यक असते.
- नारळाची उत्तम प्रतीची रोपे तयार करण्यासाठी मातृवृक्षाची निवड व मातृवृक्षापासून मिळणाऱ्या नारळांची निवड या महत्त्वाच्या बाबी आहेत.
मातृवृक्षाची निवड:
- ज्या नारळाच्या झाडाची फळे रोपे तयार करण्यासाठी वापरतात त्या झाडाला मातृवृक्ष असे म्हणतात.
- मातृवृक्षाची निवड करताना झाडाचे उत्पादन, नियमितपणा, फळाची प्रत, झाडाची वाढ, रोग-किडींचा उपद्रव, इत्यादी गोष्टी प्रामुख्याने विचारात घ्याव्यात.
- अधिक उत्पादन देणाऱ्या, मोठ्या आकाराची फळे असलेल्या निरोगी बागेतील मातृवृक्षाची निवड करावी.
- मातृवृक्ष म्हणून निवडलेले झाड नियमित व भरपूर उत्पादन देणारे असावे.
- एक वर्षा आड फळ देणारे अथवा मातृवृक्ष म्हणून दर वर्षी 100 फळांपेक्षा कमी फळे देणारे नारळाचे झाड निवडू नये.
- बिनखोबऱ्याचे नारळ येणारी म्हणजे वांझ झाडे तसेच ज्या झाडांवरून नारळ पक्व होण्यापूर्वीच गळतात अशी झाडे मातृवृक्ष म्हणून निवडू नयेत.
- अतिशय जुनाट अथवा लहान झाडे मातृवृक्ष म्हणून निवडू नयेत.
- मातृवृक्ष म्हणून निवडलेले झाड निरोगी आणि जोमदार वाढलेले असावे.
- झाडाच्या फांद्यांचे देठ आखूड व जाड असावेत.
- झाडाच्या पानांचा संभार छत्रीसारखा असावा.
- घराशेजारी, गुरांच्या गोठ्याशेजारी अथवा कंपोस्ट खड्ड्याजवळील नारळाच्या झाडाची मातृवृक्षासाठी निवड करू नये; कारण या झाडांची मूळची उत्पादनक्षमता ओळखता येत नाही.
रोपांसाठी नारळाची निवड :
- जड व पूर्ण विकसित झालेली, 11 महिन्यांपेक्षा अधिक वयाची नारळाची फळे रोपे तयार करण्यासाठी निवडावीत.
- पाणी नसलेली आणि खोबरे नरोटीपासून सुटलेली फळे तसेच गुडगुड वाजणारी आणि भेगा पडलेली नारळाची फळे रोपे तयार करण्यासाठी वापरू नयेत.
- मध्यम आकाराची आणि गोल फळे नारळाची रोपे तयार करण्यासाठी निवडावीत.
- रोपे तयार करण्यासाठी फेब्रुवारी ते मे या कालावधीत मिळणारी नारळाची फळे वापरावीत.
नारळाची रोपे तयार करणे:
- उन्हाळ्यात रोपवाटिकेत 1 ते 1.5 मीटर रुंद, 8 ते 10 मीटर लांब, 30 सेंमी. खोल आकाराचे वाफे तयार करावेत.
- वाफे वाळू, माती आणि कुजलेले शेणखत ह्यांच्या मिश्रणाने भरावेत.
- दोन वाफ्यांमध्ये जादा होणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी चर खोदून नाल्या कराव्यात.
- जून महिन्याच्या मध्यापासून पुढे बियाण्याचे नारळ लावतात.
- नारळाची फळे वाफ्यांवर आडवी रुजवावीत.
- दोन ओळींमध्ये 45 सेंमी. आणि एका ओळीतील दोन फळांमध्ये 30 सेंमी. अंतर ठेवावे.
- नारळ रोपवाटिकेसाठी गवताचे आच्छादन केल्यास नारळ लवकर रुजतात आणि रोपे चांगली वाढतात.
- नारळाच्या रोपांना नियमित पाणी द्यावे आणि उन्हाळयात रोपांवर सावली करावी.
- लावणीनंतर तीन महिन्यांनी नारळ रुजून पाच महिन्यांत नारळाला कोंब येतात.
- 9-10 महिन्यांनी म्हणजे जून-जुलैमध्ये नारळाची रोपे लागवडीसाठी उपलब्ध होतात.
नारळ पिकाच्या फळांची काढणी आणि उत्पादन:
- नारळाच्या झाडाला फुलोरा आल्यापासून 12 महिन्यांनी नारळ पक्व होतात.
- या वेळी फळाचा हिरवा रंग जाऊन पिवळसर तपकिरी रंग येतो.
- नारळाच्या तयार फळावर टिचकी मारल्यास खणखणीत आवाज येतो.
- घडातील सर्व फळे जवळजवळ एकाच वेळी तयार होतात. पाडेली झाडावर चढून कोयत्याने नारळाचा घोस कापून काढतो.
- शहाळ्यासाठी नारळाची फळे 6 ते 7 महिन्यांची असताना अथवा आवश्यकतेनुसार काढतात. त्या वेळी फळात पाणी भरलेले असते.
- नियमितपणे भरपूर फळे देणाऱ्या नारळाच्या झाडाला साधारपणे दर महिन्याला एक पुष्पगुच्छ म्हणजेच एक घड येतो. त्यानुसार दर महिन्याला साधारणपणे एक घड काढणीस येणे गृहीत असले तरी साधारणपणे वर्षाला नारळाच्या एका झाडाला कमीत कमी 5 ते 6 पुष्पगुच्छ येतात.
- ठेंगण्या जातींना चौथ्या वर्षी आणि उंच जातींना 7 ते 8 व्या वर्षी फळे येण्यास सुरुवात होते.
- नारळाचे उत्पादनक्षम आयुष्य ठेंगण्या जातीत 40 ते 50 आणि उंच जातीत 70 ते 80 वर्षे असते.
- महाराष्ट्रात नारळाचे सरासरी उत्पादन प्रत्येक झाडापासून वर्षाला 30 ते 40 नारळ फळे इतके मिळते. परंतु बागेची योग्य काळजी घेतल्यास, खत आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास आणि कीड व रोगांपासून संरक्षण केल्यास एका झाडापासून 100 ते 125 किंवा त्याहूनही जास्त फळे मिळू शकतात.
नारळ पिकाची फळांची हाताळणी, साठवण आणि विक्री व्यवस्था:
- नारळाची तयार फळे उतरवल्यानंतर ती हवेशीर जागेत साठवून ठेवावीत.
- तयार नारळ पुष्कळ महिने टिकतो.
- गरजेप्रमाणे आणि सोईप्रमाणे नारळ फळे पोत्यात भरून ठेवावे.
अशा प्रकारे योग्य रित्या, आपल्या शेतातील मातीनुसार योग्य हवामानानुसार नारळाची लागवड केल्यास भरपूर उत्पादन मिळू शकते. तुम्ही तुमच्या नारळ पिकाच्या लागवडीकरता कोणते तंत्र वापरता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. नारळ लागवडीसाठी योग्य हवामान कोणते?
उष्णकटिबंधीय आणि उप उष्णकटिबंधीय हवामान नारळाच्या लागवडीसाठी सर्वात योग्य आहे. त्याच्या लागवडीला जास्त पाणी लागत नाही.
2. नारळ लागवडीसाठी कोणती जमीन योग्य असते?
रेताड चिकणमाती असलेली जमीन नारळाच्या लागवडीसाठी सर्वात योग्य मानली जाते.
3. नारळ लागवडीसाठी जमिनीचा सामू किती असावा?
नारळ लागवडीसाठी जमिनीचा सामू 5.2 ते 8.8 पर्यंत असावा.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ