पोस्ट विवरण
सुने
कृषि
कृषी ज्ञान
DeHaat Channel
8 May
Follow

बाजरीची शेती (Cultivation of Bajra)

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

बाजरी हे पीक खरीप व रब्बी हंगामात घेतले जाते. मात्र खरीप बाजरीचे पीक हे फायदेशीर ठरते. हे पीक पाण्याचा ताण सहन करणारे, कमी पाण्यावर येणारे पीक आहे. तसेच बाजरी हे धान्या बरोबरच जनावरांना चारा देणारे पीक आहे. या पिकाचे योग्य व्यवस्थापन केल्यास चांगले उत्पादन मिळवणे शक्य होते. पाऊस उशिरा किंवा कमी प्रमाणात झाला तरी इतर तृणधान्यापेक्षा हे पीक अधिक धान्य व चारा उत्पादन देते. बाजरीमध्ये इतर तृणधान्याच्या तुलनेत अधिक ऊर्जा असते. साधारण 100 ग्रॅम बाजरीपासून 360 किलो कॅलरी इतकी ऊर्जा मिळते. याशिवाय बाजरी पिकामध्ये प्रथिने, स्निग्ध पदार्थ, पिष्टमय पदार्थ, कॅल्शिअम आणि लोह मुबलक प्रमाणात असते. चला तर मग जाणून घेऊया या बहूउपयोगी पिकाविषयीची माहिती.

बाजरी पिकासाठी योग्य हवामान (Weather):

  • या पिकात पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता असल्याने हे पीक सरासरी 500 ते 875 मिलिमीटर पाऊस असणाऱ्या भागात घेतले जाते.
  • उष्ण व कोरडे हवामान या पिकास चांगले मानवते.
  • पिकाची उगवण व वाढ 23 ते 32 अंश सेल्सिअस तापमानात चांगली होते.
  • पिकाच्या संपूर्ण वाढीच्या काळात स्वच्छ सूर्यप्रकाश अधिक उत्पादनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे.

बाजरी पिकासाठी योग्य जमीन (Soil):

  • बाजरीचे पीक हे सर्व प्रकारच्या जमिनीत येऊ शकते.
  • बाजरी या पिकासाठी हलकी ते मध्यम तसेच भारी व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी.
  • जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 च्या दरम्यान असावा.

बाजरी पिकाची पेरणी कधी करावी?

  • बाजरी हे कमी दिवसाचे म्हणजेच दोन ते अडीच महिन्याचे पीक आहे. त्यामुळे लवकर निघते.
  • बाजरी पिकाची पेरणी 15 जून ते 15 जुलै या दरम्यान करावी.
  • उशिरा पेरणी पाऊस झाल्यास पेरणी 30 जुलै पर्यंत करावी मात्र 30 जुलै पर्यंत पेरणी केल्यास उत्पादनात सरासरी 10 टक्के घट होते
  • बाजरीची लागवड लवकर केल्यास रब्बी पिक घेता येते.

पूर्वमशागत :

  • चांगल्या उगवणीसाठी जमीन भुसभुशीत ढेकळे विरहित व दाबून घट्ट केलेली असावी पेरणीपूर्वी जमीन पलटी नांगराने अर्धा फूट खोल नांगरावी.
  • कुळवाच्या उभ्या - आडव्या पाळ्या घालून जमीन लागवडीस तयार करावी.
  • दोन ते तीन वखराच्या पाळ्या देऊन शेवटच्या वखराच्या पाळी वेळेस शेणखत जमिनीत चांगले मिसळून द्यावे.
  • पेरणीपूर्वी फळी फिरवून जमीन एकसमान दाबून घ्यावी म्हणजे पेरणी यंत्राच्या जोरदार दाबाने व पावसामुळे बी दडपून उगवणीवर विपरीत परिणाम होत नाही.

बाजरी पिकासाठी महत्त्वाची वाण:

संकरित जाती

  • 86M84- पायोनियार सीड्स
  • Super 99- सुपर सीड्स
  • JKBH676 - जेके सीड्स
  • MRB 204 - महिको
  • MRB 2240 - महिको
  • 9450, 9444- प्रो  ऍग्रो सीड्स
  • वीर 552 महालक्ष्मी सीड्स

बाजरी पिकासाठी बियाण्याचे प्रमाण:

बाजरी लागवडीसाठी पेरणीसाठी एकरी 1.5 ते दोन किलो बियाणे वापरावे.

बाजरी पिकाची पेरणी कशी करावी  (Cultivation) ?

  • पेरणी दोन ते तीन सेंटीमीटर पेक्षा जास्त खोलीवर करणे टाळावे किंवा करू नये.
  • बी जास्त खोलवर पडल्यास उगवण होत नाही.
  • कोरडवाहू बाजरीची 45 × 15 सें.मी. अंतरावर तर पाण्याची सोय असल्यास बागायती बाजरीची 30 × 15 सें.मी. अंतरावर पेरणी करावी.

खत व्यवस्थापन कसे करावे (Fertilizer Management) ?

  • हलक्या जमिनीसाठी 16 कि.ग्रॅ. नत्र, 8 कि.ग्रॅ. स्फुरद, 8 कि.ग्रॅ. पालाश तर मध्यम जमिनीत 20 कि.ग्रॅ. नत्र, 10 कि.ग्रॅ. स्फुरद व 10 कि.ग्रॅ. पालाश प्रति एकरी द्यावे.
  • पेरणीच्या वेळी नत्राचा अर्धा हप्ता आणि स्फुरद व पालाश पूर्ण द्यावे तर पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी उरलेल्या नत्राचा अर्धा हप्ता जमिनीत ओल असताना द्यावा.
  • पिकाच्या अधिक उत्पादनासाठी चार किलो झिंक सल्फेट प्रति एकरी पूर्वमशागतीच्या वेळेस जमिनीतून द्यावे.

पाणी व्यवस्थापन (Water Management) :

  • जमिनीच्या पोता नुसार 10 ते 15 दिवसांनी पाणी द्यावे.
  • पहिले पाणी 20 ते 25 दिवसांनंतर फुटवे येण्याच्या वेळी द्यावे.
  • दुसरे पाणी 30 ते 45 दिवसांनी पीक पोटरीत असताना द्यावे.
  • दुसरे पाणी 60 ते 65 दिवसांनी कणसात जेव्हा दाणे भरतात तेव्हा द्यावे.
  • पाण्याची दुसरी पाळी अगोदर पिकास हलकीशी भर दिल्यास जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होते व पीक जास्त वाऱ्यावर लोळत नाही.

बाजरी पिकात आढळून येणारे रोग व किडी :

केवडा, अरगॉट, लष्करी अळी, खोडकीड

बाजरीचे उत्पादन :

बाजरीची एकरी रोपांची संख्या योग्य प्रमाणात ठेवल्यास व योग्य वाणांची निवड केल्यास संकरित बाजरी उत्पादन एकरी 14 ते 16 क्विंटलपर्यंत मिळते आणि बाजरी चा चारा देखील जनावरांना चांगला मानवतो.

अशा प्रकारे योग्य रित्या, आपल्या शेतातील मातीनुसार योग्य हवामानानुसार बाजरी लागवड केल्यास भरपूर उत्पादन मिळू शकते. तुम्ही तुमच्या बाजरी पिकाची लागवड कशी करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

बाजरी पिकास कोणते हवामान मानवते?

बाजरी पिकास उष्ण व कोरडे हवामान चांगले मानवते.

बाजरी पिक पेरणी साठीचे योग्य अंतर कोणते?

कोरडवाहू बाजरीची 45 × 15 सें.मी. अंतरावर तर पाण्याची सोय असल्यास बागायती बाजरीची 30 × 15 सें.मी. अंतरावर पेरणी करावी.

बाजरी पिकासाठी योग्य जमीन कोणती?

बाजरी या पिकासाठी हलकी ते मध्यम तसेच भारी व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन योग्य ठरते.

61 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ