पोस्ट विवरण
कोथिंबीर लागवड (Cultivation of Coriander)
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
कोथिंबीरीची लागवड भारतातील बहुतेक सर्व राज्यात केली जाते. कोथिंबीरीच्या विशिष्ट स्वादयुक्त पानांसाठी कोथिंबीरीला वर्षभर मागणी असते. त्यामुळे कोथिंबीरीच्या लागवडीस चांगला वाव आहे. कोथिंबिरीचे पीक अवघ्या 45 ते 50 दिवसांत तयार होते आणि त्यानंतर लगेचच शेतकरी बांधवांची कमाई सुरू होते. सुधारित व संकरित वाणांच्या बियाण्यांपासून सुमारे 2 ते 3 वेळा कोथिंबीर काढता येते. तसेच, मसाल्याच्या पिकांमध्ये कोथिंबीरची लागवड अत्यंत फायदेशीर मानली जाते, कारण त्याची लागवड करण्यासाठी कमी खर्च आणि कमी वेळ लागतो. हे पीक लवकर तयार होते आणि नफाही चांगला मिळतो. चला तर मग जाणून घेऊया या पिकाच्या लागवडीविषयीची माहिती.
कोथिंबीर लागवडीसाठी योग्य हंगाम:
- कोथिंबीरीची लागवड प्रामुख्याने खरीप आणि रब्बी हंगामात केली जाते.
- उन्हाळी हंगामात कोथिंबीरीचे उत्पादन कमी असले तरी मागणी मात्र भरपूर असते.
कोथिंबीर लागवडीसाठी योग्य हवामान:
- कोथिंबीरीची लागवड कोणत्याही प्रकारच्या हवामानात करता येते.
- अतिपावसाचा प्रदेश वगळता महाराष्ट्रातील हवामानात वर्षभर कोथिंबीरीची लागवड करता येते.
- उन्हाळयात तापमान 36 अंश सेल्सिअसच्या वर गेल्यास कोथिंबीरीची वाढ कमी होते.
कोथिंबीर लागवडीसाठी योग्य जमीन:
- कोथिंबीरची लागवड सर्व प्रकारच्या जमिनीवर करता येते.
- परंतु कोथिंबीर लागवडीसाठी पाण्याचा अधिक निचरा होणारी आणि जमीनीचा पीएच 6-8 च्या दरम्यान असणारी जमीन योग्य मानली जाते.
- सेंद्रिय खते भरपूर प्रमाणात असल्यास हलक्या किंवा भारी जमिनीत देखील कोथिंबीरीचे पिक चांगले येते.
- कोथिंबीर 20 - 25 अंश सेल्सिअस तापमानात चांगली वाढते.
कोथिंबीर लागवडीसाठी बियाणे दर:
बियाणे प्लॉट साठी - 10-15 किलो / एकर
हिरव्या पाल्या साठी -
गावरान धने - 30-40 किलो/एकर
संकरित धणे - 7-8 किलो / एकर
कोथिंबीर लागवडीसाठी सुधारित वाण:
- गौरी
- RCR-684
- कास्ती
- CS6
- jd-1
- जळगाव धना
- हिसार सुगंध
- V-1
- V-2 इ.
कोथिंबीर लागवडीची पद्धत:
- कोथिंबीर लागवडीसाठी प्रथम शेतात खोल नांगरणी करावी. त्यानंतर शेतात एकरी 5 ते 6 गाड्या चांगले कुजलेले शेण खत टाकावे.
- शेणखता बरोबर वाटलंच तर तुम्ही त्यावेळी बेसल डोसही टाकू शकता.
- रोटाव्हेटरच्या साहाय्याने शेणखत व रासायनिक खताची मात्रा जमिनीत पूर्णपणे मिसळावी.
- हिरवी कोथिंबीर किंवा धणे तयार करायचे असतील तर त्यानुसार बियाणे पेरा.
- उन्हाळ्यात कोथिंबीर पेरायची असेल तर प्रथम शेतामध्ये हलके पाणी द्यावे, जेणेकरून बियांची उगवण एकसारखी होईल.
- जमिनीत वाफसा आल्यास पेरणी सुरू करता येईल आणि पेरणी करताना बीजप्रक्रिया अवश्य करा.
- बीजप्रक्रिया करताना बाविस्टिन- 2 ग्रॅम + टाटा मिडा- 1 मिली मिसळून एक किलो बियाण्याला चोळावे.
- उगवण झाल्यानंतर पाणी देणे, फवारणी करणे आणि खत देणे यावर लक्ष द्या.
- कोथिंबीरची पेरणी यंत्राद्वारे व हाताने करता येते किंवा बियाणे जमिनीवर फेकून रोटाव्हेटरने मिक्स करावे म्हणजे बियाणे माती आड मिक्स होईल.
- कोथिंबीर पेरणीसाठी 20 x 15 सेमी एवढे अंतर ठेवावे.
कोथिंबीर पिकातील खत आणि पाणी व्यवस्थापन:
- कोथिंबीर पिकाच्या चांगल्या आणि जोमदार वाढीसाठी बी पेरताना एकरी 14 ते 16 गाडया शेणखत जमिनीत मिसळून द्यावे.
- कोथिंबीरीच्या पिकाला पेरणीच्या वेळी 20 किलो 15:5:5 हे मिश्रखत द्यावे.
- बी उगवून आल्यावर 20-25 दिवसांनी एकरी 16 किलो नत्र द्यावे.
- कोथिंबीरीचा खोडवा घ्यावयाचा असल्यास कापणीनंतर एकरी 16 किलो नत्र द्यावे.
कोथिंबीर पिकातील पाणी व्यवस्थापन:
- कोथिंबीरीला नियमित पाणी देणे आवश्यक आहे.
- सुरूवातीच्या काळात बियांची उगवण होण्यापूर्वी वाफ्याला पाणी देताना वाफ्याच्या कडेने वाळलेले गवत किंवा ऊसाचे पाचट लावावे.
कोथिंबिर पिकातील किड व रोग:
- कोथिंबीरीवर फारसे रोग आणि किडी दिसून येत नाही.
- काही वेळा मर व भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो.
कोथिंबीर पीक तयार होण्याचा कालावधी:
हिरवी कोथिंबीर:
45-50 दिवसांत पहिली कापणी
धणे:
धणे तयार होण्याचा कालावधी 110-120 दिवस
अशा प्रकारे योग्य रित्या, आपल्या शेतातील मातीनुसार योग्य हवामानानुसार कोथिंबीरची लागवड केल्यास भरपूर उत्पादन मिळू शकते. तुम्ही तुमच्या कोथिंबीर पिकाच्या लागवडीकरता कोणते तंत्र वापरता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. कोथिंबीर पिकास कोणते हवामान योग्य आहे?
अतिपावसाचा प्रदेश वगळता महाराष्ट्रातील सर्व हवामानात वर्षभर कोथिंबीरीची लागवड करता येते.
2. कोथिंबीर लागवडीसाठी योग्य जमीन कोणती?
कोथिंबीर लागवडीसाठी पाण्याचा अधिक निचरा होणारी आणि जमीनीचा पीएच 6-8 च्या दरम्यान असणारी जमीन योग्य मानली जाते.
3. कोथिंबीर पिकाला लागणारे रोग कोणते?
कोथिंबीर पिकावर प्रामुख्याने मर व भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ