पोस्ट विवरण
मटार सुधारित लागवड (Cultivation of Peas)
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
महाराष्ट्रात वर्षभर मटार पिकाला मोठ्या प्रमाणात मागणी असते तसेच याची लागवड देखील मोठ्या प्रमाणात केली जाते. महाराष्ट्रात रब्बी हंगामात उत्तर व पश्चिम भागात मटार हे एक महत्वाचे पिक आहे. हे पीक जमिनीमध्ये नत्र स्थिरीकरणाचे काम करते, त्यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारते. राज्यात मटार पिकाचे उत्पादन हे बडोदे, खान्देश, नगर, नाशिक, पुणे, सातारा या भागात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मटारचे दाणे हवाबंद करून, गोठवून किंवा सुकवून बराच काळ साठविता येतात. आज आपण याच लोकप्रिय अशा मटार पिकाच्या लागवडीविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.
मटार पीक लागवडीसाठी आवश्यक तापमान (Suitable Temperature for Peas Cultivation):
- मटार हे थंड हवामानात वाढणारे पीक असल्याने सरासरी 10° ते 18° से तापमानात या पिकाची वाढ चांगली होते.
- कडाक्याची थंडी व धुके यामुळे पिकावर दुष्परिणाम होतो.
- फुले येण्याच्या वेळेस उष्ण हवामान असल्यास शेंगांमध्ये बी भरत नसल्याने मटारची प्रत कमी होते. त्यामुळे योग्य वातावरण बघून या पिकाची लागवड करावी.
मटार पीक लागवडीसाठी आवश्यक जमीन (Suitable Soil for Peas Cultivation):
- मटार हे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येत असले तरी, हलक्या जमिनीत पीक लवकर तयार होते.
- मटार लागवडीसाठी मध्यम ते भारी चांगल्या निचऱ्याची जमीन निवडावी.
- जमिनीचा सामू 5.5 ते 6.7 असावा.
पूर्वमशागत:
- मटार हे चांगले उत्पादनशील पीक असल्यामुळे त्याची पूर्वमशागत योग्य रीतीने करून जमीन चांगली भुसभुशीत करावी. त्यामुळे मुळ्या चांगल्या वाढतात आणि भरपूर अन्नद्रव्ये शोषून घेऊन झाडाची वाढ व्यवस्थित करण्यास हातभार लावतात.
- त्यासाठी उभी आडवी नांगरट करून 2-3 कुळवाच्या पाळ्या द्याव्यात.
- ढेकळे व्यवस्थित फोडावीत व जमीन सपाट करावी.
- पेरणीपूर्वी पाणी देणे आवश्यक समजावे.
- वापसा आल्यावर पेरणी केल्यास उगवण चांगली होते.
लागवडीचा हंगाम (Peas Planting season):
- मटार पिकाची महाराष्ट्रात खरीप हंगामात जुन - जुलै मध्ये तसेच हे पीक थंड हवामानात येणारे असल्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीस किंवा नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीस लागवड करणे हिताचे ठरते.
बियाणे (Seed requirement for Peas Cultivation):
- लागवडीसाठी पाभरीने पेरल्यास एकरी 20 ते 30 किलो लागते. पण जर टोकण पद्धतीने लागवड केली तर एकरी 8 ते 10 किलो बियाणे पुरेसे होते.
- पेरणीपूर्वी बियाण्यास प्रतिकिलो ३ ग्रॅम थायरमची बीज प्रक्रिया करावी. त्यामुळे मूळ कुजव्या रोग टाळता येईल.
- त्याचप्रमाणे अनुजीवी खताचीही प्रक्रिया बियाण्यास आवश्यक आहे.
- रायझोबिअम कल्चर चोळल्यामुळे उत्पादनात हमखास वाढ झालेली दिसून येते.
प्रकार (Types of Peas):
लागवडीसाठी मटारचे दोन प्रकार आहेत:
बागायती किंवा भाजीचे मटार (गार्डन पी)
जिरायती किंवा कडधान्याचे मटार (फिल्ड पी)
बागायती मटारचे दोन गट पडतात.
- गोल गुळगुळीत बिया असलेले - या जातीचे मटार सुकविण्यासाठी करतात.
- सुरकुतलेल्या बियांचे प्रकार - या जातीच्या मटारमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळे वाटणे गोड लागतात आणि पिठूळपणा कमी असतो. या गटातील जाती हिरवे दाणे डबाबंद करून विकण्यासाठी, गोठविण्यासाठी किंवा हिरव्या शेंगासाठी वापरतात.
सुधारित वाण (Peas Varieties):
- लवकर येणाऱ्या जाती - अर्ली बॅगर, अर्केल, असौजी, मिटीओर
- मध्यम कालावधीत येणाऱ्या जाती - बोनव्हिला, परफेक्शन न्यु लाईन
- उशिरा येणाऱ्या जाती - एन. पी. - २९, थॉमस लॅक्सटन
तसेच
- DS- सम्राट
- देहात एडवांटा
- Advanta GS 10
- करिश्मा JS 10
- Hyveg Goldie
- PAN 4009
- AP3
लागवड व खते:
- लागवड एक तर सपाट वाफ्यात करतात किंवा सरी व वरंब्यावर करता येते. त्यासाठी 60 सेमी अंतरावर सरी वरंबे करून सऱ्यांच्या दोन्ही अंगास बिया टोकून लागवड करावी.
- दोन रोपांतील अंतर 5 ते 7.5 सेमी ठेवण्याची शिफारस केली जाते.
- एका ठिकाणी किमान दोन बिया टोकाव्यात.
- काही भागात पाभरीने बी पेरून मग वाफे बांधले जातात.
- वाटाणा पिकास जमिनीचा मगदूर पाहूनच खताची शिफारस केली जाते. त्यासाठी एकरी 6 ते 8 टन शेणखत, 8 ते 12 किलो नत्र, तर 20 ते 24 किलो स्फुरद आणि 20 ते 24 किलो पालाश देणे जरुरीचे आहे.
- जमिनीची मशागत करीत असताना संपूर्ण शेणखत जमिनीत पसरून, चांगले मिसळणे जरुरीच असते. त्याचप्रमाणे संपूर्ण पालाश आणि स्फुरद व अर्धे नत्र, बी पेरण्याचे अगोदर जमिनीत पेरावे किंवा मिसळावे. त्यातून राहिलेले नत्र ज्यावेळी पीक फुलावर येईल त्यावेळी द्यावे.
पाणी व्यवस्थापन (Peas Water Management):
खतांबरोबर पाण्याचे व्यवस्थापन ही व्यवस्थित राखणे फार महत्वाचे आहे. बी पेरल्याबरोबर लगेच पाणी द्यावे.
कीटक व रोग (Insects and Diseases in Peas):
मटार पिकावर मावा, शेंगा पोखरणारी अळी या किडींचा तर भुरी, मर रोग या रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो.
काढणी व उत्पादन:
- लवकर येणाऱ्या जातीचे हिरव्या शेंगाचे एकरी उत्पादन 10-15 क्विंटल तर मध्यम कालावधीत तयार होणाऱ्या जातीचे उत्पादन 26-30 क्विंटल आणि उशिरा येणाऱ्या जातीचे 34 ते 46 क्विंटल येते. शेंगातील दाण्याचे प्रमाण 40 ते 45 टक्के असते.
- भरघोस उत्पादनानंतर साठवणूक हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. नेहमीच्या तापमानात शेंगा जास्त दिवस साठवून ठेवता येत नाहीत पण 0 डिग्री से.ग्रे. तपमान व 85 ते 90 टक्के आद्रता असल्यास हिरव्या शेंगा दोन आठवड्यांपर्यंत साठवून ठेवता येतात.
अशा प्रकारे योग्य रित्या, आपल्या शेतातील मातीनुसार योग्य हवामानानुसार मटारची लागवड केल्यास भरपूर उत्पादन मिळू शकते. तुम्ही तुमच्या मटार पिकाच्या लागवडीकरता कोणते तंत्र वापरता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “बागायती पिके” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. मटार पिकात आढळून येणाऱ्या किडी कोणत्या?
मटार पिकात प्रामुख्याने मावा व शेंगा पोखरणारी अळी या किडी आढळून येतात.
2. महाराष्ट्रात मटार पीक घेण्याची योग्य वेळ कोणती?
महाराष्ट्रात मटार हे पीक खरीप हंगामात जुन - जुलै मध्ये तसेच थंड हवामानात ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीस किंवा नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीस घेणे योग्य ठरते.
3. मटार पिकात शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव साधारणतः कधी होतो?
मटार पिकात शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव डिसेंबर ते जानेवारी महिन्यात ढगाळ वातावरण असल्यास मोठ्या प्रमाणात आढळतो.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ