उन्हाळी बाजरीची लागवड (Cultivation of summer Millet)

नमस्कार शेतकरी बंधूंनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
बाजरी हे जिरायतीमधील महत्त्वाचे तृणधान्य पीक आहे. उन्हाळी हंगामात बाजरीचे पीक घेताना ओलिताखाली घ्यावे लागते. पोषकता आणि पचनीयतेच्या दृष्टीने सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या या भरडधान्याचा वापर आता वेगाने वाढत आहे. हे एकाच वेळी अन्न, चारा आणि इंधन पुरवणारे पीक असून, शेतकऱ्यांसाठीही फायद्याचे ठरू शकते. महाराष्ट्रामध्ये खानदेश, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा विभागात उन्हाळी बाजरी घेतली जाते. उन्हाळ्यामध्ये बाजरी पिकावर रोगांचा प्रादुर्भाव देखील कमी होतो. संरक्षित पाण्याची सोय असल्यास बाजरीपासून चांगले उत्पादन मिळवणे शक्य होते. त्यासाठी योग्य पद्धतीने नियोजन करावे. खरीप हंगामातील बाजरी पिकापासून येणाऱ्या उत्पादनापेक्षा उन्हाळी बाजरी लागवडीच्या माध्यमातून चांगले उत्पादन मिळते. या लेखात आपण उन्हाळी बाजरी लागवडीविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
उन्हाळी बाजरी लागवडीसाठी योग्य जमीन (Suitable land for summer Millet cultivation):
- उन्हाळी बाजरी लागवडीसाठी शक्यतो सपाट, मध्यम ते भारी जमीन योग्य असते.
- उन्हाळी बाजरी लागवडीसाठी 6.2 ते 8 सामू असणारी जमीन निवडावी.
- लागवडीपूर्वी जमिनीची खोल नांगरट करून कुळवाच्या दोन पाळ्या घ्याव्यात.
- दुसऱ्या कुळवाच्या पाळीच्या अगोदर चांगले कुजलेले एकरी 1.6 ते 2 टन शेणखत वापरावे.
- जमीन भारी असल्यास ओलावा जास्त काळ टिकून राहतो.
उन्हाळी बाजरी लागवडीसाठी योग्य हवामान (Suitable Weather for summer Millet cultivation:
- बाजरी या पिकास उष्ण व कोरडे हवामान (10 ते 45 अंश सेल्सिअस) मानवते.
- हे पीक पाण्याचा ताण सहन करू शकते.
- उन्हाळी हंगामात पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत म्हणजे उगवण ते फुटवे येण्याच्या वेळेस तापमान कमी असल्यामुळे पिकाची वाढ हळूवार होते. त्यामुळे पिकाच्या वाढीसाठी जास्त काळ लागतो, म्हणून उन्हाळी बाजरीचे पीक खरीप बाजरीपेक्षा 10 ते 15 दिवसांनी उशिरा काढणीस येते.
पूर्वमशागत :
- लोखंडी नांगराने जमिनीची 15 सें.मी. खोल नांगरट करावी. त्यानंतर कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.
- पूर्वी घेतलेल्या पिकाची धसकटे व काडीकचरा वेचून जमीन स्वच्छ करावी.
- शेवटच्या कुळवणीच्या आधी एकरी 5 ते 6 बैलगाड्या शेणखत किंवा कंपोस्ट खत पसरवून टाकावे, म्हणजे ते जमिनीत सम प्रमाणात मिसळले जाते.
पेरणीची वेळ :
- उन्हाळी बाजरीची पेरणी 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या तारखेपर्यंत करावी. कारण जानेवारी महिन्यात तापमान 10 अंश सेल्सिअस पेक्षा खाली गेल्यास त्याचा उगवणीवर अनिष्ट परिणाम होतो.
- अधिक थंडीची स्थिती असल्यास थंडी कमी झाल्यावर पेरणी करावी.
- मात्र उन्हाळी बाजरीची पेरणी 15 फेब्रुवारीनंतर अजिबात करू नये. कारण हे पीक पुढील उष्ण तापमानात सापडते. परिणामी, कणसात दाणे भरतात. उत्पादनात घट येते.
बियाणे प्रमाण (Seeds):
पेरणीसाठी एकरी 1.2 ते 1.6 किलो बियाणे वापरावे.
संकरीत वाण (Varities) :
- उन्हाळी बाजरी फुलोऱ्यात येण्याच्या कालावधीमध्ये वाऱ्याचा वेग व तापमान जास्त असल्याने वाणांमध्ये परागीकरणाला अडचण येते.
- कणसात दाणे कमी भरतात.
- श्रद्धा, सबुरी, शांती, आदिशक्ती, आयसीटीपी - 8203 व धनशक्ती या पैकी योग्य जातींची निवड करावी.
लागवड (Cultivation):
- संकरित बाजरीचे प्रमाणित बियाणे एकरी 1.6 ते 2 किलो वापरावे.
- बाजरीची पेरणी करण्यापूर्वी प्रति दहा ते पंधरा किलो बियाण्यास 250 ग्रॅम ऍझोस्पिरीलम या जिवाणू खताची बीजप्रक्रिया करावी.
- शेत चांगले ओले करून घ्यावे व वाफसा आल्यावर पेरणी करावी.
- पेरणी करताना तीन ते चार सेंटीमीटर पेक्षा जास्त खोल करू नये.
- उन्हाळी बाजरीची पेरणी जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात ते फेब्रुवारी या दुसऱ्या पंधरवड्यात केल्यास फायदेशीर ठरते.
- पेरणीस उशीर झाल्यास पीक जात किंवा वाणा प्रमाणे 50 ते 55 दिवसांनी फुलोऱ्यात येते. अशा वेळी तापमान 42 अंश सेंटिग्रेड पेक्षा अधिक असल्यास परागकण मरतात व उत्पादनात घट होण्याची शक्यता असते.
लागवडीचे अंतर:
उन्हाळी बाजरी करताना दोन ओळींतील अंतर 30 ते 40 सेंटीमीटर व दोन रोपांतील अंतर 10 ते 15 सेंटीमीटर ठेवावे. नंतर गरजेप्रमाणे विरळणी करून एका ठिकाणी एकच रोप ठेवावे.
उन्हाळी बाजरीचे खत व्यवस्थापन (Fertilizer Management):
- माती परीक्षण करून प्रति एकरी 24 किलो नत्र व 12 किलो स्फुरद द्यावे.
- या मधील अर्धे नत्र पेरणीच्या वेळी व संपूर्ण स्फुरद, उर्वरित नत्र पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी द्यावे. तसेच पेरणीनंतर बाजरीचे शेत पहिले 30 ते 35 दिवस तण विरहित ठेवावे.
पाणी व्यवस्थापन (Water Management):
- जमिनीच्या पोता नुसार 10 ते 15 दिवसांनी पाणी द्यावे.
- पहिले पाणी 20 ते 25 दिवसांनंतर फुटवे येण्याच्या वेळी द्यावे.
- दुसरे पाणी 30 ते 45 दिवसांनी पीक पोटरीत असताना द्यावे.
- तिसरे पाणी 60 ते 65 दिवसांनी कणसात जेव्हा दाणे भरतात तेव्हा द्यावे.
- पाण्याच्या दुसऱ्या पाळी अगोदर पिकास हलकीशी भर दिल्यास जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होते व पीक जास्त वाऱ्यावर लोळत नाही.
उन्हाळी बाजरीचे उत्पादन:
उन्हाळी बाजरीच्या एकरी रोपांची संख्या योग्य प्रमाणात ठेवल्यास व योग्य वाणांची निवड केल्यास संकरित बाजरी उत्पादन एकरी 14 ते 16 क्विंटलपर्यंत मिळते आणि बाजरी चा चारा देखील जनावरांना चांगला मानवतो.
तुम्ही उन्हाळी बाजरी पिकाची लागवड कशी करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. उन्हाळी बाजरी लागवडीसाठी योग्य जमीन कोणती?
उन्हाळी बाजरी लागवडीसाठी शक्यतो सपाट, मध्यम ते भारी जमीन योग्य असते.
2. उन्हाळी बाजरी लागवडीसाठी पेरणीची योग्य वेळ कोणती?
उन्हाळी बाजरीची पेरणी 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या तारखेपर्यंत करावी.
3. उन्हाळी बाजरी पीक लागवडीसाठी योग्य हवामान कोणते?
उन्हाळी बाजरी लागवडीसाठी पिकास उष्ण व कोरडे हवामान (10 ते 45 अंश सेल्सिअस) मानवते.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
