पोस्ट विवरण
सुने
कृषि
गोभी
कृषि ज्ञान
कृषी ज्ञान
DeHaat Channel
18 Dec
Follow

फुलकोबीची सुधारित लागवड कशी करावी? (Cultivation techniques for Cauliflower Crop)


नमस्कार शेतकरी मित्रांनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

महाराष्ट्रामध्ये कोबीवर्गीय भाज्यांमध्ये फुलकोबी ही भाजी अतिशय लोकप्रिय आहे. जवळ-जवळ सर्वच जिल्ह्यांमध्ये फुलकोबीची लागवड केली जाते. हे थंड हवामानात येणारे पीक असून सुधारित तसेच संकरीत जातींच्या उपलब्धतेमुळे त्यांची लागवड समशीतोष्ण आणि उष्ण हवामानात यशस्वीपणे करता येते. महाराष्‍ट्रामध्‍ये कोबी पिकाखाली अंदाजे 7203 हेक्‍टर एवढे क्षेत्र आहे. तर फुलकोबी या पिकाखाली अंदाजे 7000 हेक्‍टर एवढे क्षेत्र आहे. चला तर मग आता जाणून घेऊया फुलकोबीच्या सुधारित लागवड तंत्रज्ञानाविषयीची माहिती.

फुलकोबी लागवडीसाठी योग्य जमीन (Suitable Land for Cauliflower Cultivation):

  • फुलकोबी लागवडीसाठी मध्यम ते भारी, परंतु पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी.
  • जमिनीचा सामू 5.5 ते 6.6 इतका असावा.

फुलकोबी लागवडीसाठी योग्य हवामान (Suitable Climate for Cauliflower Cultivation):

  • फुलकोबी पिकाला हिवाळी हवामान मानवते. ही थंड हवामानात होणारी भाजी आहे.
  • सर्वसाधारणपणे 15 ते 20 अंश सेल्सिअस तापमान फुलकोबीच्या वाढीस पोषक असते.
  • फूलकोबीच्‍या जाती तापमानाच्‍या बाबतीत अधिक संवेदनशील असल्‍यामुळे त्‍यांची निवड त्‍या-त्‍या हवामानाच्‍या गरजेनुसार करावी.
  • अति प्रमाणात दंव असल्यास ते फुलकोबी पिकाचे नुकसान करते.

फुलकोबी लागवडीची वेळ (Cauliflower Planting Time):

लवकर येणाऱ्या वाणांसाठी : सप्टेंबर-ऑक्टोबर

मध्यम येणाऱ्या वाणांसाठी : जून-जुलै-ऑगस्ट

उशिरा येणाऱ्या वाणांसाठी : एप्रिल- मे

बियाण्याचे प्रमाण:

  • एक एकर लागवडीसाठी हळव्या, निमगरव्या जातींचे 240 ते 300 ग्रॅम बी लागते.
  • तर गरम आणि स्नोबॉल गटातील जातींसाठी एकरी 150 ग्रॅम बी पुरेसे होते.
  • संकरित वाणांचे बी 120 ग्रॅम लागते.

पूर्वमशागत :

शेतात आडवी उभी नांगरणी करून ढेकळे फोडून घ्यावीत. वखराची एक पाळी देऊन जमिनीत चांगले कुजलेले शेणखत 40-50 गाड्या हेक्टरी मिसळावे. नंतर पुन्हा वखराची एक पाळी द्यावी.

सुधारित जाती (Varieties):

बरखा (सेमिंस ), सुहासिनी (सिजेंटा), स्नोव्हाइट (Nazuweedu), CFL 1522- (सिजेंटा)

लवकर येणाऱ्या जाती : पुसा कातकी, पुसा दिपाली, अर्लीीं कुंवारी, अर्ली पटना.

मध्यम काळात येणाऱ्या जाती : सुधारित जपानी, आघानी, पुसा सिंथेटीक, पुसा शुभ्रा

उशिरा येणाऱ्या जाती : स्नो बॉल 16, स्नो बॉल-1 व सिओ-9

फुलकोबीची रोपे तयार करणे व लागवड (Cultivation) :

  • एकरी 100-120 ग्राम  चांगल्या प्रतिचे बियाणे विकत घेऊन लवकर येणाऱ्या जातीचे बियाणे मे-जून, मध्यम येणाऱ्या जातीचे बियाणे जून -ऑगस्ट आणि उशिरा येणाऱ्या जातीचे बियाणे सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये गादी वाफ्यावर पेरून रोप तयार करावे.
  • रोपे 10 ते 12 सें.मी. उंचीची झाल्यानंतर किंवा रोपे 4 ते 6 आठवड्याची  झाल्यावर लागवडीसाठी वापरावीत.
  • लवकर येणाऱ्या वाणांची 45 x 45 सें.मी., तर मध्यम व उशिरा येणाऱ्या वाणांची 60 x 45 सें.मी. अंतरावर लागवड करावी.

फुलकोबी पिकातील प्रमुख रोग व कीटक (Major Diseases and Pests of Cauliflower Crop) :

  • डायमंड बॅक मॉथ
  • मावा
  • घाण्या रोग

फुलकोबी पिकासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन (Nutrition Management):

एकरी 5 टन शेणखत तसेच 60 किलो नत्र, 25 किलो स्फुरद आणि 25 किलो पालाश प्रति हेक्‍टरी द्यावे. यापैकी 50 टक्के नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश लागवडीच्या वेळी तर उरलेले 50 टक्के नत्र लागवडीनंतर एक महिन्याने द्यावे.

फुलकोबीसाठी आंतर मशागत आणि पाणी व्यवस्थापन:

  • 15 ते 20 दिवसांच्या अंतराने नियमित खुरपणी करावी. तसेच आठ ते दहा दिवसांच्या अंतराने व गरजेनुसार पिकाला पाणी द्यावे.
  • फुलकोबीची मुळे उथळ असल्यामुळे खोलवर खुरपणी किंवा खांदणी करू नये.
  • गड्डा धरू लागल्यानंतर रोपांना भर द्यावी.

काढणी व उत्पादन (Cauliflower harvesting & production):

  • जातीपरत्वे फुलकोबी 2.5 ते 3 महिन्यात तयार होते. तयार गड्डा हातास टणक लागतो. तयार गड्डा जादा काळ तसाच ठेवला तर पाणी दिल्यावर तो फूटून नुकसान होण्याचा संभव असतो. म्हणून तो वेळीच काढून घ्यावा.
  • फूलकोबीचा गड्डा पिवळसर पडण्यापूर्वी काढावा.
  • फूलकोबीचे 40 ते 80 क्विंटल एकरी उत्पादन घेता येते.

अशा प्रकारे योग्य रित्या, आपल्या भागातील हवामानानुसार योग्य वाण वापरून फुलकोबी पिकाची लागवड केल्यास भरपूर उत्पादन मिळू शकते. तुम्ही तुमच्या शेतात फुलकोबीची लागवड कशी करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. फुलकोबी लागवडीसाठी योग्य जमीन कोणती?

फुलकोबी लागवडीसाठी मध्यम ते भारी, परंतु पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन योग्य आहे.

2. फुलकोबी लागवडीसाठी योग्य हवामान कोणते?

फुलकोबी पिकाला हिवाळी हवामान मानवते. सर्वसाधारणपणे 15 ते 20 अंश सेल्सिअस तापमान फुलकोबीच्या वाढीस पोषक असते.

3. फुलकोबी लागवडीची जातीपरत्वे योग्य वेळ कोणती?

लवकर येणाऱ्या वाणांसाठी : सप्टेंबर-ऑक्टोबर

मध्यम येणाऱ्या वाणांसाठी : जून-जुलै-ऑगस्ट

उशिरा येणाऱ्या वाणांसाठी : एप्रिल-मे

40 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ