पोस्ट विवरण
सुने
पशु पालन
पशु ज्ञान
DeHaat Channel
13 Feb
Follow

जनावरांना पचनसंस्थेचे होणारे विकार, लक्षणे व काळजी (Digestive disorders in animals, symptoms and care)


नमस्कार पशुपालकांनो,

रवंथ करणाऱ्या जनावरांमध्ये मुख्यतः आहारासंबंधित आजार उद्भवतात. यामध्ये विशेषतः पोटफुगी, पोट गच्च होणे तसेच अपचन हे नियमित आढळणारे विकार आहेत. हे विकार चाऱ्यातील बदलामुळे होतात आणि प्राथमिक अवस्थेत ओळखल्यास उपचारामुळे बरे होतात. काही वेळेस चाऱ्यामध्ये टाचणी, सुई, दाभण, तार इ. धारदार वस्तू जातात. वस्तू धारदार असल्यास पोट व छातीमधील पडद्याला (डायफ्रेंग्म) छेदून हृदयाला इजा करते. परिणामी, जनावराचा मृत्यू होऊ शकतो. धारदार वस्तूंमुळे हृदय, फुफ्फुस, पोटाचा पडदा निकामी झाल्यास महागडा औषधोपचार करूनही प्रतिसाद मिळत नाही. या समस्या रोजच्या पशुआहाराशी जास्त निगडित असतात. हे धोके लक्षात घेऊन वेळीच पशुतज्ज्ञांकडून उपचार करून घ्यावेत. चला तर मग आजच्या लेखात बघूया जनावरांना पचनसंस्थेचे होणारे विकार त्याची लक्षणे व घ्यावयाची काळजी याविषयी.

आता जाणून घेऊया रवंथ करण्याऱ्या जनावरांविषयी:

  • रवंथ करणाऱ्या जनावरांच्या पोटाचे चार कप्पे असतात.
  • जनावरांनी चारा खाल्ल्यानंतर हा चारा रूमेन नावाच्या कप्यात जातो. जनावरांच्या पोटाची रचना गुंतागुंतीची असल्यामुळे या जनावरांना पोटाच्या विकारांचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो.
  • रवंथ करणारी जनावरे समोर दिसेल तेवढा चारा खातात आणि नंतर सावकाश रवंथ करतात.
  • काही जनावरे कचऱ्याच्या ढिगावर, उकिरड्यावर मिळेल त्या गोष्टी खाताना दिसतात, परंतु त्यांच्याकडे नकळतच सर्वांचे दुर्लक्ष होते.
  • जनावरांना मिळेल तेवढा चारा खाण्याची सवय, कोणता चारा खावा आणि कोणता खाऊ नये याची निवड करता येत नसल्यामुळे नकळत त्यांच्या पोटात न पचणाऱ्या वस्तू म्हणजेच पॉलिथिन, कपडा, टायर ट्यूब, चप्पल, माती, वाळू हे पदार्थ जातात.

आयोग्य अन्न सेवनामुळे जनावरांवर होणारे परिणाम (Effects of wrong food consumption on animals) :

  • जनावरे कमी दूध देतात.
  • कमी चारा खातात.
  • निकृष्ट दर्जाचा चारा खाल्ल्यास लवकर माजावर येत नाहीत.
  • जनावर गाभण राहिल्यास वासराची वाढ व्यवस्थित होत नाही.
  • जनावरांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.

जनावरांना होणारा पचनसंस्थेचा विकार पोटफुगी (Digestive Disorder in Animals):

जनावरांना सर्वसाधारणपणे कडबा, हिरवी वैरण व पेंड अशा प्रकारचे खाद्य दिले जाते. सर्वच मोसमांमध्ये जनावरांना चांगल्या प्रतीचा चारा मिळत नसल्यामुळे बऱ्याचदा जनावरांना निकृष्ट प्रतीचा चारा दिला जातो, त्यामुळे जनावरांना पोटफुगी व पचनसंस्थेचे इतर अनेक आजार होतात. कधी कधी पोटफुगी आजाराची तीव्रता इतकी जास्त असते, की जनावरे दगावतात. जनावरांनी खाल्लेल्या पोटातील अन्नावर किण्वनाची प्रक्रिया जास्त प्रमाणात होते, त्यामुळे पोटात वायू जास्त प्रमाणात तयार होतो. हा वायू नैसर्गिकरीत्या बाहेर टाकला जाऊ शकत नाही. या वाढलेल्या वायूचा ताण पोटाच्या पिशव्यांवर होतो यालाच ‘पोटफुगी’ म्हणतात.

जनावरांना पोटफुगी होण्याची कारणे (Reasons of Digestive Disorder):

  • शेळ्या, मेंढ्या व मोठ्या जनावरांमध्ये सर्व मोसमांत पोटफुगी ही समस्या जास्त प्रमाणात दिसून येते.
  • खाद्यामध्ये झालेल्या बदलामुळे, अखाद्य पदार्थ खाल्ल्यामुळे पोटफुगीची समस्या होते.
  • कोवळ्या, जास्त प्रथिनयुक्त आणि किण्वन करू शकणाऱ्या ज्वारी, बाजरी, वाटाणा आणि मक्याची हिरवी धाटे यांसारख्या वनस्पती जास्त प्रमाणात खाल्ल्यास, जास्त प्रमाणात ऊसाची मळी, चोथरी जनावरांच्या खाद्यात गेल्यास जनावरांचे पोट फुगते.
  • अन्ननलिका कोंडल्यास, जनावरांच्या आंतरपटलाच्या हर्निया, धनुर्वात, अन्ननलिकेवरील व जठरावरील सूज, जंतांचा प्रादुर्भाव व शरीरातील कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे पोटफुगी होते.
  • काही जनावरांत अनुवंशिकतेमुळे, तोंडातील लाळेचा स्राव कमी प्रमाणात होत असल्यास, अन्न चावताना किंवा रवंथ करताना लाळ अन्नात योग्य प्रमाणात मिसळू शकली नाही तर, त्यामुळेसुद्धा पोटफुगी होते.
  • ज्वारी, गहू, बाजरी यांची कणसे, दाणे चारा व पाण्याशिवाय खाल्ल्यावरसुद्धा पोटफुगी होते.
  • अखाद्य वस्तू उदा. तार, खिळा, लाकूड, पत्रा, चामडे, कपडे, प्लॅस्टिक व इतर अखाद्य वस्तू खाल्ल्यास पोटफुगी होते.

जनावरांमध्ये पोटफुगीची लक्षणे (Symptoms of Digestive Disorder):

  • प्रथम जनावर खात - पीत नाही, ते सुस्तावते.
  • जनावरांच्या पोटाचा आकार विशेषतः डाव्या भकाळीचा आकार जास्त प्रमाणात वाढतो, जनावर डोळे व मान उंचावून ताणते, पोटात त्रास होत असल्यामुळे जनावरे दात खातात, मागच्या पायाने पोटावर लाथा मारते, डाव्या भकाळीकडे पाहते, तोंडाने श्वासोच्छ्‍वास करते, लाळ गाळते.
  • पोटातील वाढलेल्या वायूमुळे फुफ्फुसावर व हृदयावर दाब पडतो, त्यामुळे जनावरास श्वासोच्छ्‍वासास त्रास होतो.
  • शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते.
  • जनावराच्या डाव्या भकाळीवर हाताने मारून पाहिल्यास पोटात वायू असल्याचा आवाज येतो.
  • कधी-कधी पोटफुगी एवढी वाढते, की पोटाच्या पिशव्यांचा ताण फुफ्फुसावर जास्त प्रमाणात येऊन दमकोंडी होऊन जनावर कोसळते.
  • फुफ्फुसावर जास्त दाब वाढला तर श्वास कोंडून जनावर दगावते.

जनावरांमधील पोटफुगी विकारावर उपाय (Remedy for Digestive Disorder):

  • वरील लक्षणे दिसताच तत्काळ पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. जनावरांना दिले जाणारे व पोटात वायू तयार करणारे अन्न व पाणी त्वरित थांबवावे.
  • पुढचे पाय उंचावर व मागचे पाय उतारावर असतील अशाप्रकारे जनावराला बांधावे, जेणेकरून फुगलेल्या अन्नाच्या पिशवीचा दाब फुफ्फुसावर पडणार नाही.
  • जनावराच्या डाव्या भकाळीवर हाताने मालिश करावे.
  • जनावराला पशुवैद्यकाच्या सल्ल्याने वायुनाशक औषधे तोंडातून पाजावीत.
  • जनावराच्या तोंडात आडवी कडुलिंबाची 1 फूट लांबीची लाकडी काठी ठेवून ती मुरकीस दोन्ही बाजूस बांधावी. अशाप्रकारे ही काठी तोंडात राहिल्यामुळे जनावर त्या काठीस सतत चघळत राहील, त्यामुळे लाळेचे प्रमाण वाढून पोटफुगी कमी होण्यास मदत होईल.
  • कोवळ्या, जास्त प्रथिनयुक्त व किण्वन करू शकणाऱ्या वनस्पती, ज्वारी, बाजरी व वाटाणा, मक्याची हिरवी धाटे यांसारख्या वनस्पती, ऊसाची मळी, चोथरी जास्त प्रमाणात देऊ नये.
  • जंतांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून दर 3 महिन्यांनंतर जनावरांना जंतनाशक पाजावे. रोज 50 ग्रॅम क्षार मिश्रण खाद्यातून द्यावे. उरलेले शिळे अन्न, भाज्या देऊ नये.
  • ज्वारी, गहू, बाजरी यांची कणसे, दाणे जास्त प्रमाणात खाऊ देऊ नये. तार, खिळा, लाकूड, पत्रा, चामडे, कपडे, प्लॅस्टिक व इतर अखाद्य वस्तू जनावरांच्या पोटात जाणार नाहीत याची काळजी घ्यावी.

जनावरांना होणारा पचनसंस्थेचा विकार अपचन आणि पोट गच्च होणे (Digestive Disorders in Animals) :

पोट गच्च होणे व अपचन म्हणजे सर्वसाधारणपणे चारा व खाद्य पचनामध्ये अडथळा येणे. आणि या अडथळ्यामुळेच पोट गच्च होणे हा विकार दिसून येतो.

जनावरांना अपचन आणि पोट गच्च होण्याची कारणे (Reasons of Digestive Disorder):

  • आहारात होणारा अचानक बदल, पशुआहारातील वारंवार होणारा बदल.
  • हिरवा चारा किंवा वाळला चारा किंवा पशुखाद्य प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात खाण्यास देणे.
  • द्विदल चारा पिकांचा पशुआहारामध्ये अति वापर.
  • गहू, ज्वारी, मका पिठाचा पशुआहारात वापर किंवा धान्यांचा पशुआहारात जास्त प्रमाणात वापर करणे.
  • पशुआहारात मूरघासाचा अचानक जास्त प्रमाणात वापर.
  • अशक्त जनावरांना जास्त प्रमाणात चारा देणे.
  • पोषणतत्त्वांचा अभाव.
  • जास्त कर्बोदकेयुक्त किंवा प्रथिनेयुक्त खाद्य घटकांचा पशुआहारात जास्त प्रमाणात वापर.
  • एकावेळी जास्त चारा देणे.
  • वाळलेल्या चाऱ्याचा पशुआहारात अभाव.
  • जनावरांमध्ये व्यायामाचा अभाव.
  • शिळे अन्न, खराब अन्न, खराब फळे, भाजीपाला, बुरशीयुक्त चारा यांचा पशुआहारात वापर.
  • अती उष्ण किंवा थंड पदार्थांचा पशुआहारामध्ये वापर.
  • रवंथ करण्यासाठी कमी वेळ देणे.
  • पिण्याच्या पाण्याचा अभाव.
  • पशुआहारात मिठाचा, क्षारांचा अभाव.
  • उपाशीपोटी जनावरांनी अधाशीपणे चारा खाणे.
  • रवंथ करणाऱ्या जनावरांमध्ये प्रतिजैविकांचा तोंडावाटे वारंवार वापर.
  • रवंथ करणाऱ्या जनावरांच्या पोटामध्ये असणारे अखाद्य पदार्थ.
  • पोटाचे, यकृताचे आजार, हगवण.
  • संप्रेरक व विकरांचा अभाव.
  • रवंथ करणाऱ्या जनावरांना तेल पाजवणे, युरियाचे जास्त प्रमाणात सेवन करणे.
  • विषारी वनस्पतींचे सेवन.
  • जास्त पचनीय पोषणतत्त्वे असणाऱ्या पदार्थांचा आहारात अचानक जास्त प्रमाणात वापर केल्यास.
  • हिवाळ्यामध्ये निकृष्ट दर्जाच्या चाऱ्याचा आहारात जास्त प्रमाणात वापर.
  • आहारात कोवळ्या, लुसलुशीत हिरव्या चाऱ्याचा अतिवापर.

जनावरांना अपचन आणि पोट गच्च झाल्यावर आढळणारी लक्षणे (Symptoms of Digestive Disorder):

  • घट्ट शेण किंवा एकदम पातळ शेण पडणे.
  • चारा कमी खाणे किंवा न खाणे, कोटीपोटाची हालचाल मंदावणे.
  • शेण पातळ व दुर्गंधीयुक्त पडणे.
  • कधी कधी पोट फुगणे, पोटशूळ होणे, जनावर पोटावर लोळून पोटावर लाथा मारते.
  • आम्लधर्मीय अपचनामध्ये शरीराचे तापमान उन्हाळ्यात वाढते तर इतरवेळा कमी होते.
  • हृदयाचे ठोके वाढतात, काही जनावरं लंगडतात.
  • अपचनामध्ये मुख्यतः चारा न खाण्यामुळे उत्पादन कमी होते व आम्लधर्मीय किंवा अल्कली अपचनावर वेळीच निदान व योग्य उपचार न झाल्यास बरीच जनावरे दगावतात.

जनावरांमधील अपचन आणि पोट गच्च होण्याच्या विकारावर उपाय ((Remedy for Digestive Disorder):

  • जनावरांच्या आहारात हळूहळू ठराविक कालावधीने थोडा थोडा बदल करावा. आहारात अचानक आणि वारंवार बदल टाळावा.
  • जनावरांना हिरवा चारा, वाळला चारा, पशुखाद्य गरजेनुसार योग्य प्रमाणात द्यावे.
  • द्विदल चारा पिकांचा व एकदल चारा पिकांचा समप्रमाणात किंवा 30:70 प्रमाणात पशुआहारात वापर करावा. द्विदल चारा पिकांचा पशुआहारात अति जास्त वापर करू नये व द्विदल चारा दुसऱ्या चाऱ्यासोबत द्यावा.
  • कोणत्याही धान्याच्या पिठाचा रवंथ करणाऱ्या जनावरांच्या आहारात वापर करू नये. धान्य मोठे-मोठे भरडून त्याचा पशुआहारात वापर करावा.
  • अशक्त/ वयस्कर जनावरास पचनीय/ पोषक चारा ठराविक कालावधीने कमी-कमी प्रमाणात खाण्यास द्यावा.
  • आहारात मूरघासाचे प्रमाण हळूहळू वाढवावे व सोबत दररोज 50 ग्रॅम खाण्याचा सोडा द्यावा.
  • नियमित संतुलित आहार द्यावा.
  • मुक्त संचार गोठा पद्धतीचा अवलंब करावा. जेणेकरून जनावरांच्या शरीरास गरजेपुरता व्यायाम मिळून पचनक्षमता व्यवस्थित राहते तसेच पिण्यासाठी पाणी 24 तास उपलब्ध होते.
  • जनावरांच्या समोर पिण्यासाठी 24 तास पाणी उपलब्ध असावे.
  • आहारात दररोज 30 ग्रॅम मिठाचा समावेश असावा.
  • आहारात क्षार मिश्रण व जीवनसत्त्वाचा दररोज अंतर्भाव असावा.
  • वाळला चारा, हिरवा चारा व पशुखाद्य गरजेनुसार एकत्रित मिसळून एकाचवेळी (दिवसातून दोन वेळा विभागून) खायला द्यावे.

अशी घ्या जनावरांची काळजी (Take care of animals as follow):

  • जनावरांना शेतात चरावयास सोडल्यास ते टायर ट्यूब, कपडा, पॉलिथिन खाणार नाही याकडे लक्ष ठेवावे.
  • जनावरांना गावात भटकू देऊ नये.
  • दुधाळ जनावरांच्या खुराकात नियमित क्षार मिश्रणे मिसळावीत.
  • गोठ्यात खनिज मिश्रणाच्या विटा जनावरास चाटता येतील, त्याप्रमाणे टांगत्या ठेवाव्यात.
  • जनावरांचा चारा कापताना कटरमध्ये वायरचे किंवा तारांचे तुकडे जाणार नाहीत याची काळजी घ्यावी.
  • जनावरास नियमित जंतनाशके पाजावीत.
  • जनावरास पाणी देताना त्यात थोडेसे मीठ टाकावे.
  • कुठलाही औषधोपचार करण्याअगोदर पशुवैद्याचा सल्ला घ्यावा.

तुमच्या जनावरांमध्ये पचनसंस्थेचे कोणते विकार दिसून आले? त्याची लक्षणे काय होती? व तुम्ही काय उपाययोजना केल्या? याविषयीची माहिती इतर पशुपालकांसह शेयर करा. या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, अशा अजून माहितीसाठी "पशु ज्ञान" चॅनेलला फॉलो करा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

  • रवंथ करणाऱ्या जनावरांच्या पोटाचे किती कप्पे असतात?

जनावरांच्या पोटाची रचना गुंतागुंतीची असते. रवंथ करणाऱ्या जनावरांच्या पोटाचे चार कप्पे असतात. जनावरांनी चारा खाल्ल्यानंतर हा चारा रूमेन नावाच्या कप्यात जातो.

  • जनावरांना पचनाचे विकार का होतात?

जनावरांची देखभाल करताना चारा, पाणी देण्यामध्ये काही चूक झाल्यास किंवा हवामान बदलल्यास तसेच जनावरांच्या चारा, पाण्यामधून विषारी पदार्थ, अखाद्य पदार्थ पोटात गेल्यावर देखील पचनसंस्थेचे विकार होतात. हे लक्षात घेत जनावरांची पचनसंस्था योग्य क्षमतेने कार्यान्वित ठेवावी.

  • प्राण्यांच्या पोटात किती कप्पे असतात?

काही निवडक पशूंमध्ये (रवंथ करणारे प्राणी) विशेष पाचक प्रणाली (चार कप्प्यांचे पोट) असते. तर इतर प्राण्यांमध्ये (श्‍वान, वराह, माकड, मनुष्य इ.) केवळ एकच पोट असते.

46 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ