हिवाळ्यात शेळ्या, मेंढ्यांमध्ये होणारे आजार! (Diseases in Goats and Sheep in winter!)

नमस्कार पशुपालकांनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
हिवाळ्यामध्ये शेळ्या, मेंढ्यांना प्रामुख्याने संसर्गजन्य मावा, हायपोथर्मिया असे आजार होतात. आजार होऊ नये यासाठी थंड हवेपासून कळपाचे संरक्षण करावे. आहार ऊर्जादायी असावा, जेणेकरून थंडीत शरीराचे तापमान नियमित राहील. चला तर मग जाणून घेऊया हिवाळ्यात शेळ्या, मेंढ्यांमध्ये होणारे आजार.
हायपोथर्मिया:
शरीराचे तापमान सामान्य पातळीपेक्षा कमी, जास्त होणे याला हायपोथर्मिया म्हणतात. शेळ्या, मेंढ्या थंड हवामानास जास्त संवेदनशील असतात.
कारणे:
- थंड वातावरण, पाऊस, थंड वारे.
- शरीर भिजल्यामुळे उष्णता झपाट्याने कमी होते.
- कुपोषण, आजार किंवा प्रसूतीनंतरची कमजोरी.
- जास्त लहान वय असणारे, आजारी प्राणी जास्त संवेदनशील असतात.
लक्षणे:
- शारीरिक सामान्य तापमानापेक्षा तापमान कमी असते.
- त्वचा थंड पडते, विशेषतः कान आणि पाय.
- जनावर सुस्त होते, हालचाल कमी होते.
- तापमान कमी झाल्यावर शरीर थर-थर कापते.
- जनावराची खाण्या-पिण्याची इच्छा कमी होते.
- हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छ्वास दर कमी होतो.
उपचार:
- गोठ्यात उष्ण तापमान राहील याची काळजी घ्यावी. शेळ्या, मेंढ्यांना कोरड्या, उबदार ठिकाणी ठेवावे.
- गरम पाणी, गूळ पाण्यात मिसळून द्यावा. ऊर्जा देणाऱ्या औषधांचा वापर पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार करावा.
- गंभीर परिस्थितीत पशुवैद्यकाकडून शिरेवाटे सलाइन द्यावे.
प्रतिबंधात्मक उपाय:
- थंड हवेपासून कळपाचे संरक्षण करावे, विशेषतः नवजात करडांचे थंडीपासून संरक्षण करावे.
- आहार ऊर्जादायी असावा, जेणेकरून थंडीत शरीराचे तापमान नियमित राहील.
- कोकरांना थंडी जास्त वाजत असेल तर छोटी शेकोटी, विजेचा दिवा किंवा विजेची शेगडी वापरून गोठ्यातील हवा उबदार ठेवावी. त्यामुळे करडांना सर्दी, हगवण आणि न्यूमोनिया यांपासून संरक्षण होईल. शेकोटी करताना जास्त धूर होणार नाही याची काळजी घ्यावी. गोठा एकदा उबदार झाल्यानंतर शेकोटी विझवावी.
- विजेचा दिवा साधारणपणे करडांपासून २० इंचांपेक्षा जास्त उंचीवर छताला टांगावा. विजेचा दिव्याला संरक्षक पिंजरा असावा.
- शेळ्या, मेंढ्यांचे मुक्त संचार पद्धतीने संगोपन केले जात असेल, तर त्या ठिकाणी एका कोपऱ्यात बंदिस्त गोठा असावा. जेणेकरून रात्रीच्या वेळी शेळ्या, मेंढ्या तेथे जाऊन बसतील. यामुळे त्यांचे थंडीपासून संरक्षण होईल.
- शेळ्या, मेंढ्या आणि लहान करडांना सकाळच्या वेळी कोवळ्या उन्हात मोकळे सोडावे.
मावा:
देवीप्रमाणे लक्षणे असणारा हा विषाणूजन्य आजार आहे. शेळ्या, मेंढ्यामध्ये प्रामुख्याने करडांमध्ये आढळून येतो. नाकाच्या भोवती जास्त प्रमाणात काळसर खपली पकडलेल्या जखमा दिसतात. नाक, कास, शरीराच्या इतर भागावर जखमा दिसतात. ताप येतो, बाधित शेळी, मेंढी चारा कमी खाते. आजार एकदा झाला की त्याच शेळी, मेंढीमध्ये परत हा आजार दिसून येत नाही.
प्रसार:
- बाधित जनावरांचा प्रत्यक्ष संपर्कामुळे दूषित झालेल्या गव्हाणी, पाण्याचे टब इत्यादींमार्फत होतो.
- दाटीवाटी, अस्वच्छता हे प्रसाराचे मुख्य कारण आहे.
- बाधित व निरोगी शेळ्या, मेंढ्या एकत्र ठेवल्यास प्रसार वाढतो.
- लहान करडे, कोकरांची काळजी घेणे गरजेचे आहे.
- लहान पिले मावा संसर्गास लवकर बळी पडतात.
- आठवडी बाजारात मावा बाधित शेळ्या, मेंढ्यांच्या संपर्कामुळे निरोगी कळपात प्रसार होऊ शकतो.
लक्षणे:
- ओठ, नाकपुडीच्या बाजूला, तोंडामध्ये सुरुवातीला पुरळ येतात. नंतर जखमा होऊन खपल्या दिसतात.
- ओठ, हिरड्यांना झालेल्या जखमांमुळे खाद्य खाता येत नाही. त्यामुळे त्या कमजोर आणि अशक्त होतात.
- बाधित शेळी, मेंढी बरी होण्यासाठी १ ते २ महिन्यांचा कालावधी लागतो.
- हा विषाणू थंड व कोरड्या हवामानात जास्त काळ तग धरू शकतो. मात्र अति जास्त व अति कमी तापमानात मरतो.
- मावा आजार झालेल्या पिलांमध्ये सुरुवातीला हिरड्यांवर पुरळ येतो. नंतर पुरळ फुटून हिरड्या लालसर होतात.
- गाठी येऊ शकतात. तोंडातील जखमांमुळे करडांना कासेतील दूध पिणे अवघड जाते.
- रोगग्रस्त करडांमार्फत दूध पिताना शेळीच्या सडाला देखील संसर्ग होऊ शकतो. त्या जागी पुटकुळ्या येऊ शकतात.
- सडाला बाहेरून प्रादुर्भाव झाल्यास शेळ्या करडांना दूध पिऊ देत नाहीत. शेळ्या, मेंढ्यांना कासदाह होतो.
- हा आजार प्राण्यांमधून मानवाला होणाऱ्या रोगसमूहात येतो. हा आजार प्राणी प्रसारित आहे.
- सडाला प्रादुर्भाव झालेल्या शेळ्यांचे दूध काढल्यास याच प्रकारचा संसर्ग दूध काढणाऱ्या व्यक्तीच्या हाताला, बोटांना होऊ शकतो.
- दूध काढणाऱ्या व्यक्तीच्या तळहात, बोटांवर छोटे पुरळ येतात.
उपचार:
- विषाणूजन्य आजारामुळे कोणत्याही प्रतिजैविकाचा वापर होत नाही.
- जखमा सकाळी आणि संध्याकाळी पोटॅशिअम परमॅग्नेटच्या द्रावणाने धुऊन स्वच्छ कराव्यात.
- तोंड, ओठांवरील जखमा लवकर बऱ्या होण्यासाठी हळद, लोणी किंवा दुधाची साय किंवा बोरो ग्लिसरीन लावावे..
- खाद्यामध्ये मऊ, लुसलुशीत चारा, कोथिंबीर, मेथी घास द्यावे.
- अशक्तपणा दूर करण्यासाठी लापशी, गूळ पाणी यांसारखे पौष्टिक पदार्थ द्यावेत.
प्रतिबंधात्मक उपाय:
- कोकरू एक महिन्याचे झाल्यावर लसीकरण करावे.
- चांगल्या परिणामांसाठी, २ ते ३ महिन्यांनंतर लसीची दुसरी मात्रा देणे आवश्यक आहे
- लसीकरण नसलेल्या शेळी, मेंढीचे संक्रमित फीडलॉट्समध्ये प्रवेश करण्यापूर्वी लसीकरण करावे.
तुमच्या मेंढ्या आणि शेळ्यांमध्ये मावा, हायपोथर्मिया रोगाची कोणती लक्षणे दिसून आली आणि तुम्ही काय उपाययोजना केल्या या विषयीची माहिती इतर पशुपालकांसह शेयर करा. या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, अशा अजून माहितीसाठी "पशु ज्ञान" चॅनेलला फॉलो करा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. जनावरांचे वय ओळखण्याच्या पद्धती?
1) जनावरांचे निरीक्षण केले तर लहान, तरुण आणि म्हातारी जनावरे अशा वयोगटात त्यांचे विभाजन करता येते.
2) लहान जनावरे या गटात वासरांचा, तरुण जनावरांमध्ये आकाराने लहान असलेली, अंगात चपळपणा, मऊ व घट्ट कातडी, शरीरावरील केस मऊ व दातांची पूर्ण रचना असणारी जनावरे येतील.
3) म्हातारी जनावरे म्हणजे आकाराने मोठी, शांत स्वभावाची, सैल कातडी व दातांची अपूर्ण रचना असलेली होय.
2. हायपोथर्मिया आजार कशाला म्हणतात?
शरीराचे तापमान सामान्य पातळीपेक्षा कमी, जास्त होणे याला हायपोथर्मिया म्हणतात.
3. मावा आजार प्रामुख्याने कोणत्या प्राण्यांमध्ये दिसून येतो?
देवीप्रमाणे लक्षणे असणारा हा विषाणूजन्य आजार आहे. जो शेळ्या, मेंढ्यामध्ये प्रामुख्याने करडांमध्ये आढळून येतो.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
