कारले पिकातील डाऊनी मिल्ड्यू (केवडा) व्यवस्थापन (Downy mildew (Kewda) management in Bitter Gourd crop)

नमस्कार शेतकरी मित्रांनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
कारले हे वेलवर्गीय पीक असून आरोग्यासाठी खुप महत्वाचे मानले जाते. हे पीक साधारण चार महिन्यांचे असते. बाजारपेठांमध्ये पांढऱ्या रंगाच्या तर निर्यातीसाठी हिरव्या रंगाच्या कारल्यांची भरपूर मागणी असते. कारले हे वेलवर्गीय पीक असल्यामुळे आधार देणे गरजेचे असते. कारण जमिनीवर वेलीची वाढ चांगली होत नाही व फळांचा जमिनीशी संपर्क आल्याने फळे सडण्याचे प्रमाण वाढते. यामुळे कारल्याला मंडप व ताटी पद्धतीने आधार दिला जातो. कारले या पिकात डाऊनी मिल्ड्यू (केवडा) हा एक मुख्य रोग दिसून येतो. या रोगाला ओब्लिगेट जीव देखील म्हणतात, कारण या रोगाचा प्रादुर्भाव फक्त जिवंत पेशींवर होतो, पेशींवर होत नाही. या रोगामुळे कारले पिकाचे मोठे नुकसान होते. चला तर मग जाणून घेऊया या रोगाची लक्षणे आणि व्यवस्थापनाविषयीची माहिती.
कारले पिकातील डाऊनी मिल्ड्यू (केवडा) रोगाची माहिती:
- हा रोग बुरशीसारख्या शेवाळीय जिवांच्या प्रादुर्भावामुळे होतो. त्यामुळे बरेच शेतकरी याला 'बुरशीजन्य रोग' समजतात.
- हा रोग देशातील सर्व कारले लागवड होणाऱ्या राज्यांमध्ये आढळून येतो. यामध्ये महाराष्ट्र, राजस्थान, बंगाल, उत्तर प्रदेश, आसाम यांचा समावेश प्रामुख्याने होतो.
- हा रोगामध्ये पिकाचे 50 ते 100 टक्क्यांपर्यंत नुकसान करण्याची क्षमता असते.
- रोगासाठी अन्य यजमान पिके : काकडी, गिलके, टरबूज इत्यादी काकडीवर्गीय पिके.
- या रोगाचे बीजाणू काकडीवर्गीय पिकांवर जिवंत राहतात. खूप जास्त अंतरावरून देखील रोगाचे बीजाणू वाऱ्यामार्फत रोगाचा प्रसार करू शकतात.
- दमट तापमान 15 ते 20 अंश सेल्सिअस तापमान ते धुके असलेल्या वातावरणात रोगाची लागण होते. पाने ओली राहिल्यास लागण जास्त लवकर होते.
- तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली आणि 35 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यास रोगाचा प्रादुर्भाव शक्यतो होत नाही.
कारले पिकातील डाऊनी मिल्ड्यू (केवडा) रोगाची लक्षणे (Bitter Gourd crop Downy Mildew Symptoms):
- प्रथम खालील जुन्या पानांवर कोनीय प्रकारचे डाग पडतात. नंतर डाग नवीन पानांवर देखील दिसू लागतात.
- हे डाग दोन शिरांमध्ये मर्यादित असतात. बऱ्याच वेळा हे ठिपके चौकोनी आकाराचे दिसतात. असे ठिपके हे पिवळ्या रंगाचे असतात.
- पाने जास्त वेळ ओली राहिली तर पानाच्या खालून हे डाग ओलसर दिसू लागतात. बऱ्याच वेळा असे ओलसर डाग हे जिवाणूजन्य रोगासारखे दिसतात. त्यामुळे या दोन रोगांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. नंतर हे ठिपके वाढत जाऊन पूर्ण पान वाळून जाते व गळून पडते. याचा परिणाम फळांच्या पोषणावर व संरक्षणावर होतो.
- जेव्हा जास्त आर्द्रतायुक्त वातावरण असते, त्यावेळी पानाच्या पाठीमागील बाजूस पांढऱ्या रंगाच्या पावडरसारखी वाढ झालेली दिसून येते.
नियंत्रणाचे उपाय:
- लागवडीवेळी दोन ओळींतील अंतर जास्त ठेवावे.
- शेतामध्ये हवा खेळती असावी. जेणेकरून रोगाचे 'इनोकुलम' जास्त प्रमाणात शेतात राहणार नाही. तसेच पाने ओली राहणार नाहीत.
- पीक फेरपालट करावी. कारले पिकानंतर किंवा त्याआधी काकडीवर्गीय पीक घेऊ नये. जसे की गिलके, काकडी, टरबूज, खरबूज, भोपळा.
- शिफारस केलेल्या बुरशीनाशकांचा वापर करावा.
- जमिनीवर ट्रायकोडर्मा व्हिरीडी या जैविक बुरशीनाशकाची फवारणी करावी.
कारले पिकातील डाऊनी मिल्ड्यू (केवडा) रोगाचे रसायनिक व्यवस्थापन (Bitter Gourd crop Downy Mildew Management):
- मॅन्कोझेब 75% डब्ल्यूपी (देहात DEM-45) 400 ग्रॅमची एकरी 200 लिटर पाण्यातून फवारावे किंवा
- रोगाचा प्रादुर्भाव दिसताच, मेटॅलॅक्सिल एम 4.0 % + मॅन्कोझेब 64 % डब्ल्यू/डब्ल्यू (सिजेंटा-रिडोमिल गोल्ड) 400 ग्रॅमची एकरी 200 लिटर पाण्यातून फवारावे किंवा
- सायमोक्सॅनिल 8% + मॅन्कोझेब 64% डबल्यु पी (ड्युपॉन्ट-करझेट एम 8) 600 ग्रॅमची एकरी 200 लिटर पाण्यातून फवारावे किंवा
- प्रोपीनेब 70% डब्ल्यूपी (बायर-अँट्राकोल) 600 ग्रॅमची एकरी 200 लीटर पाण्यातून फवारणी करावी.
फवारणी करताना घ्यावयाची काळजी:
- फवारणीसाठी गढूळ पाणी वापरू नये. स्वच्छ पाणीच वापरावे.
- फवारणी द्रावण प्लास्टिक बकेटमध्ये करावे.
- शक्य झाल्यास फवारणीच्या वेळेस आपण स्वतः शेतात हजर राहावे.
- फवारणीच्या दिवशी ढगाळ वातावरण असल्यास शक्यतोवर फवारणी करू नये व केल्यास बेस्ट स्टीकरचा वापर अवश्य करावा. तरीही ताबडतोब पाऊस पडल्यास फवारणीचा फायदा होत नाही.
- औषध तयार करताना प्रथम थोड्या पाण्यात घेऊन नंतर जास्त पाण्यात मिसळावे व व्यवस्थित ढवळून घ्यावे.
- फवारणी शक्यतोवर सकाळी व दुपारी 4 नंतर करावी. जास्त उन्हामध्ये कृषी रसायनांचे विघटन होते व पाहिजे तसे परिणाम दिसत नाहीत.
- तणनाशकांचा पंप फवारणीसाठी शक्यतोवर वापरू नाही.
- एकाच औषधाचा किंवा एकाच गटातील औषधांचा सतत वापर करू नये.
- कीटकनाशके, बुरशीनाशके, संजीवके, एकत्र फवारताना त्यांची सुसंगतता पडताळून पाहावी. द्रावण घट्ट झाल्यास, फाटल्यास किंवा न विरघळल्यास फवारू नये.
- फवारणीसाठी तयार करून ठेवलेल्या द्रावणाचा ताबडतोब वापर करावा, ते जास्त काळ ठेवू नये.
- फवारणी सर्व झाडावर खालीवर पानांच्या मागे-पुढे एकसमान होईल याची काळजी घ्यावी.
तुम्ही तुमच्या कारले पिकातील डाऊनी मिल्ड्यू (केवडा) रोगाचे व्यवस्थापन कसे करता? तुम्हाला या रोगाची काय लक्षणे तुमच्या पिकात दिसून आली? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी डॉक्टर” चॅनेAलला फॉलो करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. कारले पिकातील डाऊनी मिल्ड्यू (केवडा) या रोगामुळे पिकाचे किती टक्क्यांपर्यंत नुकसान होते?
कारले पिकातील डाऊनी मिल्ड्यू (केवडा) या रोगामुळे पिकाचे 50 ते 100 टक्क्यांपर्यंत नुकसान होते.
2. कारले हे पीक साधारण किती महिन्यांचे असते?
कारले हे पीक साधारण चार महिन्यांचे असते.
3. कारले पिकाला कशाच्या साहाय्याने आधार दिला जातो?
कारले पिकाला मंडप व ताटी पद्धतीने आधार दिला जातो.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
