पोस्ट विवरण
सुने
पशु पालन
पशु ज्ञान
DeHaat Channel
18 Jan
Follow

दुधाळ जनावरांच्या आहारामध्ये खनिजे आणि प्रथिनांचे महत्व

नमस्कार पशुपालकांनो,

दुधाळ जनावरांच्या आहारामध्ये मुख्य पोषक तत्वे आणि त्यांचे विभिन्न स्रोत अत्यंत गरजेचे असतात. इतर जनावरांप्रमाणे दुधाळ पशूंमध्ये सुद्धा पाच पोषक तत्वे उर्जा, प्रथिने, खनिज पदार्थ, जीवनसत्वे आणि पाण्याची गरज असते. ही सर्व पोषक तत्वे आहारामधून प्राप्त होत असतात. त्यामुळे आहारातून या सर्व घटकांची पुर्तता होईल, याची खातरजमा करून घेणे गरजेचे असते जेणेकरून शरीरवाढ, गाभणकाळ व दूध उत्पादन योग्य रीतीने घेता येईल. म्हणूनच आजच्या या लेखात आपण दुधाळ जनावरांच्या आहारात महत्वाच्या असणाऱ्या दोन घटकांच्या म्हणजेच खनिजे आणि प्रथिनांच्या महत्वाविषयी जाणून घेणार आहोत.

प्रथिने:

  • प्रजननासाठी ऊर्जेपेक्षा प्रथिनांना कमी महत्त्व आहे. परंतु प्रथिनांच्या कमतरतेमुळे देखील वांझपणा व प्रजननाच्या समस्या उद्‍भवू शकतात.
  • दीर्घ काळाकरिता आहारातून प्रथिनांचा पुरवठा कमी असेल तर त्याचा जनावरांच्या प्रजननावर विपरीत परिणाम होतो.
  • दुधाळ जनावरांच्या आहारात प्रथिनांचे प्रमाण जास्त ठेवल्यास त्याचा जनावरांच्या प्रजननावर विपरीत परिणाम होतो.
  • जनावरांच्या आहारात प्रथिने किंवा युरिया यांचा अवलंब अधिक प्रमाणात केल्यास गर्भधारणेचे प्रमाण कमी होते. हे टाळण्यासाठी गाई, म्हशीच्या आहारात प्रथिनांचे प्रमाण वाढविल्यास ऊर्जेचे प्रमाण देखील आहारात वाढवावे.
  • प्रथिनांच्या आहारातील अधिक अवलंबाने गर्भाशयाचा सामू कमी होतो, जो गर्भाशयातील गर्भाला घातक/ अपायकारक ठरू शकतो.
  • त्याचप्रमाणे असे दिसून आले आहे की गाईला गरजेपेक्षा 10 ते 15 टक्के प्रथिने जास्त पुरवल्यास गाईंमध्ये गर्भधारणा होण्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा कृत्रिम रेतन करावे लागते. दोन वेतांतील व प्रसूतीमधील अंतर वाढते.

जनावरांच्या आहारात प्रथिनांचे प्रमाण वाढविल्यास होणारे परिणाम:

  • रक्तातील युरियाचे प्रमाण वाढते आणि शुक्राणू, अंडाशय व वाढणाऱ्या गर्भास अपायकारक ठरते.
  • शरीरातील संप्रेरकाचा समतोल ढळतो.
  • रक्तातील युरियाच्या अधिक प्रमाणाने ऋतुचक्र विस्कळित होते.

दुष्परिणाम टाळण्यासाठी उपाययोजना:

  • वेताच्या सुरवातीच्या काळात दुधाळ जनावरांच्या आहारात बायपास प्रथिनांचा (कोठी पोटात विघटन न होणाऱ्या प्रथिनांचा) अवलंब करावा.
  • जनावरांच्या खाद्यात प्रथिनांचे प्रमाण 16 टक्के असावे.
  • वेताच्या शेवटच्या काळात दुधाळ जनावरांच्या आहारात प्रथिनांचे प्रमाण 12 टक्के असावे.
  • आपल्या दुभत्या जनावरांच्या आहारात किती व कोणत्या प्रकारची प्रथिने असायला हवीत हे पशुआहार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ठरवावे.

खनिजे:

  • उन्हाळा सुरू होण्यापूर्वी दुधाळ जनावरांच्या आहारामध्ये खनिजांचा स्तर वाढवावा, जेणेकरून उत्पादनावर विपरीत परिणाम होणार नाही.
  • उन्हाळ्यात पोटॅशिअम घामावाटे आणि सोडिअम मुत्रावाटे शरीराबाहेर टाकले जाते, याच कारणामुळे जनावरांत पोटॅशिअम, सोडिअम, मॅग्नेशिअम खनिजांची गरज जास्त भासते.
  • साधारण परिस्थितीत प्रती 1 किलो शुष्क आहारामध्ये पोटॅशिअम 0.9, सोडिअम 0.18, मॅग्नेशिअम 0.2 टक्का असते.
  • राष्ट्रीय संशोधन परिषदेने सुचवल्यानुसार उन्हाळ्यात प्रति 1 किलो शुष्क आहारामध्ये पोटॅशिअम 1.5 टक्का, सोडिअम 0.6, मॅग्नेशिअम, 0.35 टक्क्यांपर्यंत वाढवावे.

दुधाळ जनावरांमध्ये खनिज मिश्रनाचे महत्व:

  • जनावरांच्या शरीराची योग्य वाढ होण्यासाठी एकूण 22 खनिज तत्वांची आवश्यकता असते.
  • यामध्ये 7 खनिज तत्त्व अधिक प्रमाणामध्ये तर 15 खनिज तत्वे सूक्ष्म प्रमाणामध्ये आवश्यक असतात.
  • याव्यतिरिक्त ही खनिज तत्त्व दूध उत्पादन कायम ठेवण्यासाठी, पचनक्रिया योग्य ठेवण्यासाठी, शरीरामध्ये योग्य चयापचय ठेवण्यासाठी तसेच जनावरांना ऊर्जा मिळवून देण्यासाठी महत्वपूर्व योगदान देतात.
  • यामुळेच खुराकामध्ये 2 % खानिजे मिश्रण आणि 1 % मीठ आवश्यक आहे.
  • जर खनिज मिश्रण वेगेळे द्यावयाचे असेल तर 50 % ग्रॅम दिले पाहिजे. अधिक प्रमाणात दूध देणाऱ्या जनावरांमध्ये दुधाच्या प्रमाणानुसार खनिज मिश्रण वाढवून दिले पाहिजे.

खनिज कमतरतेमुळे होणारे परिणाम:

  • खनिजांच्या अभावामुळे जनावरांमध्ये अनियमित ऋतुचक्र व अकार्यक्षम पुनरुत्पादन दिसून येते.
  • क्षाराच्या कमतरतेमुळे गाई माजावर येत नाहीत. माज सुप्त स्वरूपात राहतो. हंगामी वांझपणा येतो, गर्भपात व गर्भामध्ये उपजत दोष उत्पन्न होतात.
  • कमतरतेमुळे कालवडी माजावर येत नाहीत. माज सुप्त अनियमित राहतो, वाया जातो, गर्भधारणा होत नाही. कालवडीच्या पहिल्या विताचे वय वाढते. गर्भधारणा झालीच तर गर्भपात होतो किंवा अशक्त वासरू जन्माला येते. प्रसूती सुलभ होत नाही.
  • गाईंचा भाकड काळ वाढतो. दोन सलग वितातील अंतर वाढते. उत्पादन उपयुक्त आयुष्य कमी होते.
  • नर वासराच्या पुनरुत्पादन संस्थेतील अवयवांची वाढ समाधानकारक होत नाही. वयात येण्यास उशीर लागतो. चांगल्या प्रकारचे वीर्य उत्पादन मिळत नाही.
  • खनिजांच्या कमतरतेमुळे जनावरांना वेगवेगळ्या प्रकारचे चयापचयाचे रोग होतात.

तुम्ही दुधाळ जनावरांच्या आहारामध्ये खनिजे आणि प्रथिनांचे महत्व जाणता का? तुम्ही कशाप्रकारे व्यवस्थापन करता? याविषयीची माहिती इतर पशुपालकांसह शेयर करा. या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, अशा अजून माहितीसाठी "पशु ज्ञान" चॅनेलला फॉलो करा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.


48 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ