पोस्ट विवरण
सुने
कृषि
बागवानी
कृषि ज्ञान
काजू
बागायती पिके
DeHaat Channel
24 Feb
Follow

काजू पिकातील मोहोर व्यवस्थापन! (Flowering management in Cashew crop!)


नमस्कार शेतकरी बंधूंनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

भारतात काजूची ओळख पोर्तुगीज लोकांनी अंदाजे 400 वर्षांपूर्वी करून दिली. पूर्वीच्या काळी काजूची लागवड भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर प्रामुख्याने जमिनीची धूप होऊ नये म्हणून करण्यात आली होती. काजू हे एक परकीय चलन मिळवून देणारे महत्त्वाचे पीक आहे. आपल्या देशात काजूबियांचे उत्पादन वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने फळबागा विकास योजनेमधून प्रयत्न सुरू केले आहेत. फळझाडांमध्ये हापूस आंब्याला 'फळांचा राजा' म्हटले जाते, त्याचप्रमाणे काजूला 'फळांची राणी' म्हटले जाते. महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागाच्या घाटमाथ्यावर काजू लागवडीला फार मोठ्या प्रमाणात वाव आहे. आज आपण याच काजू पिकातील मोहोर व्यवस्थापन कसे करावे याविषयी जाणून घेणार आहोत.

काजू पिकाच्या वाढीच्या अवस्था:

  • ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यापासून काजूच्या झाडाला पालवी येण्यास सुरुवात होते.
  • नोव्हेंबरमध्ये पालवी परिपक्व होण्यासाठी वेळ घेते.
  • त्यानंतर डिसेंबर - जानेवारी महिन्यात त्यावर मोहोर येतो.

काजू मोहोर संरक्षण :

काजूची पालवी, मोहोर तसेच छोट्या फळांचे काजूवरील ढेकण्या (टी मॉस्क्युटो) आणि फुलकीड (थ्रिप्स) या किडी मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात.

  1. काजूवरील ढेकण्या (टी मॉस्क्युटो):

काजूवरील ढेकण्या (टी मॉस्क्युटो) ची ओळख:

  • टी मॉस्कीटो या किडीचा पूर्ण वाढलेला ढेकण्या आकाराने डासापेक्षा थोडा मोठा असतो. त्याचा डोक्याकडील भाग काळसर व इतर भाग काळसर तपकिरी रंगाचा असतो.
  • पोटाचा पुढील भाग पांढरा व बाकीचे शरीर काळसर रंगाचे असते.
  • त्याची मान व पाठ यांच्या मधील भागात एक टाचणी सारखा भाग वर आलेला दिसतो.
  • टी मॉस्कीटोची मादी कोवळ्या पालवीच्या दांडीत, पानांच्या देठात व मोहोराच्या कोवळ्या दांडीत सालीच्या आत पेशींमध्ये अंडी घालते. अंडी घातलेल्या ठिकाणी दोन बारीक केसांसारखे भाग बाहेर आलेले असतात. मात्र अंडी पेशींमध्ये असल्यामुळे बाहेरुन दिसत नाहीत.
  • अंड्यांमधून 4 ते 5 दिवसांत तांबूस मुंग्यांप्रमाणे दिसणारी लहान लहान पिल्ले बाहेर पडतात.
  • पिल्लांचे पूर्ण वाढलेल्या ढेकण्यात रुपांतर होण्यास 12 ते 15 दिवस लागतात. किडीचा संपूर्ण जीवनक्रम 25 ते 28 दिवसांत पूर्ण होतो.

काजूवरील ढेकण्या (टी मॉस्क्युटो) मुळे होणारे नुकसान:

  • काजूवरील ढेकण्या (टी मॉस्क्युटो) किडीमुळे पालवी, मोहोर आणि कोवळी फळे या तिन्ही अवस्थांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे पिकाच्या उत्पादनात मोठी घट येते.
  • पालवी व मोहोरावर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास फळधारणा अत्यल्प होते व मोठे आर्थिक नुकसान होते.
  • प्रादुर्भावाची तीव्रता जास्त असल्यास व नियंत्रणाचे उपाय न अवलंबल्यास 80 ते 100 टक्के नुकसान होऊ शकते.
  • पूर्ण वाढलेले टी मॉस्क्युटो तसेच त्यांची पिल्ले कोवळ्या पालवीतून तसेच मोहोराच्या दांड्यांमधून रस शोषतात.
  • ज्या ठिकाणाहून रस शोषतात तेथे एक विषारी द्रव्य सोडतात, त्यामुळे त्या जागी सुरुवातीला काळे पाणचट चट्टे उठतात.
  • हे चट्टे पसरत जातात व दुसऱ्या दिवशी ते काळे पडतात. त्यामुळे प्रादुर्भावग्रस्त पालवी किंवा मोहोर सुकतो व शेंडे करपल्यासारखे दिसतात.
  • प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असल्यास असे झाड लांबूनही ओळखता येते.
  • फळधारणा अवस्थेत टी मॉस्कीटो कोवळ्या बियांमधून रस शोषतात. त्यामुळे फळांवर खोलगट गोलाकार काळसर चट्टे उठतात. त्यामुळे बियांची वाढ होत नाही.
  • तसेच ते कोवळ्या बोंडांमधून देखील रस शोषतात. त्यामुळे बोंडांवर देखील खोलगट चट्टे उठतात व बोंडांची वाढ होत नाही.

  1. फुलकीड (थ्रिप्स) :

काजूवरील फुलकिड्यांची ओळख:

  • ही किड आकाराने अतिशय लहान (1 से 2 मि.मी.) आकाराची असते. डोळ्याने चटकन दिसत नाही. भिंगाच्या सहाय्याने पाहिल्यास दिसते.
  • या किडीची पिल्ले पिवळसर रंगाची असतात. पूर्ण वाढलेल्या फुलकीडी पिवळ्या तर काही जाती काळ्या रंगाच्या असतात. त्या कोवळी पालवी, मोहोर व कोवळ्या फळांवर मोठ्या संख्येने असतात.
  • फुलकीडी कोवळ्या पालवीच्या व मोहोराच्या पेशींमध्ये अंडी घालतात.
  • 2 ते 3 दिवसांत अंड्यांतून पिवळसर पिल्ले बाहेर येतात.
  • पिल्लांची अवस्था 8 ते 10 दिवसांची असते.

काजूवरील फुलकिड्यांमुळे होणारे नुकसान:

  • फुलकीड काजूची कोवळी पालवी, मोहोर आणि कोवळ्या फळांवर प्रादुर्भाव करते.
  • या किडीची पिल्ले तसेच पूर्ण वाढलेल्या फुलकीडी प्रथम कोवळ्या पानांवर आढळून येतात. त्या पाने खरवडतात व रस शोषून घेतात.
  • परिणामी पाने वेडीवाकडी वाढतात, पानांचा रंग करडा होतो, पानांच्या शिरा काळसर बनतात. त्यानंतर त्यांचा प्रादुर्भाव मोहोरावर मोठ्या प्रमाणावर दिसून येतो.
  • मोहोराचे दांडे खरवडतात. तसेच फुले आणि कळ्यादेखील खरवडतात.
  • मोहोराचे दांडे व मोहोर तपकीरी होतो, फुले गळतात व फळधारणा अत्यल्प होते.
  • फळधारणा झाल्यानंतर या किडीचा प्रादुर्भाव प्रकर्षाने जाणवतो. कारण फुलकीडी बिया खरवडतात. त्यामुळे बिया वेड्यावाकड्या वाढतात, बियांचा आकार लहान राहतो. तसेच त्या कोवळ्या बोंडांची देखील साल सरवडतात. त्यामुळे बोंड आवडधोबड दिसतात, वेडी वाकडी वाढतात व फुटतात.
  • मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात मोठ्या प्रमाणवर घट येते.

नियंत्रणाचे उपाय:

फवारणी वेळापत्रक:

पहिली फवारणी पालवीवर (ऑक्टोबर-नोव्हेंबर):

लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 5% ईसी (सिजेंटा - कराटे) 300 मिलि प्रति एकर 300 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

दुसरी फवारणी मोहोरावर (नोव्हेंबर-डिसेंबर):

प्रोफेनोफॉस 50% ईसी (पीआय इंडस्ट्रीज - करीना) 150 ग्रॅम प्रति एकर 300 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

तिसरी फवारणी फळधारणेच्या कालावधीत (डिसेंबर-जानेवारी)

लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 5% ईसी (सिजेंटा - कराटे) 300 मिलि प्रति एकर 300 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

काजू मोहोरावरील महत्वाचे रोग :

काजू मोहोरावर सहसा रोगांचा प्रादुर्भाव आढळून येत नाही. मात्र मोहोराच्या वेळेस पाऊस पडल्यास करपा रोगाचा प्रादुर्भाव होवू शकतो. हा एक बुरशीजन्य रोग आहे. त्यामुळे मोहोर करपतो व फळधारणा होत नाही. या रोगाच्या नियंत्रणासाठी किटकनाशकाच्या द्रावणात 50 टक्के पाण्यात विरघळणारी कार्बेन्डॅझिम 50% WP (क्रिस्टल-बाविस्टीन) 10 लिटर पाण्यात 10 ग्रॅम या प्रमाणात मिसळून फवारणी करावी.

काजू पिकावरील कीड व रोगांच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी उपाययोजना:

  • पावसाळा संपताच बागेची साफसफाई करावी बागेतील सुकलेल्या व मेलेल्या फांद्या छाटून जाळून टाकाव्यात.
  • झाडांची वाढ दाट झाली असल्यास फांद्यांमध्ये सूर्यप्रकाश पोहोचेल, अशा प्रकारे फांद्यांची विरळणी करावी.
  • मे महिन्यात फळांची काढणी पूर्ण झाल्यावर रोगट फांद्या छाटून, बांडगुळ काढून टाकावे व त्यानंतर 1 टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. याचा उपयोग फांदीमर रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी देखील होतो.
  • हंगामात पालवी व मोहोराची तपासणी करून कीड व रोगांची निरीक्षणे घेऊन योग्य त्या कीटकनाशकाची / बुरशीनाशकाची फवारणी करावी. कीड-रोग ओळखण्यासाठी जवळच्या संशोधन केंद्राची मदत घ्यावी.

काजू पिकाच्या फळांची काढणी, उत्पादन आणि विक्री:

  • लागवडीच्या सुरुवातीपासून काजूच्या झाडांची चांगली निगा राखल्यास काजूच्या झाडांना लागवडीनंतर तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षापासून फळे यावयास सुरुवात होते. परंतु 6 ते 7 व्या वर्षापासून उत्कृष्ट प्रतीच्या काजूबियांचे उत्पादन मिळण्यास सुरुवात होते आणि पुढे 40-50 वर्षे काजूचे नियमित उत्पादन मिळते.
  • काजूच्या झाडाला नोव्हेंबरपासून मोहोर येण्यास सुरुवात होते.
  • फुलोरा आल्यानंतर फळे पक्व होईपर्यंत 62 ते 65 दिवसांचा कालावधी लागतो.
  • काजूच्या झाडाला नवीन पालवी येते आणि या पालवीलाच पुढे मोहोर येतो.
  • सर्वसाधारणपणे फुलोरा दोन ते तीन वेळा येतो. यांपैकी जास्त फळे दुसऱ्या वेळी म्हणजे डिसेंबर-जानेवारी महिन्यांत आलेल्या मोहोराला येतात, म्हणून या काळात उत्पादनात वाढ करण्यासाठी काजूच्या मोहोराची निगा राखणे अत्यंत आवश्यक असते, अन्यथा उत्पादन कमी येते.
  • काही वेळा 90 ते 95% मोहोर गळून जातो. म्हणून मोहोराची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
  • लवकर येणाऱ्या मोहोरापासून तयार होणारी फळे 60 दिवसांत पक्क होतात तर उशिरा आलेल्या बहारापासून तयार होणारी फळे 45 दिवासांत पक्क होतात.
  • काजूचे उत्पादन हे त्या झाडावर असणाऱ्या लहान - लहान फांद्यांच्या संख्येवर अवलंबून असते. ज्या झाडांना लहान फांद्या जास्त असतात त्या झाडांचे उत्पादनही जास्त मिळते. अशा फांद्यांवर एका हंगामात 20 ते 30 किलोपर्यंत काजूबिया धरतात.
  • जमिनीच्या प्रतीनुसार झाडांचा विस्तार आणि झाडावरील लहान फांद्यांची संख्याही वाढते.
  • एका झाडापासून दर हंगामात 35 किलो काजूबिया मिळण्यासाठी साधारणपणे 4,000 बिया लागतात. ह्याकरिता लहान फांद्यांची संख्या 200 ते 250 पर्यंत असावी.
  • फेब्रुवारी महिन्यापासून काजूबिया तयार होण्यास सुरुवात होते आणि मार्च-एप्रिलमध्ये बिया काढणीस तयार होतात, काजू जसजसे तयार होतात, तशी हातानेच तोडणी करावी लागते आणि हे काम 45 ते 75 दिवसांपर्यंत चालते.
  • दोन-तीन दिवसांच्या अंतराने काजूच्या पक्क बिया काढाव्यात.
  • पूर्ण पिकलेली फळे झाडावर तशीच राहू दिल्यास वटवाघळे ती खाऊन टाकतात किंवा तोडून झाडापासून दूर अंतरावर रात्रीच्या वेळी नेऊन टाकतात.
  • पक्क काजूबिया बोंडापासून वेगळ्या करून 2-3 दिवस उन्हात चांगल्या वाळवाव्यात. त्यामुळे बियांमधील ओलाव्याचे प्रमाण 10 ते 12% होते.
  • काजूचे बी काजूफळातील बोंडाच्या वजनाच्या 25 ते 30% वजनाएवढे असते. प्रत्येक मोठ्या झाडापासून 75 ते 100 किलो काजूफळे आणि 20 ते 30 किलो काजूबिया मिळतात.
  • काजूच्या बियांवर कारखान्यामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या प्रक्रिया करून काजूगर तयार केले जाते. नंतर त्यांची वर्गवारी करून 18 किलो काजूगर मावतील अशा आकाराच्या पत्र्याच्या चौकोनी डब्यांमध्ये पॅकिंग करून विक्री करतात.

काजू पिकाच्या फळांची साठवण आणि पिकविण्याच्या पद्धती:

काजूची रसाळ फळे पक्क झाल्यावर तोडली जातात. नंतर खालच्या काजूबिया वाळवून भाजतात. त्यानंतर साल काढून काजूगराचे पूर्ण बी, दोन तुकडे, लहान तुकडे आणि चुरा अशा चार गटांत प्रतवारी (ग्रेडिंग) केली जाते.

वातानुकूलित पत्र्याच्या डब्यात काजूगर साठवतात. काजूची फळे झाडावरच पिकतात, त्यासाठी स्वतंत्र पिकविण्याच्या पद्धती नाहीत.

अशा प्रकारे योग्य रित्या, काजू पिकातील मोहोराचे व्यवस्थापन केल्यास भरपूर उत्पादन मिळू शकते. तुम्ही तुमच्या काजू पिकाच्या लागवडीकरता कोणते तंत्र वापरता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “बागायती पिके” चॅनेलला फॉलो करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. काजू पिकास कोणते हवामान उपयुक्त आहे?

काजू लागवडीसाठी उष्णकटिबंधीय हवामान सर्वोत्तम मानले जाते आणि उष्ण व दमट हवामानासारख्या ठिकाणी काजूचे उत्पादन खूप चांगले होते.

2. काजूचे पीक कोणत्या जमिनीत घेता येते?

काजूच्या पिकासाठी समुद्राच्या तळाची लाल आणि लॅटराइट माती चांगली मानली जाते. तसेच काजूची लागवड अनेक प्रकारच्या मातीत चांगली काळजी घेऊन करता येऊ शकते.

3. काजू पिकाला फुलोरा आल्यानंतर फळे येईपर्यंत किती दिवसांचा कालावधी लागतो?

फुलोरा आल्यानंतर फळे पक्व होईपर्यंत 62 ते 65 दिवसांचा कालावधी लागतो.

62 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ