पोस्ट विवरण
सुने
रोग
चना
कृषि ज्ञान
हरभरा
शेतकरी डॉक्टर
DeHaat Channel
18 Oct
Follow

हरभरा: काही प्रमुख रोग आणि त्यांचे व्यवस्थापन (Gram: Some major diseases and their management)

नमस्कार शेतकरी बंधूंनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

आपण तर जाणताच की, भारतात हरभरा हे रब्बी हंगामातील प्रमुख कडधान्य पिक आहे. महाराष्ट्रात एकूण 13.53 लक्ष हेक्टर क्षेत्र हरभरा पिकाचे असून उत्पादन 11.80 लाख टन एवढे आहे. हरभरा हे हिवाळी ऋतुतील पिक असून या पिकास रात्रीचे आणि दिवसाचे तापमान अनुक्रमे 18 ते 26 अं.से. आणि 21 अं.से. दरम्यान असल्यास पिकाची वाढ चांगली होते. प्रखर सुर्यप्रकाश असल्यास हे पिक जास्तीत जास्त उत्पादन देते. मात्र हरभरा पिकावर होणाऱ्या रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. हेच नुकसान टाळता यावे म्हणूनच आजच्या या लेखात आपण हरभरा पिकातील प्रमुख रोग आणि त्यांच्या व्यवस्थापनाविषयी जाणून घेणार आहोत.

हरभरा पिकात आढळून येणारे रोग:

  • मर रोग
  • मूळ कुज
  • खोड कुज

हरभरा पिकातील मर रोगाविषयी (Gram-Wilt Disease):

  • वातावरणातील बदल आणि बीज प्रकियेचा अभाव यामुळे सध्या हरभरा पिकावर (Chana Crop) मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
  • हा बुरशीजन्य रोग (Fungal Disease) असून 'फ्युजेरियम ऑक्सिस्फोरम'या बुरशीमुळे होतो.
  • या रोगाची लक्षणे साधारणपणे पेरणीनंतर ३ ते ४ आठवड्यांनी दिसून येतात.

मर रोगाची लक्षणे:

  • मर रोगाची बुरशी बियाण्यातून अथवा जमिनीतून मुळाद्वारे रोपात प्रवेश करते आणि खोडाच्या आतील भागात वाढते परिणामी जमिनीतील पाणी आणि अन्नद्रव्यांचा पानाकडे होणारा पुरवठा बंद होतो व त्यामुळे सुरवातीला या रोगात कोवळी पाने व फांद्या सुकतात आणि शेवटी पूर्ण झाड वाळून जाते.
  • या रोगाचा प्रसार प्रामुख्याने जमीन आणि बियांद्वारे होतो.
  • प्रथम पाने पिवळसर होतात आणि सुकतात. मर रोगग्रस्त झाड शेवटी पूर्णपणे मरून जाते.
  • रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यास झाडांची संख्या कमी होऊन पीक विरळ होते. परिणामी उत्पादनात घट होते.

मर रोगाचे व्यवस्थापन:

  • एकाच शेतात सतत हरभरा पीक घेणे टाळावे.
  • मर रोगग्रस्त जमिनीत हरभऱ्याचे पीक घेऊ नये.
  • लागवडीपूर्वी ३ ग्रॅम कार्बेन्डाझिम 50% WP (क्रिस्टल-बाविस्टीन) प्रती किलो बियाण्यास पेरणीपुर्वी लावावे. नंतर ५ ग्रॅम माइक्रोबैक्स ट्राइकोविन (ट्राइकोडर्मा विरिडी) या जैविक बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी.
  • मर रोगाच्या नियंत्रणासाठी रोग प्रतिकारक्षम वाणांची निवड करावी.
  • रोगग्रस्त झाडे मुळासकट उपटून शेताबाहेर उपटून फेकून द्यावीत.
  • मर रोगाचा प्रादुर्भाव शेतात दिसताच जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्माची आळवणी करावी किंवा शेणखतातून मातीत टाकावे.
  • रासायनिक पद्धतीने रोग नियंत्रण करताना कार्बेन्डाझिम या बुरशीनाशकाची आळवणी करावी.

हरभरा पिकातील मूळ कूज (Gram-Root Rot):

मूळ कूज हा रोग विविध माती - जनित रोगजनकांमुळे होतो. तो हरभऱ्याच्या मुळांना संक्रमित करतो, ज्यामुळे वाढ खुंटते, आणि रोपांचा मृत्यू होतो.

मूळ कूज रोगाची लक्षणे:

  • हरभऱ्याच्या शेतात, रोगाची सुरवात, रोपे अधुनमधुन वाळलेली दिसण्याने होते.
  • रोगाचे पहिले लक्षण पाने पिवळी पडणे आणि वाळणे या लक्षणांनी दिसते.
  • ही संक्रमित पाने बहुधा एक-दोन दिवसात गळतात आणि पूर्ण झाड पुढच्या २-३ दिवसात संपूर्णपणे वाळते.
  • प्रभावित झाडांची पाने आणि फांद्या बहुधा पिवळसर रंगाच्या असतात तरी काही बाबतीत, खालची पाने आणि खोड तपकिरी रंगहीनताही दर्शविते.
  • सोटमूळ कोरड्या जमिनीत गडद आणि ठिसुळ होते.

मूळ कुज रोगाचे व्यवस्थापन:

  • उन्हाळ्यात खोल नांगरणी करा. प्रतिरोधक वाणांची लागवड करा.
  • जास्त तापमानातील रोपे लागवडीसाठी टाळा.
  • कार्बेन्डाजिम 50% डब्ल्यूपी (क्रिस्टल-बाविस्टिन) - 2.5 ग्रॅम ने प्रति किलो बियाण्यावर बीजप्रक्रिया करावी.
  • कार्बेन्डाजिम 50% डब्ल्यूपी (क्रिस्टल-बाविस्टिन) - 400 ग्रॅम किंवा
  • मॅन्कोझेब 64% डब्ल्यूपी + मेटलैक्सिल 8% (टाटा - रॅलीस मास्टर) - 500 ग्रॅमने ड्रेंचिंग करावे.

हरभरा पिकातील खोड कुज (Gram-Foot Rot):

हा रोग स्क्लेरोशिअम रोलफसाय या बुरशीमुळे होतो. या रोगाची लक्षणे पीक पेरणीनंतर ६ आठवड्यांपर्यंत दिसून येतात.

खोड कुज रोगाची लक्षणे:

  • ओलसर जमिनीमध्ये हा रोग जास्त दिसून येतो.
  • रोपावस्थेतील पीक कोलमडते, परंतु प्रोढावस्थेतील पीक कोलमडत नाही.
  • ठळकपणे पाने गळण्याची प्रक्रिया दिसत नाही.
  • झाड उपटले असता जमिनीलगतचा खोडाचा भाग कुजलेला व खालपर्यंत कुजत गेलेला दिसतो.
  • कुजलेल्या भागावर पांढरी बुरशी वाढलेली दिसते. ही बुरशी बराच काळापर्यंत दिसते.
  • ओलसर जागेतील बाधित झालेली रोपे उपटली असता मोहरीच्या आकाराची बुरशीची बीजफळे (पांढरी बुरशी) खोडाभोवताली वाढलेली असते.
  • या बुरशीचा प्रादुर्भाव शेतात सहज ओळखता येतो.
  • शेतात काही ठिकाणी अशी वाळलेली झाडे आढळतात.

खोड कुज रोगाचे व्यवस्थापन:

  • डायथेन एम-45 75% डब्ल्यूपी (डायथेन एम - 45) 400 ग्रॅम किंवा
  • कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड 50% डब्ल्यूपी (क्रिस्टल - ब्लु कॉपर) यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक औषध 400 ग्रॅम 200 मिली पाण्यात मिसळून 10 दिवसांच्या अंतराने तीन-चार वेळा फवारावे.

फवारणी करताना घ्यावयाची काळजी:

  • फवारणीसाठी गढूळ पाणी वापरू नये. स्वच्छ पाणीच वापरावे.
  • फवारणी द्रावण प्लास्टिक बकेटमध्ये करावे.
  • शक्य झाल्यास फवारणीच्या वेळेस आपण स्वतः शेतात हजर राहावे.
  • फवारणीच्या दिवशी ढगाळ वातावरण असल्यास शक्यतोवर फवारणी करू नये व केल्यास बेस्ट स्टीकरचा वापर अवश्य करावा. तरीही ताबडतोब पाऊस पडल्यास फवारणीचा फायदा होत नाही.
  • औषध तयार करताना प्रथम थोड्या पाण्यात घेऊन नंतर जास्त पाण्यात मिसळावे व व्यवस्थित ढवळून घ्यावे.
  • फवारणी शक्यतोवर सकाळी व दुपारी 4 नंतर करावी. जास्त उन्हामध्ये कृषी रसायनांचे विघटन होते व पाहिजे तसे परिणाम दिसत नाहीत.
  • तणनाशकांचा पंप फवारणीसाठी शक्यतोवर वापरू नाही.
  • एकाच औषधाचा किंवा एकाच गटातील औषधांचा सतत वापर करू नये. त्यामुळे किडींमध्ये प्रतिकारशक्ती वाढते.
  • कीटकनाशके, बुरशीनाशके, संजीवके, एकत्र फवारताना त्यांची सुसंगतता पडताळून पाहावी. द्रावण घट्ट झाल्यास, फाटल्यास किंवा न विरघळल्यास फवारू नये.
  • फवारणीसाठी तयार करून ठेवलेल्या द्रावणाचा ताबडतोब वापर करावा, ते जास्त काळ ठेवू नये.
  • फवारणी सर्व झाडावर खालीवर पानांच्या मागे-पुढे एकसमान होईल याची काळजी घ्यावी.

तुम्ही तुमच्या हरभरा पिकातील रोगांचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी डॉक्टर” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. हरभरा पिकाची लागवड कधी करावी?

हरभरा पिकाची लागवड जिरायती पिकासाठी सप्टेंबेर अखेर ते 15 ऑक्टोबर तर बागायती पिकासाठी 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान करावी.

2. मर रोग कोणत्या बुरशीमुळे होतो?

मर रोग हा बुरशीजन्य रोग (Fungal Disease) असून 'फ्युजेरियम ऑक्सिस्फोरम'या बुरशीमुळे होतो.

3. हरभरा हे कोणत्या हंगामातील पीक आहे?

हरभरा हे रब्बी हंगामातील प्रमुख कडधान्य पिक आहे.

64 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ