पोस्ट विवरण
भुईमूग लागवड तंत्रज्ञान (Groundnut Cultivation Technology)
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
भारतात पिकविल्या जाणाऱ्या पिकांपैकी भुईमूग हे एक प्रमुख तेलबिया पीक आहे. भुईमुगाची शेती आपल्या राज्यात विशेष उल्लेखनीय आहे. भुईमुगाची खरीप हंगामातील उत्पादकता सुमारे 1000 किलो तर उन्हाळी हंगामातील उत्पादकता 1400 किलो प्रति हेक्टर आहे. खरिपातील उत्पादकता पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. देशातील एकूण उत्पादनापैकी 80 टक्के भुईमूग तेलासाठी, 10 टक्के प्रक्रिया करून खाण्यासाठी व 10 टक्के निर्यातीसाठी वापरले जाते. दिवसेंदिवस तेलाची मागणी वाढत असल्याने भुईमूग लागवड करणे फायदेशीर ठरत आहे. शेंगदाण्यामध्ये अंड्यापेक्षा अधिक प्रथिने (25 टक्के) असतात. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी फळबागांची लागवड तसेच कापसाचे क्षेत्र वाढले आहे. त्यामध्ये भुईमूग हे आंतरपीक घेऊन उपलब्ध जमिनीचा पुरेपूर वापर करता येणे शक्य आहे. भुईमूग हे असे पीक आहे की त्यापासून सकस चारा, तेल, खाद्य (भाजके शेंगदाणे, चिक्की) सकस पेंड व टरफलापासून उत्तम खत मिळते परंतु, भुईमुगाचा सर्वात मोठा वापर हा तेल काढण्यासाठी केला जातो. चला तर मग आजच्या भागात जाणून घेऊया भुईमूग लागवड तंत्रज्ञानाविषयीची माहिती.
हंगाम (Season) :
- भारतात भुईमूग लागवडीचे खरीप, रब्बी आणि उन्हाळी असे तीन हंगाम आहेत.
- ऊन्हाळी भुईमूग पेरणीचा योग्य कालावधी : 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत असतो.
- खरिपात पेरणी जून-जुलै महिन्यांत मॉन्सून सुरू होण्याच्या वेळेवर अवलंबून असते.
- भुईमुगासाठी पेरणी जूनच्या शेवटच्या किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात करावी.
हवामान (Weather) :
- हे पीक उष्ण व समशीतोष्ण कटिबंधातील आहे.
- भरपूर सूर्यप्रकाश व उबदार हवामान पीकवाढीच्या दृष्टीने उपयुक्त असते.
- पेरणीवेळी रात्रीचे किमान तापमान 18 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असावे.
- फुलोरा अवस्थेदरम्यान या पिकाला दिवसाचे तापमान 24 ते 25 अंश सेल्सिअस लागते; अन्यथा फुलधारणा क्षमतेवर विपरीत परिणाम होतो.
- अतिउशिरा पेरणी केल्यास फुलोऱ्याच्या कालावधीत तापमान वाढलेले असते.
जमीन (Soil) :
- भुईमुगाच्या लागवडीसाठी मध्यम प्रकारची, भुसभुशीत, चुना (कॅल्शियम) व सेंद्रिय पदार्थ यांचे योग्य प्रमाण असलेली, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन योग्य समजली जाते.
- या जमिनी नेहमी भुसभुशीत राहत असल्याने जमिनीत भरपूर प्रमाणात हवा खेळती राहते.
- त्यामुळे मुळांची चांगली वाढ होऊन आऱ्या सुलभ रीतीने जमिनीत जाण्यास तसेच शेंगा पोसण्यासही मदत होते.
मशागत :
- जमीन तयार करताना नांगरणीची खोली साधारणत: फक्त 12 - 15 सें.मी. एवढीच राखावी.
- जास्त खोल नांगरणी केल्यास जमिनीत शेंगा जास्त खोलीवर लागतात.
- पीक परिपक्वतेनंतर झाडे उपटताना अथवा वखराद्वारे काढताना अर्ध्या शेंगा तुटून जमिनीत राहतात. परिणामी उत्पादनात घट येते.
- नांगरणीनंतर उभी-आडवी वखरणी करून जमीन भुसभुशीत करावी.
- शेवटची वखरणी किंवा रोटाव्हेटर मारण्यापूर्वी चांगले कुजलेले शेणखत सुमारे 2 टन प्रति एकर याप्रमाणे द्यावे.
सुधारित वाण :
- फुले प्रगती (जे.एल.-24)
- फुले व्यास (जे.एल.-220)
- कोयना (बी-95)
- फुले उनप (जे.एल.-286)
- फुले भारती (जेएल-776)
बियाणे प्रमाण :
- जात निहाय तसेच दाण्याच्या आकारमानानुसार बियाण्याचे प्रमाण ठरते.
- कमी आकाराचे दाणे असलेल्या जातींसाठी एकरी 40 किलो, मध्यम आकाराच्या बियाण्यासाठी एकरी 50 किलो, तर टपोऱ्या दाण्याच्या जातीसाठी एकरी 60 किलो बियाणे वापरण्याची शिफारस केली जाते.
बीजप्रक्रिया : (प्रतिकिलो बियाणे)
- पेरणीपूर्वी अर्धा तास आधी
थायरम 5 ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम 2 ग्रॅम किंवा
- मॅंकोझेब 3 ग्रॅम किंवा ट्रायकोड्रर्मा कल्चर (भुकटी) 4 ते 5 ग्रॅम किंवा
ट्रायकोड्रर्मा कल्चर (द्रव्य) 3 ते 5 मि.लि.प्रति किलो बियाणे
- सूचना : बीजप्रक्रियेनंतर बियाणे थोडा वेळ सावलीत वाळवून मग पेरणीसाठी वापरावे.
भुईमुगाबरोबर आंतरपिके :
भुईमुगापासून अपेक्षित उत्पन्न मिळण्याची शाश्वती नसल्यास भुईमूग+तीळ (6:2), भुईमूग + सूर्यफूल (6:2), भुईमूग + कापूस (2:1), भुईमूग + तूर (6:2) या प्रमाणात पेरणी करून दोन्ही पिकांचे अधिक उत्पादन घेणे शक्य होते, तसेच भुईमूग फळबागांमध्ये आंतरपीक म्हणून घेतल्यास फळबागेस फायदा होतो.
पेरणीचे अंतर :
- सपाट वाफा पद्धतीने पेरणी करावयाची झाल्यास पेरणी यंत्राच्या साह्याने दोन ओळींतील अंतर 30 सेंमी व दोन रोपांतील अंतर 10 सेंमी ठेवावे.
- जेणेकरून हेक्टरी 3.33 लाख इतकी रोपांची संख्या ठेवता येईल.
- टोकण पद्धतीने लागवड केल्यास बियाण्याची 25 टक्के बचत होते.
- पेरणीच्या वेळी बारीक बियाणे बाजूला काढणे शक्य होऊन प्रतिहेक्टरी 3.33 लाख रोपे मिळतात.
- पेरणी पाच सेंमी खोलवर करावी.
लागवड पद्धत (Cultivation) :
भुईमुगाची पेरणी सपाट वाफ्यावर किंवा रुंद सरी वरंबा पद्धतीने करता येईल.
सपाट वाफा पद्धत :
- पेरणी सपाट वाफ्यावर करायची झाल्यास 30 सेंमी अंतर असलेले पेरणीयंत्र वापरून वाफशावर पेरणी करावी किंवा बियाणे टोकून पेरणी करावी.
- पेरणीसाठी दोन ओळींतील अंतर 30 सेंमी तर दोन रोपांतील अंतर 10 सेंमी ठेवावे व पाणी द्यावे.
- त्यानंतर 7 - 8 दिवसांनी न उगवलेल्या जागी नांग्या भरून घ्याव्यात.
इक्रिसॅट पद्धतीने लागवड:
या पद्धतीस रुंद वाफा पद्धत म्हणतात.
इक्रिसॅट पद्धतीचे फायदे :
- गादीवाफ्यावरील जमीन भुसभुशीत राहत असल्याने मुळांची कार्यक्षमता वाढून पिकाची वाढ जोमदार होते व उत्पादनात वाढ होते.
- जमिनीत पाणी व हवा यांचे प्रमाण संतुलित ठेवता येते त्यामुळे पिकाची कार्यक्षमता वाढते.
- पिकास पाण्याचा ताण बसत नाही, तसेच जास्त पाणी दिल्यामुळे सरीतून पाण्याचा निचरा करता येतो.
- तुषार सिंचन पद्धतीने पाणी देणे सोयीस्कर होते.
- या पद्धतीत पाटाने पाणी देता येते. यासाठी वेगळी रानबांधणी करावी लागत नाही.
- संतुलित खत व्यवस्थापन केल्याने अन्नद्रव्ये कमतरतेची लक्षणे दिसणार नाहीत व योग्य प्रकारे पिकाची वाढ होऊन उत्पादनात वाढ होते.
आंतर मशागत :
- पेरणीपासून साधारणत: 10 ते 12 दिवसांनी खांडण्या (तुटाळ्या) भरून घ्याव्यात.
- पेरणीपासून सुरवातीच्या 6 आठवड्यांपर्यंत 2 ते 3 डवरणी तसेच 1 ते 2 वेळा खुरपणी करावी.
- आऱ्या सुटण्याच्या अवस्थेपासून पिकात आंतरमशागतीची कामे (डवरणी) करू नये.
सिंचन व्यवस्थापन (Water Management) :
- जातीनूसार भुईमुगाचा कालावधी साधारणत: 90 ते 115 दिवसांचा असू शकतो.
- उन्हाळी भुईमुगाच्या ओलीत व्यवस्थापनासाठी तुषार सिंचन पद्धतीचा वापर फायद्याचा ठरतो.
- पेरणीपूर्वी ओलीत देऊन जमीन भिजवून घ्यावी.
- वाफसा आल्यावर अथवा जमिनीचा वरचा पापुद्रा सुकल्यावर लगेच पेरणी करावी.
- पेरणीनंतर 4 - 5 दिवसांनी पाणी द्यावे किंवा उगवण झाल्यानंतर लगेचच ओलीत करावे.
- यानंतर पीक फुलोरा अवस्थेत येईपर्यंत पाण्याचा ताण द्यावा.
- यादरम्यान जमिनीला भेगा पडलेल्या नाहीत, याची खात्री करावी.
- फुले येण्याच्या अवस्थेपासून (पेरणीपासून 22 - 30 दिवस ) ठराविक अंतरानुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
- आऱ्या सुटण्याची अवस्था (पेरणीपासून 40 - 45 दिवस), शेंगा पोसण्याची अवस्था (पेरणीपासून 65 - 70 दिवस) या वेळी पाण्याची पाळी चुकवू नये.
- पाण्याच्या पाळ्यांचे प्रमाण जमिनीचा प्रकार, मगदूर, सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण, चुनखडीचे प्रमाण यानुसार ठरवावे.
- एप्रिल-मे महिन्यांत गव्हाचा गव्हांडा व बारीक काड पिकाच्या ओळीमधील जागेत पातळ थरात पसरून घेतल्यास पाण्याच्या पाळीतील अंतर वाढवता येते.
- ओलीत व्यवस्थापन करताना जमिनीला भेगा पडणार नाही, याची कटाक्षाने काळजी घ्यावी.
- आऱ्या जमिनीत जाताना तसेच शेंगा पोसताना जमिनीतील ओलाव्याची वाफसा स्थिती राखणे आवश्यक आहे.
खत व्यवस्थापन (Fertilizer Management) :
- पेरणीवेळी प्रति एकरी युरिया 25 किलो + सिंगल सुपर फॉस्फेट 125 किलो + म्युरेट ऑफ पोटॅश 35 किलो + जिप्सम 150 ते 200 किलो याप्रमाणात द्यावे.
- पेरणीवेळी 4 - 5 किलो झिंक सल्फेट तसेच बोरॅक्स 2 किलो प्रति एकरी द्यावे.
- पिकाला शेंगा फुटण्याच्या अवस्थेत पुन्हा जिप्सम 150 ते 200 किलो प्रतिएकर याप्रमाणात द्यावे.
- जिप्समच्या वापरामुळे शेंगा चांगल्या पोसून, उत्पादन वाढण्यास मदत होते.
भुईमूग पिकात आढळून येणाऱ्या किडी (Pests found in Groundnut crop) :
- मावा
- फुलकिडे
- तुडतुडे
- पाने गुंडाळणारी अळी
- हुमणी
भुईमूग पिकात आढळून येणारे रोग (Disease found in Groundnut crop):
- तांबेरा रोग
- टिक्का रोग
- शेंडेमर रोग
- मर रोग
काढणी :
- भुईमुगाचा पाला पिवळा दिसू लागल्यावर आणि शेंगाचे टरफल टणक बनून आतल्या बाजूने काळसर दिसू लागताच काढणी करावी.
- काढणीनंतर शेंगा चांगल्या वाळवाव्यात. त्यातील ओलाव्याचे प्रमाण 8 ते 9 टक्क्यांपर्यंत खाली आणावे.
उत्पादन :
सुधारित पद्धतीने भुईमुगाची पेरणी योग्य पद्धतीने संतुलित खतांचा वापर, आंतरमशागत, पाणी व्यवस्थापन व पीक संरक्षण केल्यास भुईमुगाच्या सुधारित वाणांपासून एकरी 8 - 10 (खरीप), तर 12 - 14 (उन्हाळी) क्विंटल वाळलेल्या शेंगा तसेच 1.5 ते 2 टन कोरडा पाला मिळण्यास काहीच हरकत नाही.
अशा प्रकारे योग्य रित्या, आपल्या शेतातील मातीनुसार योग्य हवामानानुसार भुईमुगाची लागवड केल्यास भरपूर उत्पादन मिळू शकते. तुम्ही तुमच्या भुईमूग पिकाच्या लागवडीकरता कोणते तंत्र वापरता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “बागायती पिके” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. भारतात भुईमूग लागवडीचा हंगाम कोणता?
भारतात भुईमूग लागवडीचे खरीप, रब्बी आणि उन्हाळी असे तीन हंगाम आहेत.
2. उन्हाळी सोयाबीन लागवडीचा योग्य कालावधी कोणता?
ऊन्हाळी भुईमूग पेरणीचा योग्य कालावधी 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत असतो.
3. भुईमूग पिकासाठी योग्य जमीन कोणती?
भुईमूग पिकासाठी मध्यम प्रकारची, भुसभुशीत, चुना (कॅल्शियम) व सेंद्रिय पदार्थ यांचे योग्य प्रमाण असलेली, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन योग्य समजली जाते.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ