पोस्ट विवरण
सुने
रोग
कीट
कृषि ज्ञान
मूँगफली
कृषी ज्ञान
DeHaat Channel
17 Apr
Follow

भुईमूग - कीड व रोग व्यवस्थापन (Groundnut - Pest and Disease Management)

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

भुईमूग हे भारतातील महत्वाचे तेलबिया पीक आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे हे पीक खरीप व उन्हाळी हंगामात घेता येऊ शकते. हे पीक तेलाची चांगली प्रत तसेच लागवडीसाठी कमी खर्चाचे असल्यामुळे शेतकरी बांधवांच्या पसंतीचे होत आहे. परंतु या भुईमूग पिकाच्या लागवडीत येणाऱ्या प्रमुख अडचणींमधील सर्वात महत्त्वाची अडचण म्हणजे भुईमूग पिकावर पडणारी कीड व रोग. भुईमूग पिकावर येणाऱ्या काही महत्वाचा किडींचा व रोगांचा बंदोबस्त केल्यास उत्पादनात व नफ्यामध्ये वाढ होते. पोषणयुक्त आहाराच्या दृष्टीने देखील भुईमूग हे अत्यंत महत्त्वाचे पीक मानले जाते. भुईमुगाचे उत्तम व्यवस्थापन केले, तर शेतकरी विक्रमी उत्पादन घेऊ शकतात. वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलांमुळे भुईमूग पिकावर किडींचा व रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो.

भुईमूग पीक तीनही हंगामांत घेतले जाणारे पीक असून, निरनिराळ्या किडी, रोग व तणांच्या प्रादुर्भावामुळे दरवर्षी या पिकाचे मोठे नुकसान होते. भुईमूग पिकावरील कीड व रोगांचे वेळीच एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. म्हणूनच आजच्या या लेखात आपण त्याच काही महत्वाच्या किडी व रोगांच्या व्यवस्थापनाविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.

भुईमूग पिकात आढळून येणाऱ्या किडी (Pests found in Groundnut crop) :

  • मावा
  • फुलकिडे
  • तुडतुडे
  • पाने गुंडाळणारी अळी
  • हुमणी

मावा कीटक (Aphid) :

मावा कीटकाची ओळख:

  • मावा कीटक हा अतिशय लहान असतो.
  • मावा कीटक हिरव्या किंवा तपकिरी रंगाचा असतो.

मावा कीटकाची लक्षणे (Symptoms):

  • हे कीटक कोवळी पाने आणि शेंड्यातील रस शोषून घेतात.
  • त्यामुळे नवीन पालवी येणे बंद होते.
  • ही कीड सोंडेद्वारे झाडातील अन्नरस शोधते.
  • मावाच्या अधिक प्रादुर्भावामुळे झाडे वाळतात.

उपाय (Remedy):

  • निंबोळी अर्क (5%) - 400 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी.
  • इमिडाक्लोप्रिड 17.8% एसएल (बायर-कॉन्फिडोर) 100 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी किंवा
  • डायमेथोएट 30% ईसी (टाटा-टॅफगोर) 160 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी.
  • इमिडाक्लोप्रिड 70% डब्ल्यूजी (सल्फर मिल्स-प्रोन्टो) 12 ते 20 ग्रॅम एकरी फवारावे किंवा
  • फेनप्रोपॅथ्रिन 30% ईसी (सुमिटोमो- मियोथ्रिन)  100 मिली/ 200 लिटर एकरी फवारावे किंवा
  • बीटा-सायफ्लुथ्रिन + इमिडाक्लोप्रिड 300 ओडी (8.49 + 19.81% डब्ल्यू/डब्ल्यू) (बायर-सोलोमोन) 80 मिली/एकरी फवारावे.

फुलकिडे (Thrips) :

फुलकिड्यांची ओळख:

  • फुलकिडे आकाराने अतिशय लहान म्हणजेच 1 मीली. पेक्षा कमी लांबीचे असतात.
  • फुलकिड्यांचा रंग हा फिकट पिवळा असतो.

फुलकिड्यांची लक्षणे (Symptoms):

  • फुलकिडे पानातील रस शोषून घेतात व पानांचे नुकसान करतात.
  • कीड नवीन पाने आणि खोड या भागांना नुकसान करते.
  • पाने गुंडाळलेली दिसतात आणि नंतर फिकट पिवळी होऊन हळूहळू सुकून जातात.
  • तीव्र प्रादुर्भावामुळे नवीन पाने कोरडी होऊन पडतात.

उपाय (Remedy):

  • या कीडीच्या नियंत्रणासाठी निळे चिकट सापळे लावावी.
  • नीम तेल (अझेडरेक्टिन) @30 मिली
  • बायो आर 303 (वनस्पती अर्क) @30 मिली
  • थायोमिथोक्सम 25% डब्ल्यूजी (देहात-असेर) 100 ग्रॅम 200 लिटर पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी किंवा
  • इमिडाक्लोप्रिड 17.8% एसएल (बायर-कॉन्फिडोर) @100 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी किंवा
  • फिप्रोनिल 5% एससी (धानुका-फॅक्स) - 400 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी किंवा
  • फिप्रोनिल 40% + इमिडाक्लोप्रिड 40% डब्ल्यूजी (घरडा - पोलीस) 40-60ग्रॅम/एकर प्रमाणात फवारावे किंवा
  • एसीफेट 50% + इमिडाक्लोप्रिड 1.8% एसपी (युपीएल- लान्सर गोल्ड) 300 ग्रॅम एकरी वापरावे किंवा
  • स्पिनोसॅड 45% एससी (बायर- स्पिनटोर) 100 मिली प्रति एकर 200 लिटर पाण्यात मिसळून फवारावे किंवा
  • स्पिनेटोरम 11.7 % एससी (डाव-डेलिगेट) 160-200 मिली/एकर वापरावे किंवा
  • प्रोफेनोफॉस 40% + फेनपायरॉक्सिमेट 2.5% ईसी (सुमिटोमो-एट्ना) 300-400 मिली/एकर वापरावे.

तुडतुडे (Jassid):

तुडतुडे कीटकाची ओळख:

  • किडीची 4 ते 5 मि. मी. लांबी, रंग हिरवट करडा असून, आकार पाचरीसारखा असतो.
  • डोक्‍यावर तपकिरी रंगाचे तीन ठिपके असतात.
  • तुडतुडे चालताना तिरपे चालतात ही त्याची प्रमुख ओळख आहे.

तुडतुडे कीटकाची लक्षणे (Symptoms):

  • तुडतुडे ही कीड पानातील रस शोषून घेते तसेच तुडतुडे आणि त्यांची पिल्ले पानाच्या खालच्या बाजूला राहून त्यातील रस शोषून घेतात.
  • तुडतुड्यांच्या शरीरातून स्त्रवणाऱ्या गोड चिकट मधासारख्या पदार्थामुळे मिरचीवर, पानांवर काळ्या बुरशीची वाढ होते.
  • प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेमध्ये अडथळा येतो.
  • या किडीचा जास्त प्रादुर्भाव झाल्यास पाने मुरगळतात व परिणामी झाडांची वाढ खुंटते.
  • तुडतुड्यांमुळे 50 ते 70% पर्यंत उत्पादनात घट येऊ शकते.

उपाय (Remedy):

  • या किडीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोरपीड 70% डब्ल्यू जी (देहात-कॉन्ट्रोपेस्ट) 40 ग्रॅम किंवा
  • थायोमिथोक्सम 25% डब्ल्यूजी (देहात-असेर) 80 ग्रॅम 200 मिली किंवा
  • डायमेथोएट 30% ईसी (टाटा-टॅफगोर) 160 मिली प्रति एकर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

पाने गुंडाळणारी अळी (Leaf Roller):

पाने गुंडाळणाऱ्या अळीची ओळख:

  • पतंग लहान व करड्या रंगाचे असतात.
  • त्यांच्या पुढील पंखावर टोकाकडील मागच्या किनाऱ्यावर पांढरा ठिपका असतो.
  • मागील पंख दातेरी असतात.

पाने गुंडाळणाऱ्या अळीची लक्षणे (Symptoms):

  • अळी पाने गुंडाळते व आत राहून पाने पोखरते.
  • कीडग्रस्त पाने कपासारखी अथवा चोचेसारखी दिसतात व ती गळून पडतात.

उपाय (Remedy):

इंडोक्झाकार्ब 14.5% एससी (घरडा-किंगडोक्सा) 100 मिली प्रति एकर 200 ली पाण्यात मिसळून फवारणी करा.

हुमणी (White grub) :

हुमणी किडीची ओळख:

  • प्रथम अवस्थेतील हुमणीच्या अळ्या अंड्यातून बाहेर निघाल्यावर जमिनीतील कुजलेल्या सेंद्रिय पदार्थावर किंवा जिवंत मुळे मिळाल्यास मुळांवरच उपजीविका करतात.
  • त्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेतील अळ्या ऊस व इतर पिकांची मुळे जून-ऑक्टोबर महिन्यात खातात.
  • मुळे खाल्ल्यामुळे पिकाचे अन्न व पाणी घेण्याचे कार्य बंद पडते.

हुमणी किडीची लक्षणे (Symptoms):

  • कीड पाने व मुळे खाते ज्यामुळे झाडे मरगळतात व पूर्ण पिवळी पडतात.
  • पाने हळूहळू पिवळी पडण्यास सुरूवात होते व वीस दिवसात पूर्णपणे वाळतात.
  • मुळे कुरतडल्यामुळे संपूर्ण झाड वाळते आणि वाळक्या काठीसारखे दिसते.
  • जमिनी खालील ऊसाच्या कांड्यांवरही ही अळी उपद्रव करते. प्रादुर्भावग्रस्त झाडाला हलकासा झटका दिल्यास झाड सहजासहजी उपटून येते.

उपाय (Remedy):

जून-ऑगस्ट दरम्यान क्लोरपायरीफॉस 20% ईसी (टाटा रैलिस-तफाबान) 1 लि./प्रति एकरी 200 लिटर पाण्यात मिसळून जमिनीत आळवणी करावी.

सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात 0.3% दाणेदार फिप्रोनिल 0.6% जीआर (देहात-स्लेमाईट अल्ट्रा) अथवा 10% दाणेदार फोरेट हे कीटकनाशक 10 कि./ए. मातीत मिसळावे व नंतर हलके पाणी द्यावे.

भुईमूग पिकात आढळून येणारे रोग (Disease found in Groundnut crop):

  • तांबेरा रोग
  • टिक्का रोग
  • शेंडेमर रोग
  • मर रोग

तांबेरा रोग (Rust) :

लक्षणे:

  • तांबेरा हा बुरशीजन्य रोग असून, हा रोग पानांच्या खालच्या बाजूला सूक्ष्म ठिपक्यांच्या स्वरूपात दिसून येतो.
  • हे ठिपके हळूहळू जांभळट व थोड्या उंचावलेल्या फोडात बदलतात.
  • हे ठिपके गोल ते अंडाकृती आकाराचे असून विखुरलेले किंवा पुंजक्यांसारखे असतात.
  • तांबेरा रोगाची लक्षणे पर्णकोषावर आणि फुलांच्या फांदीवरही दिसतात.

रोग व्यवस्थापन:

  • रासायनिक खतांची संतुलित मात्रा द्यावी. युरिया शिफारसशी पेक्षा अधिक मात्रा देऊ नये.
  • पेरणीसाठी तांबेरा प्रतिरोधक वाणांची निवड करावी.
  • वेळेवर पेरणी करावी.
  • पिकाच्या गरजेनुसार पाणी द्यावे.
  • तांबेरा रोगाची लक्षणे दिसू लागताच प्रोपीनेब 70% डब्ल्यूपी (देहात - Zinacto) प्रति एकर 200 मिली 200 लिटर पाण्यातून फवारावे.

पानांवरील ठिपके/टिक्का रोग (Nematodes):

लक्षणे:

  • हा रोग सारकोस्पोरा तसेच अलटर्निया बुरशीच्या प्रजातीमुळे होतो.
  • झाडाच्या पानावर, खोडावर व शेंगावर तपकिरी रंगाचे, विशिष्ट आकाराचे व आकारमानाचे गडद वलय असलेले ठिपके आढळतात.
  • कालांतराने पानावरील ठिपक्यांचा आतील भाग गळून पानाला छिद्रे पडतात.
  • आद्र हवामान या रोगाच्या प्रसारास अनुकूल ठरते.

रोग व्यवस्थापन:

  • पेरणीपूर्वी बियाण्यास (कार्बॉक्सिन 37.5% + थायरम 37.5%) मिश्र घटक 3 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
  • रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास टेबुकोण्याझोल 10% डब्लूपी + सल्फर 65% डब्लूजी (हरू - सुमिटोमो ) 400 प्रति 200 ली पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी.

शेंडेमर:

लक्षणे:

  • कोवळ्या पानांवर थोडे पिवळे ठिपके दिसतात जे नंतर वाढुन पिवळ्या आणि तपकिरी सुकलेल्या गोल कडांच्या डागात आणि पट्ट्यात बदलतात.
  • नंतर शेंडेमर हा रोग देठ, फांद्या आणि कळ्यांपर्यंत पसरतो.
  • बाधीत रोपांची वाढ खुंटते, विकृत पाने आणि सामान्य पिवळेपणा दिसतो.

रोग व्यवस्थापन:

  • निंबोळी अर्क (5%) - 400 मिली प्रती एकर या प्रमाणात फवारणी करावी.
  • इमिडाक्लोप्रिड 17.8% एसएल (बायर-कॉन्फिडोर) 100 मिली प्रती एकर या प्रमाणात ड्रीप द्वारे द्यावे.

मर रोग (Fusarium Wilt) :

मर हा रोग जमिनीतील बुरशीमुळे होतो.

लक्षणे:

  • या रोगाची लागण किंवा प्रादुर्भाव रोपवाटीकेमध्ये बीज लागवडीनंतर दुसर्‍या आठवड्यापासून पाचव्या आठवड्यापर्यंत आढळून येतो.
  • लागण झालेली रोपे निस्तेज होतात आणि कोमेजतात.
  • रोपाचा जमिनी लगतचा खोडाचा भाग आणि मुळे सडतात. त्यामुळे रोपे कोलमडतात व मरतात.

उपाय:

  • हेक्झाकॉनाझोल 5% एससी (धनुका-हेक्झाधन) 400 मिली प्रती पंप 200 मिली प्रति एकर पाण्यातून फवारावे.
  • कॉपर ऑक्झीक्लोराईड 50% डब्लूपी (क्रिस्टल - ब्लु कॉपर) 400 ग्रॅम 200 ली पाण्यात मिसळून हे द्रावण गादी वाफे किंवा रोपांच्या मुळांभोवती टाकावे.

फवारणी करताना घ्यावयाची काळजी:

  • फवारणीसाठी गढूळ पाणी वापरू नये. स्वच्छ पाणीच वापरावे.
  • फवारणी द्रावण प्लास्टिक बकेटमध्ये करावे.
  • शक्य झाल्यास फवारणीच्या वेळेस आपण स्वतः शेतात हजर राहावे.
  • फवारणीच्या दिवशी ढगाळ वातावरण असल्यास शक्यतोवर फवारणी करू नये व केल्यास बेस्ट स्टीकरचा वापर अवश्य करावा. तरीही ताबडतोब पाऊस पडल्यास फवारणीचा फायदा होत नाही.
  • औषध तयार करताना प्रथम थोड्या पाण्यात घेऊन नंतर जास्त पाण्यात मिसळावे व व्यवस्थित ढवळून घ्यावे.
  • फवारणी शक्यतोवर सकाळी व दुपारी 4 नंतर करावी. जास्त उन्हामध्ये कृषी रसायनांचे विघटन होते व पाहिजे तसे परिणाम दिसत नाहीत.
  • तणनाशकांचा पंप फवारणीसाठी शक्यतोवर वापरू नाही.
  • एकाच औषधाचा किंवा एकाच गटातील औषधांचा सतत वापर करू नये. त्यामुळे किडींमध्ये प्रतिकारशक्ती वाढते.
  • कीटकनाशके, बुरशीनाशके, संजीवके, एकत्र फवारताना त्यांची सुसंगतता पडताळून पाहावी. द्रावण घट्ट झाल्यास, फाटल्यास किंवा न विरघळल्यास फवारू नये.
  • फवारणीसाठी तयार करून ठेवलेल्या द्रावणाचा ताबडतोब वापर करावा, ते जास्त काळ ठेवू नये.
  • फवारणी सर्व झाडावर खालीवर पानांच्या मागे-पुढे एकसमान होईल याची काळजी घ्यावी.

तुमच्या भुईमूग पिकात वरील पैकी कोणते रोग व कीटक दिसून आले? व तुम्ही काय उपाययोजना केल्या? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. भुईमूग पिकात आढळून येणाऱ्या किडी कोणत्या?

भुईमूग पिकात प्रामुख्याने मावा, फुलकिडे, तुडतुडे, पाने गुंडाळणारी अळी, हुमणी या किडी आढळून येतात.

2. भुईमूग पिकात आढळून येणारे रोग कोणते?

भुईमूग पिकात प्रामुख्याने तांबेरा रोग, टिक्का रोग, शेंडेमर रोग व मर रोग हे रोग आढळून येतात.

3. भुईमुगाचे पीक घेण्याची योग्य वेळ कोणती?

भुईमुगाचे पीक हे खरीप व उन्हाळी हंगामात घेता येऊ शकते.

29 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ