पोस्ट विवरण
सुने
पशु पालन
पशु ज्ञान
DeHaat Channel
27 June
Follow

शेळी, मेंढ्यांचे आरोग्य व्यवस्थापन (Health management of Goats and Sheep)

नमस्कार पशुपालकांनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे.

शेळी व मेंढी पालन व्यवसायामध्ये उत्पादन खर्च नियंत्रित ठेण्याकरिता खाद्य, आहार तसेच आरोग्य व्यवस्थापनावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. शेळीचे उत्पादन वाढविण्याकरिता संतुलित आहार हा जसा अत्यंत महत्वाचा भाग आहे तसेच आरोग्य व्यवस्थापन हा देखील महत्वाचा भाग आहे. त्यामुळे शेळीचे उत्पादन, उत्पादकता व आयुष्य वाढण्यास मदत होते. म्हणूनच आजच्या या भागात आपण शेळी, मेंढ्यांचे आरोग्य व्यवस्थापन याविषयी जाणून घेणार आहोत.

उष्माघाताची लक्षणे (Symptoms of Heatstroke) :

 • शेळ्या, मेंढ्या अस्वस्थ होतात, त्यांची तहान-भूक मंदावते.
 • शरीराचे तापमान 106 अंश सेल्सिअस इतके वाढून त्यांची कातडी कोरडी पडते.
 • डोळे लालसर होऊन डोळ्यातून पाणी गळते.
 • 8 ते 10 तासांनंतर अतिसार होतो.
 • लघवीचे प्रमाण कमी होते.
 • शेळ्या, मेंढ्या बसूनच राहतात.
 • गाभण शेळ्या, मेंढ्या गाभडण्याचे प्रमाण वाढते.
 • उष्माघातामुळे पिले दगावू शकतात.
 • जास्त तापमानाचा परिणाम झाल्यास जास्त प्रमाणात श्वासोच्छ्वास करतात.
 • जास्त लाळ गाळतात. त्यांना उभे राहण्याची ताकद राहत नाही. त्यांना जास्त थकवा जाणवतो.
 • खाद्य कमी खातात.
 • उष्णतेचा ताण मांस उत्पादनावर परिणाम होतो.
 • उष्णतेने त्रस्त असलेल्या उस्मानाबादी शेळ्यांच्या मांसामध्ये सामू बदलतो.

करडांचे व्यवस्थापन:

 • करडांना आवश्यकतेपेक्षा जास्त दूध पाजू नये, नाही तर अपचन होऊन हगवण वाढते.
 • हगवणीसाठी अनेक घटक कारणीभूत असतात.
 • जसे उष्माघात, गरम व दूषित पाणी, साचलेल्या दूषित पाण्याद्वारे जंतबाधा, जिवाणूबाधा किंवा अपचन अशा अनेक घटकांचा समावेश असतो.
 • हगवणीची बाधा झाल्यास शरीरातील पाणी, इलेक्ट्रोलाइटचे प्रमाण फार कमी होते. त्यामुळे जनावर अशक्त होते, जमिनीवर पडून राहतात.

हाताळणी आणि वाहतूक:

 • उन्हाळ्यात शेळ्या, मेंढ्यांची जास्त हाताळणी करणे टाळावे.
 • अत्यंत आवश्यक व गरजेचे असेल तरच सकाळी लवकर आणि दुपारी उशिरा हाताळणी करावी.
 • शरीराच्या जास्त हालचालीमुळे शरीराचे तापमान वाढून त्याचा विपरीत परिणाम आरोग्यावर होतो.
 • हाताळणी करण्यापूर्वी त्यांना थंड पाणी पिण्यास द्यावे.
 • शेळ्या, मेंढ्यांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक टाळावी.
 • कडक उन्हातील प्रवासामुळे जनावरावर ताण येतो शरीरावर विपरीत परिणाम होऊन वजनात घट होते.
 • सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा जेव्हा वातावरण थंड असेल तेव्हा शेळ्या मेंढ्यांची वाहतूक करावी.

व्यवस्थापनातील बदल (Changes in Management) :

 • हिरवा चारा नसल्यास खुराक देणे गरजेचे आहे, त्यामध्ये दूध वाढीसाठी पशू खाद्य तसेच मका, तुरीचा भरडा यासारखा खुराक द्यावा.
 • गोठ्यातील हवा खेळती ठेवावी. आंत्रविषार, लाळ्या खुरकूत आणि घटसर्प व अन्य रोगाचे लसीकरण करून घ्यावे. लसीकरण करण्याच्या दोन दिवस आधी व लसीकरण केल्यानंतर इलेक्ट्रोलाइट पावडर, बी कॉम्प्लेक्स द्यावे, यामुळे लसीकरणाचा ताण येणार नाही. शेळ्यांना सकाळी लवकर 6 ते 9 आणि संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत चरण्यासाठी सोडावे.
 • पशुतज्ज्ञांकडून करडे, कोकरांची नियमित तपासणी करून घ्यावी. करडांच्या वाढीच्या वयाचे साधारण 3 टप्पे असतात. यामध्ये जन्मापासून 2 महिने, 2 ते 4 महिने आणि 4 ते 6 महिने या काळात काळजी घेणे आवश्यक आहे. पहिल्या 6 महिन्यांत दर 15 दिवसांनी करडे सांभाळण्याच्या व्यवस्थापन गरजेनुसार बदलावे लागते. जन्मानंतर लगेच शरीर वजनांच्या नोंदीवरून करडे, कोकरू सशक्त आहेत का, याचा अंदाज बांधता येतो. अशक्त करडे, कोकरू पहिले 15 दिवस विशेष सांभाळावी लागतात.
 • सर्वसाधारणपणे शेळ्या, मेंढ्यांचा पैदासकाळ हा पावसाळ्याच्या सुरुवातीला येतो; मात्र पैदाशीसाठी सक्षम शरीर यंत्रणा तयार होण्यासाठी त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे.
 • उन्हाच्या ताणामुळे ताप येणे, नाकातून पाणी गळणे, चारा व पाणी कमी खाणे, दूध कमी देणे, वजन घटणे अशी लक्षणे दिसतात. पशुवैद्यकाचा सल्ला घेऊन योग्य उपचार करावेत. आजारी शेळ्यांना वेगळे करून उपचार करावेत. जंतांचे औषध आवश्यक असेल तरच द्यावे.
 • शेळ्यांची दाटीवाटी किंवा गर्दी कमी करावी. तज्ज्ञांकडून औषधोपचार करून घ्यावेत. खाद्यातून शेळ्यांना क्षार मिश्रण, जीवनसत्त्वे, प्रतिजैविके द्यावीत. लहान करडांची उन्हाळ्यात विशेष काळजी घ्यावी. कारण करडांची उष्माघातामुळे जास्त प्रमाणात मरतूक होते.
 • गोठ्यातील कप्प्यात खनिज क्षार विटा टांगून ठेवाव्यात. वाढीस लागलेल्या करडांना क्षाराची कमतरता असल्यास ते माती चाटतात आणि यातून पोटात जंतही वाढतात. प्रत्येक करडास जन्मानंतर 15 दिवसांत, तर पुढे दर महिन्यास एकदा जंतनाशन करावे.

पाण्याचे नियोजन (Water Management) :

 • बाह्य वातावरणात एकदम झालेला बदल लहान करडांना सहन होऊ शकत नाही.
 • अचानक घडणारे बदल शेळ्यांच्या व मेंढ्यांच्या शरीरात ताण निर्माण करतात. अशा वेळी आजार पसरतात.
 • शेळ्यांना व मेंढ्यांना स्वच्छ व थंडगार पाणी प्यायला द्यावे.
 • 24 तास गरजेनुसार पाणी पिण्यासाठी उपलब्ध होईल अशी सोय करावी.
 • उन्हाळ्यात शेळ्या, मेंढ्यांना थंड ठिकाणी ठेवावे. थंड पाणी पाजावे. गरज भासल्यास पायावर, मानेवर, पाठीवर पाणी शिंपडावे.
 • शेळ्यांना व मेंढ्यांना रात्रीपेक्षा दिवसा चारपट अधिक पाणी लागते; त्यामुळे स्वच्छ भांड्यात किंवा हौदात पाणी उपलब्ध करून द्यावे.
 • पाण्याचे हौद स्वच्छ धुतलेले असावेत. पिण्याच्या पाण्याचे हौद, चाऱ्याच्या गव्हाणीला महिन्यातून एकवेळा चुना लावावा. पाण्यात पोटॅशिअम परमँगनेट (0.01 टक्का) टाकून पाण्याचे निर्जंतुकीकरण करावे.

तुम्ही तुमच्या शेळी, मेंढ्यांचे आरोग्य व्यवस्थापन कसे करता? या विषयीची माहिती इतर पशुपालकांसह शेयर करा. या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, अशा अजून माहितीसाठी "पशु ज्ञान" चॅनेलला फॉलो करा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. जनावरांमधील उष्माघात म्हणजे काय?

उन्हाळ्यामध्ये वातावरणातील तापमानात जास्त वाढ होते. जनावरांच्या शरीराद्वारे वातावरणातील ही जास्त उष्णता शोषल्यामुळे किंवा शरीरातील उष्णता उत्सर्जित करण्याच्या प्रक्रियेमध्ये बाधा निर्माण झाल्यास किंवा शरीरामध्ये अतिरिक्त उष्णता निर्माण झाल्यास शरीरावर ताण येतो. जनावरांच्या शरीराचे तापमान सुमारे 103 ते 110 अंश फॅरानहाइटपर्यंत वाढते. जनावरांची तापमान नियंत्रण करण्याची शारीरिक क्षमता कमी पडल्यास शारीरिक तापमानात वाढ होणे, जनावर एका जागी उभे राहणे, बैचेन होणे, खाली बसणे अशी लक्षणे दिसून येतात, यालाच 'उष्माघात' असे म्हणतात. वेळीच उपचार न केल्यास जनावरे उष्माघाताचा बळी पडतात.

2. शेळ्या मेंढ्यांची वाहतूक केव्हा करावी?

सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा जेव्हा वातावरण थंड असेल तेव्हा शेळ्या मेंढ्यांची वाहतूक करावी.

3. करडांची जास्त मरतूक कशामुळे होते?

करडांची उष्माघातामुळे जास्त प्रमाणात मरतूक होते.

59 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ