पोस्ट विवरण
सुने
कृषि
कीट
कृषि ज्ञान
शेतकरी डॉक्टर
DeHaat Channel
27 Sep
Follow

पिकांमधील फळमाशी किटकांवर कसे मिळवावे नियंत्रण! (How to control fruit fly pests in crops!)


नमस्कार शेतकरी मित्रांनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

विषाणूजन्य रोगांचे वहन पिकांमध्ये रस शोषणाऱ्या किडींमुळे होते. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पिकात रस शोषक किडींचे वेळीच नियंत्रण करणे महत्वाचे असते. पिकांमध्ये कीड व्यवस्थापनाला खूप मोठे महत्त्व असून पिकांवर होणारा किडींचा प्रादुर्भाव रोखून वेळीच उपाययोजना करून कीटक नियंत्रणात आणणे गरजेचे असते. यातीलच वेलवर्गीय पीक असो वा फळवर्गीय पीक, सर्वामध्येच एक प्रामुख्याने आढळणारी किड म्हणजे "फळमाशी". आजच्या या लेखात आपण पिकाचे सर्वात जास्त नुकसान करणाऱ्या याच फळमाशी कीटकाच्या व्यवस्थापनाविषयी जाणून घेणार आहोत.

फळमाशीची ओळख (Identification of the Fruit fly):

  • फळमाशीची प्रौढावस्था घरी दिसणाऱ्या माशी सारखी दिसते व साधारण पाच ते सहा मी. मी. लांब असते.
  • फळमाशीचा मागील भाग टोकदार व गर्द कथ्या रंगाचा असून पंख सरळ लांब असतात.
  • साधारणपणे फळमाशी पिवळसर सोनेरी दिसते.

फळमाशी जीवनक्रम (Fruit fly life cycle):

  • नर आणि मादी फळमाशीचे मिलन होते व त्यानंतर मादी फुलोऱ्यात आलेल्या पिकामध्ये आढळून येते.
  • एकदम कळीतून बाहेर आलेल्या छोट्या अशा फळावर फळमाशीची मादी डंख मारते आणि आतमध्ये अंडी घालते.
  • एक दोन दिवसात म्हणजेच अंडी घालण्याचा कालावधी पूर्ण झाल्यावर त्यामधून अळी बाहेर येते व फळाच्या आतमध्येच वाढ चालू होते.
  • जसे जसे फळ मोठे होईल तसतसे आतमध्ये अळी पण मोठी होत जाते आणि फळ आतून खायला सूरवात करते.
  • अळी चा कालावधी संपल्यानंतर अळी फळातून बाहेर जमिनीत पडते व कोषावस्थे मध्ये जाते ज्यातून पुन्हा नवीन प्रौढ फळमाशी तयार होते.

फळमाशीमुळे होणारे नुकसान (Damage due to Fruit fly):

  • फळमाशीची एक मादी संपूर्ण जीवन काळात फळाच्या सालीखाली 500 ते 1000 अंडीपुंजके देते.
  • त्यामधून चार ते पाच दिवसात किंवा सात दिवसात अळ्या बाहेर पडतात. या बाहेर पडलेल्या अळ्या फळांच्या गरावर उपजीविका करतात व फळे कुजवतात. या अळीच्या प्रादुर्भावामुळे फळांना अकाली पक्वता येते तसेच फळांमध्ये अळ्या पडतात अशी फळे वेडीवाकडी होतात व फळगळ होते.

फळमाशीचे एकात्मिक कीड व्यवस्थापन (Pest management of fruit fly):

  • जमिनीची नांगरट करून जमीन चांगली तापू देणे गरजेचे असून त्यामुळे या अळीचे कोश उष्णतेत नष्ट होतात.
  • शक्यतो फळमाशीला प्रतिकारक असणाऱ्या जातींची लागवड करावी.
  • फळमाशी ग्रस्त बागेत पडलेली फळे गोळा करून ती नष्ट करून टाकावी किंवा लांब नेऊन त्यांचा नायनाट करावा.
  • बागेमध्ये कामगंध सापळे एका एकरसाठी 15 ते 20 लावावे.
  • फळधारणा जेव्हा होईल तेव्हा पाच टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडिरेक्टरीन (1000 पीपीएम) 10 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. त्यासोबतच तज्ञांच्या सल्ल्याने आर्थिक नुकसानीची पूर्वसंकेत पातळी पाहून शिफारशीप्रमाणे तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधांची फवारणी घेणे गरजेचे आहे.

रासायनिक नियंत्रण:

  • शेतात एका एकरसाठी 15 ते 20 कामगंध सापळे वापरावेत.
  • फ्लुबेंडियामाइड 90 + डेल्टामेथ्रिन 60 एससी (बायर-फेनोस क्विक) 100 मिली 200 लिटर पाण्यातून फवारावे किंवा
  • सायंट्रानिलिप्रोल 10.26% डब्ल्यू /डब्ल्यू ओडी (एफएमसी-बेनेविया) 400 मिली 200 लिटर पाण्यातून फवारावे किंवा
  • फ्लुबेंडिएमाइड 39.35% एम/एम एस.सी (बायर-फेम) 100 मिली 200 लिटर पाण्यातून फवारावे किंवा
  • फ्लुबेंडियामाइड 20% डब्ल्यूजी (टाटा-ताकुमी) 100 ग्रॅम 200 लिटर पाण्यातून फवारावे.

फवारणी करताना घ्यावयाची काळजी:

  • फवारणीसाठी गढूळ पाणी वापरू नये. स्वच्छ पाणीच वापरावे.
  • फवारणी द्रावण प्लास्टिक बकेटमध्ये करावे.
  • शक्य झाल्यास फवारणीच्या वेळेस आपण स्वतः शेतात हजर राहावे.
  • फवारणीच्या दिवशी ढगाळ वातावरण असल्यास शक्यतोवर फवारणी करू नये व केल्यास बेस्ट स्टीकरचा वापर अवश्य करावा. तरीही ताबडतोब पाऊस पडल्यास फवारणीचा फायदा होत नाही.
  • औषध तयार करताना प्रथम थोड्या पाण्यात घेऊन नंतर जास्त पाण्यात मिसळावे व व्यवस्थित ढवळून घ्यावे.
  • फवारणी शक्यतोवर सकाळी व दुपारी 4 नंतर करावी. जास्त उन्हामध्ये कृषी रसायनांचे विघटन होते व पाहिजे तसे परिणाम दिसत नाहीत.
  • तणनाशकांचा पंप फवारणीसाठी शक्यतोवर वापरू नाही.
  • एकाच औषधाचा किंवा एकाच गटातील औषधांचा सतत वापर करू नये. त्यामुळे किडींमध्ये प्रतिकारशक्ती वाढते.
  • कीटकनाशके, बुरशीनाशके, संजीवके, एकत्र फवारताना त्यांची सुसंगतता पडताळून पाहावी. द्रावण घट्ट झाल्यास, फाटल्यास किंवा न विरघळल्यास फवारू नये.
  • फवारणीसाठी तयार करून ठेवलेल्या द्रावणाचा ताबडतोब वापर करावा, ते जास्त काळ ठेवू नये.
  • फवारणी सर्व झाडावर खालीवर पानांच्या मागे-पुढे एकसमान होईल याची काळजी घ्यावी.

तुम्ही तुमच्या पिकांमधील फळमाशी कीटकाचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी डॉक्टर” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. रसशोषक किडी पिकाचे काय नुकसान करतात?

रसशोषक किडी पिकांमधील पानाचा रस शोषून (sap sucking insects) घेऊन पिकाला नुकसान पोहचवतात.

2. फळमाशी कशी ओळखावी?

फळमाशीची प्रौढावस्था घरी दिसणाऱ्या माशी सारखी दिसते व साधारणपणे फळमाशी पाच ते सहा मी. मी. लांब असते. फळमाशीचा मागील भाग टोकदार व गर्द कथ्या रंगाचा असून पंख सरळ लांब असतात.

3. फळमाशीमुळे पिकाचे काय नुकसान होते?

फळमाशीची एक मादी संपूर्ण जीवन काळात फळाच्या सालीखाली 500 ते 1000 अंडीपुंजके देते. त्यामधून चार ते पाच दिवसात किंवा सात दिवसात अळ्या बाहेर पडतात. या बाहेर पडलेल्या अळ्या फळांच्या गरावर उपजीविका करतात व फळे कुजवतात. या अळीच्या प्रादुर्भावामुळे फळांना अकाली पक्वता येते तसेच फळांमध्ये अळ्या पडतात अशी फळे वेडीवाकडी होतात व फळगळ होते.

31 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ