पोस्ट विवरण
सुने
कृषि
टमाटर
कीट
कृषि ज्ञान
शेतकरी डॉक्टर
DeHaat Channel
11 Apr
Follow

टोमॅटो पिकातील महत्वाच्या किडी व त्यांचे व्यवस्थापन! (Important pests of Tomato crop and their management!)


नमस्कार शेतकरी मित्रांनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

महाराष्ट्र हे भारतातील प्रमुख टोमॅटो उत्पादक राज्यांपैकी एक आहे. देशातील एकूण टोमॅटो उत्पादनापैकी सुमारे २० टक्के उत्पादन या राज्यात होते. महाराष्ट्रातील प्रमुख टोमॅटो उत्पादक जिल्हे पुणे, नाशिक, अहमदनगर, सातारा आणि सोलापूर आहेत. खरीप, रब्‍बी, उन्‍हाळी या तीनही हंगामात टोमॅटो पिकाची लागवड करता येत असल्‍यामुळे टोमॅटो हे महाराष्‍ट्रातील शेतक-यांचे प्रमुख फळपिक आहे. याच टोमॅटो पिकाचे विविध किडींच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते म्हणूनच आजच्या या लेखात आपण टोमॅटो पिकातील किडी व त्यांच्या व्यवस्थापनाविषयी जाणून घेणार आहोत.

टोमॅटो पिकात आढळून येणाऱ्या किडी:

  • फळ पोखरणारी अळी
  • टुटा ॲबसोलुटा
  • पांढरी माशी
  • मावा
  • तुडतुडे

फळ पोखरणारी अळी:

फळ पोखरणाऱ्या अळीची ओळख:

  • या किडींच्या अळीचा रंग हिरवट असून बाजुला तुटक करड्या रंगाच्या रेषा असतात.
  • अंडी पिवळसर व आकाराने गोल 0.5 मि. मी. व्यासाची असतात.
  • अंडी उबण्यापुर्वी अंड्याचा रंग फिक्कट लाल होतो आणि अंड्यातून अळी बाहेर पडते.
  • ही अळी टोमॅटोच्या झाडांच्या खोडा जवळ कोषात जाते. कोषावस्था आठ ते वीस दिवसांची असते.
  • कोषाचा रंग पांढुरका चकचकीत असतो.
  • या किडीचा जीवनक्रम अंदाचे 28 दिवसांचा असतो.

नुकसानीचा प्रकार:

  • सुरवातीला अळ्या समूहाने राहतात व टोमॅटोची कोवळी पाने खातात.
  • या किडीचा मादी पतंग झाडाच्या पानावर, खोडावर अंडी घालतो.
  • अळ्या सहा वेळा कात टाकतात. हा कालावधी 18 ते 25 दिवसांचा असतो.
  • या अळीची पूर्ण वाढ झाल्यावर टोमॅटोची फळ पोखरतात.
  • एकानंतर अनेक फळे पोखरत असतात.
  • एक अळी आठ ते दहा टोमॅटोच्या फळांना पोखरते.
  • टोमॅटो पिकात अळी अवस्थेतील किड शेंड्याची किंवा रोपांची पाने खाते. नंतर टोमॅटोच्या अपरिपक्व अथवा पक्व किंवा लहान फळांना बिळ पाडते.
  • टोमॅटोच्या फळात विष्टा टाकते त्यामुळे टोमॅटोची फळे खराब होतात, सडतात व त्यावर बुरशीजन्य रोगाची वाढ होऊन पिकाला रोगाची लागण होते.

व्यवस्थापन:

  • प्रति किलो बियाण्यावर 1.5 ते 4 मिली थायमेथॉक्सम 30% एफएस (देहात - असेर एफएस) ने बीजप्रक्रिया करावी.
  • कीटकाचा प्रभाव दिसून आल्यास इमॅमेक्टिन बेंझोएट 5% एसजी (देहात-Illigo) 54 - 88 ग्रॅम किंवा
  • थाईमेथोक्सम 12.6 + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 9.5% झेडसी (देहात-Entokill) 50 - 80 मिली किंवा
  • डेल्टामेथ्रिन 100% ईसी (बायर-डेसिस) 135 मिली किंवा
  • फ्लुबेन्डियामाइड 39.35% एससी (बायर-फेम) 600 मिलीची 200 लिटर पाण्यातून प्रति एकर फवारणी करावी.

टुटा ॲबसोलुटा:

टुटा ॲबसोलुटा कीटकाची ओळख:

  • नेहमीची नागअळी, फळमाशी आणि टूटा यांच्या ओळखण्यामध्ये संभ्रम होऊ नये म्हणून पुढील बाबी गोष्टी तपासाव्यात:
  • नेहमीची नागअळी पानांवर नागासारख्या रेषा ओढते. आकाराने ती टूटा किडीपेक्षा खूप लहान असते.
  • फळमाशी फळाला दंश करते. फळ कापल्यावर आतमध्ये लहान सुतके आढळतात.
  • टुटा फळाच्या सालीवर गॅलरी बनवते. पाने गुंडाळते.

नुकसानीचा प्रकार:

  • टुटा ॲबसोलुटा पानांच्या वरील पृष्ठभगामध्ये सापाप्रमाणे फिरत आपला उदरनिर्वाह करते.
  • जसे - जसे अळी पुढे खात जाते तसे - तसे पाठीमागचा भाग धाग्यासारखा पांढऱ्या रंगाचा दिसतो.
  • ज्या पानावर प्रादुर्भाव झाला आहे त्या पानावर काळी विष्टा सुद्धा दिसते तसेच ते पान नंतर पूर्णपणे वाळले जाते.
  • पान किंवा फळ कापून तपासले असता आत मध्ये पिवळ्या रंगाची अळी दिसून येते.
  • तसेच फळा वरती सुद्धा 3 ते 4 प्रकारची छोटी - छोटी ज्वारीच्या दाण्याच्या आकारासारखी ओल किंवा छिद्र दिसतात.

व्यवस्थापन:

टुटा ॲबसोलुटा किडीच्या सुरुवातीच्या अवस्थेतील नियंत्रण:

  • किडीची अंडी तसेच प्राथमिक अवस्था नष्ट करण्यासाठी टोमॅटोच्या रोप लागवडीनंतर जवळ जवळ 10 दिवसांनी सायंट्रानिलिप्रोल 10.26% (FMC-बेनेविया) 30 मिली, नीम तेल 10000 पीपीएम, 1% ईसी (IFC-निम ऑइल) 25 मिली + स्टिकर 4 मिली या प्रमाणात 15 लिटर पाण्यात मिसळून आपल्या टोमॅटो पिकात फवारणीसाठी वापरायचे आहे.
  • पहिल्या फवारणीनंतर 10 ते 12 दिवसांनी आपण हीच फवारणी पुन्हा करू शकतो.
  • टुटा ॲबसोलुटा किडीने टोमॅटो पिकात आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्या नंतर करावयाच्या उपाययोजना:
  • क्लोरेंट्रानिलिप्रोल 18.5% डब्ल्यू/डब्ल्यू एससी (FMC-कोराजन) 6 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 % एससी (डाव-डेलिगेट) 18 मिली या मध्ये स्टिकरची मात्रा 4 मिली मिसळून प्रति 15 लिटर पाण्यात द्रावण तयार करून त्याची फवारणी करावी.

पांढरी माशी:

पांढरी माशी कीटकाची ओळख:

  • या किडीचा आकार 0.5 मिमी पेक्षा कमी असतो.
  • रंग भुरकट पांढरा व डोळ्याचा रंग लाल असतो.
  • या किडींच्या पंखावर पांढरी भुकटी असते.
  • कोष व किडींचा आकार फुगीर, गोलाकार असतो.
  • पिल्ले व प्रौढ यांच्या शरीरावर केस असतात.

नुकसानीचा प्रकार:

  • पांढरी माशी किडीची मादी पानाच्या खालच्या बाजूला 20 पर्यंत अंडी घालते.
  • 10 दिवसात अंडी उबवून त्यातुन पिल्ले बाहेर पडतात.
  • ही पिल्ले योग्य वास्तव्य शोधण्यासाठी झाडावर भटकतात.
  • वास्तव्य निश्चीत झाल्यावर झाडाच्या पेशिजलात आपली सोंड खुपसून त्यातील रस शोषण करतात.
  • ही कीड पिल्ले व प्रौढ या दोन्ही अवस्थेत पानातील रसशोषण करते. त्यामुळे पानाचा रंग पिवळसर होतो.
  • या किडीच्या जास्त उद्रेकामुळे फुलगळ होते व फळ धारणा होत नाही.
  • या किडीची पूर्ण वाढ 70 ते 75 दिवसांत होते.
  • वाढ झालेली कीड कोषावस्थेत जाते.
  • ही अवस्था 160 दिवस असते. त्यातुन नंतर पांढरी माशी बाहेर पडते.

व्यवस्थापन:

  • प्रति एकर शेतात 4 ते 6 पिवळे चिकट सापळे वापरा.
  • एसिटामिप्रिड 20 % एस पी (टाटा-मानिक) 100 ग्रॅम किंवा
  • एसीफेट 75% डब्ल्यूपी (टाटा-असताफ) 400 ग्रॅम किंवा
  • याशिवाय इमिडाक्लोरपीड 70% डब्ल्यू जी (देहात-कॉन्ट्रोपेस्ट) 15 ग्रॅम किंवा
  • थायोमिथोक्सम 25% डब्ल्यूजी (देहात-असेर) 80 ग्रॅम किंवा
  • ऍसिटामिप्रिड 20% एसपी (देहात-Aerowon) 100 ग्रॅम किंवा
  • डायफेंथियुरॉन 50% डब्ल्यू पी (देहात-Kiosk) 200 ग्रॅमची 200 ली पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी.

मावा:

मावा कीटकाची ओळख:

  • टोमॅटो पिकात मावा किडीचा प्रादुर्भाव फारच कमी प्रमाणात आढळतो.
  • मावा कीटकांच्या प्रजाती विषाणू रोगाचा प्रसार करतात.
  • मावा कीटकांचे शरीर मऊ व लांबोळा फुगीर आकारासारखे असते.
  • मावा किडीची लांबी 1 ते 2 मि. मी. असते.
  • डोळे लाल रंगाचे असतात.
  • त्याला दोन अंटेना व दोन संयुक्त डोळे असतात.
  • मावा किडींमध्ये बिनापंखाच्या मावा किडीची संख्या पंखाच्या मावा पेक्षा अधिक असते.
  • एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत होताना बिनापंखाच्या मावा किडीला पंख फुटतात.
  • मावा किडीला दोन उभे पंख असतात व बाजूला चिकट द्रव टाकण्याकरिता दोन नळ्या असतात. यामुळे मावा स्वतःचे शत्रू कीटकांपासून सरंक्षण करीत असते.
  • बीन पंखाची मादी वर्तुळाकार आकाराने मोठी फिक्कट रंगाची असते. पिल्लांचा रंग हिरवट किंवा करडा असतो. प्रौढ मावा 21 दिवस जगतो.

नुकसानीचा प्रकार:

  • मावा कीड न पचविलेला गोड द्रव्य गुदद्वारातून बाहेर टाकते. ते खाण्यासाठी मुंगळे जमा होतात. यामुळे मुंगळे मावा किडींच्या ठिकाणी आढळतात.
  • मावा किडींची उत्पत्ती नर मादीच्या समागमविना किंवा समागमानंतर होते.
  • मावा पिल्लांची अवस्था 9 दिवस असते. एक मादी दररोज 22 पिल्लांना जन्म देते.

व्यवस्थापन:

  • निंबोळी अर्क (5%) - 400 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी.
  • इमिडाक्लोप्रिड 17.8% एसएल (बायर-कॉन्फिडोर) 100 मिली किंवा
  • डायमेथोएट 30% ईसी (टाटा-टॅफगोर) 160 मिली किंवा
  • इमिडाक्लोप्रिड 70% डब्ल्यूजी (देहात-कॉन्ट्रोपेस्ट) 40 ग्रॅम किंवा
  • फेनप्रोपॅथ्रिन 30% ईसी (सुमिटोमो- मियोथ्रिन) 100 मिली किंवा
  • बीटा-सायफ्लुथ्रिन + इमिडाक्लोप्रिड 300 ओडी (8.49 + 19.81% डब्ल्यू/डब्ल्यू) (बायर-सोलोमोन) 80 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी.

तुडतुडे:

तुडतुडे कीटकाची ओळख:

  • तुडतुडे ही टोमॅटो पिकात कमी सक्रिय पण महत्वाची कीड आहे.
  • ही किड हिरवट रंगाची असते.
  • शरीररचनेमुळे ही कीड चटकन ओळखता येते.
  • पिल्लांना पंख नसतात.
  • प्रौढ तिरपे चालतात. चटकन व जलद उडी मरतात.
  • किडींची लांबी 2 मिमी असते.

नुकसानीचा प्रकार:

  • पिल्ले व प्रौढ तुडतुडे टोमॅटोच्या पिकातील रस शोषूण घेतात.
  • या किडीच्या मादी पानांच्या शिरांमध्ये किंवा पेशीत 30 पर्यंत अंडी घालतात.

व्यवस्थापन:

  • या किडीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोरपीड 70% डब्ल्यू जी (देहात-कॉन्ट्रोपेस्ट) 40 ग्रॅम किंवा
  • थायोमिथोक्सम 25% डब्ल्यूजी (देहात-असेर) 100 ग्रॅम किंवा
  • डायमेथोएट 30% ईसी (टाटा-टॅफगोर) 160 मिली प्रति एकर 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फवारणी करताना घ्यावयाची काळजी:

  • फवारणीसाठी गढूळ पाणी वापरू नये. स्वच्छ पाणीच वापरावे.
  • फवारणी द्रावण प्लास्टिक बकेटमध्ये करावे.
  • शक्य झाल्यास फवारणीच्या वेळेस आपण स्वतः शेतात हजर राहावे.
  • फवारणीच्या दिवशी ढगाळ वातावरण असल्यास शक्यतोवर फवारणी करू नये व केल्यास बेस्ट स्टीकरचा वापर अवश्य करावा. तरीही ताबडतोब पाऊस पडल्यास फवारणीचा फायदा होत नाही.
  • औषध तयार करताना प्रथम थोड्या पाण्यात घेऊन नंतर जास्त पाण्यात मिसळावे व व्यवस्थित ढवळून घ्यावे.
  • फवारणी शक्यतोवर सकाळी व दुपारी 4 नंतर करावी. जास्त उन्हामध्ये कृषी रसायनांचे विघटन होते व पाहिजे तसे परिणाम दिसत नाहीत.
  • तणनाशकांचा पंप फवारणीसाठी शक्यतोवर वापरू नाही.
  • एकाच औषधाचा किंवा एकाच गटातील औषधांचा सतत वापर करू नये. त्यामुळे किडींमध्ये प्रतिकारशक्ती वाढते.
  • कीटकनाशके, बुरशीनाशके, संजीवके, एकत्र फवारताना त्यांची सुसंगतता पडताळून पाहावी. द्रावण घट्ट झाल्यास, फाटल्यास किंवा न विरघळल्यास फवारू नये.
  • फवारणीसाठी तयार करून ठेवलेल्या द्रावणाचा ताबडतोब वापर करावा, ते जास्त काळ ठेवू नये.
  • फवारणी सर्व झाडावर खालीवर पानांच्या मागे-पुढे एकसमान होईल याची काळजी घ्यावी.

तुम्ही तुमच्या टोमॅटोच्या पिकामधील किडींचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी डॉक्टर” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. महाराष्ट्रात टोमॅटो पिकाची लागवड केव्हा केली जाते?

टोमॅटो हे तीन हंगामी पीक असल्यामुळे ते आपण एका वर्षात तिन्ही हंगामात घेऊ शकतो. उन्हाळ्यामध्ये जानेवारी ते मार्च या महिन्यात पहिली लागवड केली जाते त्यानंतर, पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या महिन्याच्या कालावधीत दुसरी लागवड केली जाते आणि त्यानंतर शेवटची लागवड ही ऑक्टोंबर ते डिसेंबर या महिन्याच्या कालावधीत केली जाते. जवळपास आपण वर्षातले बाराही महिने टोमॅटो पिकाची लागवड करू शकतो.

2. टोमॅटो पीक वाढण्यास किती कालावधी लागतो?

टोमॅटो लागवडीपासून ते काढणीपर्यंतचा जर आपण काळ पाहिला तर टोमॅटो रोपाच्या वाढीसाठी 50 ते 80 दिवसांचा कालावधी लागतो.

3. टोमॅटो लागवड कुठे केली जाते?

महाराष्ट्रात सातारा, सांगली, सोलापूर या भागात खूप जास्त प्रमाणात टोमॅटो लागवड केली जाते.

22 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ