पोस्ट विवरण
सुने
कृषि
मिर्च
कृषि ज्ञान
कृषी ज्ञान
DeHaat Channel
5 Apr
Follow

मिरची लागवडीविषयी संपूर्ण माहिती व सर्वोत्तम वाण (Information about chilli cultivation and best varieties)

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

बाजारात मिरच्यांना वर्षभर मागणी असते. याखेरीज भारतीय मिरचीस परदेशामधून देखील चांगली मागणी आहे. महाराष्ट्र राज्यात अंदाजे एक लाख हेक्टर क्षेत्रावर मिरची पिकाची लागवड होते. महाराष्ट्रात मिरची खालील एकूण क्षेत्रापैकी 68 टक्के क्षेत्र हे नांदेड, जळगाव, सोलापुर, धुळे, कोल्हापूर, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, उस्मानाबाद या जिल्ह्यात आहे. स्वाद आणि तिखटपणा यामुळे मिरचीच्या पिकाला महत्त्वाचे मसाला पिक मानले जाते. मिरचीचा औषधी उपयोग सुद्धा केला जातो. आजच्या लेखात आपण आज बहुगुणी मिरची पिकाच्या लागवडी विषयीची व लागवडीसाठीच्या सर्वोत्तम वाणांविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.

मिरची लागवडीविषयी संपूर्ण माहिती व सर्वोत्तम वाण | Information about Chilli cultivation and best varieties

हवामान (Weather) :

  • मिरची पिकाला उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. तसा विचार केला तर मिरची हे पीक तिन्ही हंगामात घेता येते.
  • मिरची पिकाच्या चांगल्या वाढीसाठी 20 - 30 अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते.
  • तापमान कमी जास्त झाल्यास फुलगळ होऊ शकते.

जमीन (Soil) :

  • मिरची लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी आणि मध्यम भारी जमीन अतिशय चांगली मानली जाते.
  • हलक्‍या जमिनीत योग्य प्रमाणात सेंद्रिय खते वापरली, तरी देखील मिरचीचे पीक चांगले येते.
  • पाण्याचा योग्य निचरा न होणाऱ्या जमिनी मध्ये मिरचीचे पीक अजिबात घेऊ नये.
  • पावसाळ्यात आणि बागायती मिरचीसाठी मध्यम काळी आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी.
  • तर उन्हाळ्यात मध्यम ते भारी जमिनीवर मिरचीची लागवड करावी.
  • चुनखडी असलेल्या जमिनीतही मिरची पिकाचे उत्पादन चांगले येते.

हंगाम (Season) :

  • मिरची पिकाची लागवड पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा या तिन्ही ऋतूंमध्ये करता येते.
  • मिरची खरीप पिकाची लागवड जून, जुलै महिन्यामध्ये करावी. तर उन्हाळी मिरची पिकाची लागवड जानेवारी - फेब्रुवारी महिन्यामध्ये करावी.

दर एकरी प्रमाण (Seed Rate) :

एकरी 80 - 100 ग्रॅम मिरचीचे बियाणे वापरावे.

पूर्वमशागत (Land preparation for chilli) :

  • एप्रिल, मे महिन्यामध्ये जमीन नांगरून विखरून तयार करावी.
  • हेक्‍टरी नऊ ते दहा टन कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून लागवडीसाठी जमीन तयार करावी.

सुधारीत वाण (Varieties):

  • वैशाली एफ1- (सागर हायब्रीड)
  • ज्योती (निर्मल)
  • सितारा (निर्मल)
  • ज्वेलरी (नॉन्गवू)
  • सोनल (रासी हायवेज)
  • तेजा ४ (महिको)
  • एके४७ (एडवांटा सीड्स)
  • आर्मर (नुनहेम्स)
  • अ‍ॅस्टन (नेत्र)
  • आर्च 930 (अंकुर) - पोपटी तिखट
  • सितारा गोल्ड - सेमिनीस
  • रॉयल बुलेट (सिजेंटा)
  • शार्क 1 (स्टार फिल्ड)
  • ओमेगा प्लस (पिरॅमिड)

रोपवाटिका व्यवस्थापन:

  • जिरायती मिरची पिकासाठी सपाट वाफ्यावर रोपे तयार करावीत. तर बागायती पिकासाठी गादीवाफ्यावर रोपे तयार करावीत.
  • गादी वाफे तयार करण्यासाठी जमीन नांगरून आणि कुळवून भुसभुशीत करावी. त्या जमिनीमध्ये दर एकरी 8 ते 9 टन कुजलेले शेणखत मिसळावे. नंतर वीस फूट लांब आणि चार फूट रुंद उंच आकाराचे गादी वाफे तयार करून घ्यावेत.
  • प्रत्येक गादी वाफ्यांमध्ये तीस किलो अशा प्रमाणे चांगले कुजलेले शेणखत आणि अर्धा किलो सुफला मिसळावे.

लागवड (Cultivation) :

  • बी पेरण्यासाठी आठ ते दहा सेंटिमीटर एवढ्या अंतरावर वाफ्याच्या रुंदीला समांतर ओळी तयार करून त्यामध्ये दहा टक्के फोरेट दाणेदार 15 ग्रॅम असे वाफ्यात टाकून वाफे मातीने झाकून घ्यावेत.
  • यानंतर या ओळीं मध्ये दोन सेंटीमीटर वर बियांची पातळ पेरणी करावी आणि बी मातीने झाकून घ्यावे.
  • बियांची उगवण होईपर्यंत त्यांना दररोज पाणी द्यावे.
  • बी पेरल्यानंतर 30 ते 40 दिवसांनी मिरचीची रोपे लागवडीसाठी तयार होतात.
  • उंच आणि पसरट वाढणार्‍या मिरचीच्या जातींची लागवड 30 सेमी लांबी आणि 60 सेमी रुंदी वर आणि बुटक्या जातींच्या मिरचीची लागवड 60 सेमी लांबी आणि 40 सेमी रुंदीवर करावी.
  • कोरडवाहू मिरची पिकाची लागवड करताना 45 बाय 45 सेमी अंतरावर करावी.
  • मिरचीच्या रोपांची सरी-वरंबा पद्धतीने लागवड करावी.

आंतरमशागत :

  • मिरचीच्‍या रोपांच्‍या लागवडीनंतर 20 ते 25 दिवसांनी पहिली खुरपणी करावी.
  • त्‍यानंतर तणांच्‍या तीव्रतेनुसार खुरपण्‍या करून शेत तणविरहीत ठेवावे.
  • खरीप मिरची लागवडीनंतर 2 ते 3 आठवडयांनी रोपांना मातीची भर दयावी.
  • बागायती पिकांच्‍या बाबतीत रोपांच्‍या लागवडीनंतर 2 महिन्‍यांनी हलकी खांदणी करून सरी फोडून झाडांच्‍या ओळीच्‍या दोन्‍ही बाजूंनी मातीची भर द्यावी.

खते (Fertiliser) :

  • वेळेवर वरखते दिल्‍यामुळे मिरची पिकाची जोमदार वाढ होते.
  • मिरचीच्‍या कोरडवाहू पिकासाठी दर एकरी 20 किलो नत्र 20 किलो स्‍फूरद आणि ओलिताच्‍या पिकासाठी दर एकरी 40 किलो नत्र 20 किलो स्‍फूरद आणि 20 किलो पालाश द्यावे.
  • यापैकी स्‍फूरद आणि पालाश यांची पूर्ण मात्रा आणि नत्राची अर्धी मात्रा रोपांच्‍या लागवडीच्‍या वेळी द्यावी.
  • नत्राची उर्वरीत अर्धी मात्रा रोपांच्‍या लागवडीनंतर 30 दिवसांनी बांगडी पध्‍दतीने द्यावी.

पाणी व्यवस्थापन (Water management) :

  • मिरची बागायती पिकाला जमिनीच्‍या मगदुराप्रमाणे पाणी द्यावे.
  • प्रमाणापेक्षा जास्‍त किंवा कमी पाणी देऊ नये.
  • झाडे फूलावर आणि फळावर असताना झाडांना पाण्‍याचा ताण दिल्यास रोपे लावणीनंतर 10 दिवसात शेतात रोपांचा जम बसतो.
  • या काळात 1 दिवसाआड पाणी दयावे.
  • त्‍यानंतर 5 दिवसांच्‍या किंवा एक आठवडयाच्‍या अंतराने पाणी दयावे.
  • साधारणतः हिवाळयात 10 ते 15 दिवसांच्‍या अंतराने तर उन्‍हाळयात 6 ते 8 दिवसांच्‍या अंतराने पिकाला पाणी दयावे.

मिरची पिकावर आढळणारे कीटक:

  • मिरची या पिकावर रस शोषण करणारे कीटक जास्त प्रमाणात आढळतात.
  • फुलकिडे, तुडतुडे, मावा, पांढरी माशी तसेच कोळी या प्रमुख किडींचा प्रादुर्भाव मिरची पिकावर मोठ्या प्रमाणात आढळून येतो.

मिरची पिकावर आढळणारे प्रमुख रोग:

मिरची या पिकावर मर, डायबॅक, सरकोस्पोरा पानावरील ठिपके, जिवाणूजन्य पानावरील ठिपके व भुरी या विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो.

अशा प्रकारे योग्य रित्या, आपल्या शेतातील मातीनुसार योग्य वाण वापरून मिरचीची लागवड केल्यास भरपूर उत्पादन मिळू शकते. तुम्ही तुमच्या मिरची पिकाचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. महाराष्ट्रात मिरची पिकाची लागवड कुठे होते?

मिरचीचे पीक प्रामुख्याने महाराष्ट्रात नांदेड, जळगांव, धुळे, सोलापूर, कोल्‍हापूर, नागपूर, अमरावती, चंद्रपूर आणि उस्‍मानाबाद येथे घेतले जाते.

2. मिरची पिकावर कोणते रोग व कीटक दिसून येतात?

मिरची या पिकावर मर, डायबॅक, सरकोस्पोरा पानावरील ठिपके, जिवाणूजन्य पानावरील ठिपके व भुरी रोग या विषाणूजन्य रोगांचा तर, फुलकिडे, तुडतुडे, पांढरी माशी तसेच कोळी व मावा यासारख्या प्रमुख किडींचा प्रादुर्भाव आढळतो.

3. मिरची पिकावरील कोळी कीटक कसा ओळखावा?

कोळी हे कीटक अत्यंत सूक्ष्म (लांबी 1 मि.मी.) असून, चप्पट, वर्तुळाकार, लाल किंवा पिवळसर असतात.

41 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ