पोस्ट विवरण
सुने
पशु पालन
पशु ज्ञान
DeHaat Channel
12 Dec
Follow

जनावरांतील ऋतुचक्र समजून घेणे महत्वाचे! (It is important to understand the seasonal cycle in animals!)

नमस्कार पशुपालकांनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

गाय, म्हैस, शेळीच्या मासिक ऋतुचक्राचे इस्ट्रस, मेटॅइस्ट्रस, डायइस्ट्रस, प्रोइस्ट्रस असे चार टप्पे पडतात. त्याप्रमाणे जनावरांच्या शरीरात बदल होऊन लक्षणे दिसून येतात. ती लक्षात घेऊन, त्यानुसार जनावरांचा माज ओळखून माजावरील जनावरांना वळू दाखविणे, प्राथमिक व्यवस्थापनामध्ये हिरव्या चाऱ्याचे नियोजन, वैरण, पाणी, वेताच्या वेळी घ्यावयाची काळजी याबाबत दक्ष राहणे आवश्‍यक आहे. आजच्या या भागात आपण जनावरांतील ऋतुचक्र समजून घेणे का महत्वाचे आहे याविषयी जाणून घेणार आहोत.

प्रजननाच्या दृष्टीने महत्वाचा काळ?

साधारणपणे जून ते फेब्रुवारी हा कालावधी प्रजननदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असतो. या कालावधीत दुधाळ जनावरांतील प्रजननाचे कार्य सुरळीतपणे चालू होत असते. दोन माजांतील अंतर २१ दिवसांचे असते. त्यामुळे जनावरांतील माजाचे व्यावसायिकदृष्ट्या योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. प्रजननाच्या प्रत्येक बाबींची नोंदवहीत नोंद ठेवावी.

माजाचा कालावधी कोणत्या चार टप्प्यांत विभागाला गेला आहे?

माजाचा कालावधी चार टप्प्यांत विभागला गेला आहे. यामध्ये मुख्य माजापूर्वीची अवस्था, मुख्य माज, मुख्य माजानंतरची अवस्था आणि माजाच्या शेवटची अवस्था. महत्त्वाचे म्हणजे माजाचे ऋतुचक्र हे एका माजाच्या टप्प्यापासून सुरू होते आणि दुसऱ्या टप्प्यात संपते. अशाप्रकारे गाभण होईपर्यंत चालू असते. गाभण कालावधीत माजाचे ऋतुचक्र बंद होत असते. जनावरांतील ऋतुचक्र समजून घेणे अत्यंत गरजेचे असते. त्यामुळे जनावरांतील उत्पादन वाढ आणि वेळेवर गर्भधारणा करणे सोपे जाते.

मुख्य माजाची लक्षणे:

  • अस्वस्थ होणे, सतत ओरडणे, लघवी करणे, खाद्य-पाणी कमी करणे.
  • योनीमार्ग सुजल्यासारखे दिसणे.
  • नराकडे आकर्षित होणे.
  • नैसर्गिक संयोगासाठी तयार असणे.
  • योनीमार्गात चिकट, काचेसारखा चकाकणारा, पारदर्शक स्राव दिसून येणे.
  • पाठीवर थाप मारल्यानंतर शेपूट वर करणे.
  • सोबतच्या जनावराच्या पाठीवर पाय टाकणे.

माज ओळखण्याच्या पद्धती:

  • दररोज सकाळी व सायंकाळी जनावरांचे निरीक्षण केल्यास माजावर आलेली जनावरे लक्षात येतात.
  • नसबंदीत वळूचा वापरही आपण माजावर असलेल्या गाई शोधण्यासाठी करू शकतो. माजावर असलेल्या जनावरांच्या जननेंद्रियात काही रसायने निर्माण होतात, जी फक्त वळूच ओळखू शकतो व वळू माजावर असलेल्या जनावरांकडे आकर्षिला जातो. प्रक्षेत्रावर किंवा जिथे जनावरांची संख्या अधिक आहे, अशा ठिकाणी या पद्धतीचा वापर जास्त प्रमाणात होतो.
  • शेपटीच्या वरच्या बाजूस रंग लावल्यास अशा गाई इतर गाई उडाल्यास रंग पसरतो व त्यामुळे माजावर असलेली गाय ओळखण्यास मदत होते.
  • संप्रेरके देऊन तयार केलेली गायसुद्धा नसबंदीत वळूऐवजी माज ओळखण्यासाठी वापरली जाऊ शकते.
  • प्रशिक्षित कुत्र्यांचा वापरही जनावरांतील माज ओळखण्यासाठी केला जातो.
  • निरणातील विद्युतरोध जर मोजला, तर जनावरे माजावर आल्याचे समजते. आधुनिक प्रगत विज्ञानाने हा शोध लावला आहे. निरणातील विद्युतरोध हा माजाच्या इतर वेळीपेक्षा कमी असतो, असे दिसून आले आहे.
  • संप्रेरकांच्या चाचणीतून दूध परीक्षणाद्वारे जनावरांचा माज ओळखता येतो.
  • माजावर असलेले जनावर मानसिकरीत्या अस्वस्थ असते, त्यामुळे त्यांच्या पावलांच्या हालचाली वाढत असतात. त्यांच्या नोंदीवरून आपण जनावरांतील माज ओळखू शकतो. अशा प्रकारे जनावर माजावर असल्याची खात्री एकदा पटल्यास सकाळी माजावर आलेली जनावरे सायंकाळी व सायंकाळी माजावर आलेली जनावरे दुसऱ्या दिवशी सकाळी सिद्ध वळूकडून अथवा कृत्रिम रेतन पद्धतीनेच भरवावी, म्हणजे ती गाभण राहण्याची शक्‍यता वाढते. असे केल्यास वर्षाकाठी एक वासरू मिळू शकते.

नोंद:

प्रजननविषयक सर्व नोंदीची नोंद वहीत नोंद करावी किंवा विविध प्रणालीद्वारे वापरली जात असलेल्या साधनांचा वापर करावा.

स्पिनबार्केट टेस्ट म्हणजे काय व कशी करावी?

  • जनावर माजावर असताना योनीमार्गे स्राव येतो, तो दोन काचेच्या पट्टीवर किंवा दोन बोटांच्या चिमटीत घेऊन त्याची लांबी व चिकटपणा मोजला जातो.
  • जेवढा जास्त चिकटपणा तेवढा चांगला माज, असे यावरून सिद्ध होते.

माज अपेक्षा तक्ता:

कृत्रिम रेतन संस्थांकडे विशेष कॅलेंडर/दिनदर्शिका उपलब्ध असतात. बहुतेक तक्ते २१ दिवसांच्या चक्रावर आयोजित केले जातात, जेणेकरून भविष्यातील माजाचा अंदाज लावता येईल. काही कळप व्यवस्थापक गर्भधारणेनंतर १९ वा दिवस चिन्हांकित करतात. जेणेकरून अपेक्षित माजाचा अंदाज अनेक दिवस अगोदर लावता येऊ शकतो.

ब्रीडिंग व्हील किंवा हर्डेक्स रेकॉर्ड सिस्टीम म्हणजे काय व कशी करावी?

भिंतीवर लटकविलेली प्रजनन नोंद प्रणाली / रेकॉर्ड सिस्टीम प्रत्येक गायीसाठी पुनरुत्पादक घटना दर्शविण्यासाठी रंग-चिन्हांकित पीन किंवा खुणा वापरतात. एकतर पारदर्शक प्लॅस्टिक पिन फिरवून किंवा दररोज प्लॅस्टिक कव्हर सरकवून, भविष्यातील माज आणि पुनरुत्पादक घटनांचा अंदाज लावला जाऊ शकतो.

संगणकाद्वारे तयार केलेल्या कृती सूची:

संगणक प्रणालीद्वारे गायींची सूची तयार करता येते. ज्यांना विशिष्ट दिवशी विशेष लक्ष देणे किंवा कारवाई करणे आवश्यक असते, अशा प्रकारची सूचना संगणकाद्वारे समजते. माउंट डिटेक्शन (कामर प्रेशर-सेन्सेटिव्ह माउंट डिटेक्टर)

पारंपरिक माउंट डिटेक्टर, जसे की कामार उपकरणे आणि शेपटी रंगवल्याची खुणाचा वापर करणे. जेव्हा दृश्य निरीक्षणाला पूरक म्हणून माउंट डिटेक्टर प्रणाली वापरली जाते, तेव्हा सामान्य गर्भधारणा दर आणि सुधारित माज शोधण्याची कार्यक्षमता वाढते.

माज ओळखण्याचे फायदे:

  • यशस्वी गर्भधारणा झाली असल्यास माजाचे ऋतुचक्र बंद होत असते. योग्य माज ओळखल्यामुळे वेळेत जनावरे गाभण राहतात.
  • अचूक माज ओळखल्यामुळे प्रसूतीनंतर वेळ वाया जात नाही. तसेच वर्षाला वासरू शक्य होते.
  • नियमितपणे माजाचे निरीक्षण केल्यामुळे योनिमार्गातील स्रावावर लक्ष ठेवू शकतो. काही वेगळ्या प्रकारचा माज असेल, तर वेळीच पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनाखाली उपचार करू शकतो.
  • माजाचे सूक्ष्म निरीक्षण केल्यामुळे, काचपट्टीद्वारे स्रावाची चाचणी करून योग्य किंवा अयोग्य माज ओळखता येतो.
  • वेळोवेळी माजाची लक्षणे निरीक्षण केल्यास माजाचा प्रकार ओळखू शकतो, जसे की सुरुवातीचा माज, मधला माज व शेवटचा माज. साधारणपणे मधला माज हा योग्य माज असतो त्या वेळी रेतन प्रक्रिया यशस्वी होऊ शकते.
  • कृत्रिम रेतनाची योग्य वेळ पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित करणे गरजेचे असते. स्त्रीबीज सुटण्याच्या वेळेवर कृत्रिम रेतन केल्याने गर्भधारणेचे प्रमाण जास्त होते. म्हणूनच वेळेवर कृत्रिम रेतन करणे आवश्यक असते.

तुम्ही तुमच्या जनावरांतील ऋतुचक्रासाठी काय व्यवस्थापन करता? याविषयीची माहिती इतर पशुपालकांसह शेयर करा. या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, अशा अजून माहितीसाठी "पशु ज्ञान" चॅनेलला फॉलो करा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. गाय, म्हैस, शेळीच्या मासिक ऋतुचक्राचे चार टप्पे कोणते?

गाय, म्हैस, शेळीच्या मासिक ऋतुचक्राचे इस्ट्रस, मेटॅइस्ट्रस, डायइस्ट्रस, प्रोइस्ट्रस असे चार टप्पे पडतात.

2. प्रजननाच्या दृष्ट्या महत्वाचा कालावधी?

साधारणपणे जून ते फेब्रुवारी हा कालावधी प्रजननदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असतो.

3. जनावरांच्या दोन माजांतील अंतर किती दिवसांचे असते?

जनावरांच्या दोन माजांतील अंतर २१ दिवसांचे असते.

28 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ