तपशील
ऐका
कलिंगड
कृषी ज्ञान
कृषी ज्ञान
DeHaat Channel
12 Jan
Follow

कलिंगड, खरबूज : आधुनिक लागवड तंत्र

नमस्कार शेतकरी बंधूंनो,

महाराष्ट्रात कलिंगडाचे क्षेत्र सुमारे 660 हेक्टरने तर खरबुजाचे क्षेत्र सुमारे 238 हेक्टरने व्यापलेले आहे. कलिंगड हे उष्ण आणि कोरड्या उन्हाळ्याच्या महिन्यांत उगवणारे ताजेतवाने आणि गारव्याचे पीक आहे. तर खरबूज हे कमी दिवसांत, कमी पाण्यात आणि कमी कष्टांत येणारे वेलवर्गीय फळ आहे. कलिंगड लागवडीचा हंगाम हा डिसेंबर महिन्यात सुरू होतो. मार्च महिन्यात कलिंगड पिकाची काढणी केली जाते. तर काही भागात फेब्रुवारीच्या मध्यात कलिंगड पिकाची लागवड केली जाते पण डोंगराळ भागात मात्र मार्च-एप्रिलमध्ये कलिंगडाची लागवड करतात. तसेच खरबुजाची लागवड जानेवारी ते मार्च दरम्यान केली जाते. आजच्या या लेखात आपण याच कलिंगड आणि खरबूजाच्या आधुनिक लागवड तंत्राविषयी जाणून घेणार आहोत.

हवामान:

  • दोन्ही पिकांसाठी आवश्यक असणाऱ्या हवामानाबद्दल बोलायचे झाल्यास, कलिंगड पिकाला उष्ण आणि कोरडे हवामान व भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक असतो.
  • वेलींची वाढ होण्याकरिता 24°C ते 27°C तापमान उपयुक्त असते.
  • उगवण क्षमतेसाठी 22 ते 25 अंश सेल्सिअसचे तापमान गरजेचे असते.

जमीन:

  • दोन्ही पिकांसाठी मध्यम काळी पाण्याचा निचरा होणारी जमीन योग्य असते या पिकाकरिता जमिनीचा सामू 5.5 ते 7 योग्य असतो.

वाण:

कलिंगड:

शुगरबेबी (माहिको), शुगरपॅक (सेमीन्स), महिसंपरुपती (महिको), ज्योती (अर्का), शुगर क्वीन (सिजेंटा), माणिक (अर्का)

खरबूज:

राजहंस (अर्का), जीत (अर्का), शरबती (पुसा), हरामधु (टीम टीम अ‍ॅग्रो), महिमा (एफ१),

बियाण्याचे प्रमाण:

  • कलिंगडासाठी एकरी 300 ते 350 ग्रॅम बियाणे पुरेसे असते. पेरणीपूर्वी प्रती किलो बियाण्यास 3 ग्रॅम थायरम चोळावे.
  • खरबुजासाठी एकरी 300 ते 350 ग्रॅम बियाणे पुरेसे होते. एक लिटर पाण्यात 2 ग्रॅम थायरम टाकलेल्या द्रावणात बिया भिजवून बाहेर काढाव्यात.

पूर्वमशागत:

  • शेतास उभी आडवी नांगरणी करून ढेकळे फोडून काढावी व एक वखारणी द्यावी.
  • शेतात चांगले कुजलेले 15 ते 20 गाड्या शेणखत टाकावे. नंतर वखरणी करावी.
  • कलिंगड व खरबुजाची लागवड बिया टोकून करतात.

आता जाणून घेऊया कलिंगड व खरबूज लागवडीची पद्धत:

कलिंगड व खरबुजाची लागवड ही बिया टोकून करतात कारण त्याची रोपे स्थलांतर सहन करू शकत नाही या पिकाची लागवड खालीलप्रमाणे केली जाते.

सरी-वरंबा पद्धत:

6.5x1.5 फुट अंतरावर तीन ते चार बिया टोकून लावाव्यात.

रुंद गादीवाफ्यावर लागवड:

या पद्धतीत लागवड गादीवाफ्यावर दोन्ही बाजूंना करतात त्यामुळे वेल गादीवाफ्यावर पसरतो व फळे पाण्याच्या संपर्कात येत नाहीत व खराब होत नाहीत. यासाठी तीन ते चार मीटर अंतरावर सरी पाडून सरीच्या बगलेत 3 फूट रुंदी, 20 सेमी उंची, 2 बेडमधील अंतर 6 फूट ठेवावे आणि 2 झाडे 2.5 फुटावर झिग झॅगमध्ये लावावीत.

खत व पाणी व्यवस्थापन:

  • दोन्ही पिकामध्ये खत व्यवस्थापनासाठी लागवडीपूर्व 50 किलो नायट्रोजन, 50 किलो फॉस्फरस व 50 किलो पोटॅश द्यावे व लागवडीनंतर 1 महिन्याने 50 किलो नायट्रोजनचा दुसरा हफ्ता द्यावा.
  • जमिनीच्या मगदुराप्रमाणे पिकास पाणी द्यावे.
  • वेलीच्या वाढीच्या काळात 5 ते 7 दिवसांच्या अंतराने व फळधारणा होऊन फळ वाढू लागल्यावर 8 ते 10 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
  • उन्हाळी हंगामात पाण्याच्या साधारणपणे 15 ते 17 पाळ्या द्याव्या लागतात.

आंतरमशागत:

  • आंतरमशागत करताना बी उगवून वेल पूर्ण वाढीला लागेपर्यंत आजूबाजूचे सर्व तण काढून रान भुसभुशीत ठेवावे.
  • रानातील मोठे तण हातांनी उपटून टाकावे.
  • भारी जमिनीत बी पेरल्यानंतर पाणी देऊ नये. कारण अशा जमिनीत पाणी सुकल्यानंतर वरचा थर कडक होतो. अशा जमिनीस प्रथमतः पाणी देऊन वाफसा आल्यानंतर बी टोकावे.

काढणी:

  • काढणी फळ पूर्ण पिकल्यावर करावी.
  • नदीच्या पात्रातील फळे बागायती पेक्षा थोडी लवकर तयार होतात.
  • बी पेरल्यापासून तीन ते साडेतीन महिन्यात काढणी सुरू होते व तीन ते चार आठवड्यात पूर्ण होते.

अशा प्रकारे योग्य रित्या, आपल्या शेतातील मातीनुसार योग्य वाण वापरून कलिंगडाची लागवड केल्यास भरपूर उत्पादन मिळू शकते. तुम्ही तुमच्या कलिंगड व खरबूज पिकाचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.


30 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor