पोस्ट विवरण
कसे कराल पपईमध्ये व्हायरस व्यवस्थापन
नमस्कार शेतकरी बंधूंनो,
कमी काळात, कमी पाण्यात आणि कमी खर्चात येणारे पीक म्हणून पपईचे पीक ओळखले जाते. महाराष्ट्रातील जळगाव, अहमदनगर, नाशिक, धुळे, इत्यादी जिल्हे तसेच पुणे आणि विदर्भातील वर्धा जिल्ह्यात पपईची लागवड मोठ्या प्रमाणात होते. महाराष्ट्रातील बहुतेक भागांत कमी-अधिक प्रमाणात पपईची लागवड होते. जवळजवळ वर्षभर पपईचे झाड फळ देते. पण याच पपईच्या पिकावर व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. आजच्या या लेखात आपण पपई पिकातील व्हायरस व्यवस्थापना विषयी जाणून घेणार आहोत.
पपई पिकावर प्रामुख्याने तीन प्रकारचे व्हायरस आढळून येतात त्यापैकी पहिला आणि महत्वाचा म्हणजे रिंग स्पॉट व्हायरस. या रोगामुळे पपईचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होते. साधारणपणे पपईच्या झाडावर पहिली फळधारणा आणि फळांची वाढ होत असते त्यावेळी या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. महाराष्ट्रात हा रोग मोठ्या प्रमाणावर पपई वर आढळून येतो. सर्वप्रथम रिंग स्पॉट व्हायरसची लक्षणे समजून घेऊ.
- पानावर पिवळसर चट्टे पडतात शिरा मात्र हिरव्या राहतात.
- पाने आकसतात व पानाची तसेच झाडाची वाढ खुंटते.
- पानाच्या देठावर व खोडाच्या कोवळ्या भागावर तेलकट ठिपके दिसतात.
- फळधारणा कमी होते किंवा होत नाही.
- फळे न वाढता वाळून पडतात.
- फळावर बांगडीच्या आकाराचे किंचित उठावदार ठिपके दिसतात सुरुवातीला ठिपक्याचा आकार एक मिलीमीटर असतो नंतर तो चार ते आठ मिलिमीटर होतो.
- फळाची वाढ होत नाही व ती वाकडीतिकडी होतात.
- या रोगाच्या प्रादुर्भावास कारणीभूत असलेला विषाणू काकडी वर्गीय पिकात आढळतो आणि मावा या कीटकांमुळे या विषाणूजन्य रोगाचा प्रसार होतो.
- कलिंगड, काकडी, चवळी, बटाटा या पिकावरील मावा कीटक या विषाणूजन्य रोगाचा प्रसार पपईवर करतात.
- हा विषाणू पपईच्या संपूर्ण झाडाच्या विविध भागात विशेषता वरील भागात असतो परंतु बियांमध्ये नसतो.
आता जाणून घेऊया पपई पिकामध्ये कोणत्याही अवस्थेमध्ये उद्भवू शकणाऱ्या मोझॅक विषाणूच्या लक्षणांविषयी:
- या रोगाची लक्षणे नवीन पानावर दिसतात.
- ही एक पानांवरील विकृती असून, याची लक्षणे रिंग स्पॉट रोगासारखीच दिसतात.
- या रोगाचा प्रसार मावा या रसशोषक किडीमुळे होतो.
आता जाणून घेऊया पपई पिकात होणाऱ्या बोकड्या रोगाच्या लक्षणांविषयी:
- ह्या रोगाचे अतिशय स्पष्ट दिसणारे लक्षण म्हणजे पाने खालुन आतल्या बाजुला मुडपणे.
- पानांच्या शिरा जाड होणे, काही वेळा त्यावर गाठी येणे.
- पाने खडबडीत होऊन उलट्या कपासारखी दिसणे आणि देठ विकृत आकाराचे होउन पिळ दिल्यासारखे दिसणे.
- बहुधा वरची पानेच जास्त बाधीत होतात.
- रोगाच्या नंतरच्या टप्प्यावर पानगळती होऊ शकते.
- रोपाची वाढ खुंटते आणि फुले किंवा फळे फारच कमी येतात.
- जर फळे आलीच तर छोटी आणि आकाराने विकृत असतात आणि अकाळीच गळु शकतात.
नियंत्रणाच्या पद्धती:
- पपई पिकाची लागवड करताना या रोगासाठी प्रतिकारक वाणाची लागवड करावी.
- रोगग्रस्त झाडे काढून नष्ट करून बाग स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे.
- नवीन बाग लागवड करतेवेळी, निरोगी आणि रोगविरहित रोपांची निवड करावी.
- रोगग्रस्त झाडे कोणत्याही उपायाने निरोगी होऊ शकत नाहीत त्यामुळे रोगग्रस्त झाडे काढून नष्ट करणे आवश्यक आहे. अन्यथा, या विषाणूचा कायमचा स्रोत झाडांवर टिकून राहतो, यामुळे एकाच वेळी इतर झाडांवर या रोगाचा प्रसार होत राहतो.
- मावा हा रोग पसरवण्याचे काम करतात. मावाच्या नियंत्रणासाठी कीटकनाशक डायमिथोएट 30% ईसी (कात्यायनी-डिमॅट) 8 मिली प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किंवा
- इमिडाक्लोप्रीड 17.8% एसएल (इफको-इसोगाशी) 0.3 मिली प्रति लीटर पाण्याच्या प्रमाणात 10 ते 12 दिवसांच्या अंतराने पिकावर फवारणी करणे गरजेचे आहे.
- याशिवाय 2% कडुलिंबाच्या तेलात 0.5 मिली स्टिकर- स्प्रेडर मिसळून फवारणी करावी. गरज भासल्यास 1 महिन्याच्या अंतराने 6 ते 8 वेळा फवारणी करता येते.
- पावसानंतर पपईची रोपे लावल्यास हा रोग होण्याची शक्यता कमी होते.
- शेतात निंबोळी पेंड आणि कंपोस्ट खताचा वापर केल्यास या रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो.
- या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाधित झाडे किंवा रोपांचे भाग शेतातून काढून टाकून नष्ट करा.
- शेतातील आणि आजूबाजूचे तण नियंत्रित करा.
- केवळ उच्च दर्जाच्या खतांचा संतुलित वापर करा.
तुमच्या पपईच्या पिकातील व्हायरसचे नियंत्रण तुम्ही कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. आणि हो, पपई पिकातील तण व्यवस्थापनाविषयी माहितीसाठी https://dehaat-kisan.app.link/CVZPoNJlwFb हे वाचा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ