पोस्ट विवरण
सुने
कृषि
टमाटर
कीट
कृषि ज्ञान
कृषी ज्ञान
DeHaat Channel
10 Apr
Follow

टोमॅटो मधील टूटा नागआळी व्यवस्थापन (Leaf Miner Management in Tomato)

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

महाराष्ट्रामध्ये टोमॅटो पिकाखाली सुमारे 50 हजार हेक्‍टर क्षेत्र असून, त्यापासून जवळजवळ 1.05 लाख टन टोमॅटो उत्पादन मिळते. तसेच सरासरी उत्पादनात आपले राज्य इतर राज्यांच्या तुलनेत आघाडीवर आहे. महाराष्ट्रातील हवामान या पिकास योग्य असून, जमीन, पीक, हवामान, पाणी, खत व पीक संरक्षण यांचे योग्य नियोजन केल्यास टोमॅटोची उत्पादकता सहज 60 ते 70 टन प्रति हेक्‍टरपर्यंत वाढू शकते. चांगला निचरा असलेल्या मध्यम काळ्या जमिनीत किंवा पोयट्याच्या जमिनीत हे पीक चांगले येते. योग्य हवामान, जमीन न मिळाल्यास टोमॅटोच्या पिकामध्ये विविध प्रकारच्या किडी आढळून येतात. आजच्या या भागात आपण यापैकी मुख्य अशा टूटा नागअळी या किडीविषयी जाणून घेणार आहोत.

टोमॅटो पिकातील टुटा नागअळीला "टुटा ॲबसोलुटा" या नावाने देखील ओळखले जाते. या किडीचा प्रादुर्भाव अलीकडील काळात वाढत चालला आहे. या किडीची सविस्तर ओळख, नुकसानीची लक्षणे ओळखून एकात्मिक पद्धतीने नियंत्रण करणे अत्यंत गरजेचे आहे.

टुटा नागअळीचा  (Tomato Leaf Miner Introduction) प्राथमिक परिचय:

या किडीचे मूळ ठिकाण 'पेरू' देश आहे. ही कीड दक्षिण अमेरिकेत खूप उपद्रवी असल्याने त्यास ‘साऊथ अमेरिकन मॉथ' या नावाने सुद्धा ओळखले जाते. आपल्या देशात व महाराष्ट्रात 2014 मध्ये ती सर्वप्रथम आढळली.

टुटा नागअळी नुकसानीचा प्रकार व लक्षणे (Tomato Leaf Miner Types of damage and symptoms):

 • टुटा नागअळी मुख्यत्वे टोमॅटो पिकावर आपली उपजीविका करते. या व्यतिरिक्त मिरची, बटाटा, सिमला मिरची व वांगी या ‘सोलॅनॅनिसी’ वर्गातील पिकांचे देखील ती नुकसान करते.
 • मादी साधारणतः 200 ते 260 अंडी एकावेळी पानाच्या खालील बाजूला किंवा फांदीवर घालते.
 • अंड्यातून बाहेर पडलेली अळी पांढरट व कालांतराने पिवळी दिसते.
 • ती पानांमध्ये जाळी तयार करते व नंतर कोवळ्या फांद्या व हिरवी फळे यांना हानी पोहोचवते.
 • जास्त उद्रेक झाल्यास पाने जळून जातात.
 • जसजशी अळी मोठी होते तसतशी हिरवट दिसू लागते. डोक्यावर काळसर पट्टा दिसतो.
 • पूर्ण परिपक्व अळी साधारण 9 मिमी म्हणजेच तांदळाच्या दाण्याच्या आकाराएवढी असते.
 • त्यानंतर अळी बाहेर येऊन मातीमध्ये अथवा पानांना गुंडाळून कोषावस्थेत जाते.
 • उष्ण, ढगाळ वातावरण पतंग कोषातून लवकर बाहेर पडण्यास पोषक असते.
 • कोषातून बाहेर पडलेले पतंग अंधारप्रिय असल्याने दिवसा पानांच्या मागच्या बाजूस ते लपून राहतात. रात्रीचे बाहेर पडतात.
 • अळी पानांवरती व फळांवरती जाळी तयार करते. त्यानंतर तेथे बुरशीचा प्रादुर्भाव होतो. अशी फळे बाजारात विकता येत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते.

टुटा नागअळीसाठी (Tomato Leaf Miner) पोषक हवामान:

 • टुटा किडीसाठी हिवाळा किंवा खूप उष्ण व कोरडे वातावरण प्रतिकूल असते. त्यामुळे या दिवसांत एक जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी 30 ते 74 दिवस लागतात.
 • कोषावस्थाही दीर्घ होते. त्यामुळे पावसाळ्यात, हिवाळ्यात व अति उष्ण, कोरड्या भागात या किडीचा उपद्रव दिसत नाही.
 • उन्हाळ्यात म्हणजेच डिसेंबर ते एप्रिल 28 ते 24 अंश सेल्सिअस तापमान व आर्द्रता 55 ते 60 टक्के हे वातावरण उपद्रवासाठी पोषक असते.
 • त्यामध्ये ही कीड जीवनक्रम 18 ते 22 दिवसांत पूर्ण करते व त्यांची संख्या झपाट्याने वाढते.

टुटा नागअळीची (Tomato Leaf Miner) नेमकी ओळख:

नेहमीची नागअळी, फळमाशी आणि टूटा यांना ओळखण्यामध्ये संभ्रम होऊ नये म्हणून पुढील बाबी तपासाव्यात.

 • नेहमीची नागअळी पानांवर नागासारख्या रेषा ओढते. आकाराने ती टूटा किडीपेक्षा खूप लहान असते.
 • फळमाशी फळाला दंश करते. फळ कापल्यावर आतमध्ये लहान सुतके आढळतात.
 • टुटा नागअळी फळाच्या सालीवर जाळी बनवते.
 • टुटा नागअळी पाने गुंडाळते.

टुटा नागअळी (Tomato Leaf Miner) किडीचे एकात्मिक नियंत्रण:

 • प्रभावी नियंत्रणासाठी किडीचा उद्रेक, झपाट्याने वाढ होणारे वातावरण व पिकांची अवस्था यांची माहिती असणे फार गरजेचे आहे.
 • प्रतिबंधात्मक उपायांवर भर द्यावा.
 • डिसेंबर ते एप्रिल या कालावधीत जास्त प्रादुर्भाव होत असल्यामुळे उपजिवीकेसाठीच्या गवताचे नियंत्रण करावे.
 • आधीच्या पिकाची काढणी झाल्यानंतर शेत तळपू द्यावे. यामुळे कोषावस्था नष्ट होण्यास मदत होते.
 • रोपवाटिकेद्वारे किडीचा प्रसार होऊ नये म्हणून त्यास ‘इन्सेक्ट प्रूफ नेट' लावावे.
 • रोपांची दाट लागवड टाळावी.
 • पिवळे चिकट सापळे व त्याला टूटा या किडींसाठीचे ल्यूर सुरवातीला शेतात लावावेत. त्यामुळे कीड शेतात आलेली समजते. त्यावेळेसच अटकाव होण्यास मदत होते.
 • पतंग अवस्था अंधारप्रिय असल्याने झाडाच्या खाली व पानांच्या मागील बाजूस ते दडलेले असतात. त्यामुळे टोमॅटोचे दोन ते तीन तोडे झाल्यानंतर खालील बाजूची एक ते दीड फूट पाने काढून टाकावीत.
 • रात्रीच्या वेळेस एकरी 2 ते 3 प्रकाश सापळे लावावेत.
 • 'आयआयएचआर’ या बंगळूर स्थित संस्थेने विकसित केलेला अर्का-टूटा सापळा आहे. शिफारसीनुसार त्याचा वापर करता येईल.
 • टोमॅटोचे पीक घेण्याआधी वा काढणी झाल्यानंतर सोलेनेसी वर्गातील पिके उदा. मिरची, बटाटा, सिमला मिरची, वांगी अशी पिके त्या शेतात घेऊ नयेत.
 • झाडाला अजैविक ताण देऊ नये. म्हणजेच पाणी कमी किंवा जास्त देऊ नये.
 • वाढीनुसार योग्य अन्नद्रव्ये खतांमार्फत द्यावीत.
 • टूटा नागअळी किडीचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी ट्रायकोडर्मा प्रजातीच्या मित्रकिटकांचा एक लाख अंडी प्रति एकर याप्रमाणेही वापर करता येतो.

रासायनिक नियंत्रण (प्रति लिटर पाणी):

टूटा नागअळी किडीच्या सुरुवातीच्या अवस्थेतील नियंत्रण:

 • किडीची अंडी तसेच प्राथमिक अवस्था नष्ट करण्यासाठी टोमॅटोच्या रोप लागवडीनंतर जवळ जवळ 10 दिवसांनी सायंट्रानिलिप्रोल 10.26% (FMC-बेनेविया) 30 मिली, नीम तेल 10000 पीपीएम, 1% ईसी (IFC-निम ऑइल) 25 मिली + स्टिकर 4 मिली या प्रमाणात 15 लिटर पाण्यात मिसळून आपल्या टोमॅटो पिकात फवारणीसाठी वापरायचे आहे.
 • पहिल्या फवारणीनंतर 10 ते 12 दिवसांनी आपण हीच फवारणी पुन्हा करू शकतो.

टूटा नागअळी किडीने टोमॅटो पिकात आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्या नंतर करावयाच्या उपाययोजना:

 • क्लोरेंट्रानिलिप्रोल 18.5% डब्ल्यू/डब्ल्यू एससी (FMC-कोराजन) 6 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 % एससी (डाव-डेलिगेट) 18 मिली या मध्ये स्टिकरची मात्रा 4 मिली मिसळून प्रति 15 लिटर पाण्यात द्रावण तयार करून त्याची फवारणी करावी.

फवारणी करताना घ्यावयाची काळजी:

 • फवारणीसाठी गढूळ पाणी वापरू नये. स्वच्छ पाणीच वापरावे.
 • फवारणी द्रावण प्लास्टिक बकेटमध्ये करावे.
 • शक्य झाल्यास फवारणीच्या वेळेस आपण स्वतः शेतात हजर राहावे.
 • फवारणीच्या दिवशी ढगाळ वातावरण असल्यास शक्यतोवर फवारणी करू नये व केल्यास बेस्ट स्टीकरचा वापर अवश्य करावा. तरीही ताबडतोब पाऊस पडल्यास फवारणीचा फायदा होत नाही.
 • औषध तयार करताना प्रथम थोड्या पाण्यात घेऊन नंतर जास्त पाण्यात मिसळावे व व्यवस्थित ढवळून घ्यावे.
 • फवारणी शक्यतोवर सकाळी व दुपारी 4 नंतर करावी. जास्त उन्हामध्ये कृषी रसायनांचे विघटन होते व पाहिजे तसे परिणाम दिसत नाहीत.
 • तणनाशकांचा पंप फवारणीसाठी शक्यतोवर वापरू नाही.
 • एकाच औषधाचा किंवा एकाच गटातील औषधांचा सतत वापर करू नये. त्यामुळे किडींमध्ये प्रतिकारशक्ती वाढते.
 • कीटकनाशके, बुरशीनाशके, संजीवके, एकत्र फवारताना त्यांची सुसंगतता पडताळून पाहावी. द्रावण घट्ट झाल्यास, फाटल्यास किंवा न विरघळल्यास फवारू नये.
 • फवारणीसाठी तयार करून ठेवलेल्या द्रावणाचा ताबडतोब वापर करावा, ते जास्त काळ ठेवू नये.
 • फवारणी सर्व पिकावर खालीवर पानांच्या मागे-पुढे एकसमान होईल याची काळजी घ्यावी.

तुम्ही तुमच्या टोमॅटोच्या पिकामधील टूटा नागअळी किडीचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. टोमॅटोमध्ये कोणते रोग व किडी आढळून येतात?

टोमॅटोमध्ये प्रामुख्याने मर, करपा, विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. तर फळे पोखरणारी अळी, टूटा नागअळीचा प्रादुर्भाव दिसून येतो.

2. टुटा नागअळी कशी ओळखावी?

टुटा नागअळी फळाच्या सालीवर जाळी बनवते आणि पाने गुंडाळते.

3. टुटा नागअळी कोणत्या पिकांचे नुकसान करते?

टुटा नागअळी मुख्यत्वे टोमॅटो पिकावर आपली उपजीविका करते. या व्यतिरिक्त मिरची, बटाटा, सिमला मिरची व वांगी या ‘सोलॅनॅनिसी’ वर्गातील पिकांचे देखील ती नुकसान करते.

22 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ