लिंबू फळबागेचे लागवड व्यवस्थापन! (Lemon: Cultivation management!)

नमस्कार शेतकरी मित्रांनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
लिंबू हे कमी खर्चात जास्त नफा देणारे पीक आहे. यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. यामुळे वर्षभर बाजारात लिंबाची मागणी कायम असते. भारत हा जगातील सर्वात मोठा लिंबू उत्पादक देश आहे. भारतात तामिळनाडू, राजस्थान, महाराष्ट्र, बिहार, आसाम, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, गुजरात इत्यादी राज्यांमध्ये लिंबाची लागवड केली जाते. शेतकरी वेगवेगळ्या राज्यांमध्ये लिंबाच्या विविध जातींची लागवड करतात. एकदा लिंबाची लागवड केल्यावर 10 वर्षे उत्पादन घेता येते. लिंबाचे रोप सुमारे ३ वर्षांनी चांगले वाढते. त्याची झाडे वर्षभर उत्पादन देत राहतात. चला तर मग आजच्या भागात या वर्षभर उत्पादन देणाऱ्या लिंबू पिकाच्या फळबाग लागवड व्यवस्थापनाविषयी जाणून घेऊया.
लिंबू लागवडीसाठी योग्य जमीन (Suitable Soil for Lemon cultivation):
- लिंबू लागवड करण्यासाठी मध्यम काळी, हलकी, मुरमाड व पाण्याचा निचरा होणारी जमीन उपयुक्त ठरते.
- याशिवाय लाल लॅटराइट जमिनीतही लिंबू पिकवता येतात .
- आम्लयुक्त किंवा अल्कधर्मी जमिनीतही लिंबाची लागवड करता येते.
- लिंबाचे पीक डोंगराळ भागात देखील घेतले जाऊ शकते.
- लिंबू पिकाचे थंड आणि दंवा पासून संरक्षण आवश्यक आहे.
- 4 ते 9pH मूल्य असलेल्या जमिनीत लिंबाची लागवड करता येते.
लिंबू लागवडीसाठी योग्य हवामान (Suitable Weather for Lemon cultivation):
- लिंबू लागवडीसाठी अर्ध-शुष्क हवामान सर्वोत्तम मानले जाते.
- जिथे जास्त हिवाळा किंवा दंव असते तिथे लिंबाचे उत्पादन कमी मिळते, जास्त थंडीमुळे लिंबू झाडाची वाढ थांबते. म्हणूनच भारतात लिंबाची सर्वाधिक लागवड दक्षिण भारतातील उष्ण हवामान असलेल्या प्रदेशात केली जाते.
- ज्या वर्षी हिवाळा जास्त असतो, त्या हंगामात लिंबाचे उत्पादन फारच कमी मिळते.
लिंबू लागवडीसाठी योग्य हंगाम (Suitable Season for Lemon cultivation):
- लिंबामध्ये जून-जुलै महिन्यात मृग बहार, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये हस्त बहार आणि जानेवारी-फेब्रुवारीमध्ये आंबिया बहार धरला जातो.
- या तिन्ही बहरांत लिंबाच्या झाडांना फळे येतात.
- मात्र हस्त बहरातील फळे मार्च-एप्रिल महिन्यात विक्रीयोग्य होतात. या काळात बाजारात लिंबास चांगली मागणी असते आणि दरही चांगला मिळतो.
लिंबाच्या जाती (Lemon Varities):
- कागदी लिंबू
- बारामासी
- गोड लिंबू
- प्रमालिनी
- विक्रम प्रकारचा लिंबू
- चक्रधर
- विक्रम
- पीकेएम-1
- साई शरबती
- अभयपुरी लाइम
- करीमगंज लाइम
लिंबू पेरणीची पद्धत:
- लिंबू पिकाची लागवड बिया पेरून अथवा रोपे लावून करता येते.
- लिंबू लागवडीसाठी दोन्ही पद्धतींनी पेरणी करता येते.
- रोपे लावून लिंबाची लागवड जलद आणि चांगली होते आणि त्यासाठी कमी मेहनतही लागते, तर बिया पेरून पेरणी करताना जास्त वेळ आणि मेहनत लागते.
- लिंबू रोपांचे प्रत्यारोपण करण्यासाठी, रोपे नर्सरीमधून खरेदी करावी लागतात.
- खरेदी केलेली रोपे एक महिन्याची आणि पूर्णपणे निरोगी असावीत.
लिंबू पिकाची लागवड (Lemon Cultivation) :
- लिंबाची लागवड करण्यासाठी 06×06 मीटर अंतरावर 3×3×3 फूट आकाराचे खड्डे खोदून घ्यावेत.
- या खड्ड्याचे उन्हाळ्यामध्ये कडक उन्हामध्ये निर्जतुकीकरण करुन घ्यावे.
- पुन्हा पावसाळ्यात लागवड करण्यापूर्वी कार्बेन्डाझिम दोन ग्रॅम अधिक क्लोरपायरीफॉस 50% ईसी 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी या द्रावणाने खड्ड्याचे निर्जंतुकीकरण करावे.
- खड्डा भरताना त्यात शेणखत 10 किलो, SSP 2 किलो, निंबोळी पेंड 1 किलो आणि ट्रायकोडर्मा 25 ग्रॅम पोयटा माती मध्ये मिसळून द्यावे. त्यात लिंबाच्या कलमांची लागवड करावी.
लिंबू लागवडीसाठी कलमांची निवड आणि जाती :
- लिंबू लागवड करण्यासाठी विशिष्ट रोगांना तसेच किडींना प्रतीकारकक्षम असणाऱ्या वाणांची निवड करावी.
- खात्रीलायक रोपवाटिकांमधून कलमांची अथवा रोपांची खरेदी करावी.
- लिंबू लागवडीसाठी साई सरबती, फुले शरबती इ. सुधारित जातींची निवड करू शकतो.
अन्नद्रव्य व्यवस्थापन (Fertilizer Management) :
- नवीन बागेसाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन:
- उपरोक्त खतांची मात्रा देताना नत्रयुक्त खतांची मात्रा प्रति झाडासाठी समान तीन हप्त्यांमध्ये विभागून द्यावी.( जानेवारी, जुलै आणि नोव्हेंबर)
- नत्राच्या एकूण गरजेपैकी 50 टक्के मात्रा रासायनिक खताद्वारे (युरिया किंवा अमोनियम सल्फेट) तसेच उर्वरित नत्राची मात्रा सेंद्रिय खते किंवा निंबोळी पेंडच्या स्वरूपात द्यावी.
- साधारणत: प्रति झाडासाठी 15 किलो निंबोळी पेंड आणि 15 किलो सेंद्रिय खत योग्य फळधारणा झालेल्या झाडांसाठी वापरावे.
पाणी व्यवस्थापन (Water Management):
- लिंबाच्या झाडांना जास्त सिंचनाची गरज नसते. कारण लिंबाची लागवड किंवा पेरणी जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत केली जाते.
- तुम्ही पावसाळ्याच्या आधी जर पेरणी केली तर या काळात जास्त सिंचनाची गरज भासत नाही.
- पावसाळ्यात पाऊस नसल्यास 15 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे, परंतु हे पाणी हलके असावे जेणेकरून जमिनीतील ओलावा 6-8% राहील.
- हिवाळ्यात दंव आणि थंडीपासून बचाव करण्यासाठी आठवड्यातून एकदा पाणी द्यावे. याशिवाय रोपात जेव्हा कळ्या दिसतात तेव्हा पाणी द्यावे लागते. त्यानंतर पाणी थांबवावे.
लिंबू पिकावर आढळून येणाऱ्या मुख्य किडी आणि रोग (Insect and Disease in Lemon crop):
- हिरव्या रंगाची फुलपाखरू अळी
- नागअळी
- काळी माशी
- पांढरी माशी
- सायला
- कँकर/खैऱ्या रोग
- पायकूज व डिंक्या रोग
- शेंडे मर रोग
- सिट्रस ग्रिनिंग
लिंबू पिकाच्या फळांची काढणी आणि लिंबू पिकाचे उत्पादन :
- रोपांपासून वाढविलेल्या झाडांना 5/6 वर्षांनंतर चांगले उत्पादन येऊ लागते.
- फळांचा रंग बदलू लागताच फळे काढून, गोळा करावीत.
- झाडांना वर्षभर फळे येत असली तरी पावसाळ्यात उत्पादन वाढते.
- आंबे बहाराच्या उशिराने आलेल्या फळांचे उत्पादन अधिक भरते.
- फळांचा आकारही मोठा असतो.
- दरवर्षी लिंबाच्या एका झाडापासून 1,000 ते 1,200 फळे मिळतात.
- एकरी उत्पादन 4-5 टनांपर्यंत मिळते.
लिंबू पिकाच्या फळांची साठवण, फळे पिकविण्याच्या पद्धती आणि विक्री :
- योग्य अवस्थेत काढलेली फळे आठवडाभर चांगली टिकतात.
- या काळात त्यांना पिवळाधमक रंग येतो.
- दूरच्या बाजारात विक्रीसाठी फळे 40-50 किलो क्षमतेच्या गोण्यांतून पाठवावी.
अशा प्रकारे योग्य रित्या, आपल्या शेतातील मातीनुसार योग्य हवामानानुसार लिंबू पिकाची लागवड केल्यास भरपूर उत्पादन मिळू शकते. तुम्ही तुमच्या लिंबू पिकाची लागवड कोणत्या पद्धतीने करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “बागायती पिके” चॅनेलला फॉलो करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. लिंबू पिकाला लागणारे प्रमुख रोग कोणते?
कँकर/खैऱ्या रोग, पायकूज व डिंक्या रोग, शेंडे मर रोग हे लिंबू पिकाला लागणारे प्रमुख रोग आहेत.
2. लिंबू पिकासाठी योग्य हवामान कोणते?
लिंबू वनस्पतीसाठी अर्ध-शुष्क हवामान सर्वोत्तम आहे.
3. लिंबू पिकासाठी कोणती जमीन योग्य असते?
लिंबू रोपासाठी वालुकामय, चिकणमाती सर्वोत्तम मानली जाते. याशिवाय लाल लॅटराइट जमिनीतही लिंबू पिकवता येतो.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
