गुरांमधील लम्पी रोग - लक्षणे व उपाय (Lumpy Skin disease in Cattle - Symptoms and Remedies)
नमस्कार पशुपालकांनो,
लम्पी हा जनावरांमधील विषाणूजन्य त्वचा आजार (Lumpy Skin disease) आहे. याचा प्रादुर्भाव गाई, म्हशींमध्ये आढळून येतो. मात्र शेळ्यांमध्ये आढळत नाही. याची तीव्रता संकरित गाईंमध्ये अधिक प्रमाणात असते. सर्व वयोगटातील जनावरांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव आढळतो. प्रौढ जनावरांच्या तुलनेत लहान वासरांमध्ये अधिक प्रमाणात हा रोग आढळतो. या आजारामध्ये मरतुकीचे प्रमाण कमी असले तरीही आर्थिकदृष्ट्या जास्त नुकसान होते. कारण, दूध उत्पादनात घट येते. जनावर अशक्त होते. काही वेळा गर्भपात होण्याची शक्यतादेखील असते. जनावराची त्वचा कायमस्वरूपी खराब होऊन जनावर विकृत दिसते. त्यामुळे जनावरांचे बाजारमूल्य घटते.
भारतात या रोगाची पहिली नोंद ऑगस्ट 2019 मध्ये ओरिसा राज्यात झाली. त्यानंतर झारखंड, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक व केरळ राज्यात या आजाराचा शिरकाव झालेला आढळून आला. हा आजार एका विषाणूमुळे गुरांमध्ये परसतो ज्याला ‘लम्पी स्किन डिसीज व्हायरस’ (LSDV) म्हणतात. त्याच्या तीन प्रजाती आहेत. ज्यामध्ये पहिली प्रजाती ‘कॅप्रीपॉक्स व्हायरस’ आहे. त्यानंतर ‘गोटपॉक्स व्हायरस’ आणि ‘मेंढीपॉक्स व्हायरस’ अशा आणखी दोन प्रजाती आहेत.
लम्पी त्वचा रोग हा वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असल्यामुळे, पशुपालकांनी काळजी घेत सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. या आजाराने जनावरे दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. तसेच जनावरांची वेळीच योग्य काळजी घेतल्यास जनावरांना लम्पी रोगाची लागण होण्यापासून वाचविता येणे देखील शक्य आहे. म्हणूच आजच्या या लेखात आपण लम्पी रोगाचा प्रसार, लक्षणे व उपाययोजनांविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.
लम्पी त्वचा रोगा (Lumpy Skin disease) चा प्रसार कशामार्फत होतो?
- लम्पी त्वचा रोगाचा प्रसार मुख्यत्वे करून चावणारे कीटक जसे की माशा, डास, गोचीड, कीटक, चिलटे इ.मार्फत होतो.
- कीटकांपासून होणारा लम्पी त्वचा रोग हा गोवंश व महिष वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे.
- निरोगी जनावर बाधित जनावराच्या संपर्कात आल्यानंतर प्रसार होतो.
- बाधित जनावरांच्या अश्रूंमध्ये, नाकातील स्रावामध्ये व वीर्यामध्ये रोगाचे विषाणू आढळून येतात.
- हे विषाणू पाणी किंवा चाऱ्यामध्ये मिसळले तरी देखील प्रसार होतो.
- उष्ण व दमट वातावरणात चावणाऱ्या कीटकांची वाढ झपाट्याने होते. याच काळात प्रादुर्भाव वाढतो.
- बाधित नराचा संयोग मादीसोबत झाल्यानंतर वीर्यातील विषाणूंमुळे मादीत रोगाचे संक्रमण होऊ शकते. त्यामुळे बाधित गाभण जनावराच्या जन्माला येणाऱ्या वासरास रोगाचे संक्रमण होते.
- दूध पिणाऱ्या वासरास बाधित गायीच्या दुधातून किंवा सडावरील जखमेतील स्रावातून बाधा होऊ शकते.
लम्पी रोगाची प्रमुख लक्षणे (Lumpy Skin disease Symptoms) :
- आजाराचा संसर्ग झाल्यास प्रथम जनावरांच्या डोळयातून व नाकातून पाणी येते.
- लसिकाग्रंथीना सूज येते.
- सुरवातीस ताप येतो.
- दुधाचे प्रमाण कमी होते.
- चारा खाणे, पाणी पिणे कमी होते.
- हळूहळू डोके, मान, मायांग, कास इ. भागाच्या त्वचेवर 10-50 मिमी व्यासाच्या गाठी प्रामुख्याने येतात.
- तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो.
- डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येतात.
- डोळ्यांची दृष्टी बाधित होते.
- पायावर सूज येवून काही जनावरे लंगडतात.
कशी घ्याल लम्पी रोगाने बाधित जनावरांची काळजी कशी घ्याल?
- गोठ्यात माश्या, डास होणार नाहीत याची काळजी घ्यावी.
- जनावराच्या अंगावर उवा दिसत असल्यास त्यांच्यावर प्रतिबंधात्मक उपाय करावा.
- जनावरांचा गोठा स्वच्छ ठेवावा.
- निरोगी जनावरांना लम्पी बाधित जनावरांपासून वेगळे ठेवावे.
- लम्पी रोगाने आजारी असलेल्या जनावरांना चरण्यासाठी बाहेर सोडू नये.
- गाई आणि म्हशींना वेगवेगळ्या ठिकाणी बांधावे.
लम्पी रोगावर करावयाचे उपचार (Lumpy Skin disease Remedies) :
- आजाराची लक्षणे दिसणाऱ्या जनावराला तात्काळ पशुतज्ज्ञाकडे न्यावे.
- जनावरास ज्वरनाशक, सूज कमी करणारे व वेदनाशामक औषध घ्यावे.
- जिवाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिजैविकांचा वापर करावा.
- प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी उपचार करावेत.
- जनावरांच्या शरीरावर झालेल्या जखमा 2 टक्के पोटॅशिअम परमॅंगनेटच्या पाण्याने धुऊन त्यावर बोरोग्लिसरीन लावावे.
- निरोगी जनावरांचे लसीकरण केल्यास जनावरांना हा रोग होण्यापासून वाचवता येऊ शकते.
लसीकरण (Vaccination):
लम्पी आजाराने बाधीत गावांमध्ये तसेच बाधीत गावांपासून 5 किलोमीटरच्या त्रिज्येत सर्व गावांमधील 4 महिने वयावरील गाय व म्हैस वर्गातील जनावरांना 1 मिली प्रति जनावर याप्रमाणे गोट पॉक्स, उत्तरकाशी स्ट्रेन लस टोचण्यात यावी. यावेळेस प्रत्येक जनावराकरिता स्वतंत्र सुई वापरण्याची दक्षता घ्यावी. लसीकरणानंतर 22 दिवस जनावरे मोकळी चरायला सोडू नयेत.
'लम्पी स्किन डिसीज' हेल्पलाईन नंबर:
लम्पी आजाराबाबत मदतीसाठी पशुपालकांनी पशुवैद्यकीय दवाखान्यात अथवा विभागाचा टोल फ्री क्रमांक 18002330418 किंवा राज्यस्तरीय कॉल सेंटरमधील पशुसेवेचा टोल फ्री क्रमांक 1962 यावर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
तुमच्या जनावरांमध्ये लम्पी त्वचा आजाराची कोणती लक्षणे दिसत आहेत का? तुम्ही काय उपाययोजना केल्या? याविषयीची माहिती इतर पशुपालकांसह शेयर करा. या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, अशा अजून माहितीसाठी "पशु ज्ञान" चॅनेलला फॉलो करा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. लम्पी रोगाचा प्रभाव किती दिवस असतो?
लम्पी रोगाचा प्रभाव दोन ते तीन आठवडे असतो.
2. लम्पी रोग कसा पसरतो?
लम्पी रोग माशा, डास, गोचीड, कीटक आणि चिलटे इ. द्वारे पसरतो.
3. 'लम्पी स्किन डिसीज' हेल्पलाईन नंबर कोणता आहे?
लम्पी आजाराबाबत मदतीसाठी पशुपालकांनी पशुवैद्यकीय दवाखान्यात अथवा विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002330418 किंवा राज्यस्तरीय कॉल सेंटरमधील पशुसेवेचा टोल फ्री क्रमांक 1962 यावर संपर्क साधावा.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ