लसूण पिकातील प्रमुख रोग आणि त्यांचे व्यवस्थापन (Major diseases of Garlic crop and their management)
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
लसूण हे कंदर्प कुळातील एक मसाल्याचे पीक आहे. आहारात लसणाचे खूप महत्व आहे. लसणाचा वापर प्रत्येक भाजी मध्ये केला जातो. लसूण प्रामुख्याने मसाल्यांमध्ये वापरली जाते. लसणाचे औषधी गुणधर्म देखील आहेत. यामुळे या लसणाला वर्षभर मागणी असते. लसणाची लागवड रब्बी हंगामात केली जाते. भारत आणि चीन हे लसूण पिकवणारे जगातील प्रमुख देश आहेत. या पिकाच्या लागवडीत मध्यप्रदेश आघाडीवर असून त्यानंतर ओडिसा, गुजरात आणि महाराष्ट्राचा नंबर लागतो अशा या अधिक नफा देणाऱ्या लसणाच्या उत्पादनाचे रोगांमुळे नुकसान होते. त्यामुळे वेळीच त्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे असते. चला तर मग जाणून घेऊया लसूण पिकातील प्रमुख रोग आणि त्यांचे व्यवस्थापन याविषयीची माहिती.
लसूण पिकात आढळणारे प्रमुख रोग (Major diseases of Garlic crop):
- काळा करपा
- तपकिरी करपा
- जांभळा करपा
- मर रोग
- केवडा
काळा करपा: (ॲन्थ्रॅक्नोज)
कोलीटोट्रीकम करप्यालाच काळा करपा रोग असे देखील म्हणतात व याचा प्रादुर्भाव खरीप हंगामामध्ये दिसून येतो. प्रामुख्याने जमिनीतून पाण्याचा निचरा न झाल्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो व पाने करपतात व कंद सडतो.
रोगकारक बुरशी: कोलीटोट्रायकम ग्लेओस्पोराइड्स
लक्षणे:
- सुरूवातीला पानाची बाह्य बाजू व देठाजवळ राखाडी रंगाचे ठिपके दिसतात. त्यावर बारीक गोलाकार आणि उठावदार ठिपके वाढू लागतात.
- पाने वाळतात. रोपाची मान लांबट होऊन पात वेडीवाकडी होते. पाने वेडीवाकडी झाल्यामुळे लसणाची वाढ होत नाही.
- रोपांची पाने ही काळी पडून वाळतात. नंतर रोप मरते.
- दमट आणि उबदार हवामानात रोगाच्या बुरशीची वाढ झपाट्याने होते.
- कुजलेल्या रोपाचा भाग, रोपवाटिकेतील रोप आणि लसूण या मार्फत हा रोग पसरतो.
तपकिरी करपा:
स्टेम्फीलीयम करप्यालाच तपकिरी करपा रोग म्हणून ओळखले जाते व रब्बी हंगामात या करप्याचा प्रादुर्भाव दिसून येतो.
रोगकारक बुरशी: स्टेमफीलीयम व्हेसिकॅरीयम
लक्षणे:
- रोगाचा प्रादुर्भाव लसूण, कांदा पिकावर तसेच बियाण्याच्या पिकावर होतो.
- पानाच्या बाहेरील भागावर पिवळसर, तपकिरी रंगाचे लांबट चट्टे दिसून येतात. चट्ट्यांचा आकार वाढत जाऊन पाने सुकू लागतात.
- फुलांच्या दांड्यावर प्रादुर्भाव झाल्यास दांडे मऊ होऊन वाकून मोडतात.
जांभळा करपा:
अल्टरनेरिया करप्यालाच जांभळा करपा रोग असे म्हणतात. खरीप हंगामातील दमट, ढगाळ व पावसाळी वातावरणामुळे या प्रकारच्या करपा रोगाचा प्रादुर्भाव लसूण पिकावर मोठ्या प्रमाणावर होतो.
रोगकारक बुरशी: अल्टरनेरिया पोराय
लक्षणे:
- या प्रकारामध्ये सुरुवातीला लसणाच्या रोपावर लहान, खोलगट असे पांढरे चट्टे पडतात व ही सुरुवात प्रथम शेंड्याकडून होते व खालच्या भागाकडे सरकत जाते.
- या चट्ट्याचा मधील भाग जांभळट लालसर रंगाचा होतो आणि कडा पिवळसर दिसायला लागतात.
- हवामान जर दमट असेल तर या प्रकारचा करपा मोठ्या प्रमाणावर वाढतो व चट्ट्याच्या ठिकाणी तपकीरी किंवा काळपट बुरशीची वाढ व्हायला लागते. त्यामुळे रोप शेंड्याकडून जळु लागते.
- अगदी सुरुवातीला जर हा रोग आला तर पिकाची वाढ होत नाही.
- जेव्हा या रोगाचा बियाण्यावर परिणाम होतो तेव्हा बियाणे विकसित होत नाही.
- जेव्हा लसूण पोसत असते तेव्हा हा रोग आला तर बुरशीचा प्रादुर्भाव थेट लसूणापर्यंत पसरतो व त्यामुळे लसूण सडायला लागते व अशी लसूण टिकत नाही.
काळा, तपकिरी व जांभळा करपा नियंत्रणाचे उपाय (प्रतिलिटर पाणी) : (खालील बुरशीनाशकांची फवारणी करावी)
- मॅन्कोझेब 75% डब्ल्यूजी (देहात:DEM-45) 600 ग्रॅम किंवा
- कार्बेन्डाझिम 50% डब्ल्यू पी (इफको-यामाटो) 200 ग्रॅम किंवा
- हेक्झाकोनॅझोल 5% इसी (टाटारॅलिस-कॉन्टाफ) 200 मिलि किंवा
- क्लोरोथॅलोनील 75% WP (सिजेंटा-कवच) 500 ग्रॅम किंवा
- पाइराक्लोस्ट्रोबिन 5% + मेतिराम 55% (पीआय इंडस्ट्रीज-क्लच) (संयुक्त बुरशीनाशक) 200 ग्रॅमची प्रति 200 लीटर पाणी या प्रमाणात 10 ते 15 दिवसांच्या अंतराने आलटून-पालटून फवारणी करावी.
- पिकांची फेरपालट करावी.
मर रोग:
- मर हा रोग गरमी मध्ये (उष्ण वातावरणात) अथवा हवेत पाण्याचे प्रमाण (आद्रता) जास्त असल्यास वाढतो.
- खरीप हंगामातील हवामान या रोगास पोषक आहे.
- मर रोग लागल्यास लसणाची पाने पिवळी पडतात, पिकाची मुळे सडतात.
- लसूण पिकाची पाने पिवळी पडल्यामुळे व मुळे सडल्यामुळे पीक मरते म्हणूनच या रोगाला मर रोग म्हणतात.
नियंत्रणाचे उपाय (Remedy):
- मर रोग होऊ नये म्हणून शास्त्रशुद्ध पद्धतीने एकात्मिक नियोजन करावे.
- जस की लागवड करतानाच पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी.
- पिकांची फेरपालट करणे अत्यंत आवश्यक असते. प्रत्येक वर्षी पीक आलटून पालटून घ्यावे.
- शेतात स्वछता ठेवावी.
- प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बेणे 0.1% बाविस्टीन (क्रिस्टल)च्या द्रावणात 2 ग्रॅम प्रति किलो नुसार बीज प्रक्रिया करावी.
- मर दिसताच कार्बेन्डाजिम 50% डब्ल्यूपी (क्रिस्टल-बाविस्टिन) ४०० ग्रॅमची एकरी पिका भोवती आळवणी, फवारणी करावी किंवा सिंचना वाटे सोडावे.
केवडा (Downy Mildew):
- केवडा हा एक बुरशीजन्य रोग आहे ज्यामुळे पानांवर पिवळसर बुरशीची वाढ होते व पाने कोमेजतात.
- केवडा रोगाचा शिरकाव हिरव्या भागावरील त्वचारंध्रा किंवा जखमेतून होत असतो.
- हा रोग पावसाच्या मदतीने निरोगी भागावर पसरून रोगाचा प्रसार करतो.
- भौतिक गुणधर्म हरवलेल्या जमिनीमध्ये तसेच आद्रतायुक्त हवामानात डाऊनी या रोगाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात होतो.
- या रोगामुळे पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान होते.
- या रोगाला दमट वातावरण अनकूल असते.
- या रोगामुळे ग्रस्त भाग निकामी होतो या रोगाला पोषक हवामान असल्यास रोगाचे नियंत्रण करणे अवघड होते.
- या रोगाची लक्षणे पिकाच्या सर्व हिरव्या भागांवर आढळतात.
- हिरव्या पानांवर सुरवातीस लहान तेलकट डाग पडतात.
- पानाच्या खालील भागावर ठिपका असलेल्या ठिकाणी बुरशीची वाढ दिसते.
नियंत्रणाचे उपाय (Remedy):
- मॅन्कोझेब 75% डब्ल्यूपी (देहात DEM-45) 400 ग्रॅम/ 200 लीटर किंवा
- रोगाचा प्रादुर्भाव दिसताच, मेटॅलॅक्सिल एम 4.0 % + मॅन्कोझेब 64 % डब्ल्यू/डब्ल्यू (सिजेंटा-रिडोमिल गोल्ड) 400 ग्रॅम/ 200 लिटर पाण्यातून फवारावे किंवा
- सायमोक्सॅनिल 8% + मॅन्कोझेब 64% डबल्यु पी (ड्युपॉन्ट-करझेट एम 8) 600 ग्रॅमची/ 200 लीटर पाण्यातून एकरी किंवा
- प्रोपीनेब 70% डब्ल्यूपी (बायर-अँट्राकोल) 600 ग्रॅमची/ 200 लीटर पाण्यातून एकरी फवारणी करावी.
फवारणी करताना घ्यावयाची काळजी:
- फवारणीसाठी गढूळ पाणी वापरू नये. स्वच्छ पाणीच वापरावे.
- फवारणी द्रावण प्लास्टिक बकेटमध्ये करावे.
- शक्य झाल्यास फवारणीच्या वेळेस आपण स्वतः शेतात हजर राहावे.
- फवारणीच्या दिवशी ढगाळ वातावरण असल्यास शक्यतोवर फवारणी करू नये व केल्यास बेस्ट स्टीकरचा वापर अवश्य करावा. तरीही ताबडतोब पाऊस पडल्यास फवारणीचा फायदा होत नाही.
- औषध तयार करताना प्रथम थोड्या पाण्यात घेऊन नंतर जास्त पाण्यात मिसळावे व व्यवस्थित ढवळून घ्यावे.
- फवारणी शक्यतोवर सकाळी व दुपारी 4 नंतर करावी. जास्त उन्हामध्ये कृषी रसायनांचे विघटन होते व पाहिजे तसे परिणाम दिसत नाहीत.
- तणनाशकांचा पंप फवारणीसाठी शक्यतोवर वापरू नाही.
- एकाच औषधाचा किंवा एकाच गटातील औषधांचा सतत वापर करू नये. त्यामुळे किडींमध्ये प्रतिकारशक्ती वाढते.
- कीटकनाशके, बुरशीनाशके, संजीवके, एकत्र फवारताना त्यांची सुसंगतता पडताळून पाहावी. द्रावण घट्ट झाल्यास, फाटल्यास किंवा न विरघळल्यास फवारू नये.
- फवारणीसाठी तयार करून ठेवलेल्या द्रावणाचा ताबडतोब वापर करावा, ते जास्त काळ ठेवू नये.
- फवारणी सर्व झाडावर खालीवर पानांच्या मागे-पुढे एकसमान होईल याची काळजी घ्यावी.
तुम्ही तुमच्या लसूण पिकातील प्रमुख रोगांचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी डॉक्टर” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. लसूण लागवडीस योग्य हवामान कोणते?
लसूण लागवडीस समशितोष्ण हवामान उपयुक्त असते.
2. लसूण लागवडीस योग्य जमीन कोणती?
मध्यम खोलीच्या भरपूर सेंद्रीय खते घातलेल्या रेती मिश्रित कसदार तणविरहित जमिनीत लसूण पीक चांगल्याप्रकारे घेता येते.
3. लसूण पिकात आढळून येणारे प्रमुख रोग कोणते?
लसूण पिकात काळा करपा, तपकिरी करपा, जांभळा करपा, मर व केवडा हे रोग आढळून येतात.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ