तूर पिकातील मर रोग : लक्षणे आणि उपाय (Management of Wilt diseases in Pigeon pea (Tur) crop)

नमस्कार शेतकरी बंधूंनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
तूर हे पीक महाराष्ट्रात विस्तृत प्रमाणात घेण्यात येते. खरीप हंगामामध्ये तुर हे अतिशय महत्वाचे पीक आहे. मध्यम ते भारी जमिनीत या पिकाची वाढ होत असून महाराष्ट्रात लागवडी खालील जातींचा कालावधी 110 ते 200 दिवसापर्यंतचा आहे. साधारणतः 6.5 ते 7.5 सामु असलेली जमीन या पिकास योग्य असते. याच तूर पिकाच्या उत्पन्नात घट आणणाऱ्या अनेक कारणांपैकी तुरीवर होणारा मर रोगाचा प्रादुर्भाव हे मुख्य कारण आहे. चला तर मग आता जाणून घेऊया, या मर रोगाच्या प्रादुर्भावाची लक्षणे आणि नियंत्रणाविषयी.
मर रोगाविषयी:
- मर रोग जमिनीत वास्तव्य करणाऱ्या फ्युजारियम उडम या बुरशीमुळे होतो.
- जमिनीचे तापमान 25 ते 28 अंश सेल्सिअस व ओलावा 20 ते 25 टक्के असल्यास मर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो.
- तूर पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव रोपावस्थेपासून ते फुले व शेंगा येईपर्यंत होतो.
- शेंगा परिपक्व होण्याच्या कालावधीत प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात मोठी घट येते.
- मागील वर्षीच्या पीक अवशेषांमध्ये बुरशी सुप्तावस्थेत राहून पुढील वर्षी तुरीमध्ये रोग उद्भवू शकतो.
- या बुरशीच्या प्रादुर्भावामुळे पिकास पाणी दिले तरी वर पानांपर्यंत पाण्याचे वहन होत नाही.
मर रोगाची तूर पिकावरील लक्षणे:
- पानाच्या शिरा पिवळ्या होतात.
- पाने पिवळी पडतात.
- झाडाचे शेंडे मलूल होतात व कोमेजतात.
- झाड हिरव्या स्थितीत वाळते.
- जमिनीलगतचा खोडाचा भाग काळ्या रंगाचा बनतो.
- मूळ उभे चिरून पाहिले असता मुळाचा मध्य भाग काळा दिसतो. यात बुरशीची वाढ झालेली दिसते.
- कधी कधी खोडावर पांढरी बुरशीसुद्धा आढळते.
- वाळलेल्या झाडाची पाने गळत नाही. तसेच रोगाची तीव्रता पीक फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत जास्त असते. झाड मरते.
तूर पिकात मर रोगाचे व्यवस्थापन:
- मध्यम व उशिरा परिपक्व होणाऱ्या वाणांमध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव जास्त आढळून येतो.
- सलग तुरीचे पीक घेण्यापेक्षा ज्वारीचे आंतरपीक घेतल्यास मर रोगाचा प्रादुर्भाव कमी असतो.
- पाणी साचणाऱ्या व पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीत तुरीचे पीक घेऊ नये.
- ज्या शेतामध्ये पूर्वी मर रोगाचा प्रादुर्भाव झालेला असेल, अशा शेतात तूर पीक पुढील किमान चार ते पाच वर्षे घेऊ नये. या क्षेत्रात तुरीऐवजी तृणधान्य पिके घ्यावीत.
- शेतामध्ये मर रोगाची रोगट झाडे दिसताच त्वरित उपटून टाकावीत.
- मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास पिकांची फेरपालट करणे अत्यंत आवश्यक असते. प्रत्येक वर्षी पीक आलटून पालटून घ्यावे.
- शेतात स्वछता ठेवावी.
- मर रोगग्रस्त शेतात 2 किलो ट्रायकोडर्मा चांगल्या कुजलेल्या 200 किलो शेणखतात मिसळून पिकात द्यावा.
- प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बेणे 0.1% बाविस्टीन (क्रिस्टल)च्या द्रावणात 2 ग्रॅम प्रति किलो नुसार बीज प्रक्रिया करावी.
- तूर पिकात मर दिसताच 300 लिटर पाण्यात मिसळून FOSETYL AL 80 % WP (बायर-ॲलिट) 200 ग्रॅम किंवा Azoxystrobin 23% Sc (सिजेंटा-ॲमिस्टार) 200 मिलीची प्रति एकर ड्रेंचिंग करावी.
फवारणी करताना घ्यावयाची काळजी:
- फवारणीसाठी गढूळ पाणी वापरू नये. स्वच्छ पाणीच वापरावे.
- फवारणी द्रावण प्लास्टिक बकेटमध्ये करावे.
- शक्य झाल्यास फवारणीच्या वेळेस आपण स्वतः शेतात हजर राहावे.
- फवारणीच्या दिवशी ढगाळ वातावरण असल्यास शक्यतोवर फवारणी करू नये व केल्यास बेस्ट स्टीकरचा वापर अवश्य करावा. तरीही ताबडतोब पाऊस पडल्यास फवारणीचा फायदा होत नाही.
- औषध तयार करताना प्रथम थोड्या पाण्यात घेऊन नंतर जास्त पाण्यात मिसळावे व व्यवस्थित ढवळून घ्यावे.
- फवारणी शक्यतोवर सकाळी व दुपारी 4 नंतर करावी. जास्त उन्हामध्ये कृषी रसायनांचे विघटन होते व पाहिजे तसे परिणाम दिसत नाहीत.
- तणनाशकांचा पंप फवारणीसाठी शक्यतोवर वापरू नाही.
- एकाच औषधाचा किंवा एकाच गटातील औषधांचा सतत वापर करू नये. त्यामुळे किडींमध्ये प्रतिकारशक्ती वाढते.
- कीटकनाशके, बुरशीनाशके, संजीवके, एकत्र फवारताना त्यांची सुसंगतता पडताळून पाहावी. द्रावण घट्ट झाल्यास, फाटल्यास किंवा न विरघळल्यास फवारू नये.
- फवारणीसाठी तयार करून ठेवलेल्या द्रावणाचा ताबडतोब वापर करावा, ते जास्त काळ ठेवू नये.
- फवारणी सर्व झाडावर खालीवर पानांच्या मागे-पुढे एकसमान होईल याची काळजी घ्यावी.
तुम्ही तुमच्या तूर पिकातील मर रोगाचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी डॉक्टर” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. तूर पिकासाठी योग्य जमीन कोणती?
तूर पिकासाठी मध्यम ते भारी जमीन योग्य मानली जाते.
2. मर रोग कोणत्या बुरशीमुळे होतो?
मर रोग जमिनीत वास्तव्य करणाऱ्या फ्युजारियम उडम या बुरशीमुळे होतो.
3. तूर पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव कधी दिसून येतो?
तूर पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव रोपावस्थेपासून ते फुले व शेंगा येईपर्यंत होतो तसेच शेंगा परिपक्व होण्याच्या कालावधीत प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात मोठी घट येते.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
