पोस्ट विवरण
सुने
संतरा
मौसम्बी
बागवानी
कृषि ज्ञान
बागायती पिके
DeHaat Channel
12 Feb
Follow

संत्री, मोसंबी आंबिया बहारातील नवती व्यवस्थापन (Navati Management in Orange and Mosambi Ambia Bahar)

नमस्कार शेतकरी बंधूंनो,

संत्री आणि मोसंबी ही फळे भारतातच नव्हे तर जगात प्रसिद्ध आहे. उत्कृष्ट स्वाद, चव व आकर्षक नारिंगी आणि पिवळ्या रंगांसह संत्री आणि मोसंबी ही पोषक, उत्साहवर्धक, स्वादिष्ट व स्वास्थवर्धक फळे असल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने देखील महत्वाची आहेत. निसर्गतः संत्री आणि मोसंबी फळझाडास वर्षातून तीन वेळा बहार येतो. संत्रा व मोसंबी पिकातून आर्थिक उत्पादन मिळविण्यासाठी आंबिया बहाराची शास्त्रीय दृष्टया निगा राखणे अत्यंत जरुरी असते. चला तर मग आजच्या लेखात जाणून घेऊया बहार किती व कोणते? आंबिया बहार व नवती म्हणजे काय? आणि बहाराच्या संपूर्ण व्यवस्थापनाविषयीची माहिती.

बहार धरणे म्हणजे काय व बहाराचे प्रकार? (What is Bahar treatment in Orange and Mosambi?)

  • बहार धरणे म्हणजे झाडांना पाण्याचा ताण देऊन विश्रांती देणे.
  • निसर्गतः संत्रा-मोसंबी फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो.
  • त्यापैकी (पावसाळ्यात) जून-जुलै महिन्यांमध्ये येणार्‍या बहारास मृग बहार
  • ऑक्टोबर महिन्यांमध्ये (हस्त नक्षत्रात) येणार्‍या बहारास हस्त बहार
  • तर जानेवारी-फेब्रुवारीमध्ये म्हणजे (थंडी संपण्याच्या वेळी) येणार्‍या बहरास आंबिया बहार म्हणतात.

नवती म्हणजे काय? (What is Navati?)

  • नवी पाने फुटण्याची (नवीन पालवीची) अवस्था म्हणजेच नवती.
  • लिंबूवर्गीय फळे झाडांना बहर येण्याकरिता झाडाची वाढ करणारे अन्नद्रव्य वाढीकरता खर्च न होता अन्नद्रव्यांचा संचय होणे जरुरी असते.
  • अन्नद्रव्यांचा संचय झाडांच्या फांद्यांमध्ये प्रमाणबद्ध झाल्यावर पोषक हवामान मिळताच, बहराची फुले नवती सोबत दिसू लागतात.
  • जानेवारी - फेब्रुवारी, जुलै - ऑगस्ट व ऑक्टोंबर हे नवती फुटण्याचे तीन काळ आणि साध्यचा काळ हा आंबिया बहराचा आहे तर चला त्याबद्दलची थोडीशी माहिती बघूया.

आंबिया बहार: आंबिया बहार हा साधरणतः फेब्रुवारी महिन्यात फुटतो. पण तो फुटण्याची क्रिया मागील सप्टेंबर, ऑक्टोंबर महिन्यातच सुरू झालेली असते. आंबिया बहाराचा अनुक्रम खालीलप्रमाणे (Sequence of Ambia Bahar is as follows):

  1. संत्र्याला सप्टेंबर महिन्यात नवती फुटते. नवती पहिले 1-2 महिने जुन्या पानांतील व फांद्यातील अन्नद्रव्यांवर जगते.
  2. नवतीची पानं मोठी झाल्यावर ती व जुनी पानं मिळून सूर्यप्रकाश, पाणी व कर्ब वायू यांच्यापासून अन्नद्रव्य तयार करतात. हे अन्नद्रव्य साखरेच्या स्वरुपात असते.
  3. यातील बरीचशी साखर झाडाच्या निरनिराळया जैवीक क्रियेत खर्च होते. व काही साखर झाडात शिल्लक राहते. जेवढे हे साखर शिल्लक राहण्याचे प्रमाण जास्त तेवढी बार फुटण्याची शक्यता जास्त.
  4. साखर तयार होण्याच्या क्रियेला फोटोसिन्थेसीस म्हणतात. फोटोसिन्थेसीस जेवढे जास्त तेवढी साखर तयार होण्याची क्रिया जलद होते. साखरेला फोटोसिन्थेट असे म्हणतात.
  5. साखरेचा उपयोग करून नवती पक्की होते. म्हणजेच शेंड्याचा पोपटी हिरवा रंग जाऊन फांद्या फिक्कट हिरव्या बनतात, त्यावर पांढऱ्या उभ्या रेषा दिसतात. व त्या गोल होतात. अपक्व फांद्या त्रिकोणी, चापट व हिरव्या राहतात. त्रिकोणी व चापट फांद्यांवर बार फुटत नाही.
  6. नवतीमधे मोठया प्रमाणावर ऑक्झीन्स तयार होतात. नॉथलीन अ‍ॅसीड (एन ए ए) सदृष हे ऑक्झीन असते या आक्झीन्समुळे फुलं तयार होण्याच्या क्रियेत बाधा निर्माण होते.
  7. झाडाला यावेळी भरपूर नायट्रोजन मिळाले तर ऑक्झीन्सचे प्रमाण वाढते व ऑक्झीनमुळे शेंडयाची अविरत वाढ होत राहते. त्यामुळे बार येण्यात बाधा निर्माण होते.
  8. नवीन पानात व मुळात ऑक्झीन्स व जिबरेलीनस असतात. जिबरेलीनसमुळे पानात तयार झालेल्या साखरेचे विघटन होते व साखर जमा होत नाही. व बार फुटण्यास बाधा निर्माण होते.
  9. नोव्हेंबरचा दुसऱ्या पंधरवड्यापासून पूढे डिसेंबर व जानेवारी महिन्यात थंडी पडते व थंडीमुळे झाडामधे फुलं तयार करणारे हार्मोन - ॲबसिसीक अ‍ॅसीड - तयार होते. या हार्मोनमुळे झाडाला बार फुटण्याकरता मदत होते. पाण्याचा ताण बसला की झाडामधे ॲबसिसीक अ‍ॅसीड तयार होते.
  10. फुलं आणणारे हार्मोन झाडात एकदा तयार झाले की ते नष्ट होत नाही व फुलं ही लागतातच. फूट सुरु झाल्यानंतर परत थंडी पडली तर कळया सुप्तावस्थेत जातात. पण परत योग्य उष्णतामान झाले की कळया बाहेर येतात.

ताण म्हणजे काय व कधी द्यावा?

  • झाडांची सतत होणारी वाढ थांबविण्याकरिता संत्रा व मोसंबी झाडाला पाण्याचा पुरवठा बंद करणे म्हणजे झाडांना ताण देणे.
  • बहार धरण्याकरिता जमिनीच्या मगदुराप्रमाणे झाडाचे वय व अवस्था पाहून ताण द्यावा.
  • हलक्या जमिनीत 35 ते 45 दिवस, भारी जमिनीत 55 ते 65 दिवस ताण द्यावा.
  • ताणाच्या कालावधीत पाऊस पडल्यास सायकोसेल 1000 पी पी एम (1000 मिली ग्रॅम प्रति लिटर पाणी)ची फवारणी करावी.

संत्री-मोसंबी बागेतील आंबिया बहार व्यवस्थापन (Ambia Bahar Management in Orange and Mosambi):

  • संत्री-मोसंबीची झाडे निसर्गतः थंडीच्या आणि उन्हाळ्याच्या दिवसात कमी जास्त तापमानामुळे दोनदा विश्रांती घेतात.
  • वाढ थांबल्यामुळे अन्नद्रव्यांचा संचय झाडाच्या फांद्यांमध्ये होतो.
  • त्यामुळे या विश्रांतीच्या काळात जास्तीचा साखरेचा संचय झाडाच्या 6 ते 9 महिन्यांच्या फांद्यांमध्ये होतो.
  • व नवीन वाढीसाठी खर्च होणारा साखरेचा भाग शिल्लक राहून फांद्यांमध्ये त्याचा जास्तीचा संचय होऊन हवामान अनुकूल झाल्यावर झाडावर फुले येण्यास याचा उपयोग होतो.
  • या बहारामध्ये संत्रा व मोसंबी झाडाची वाढ तापमान कमी झाल्यामुळे कडाक्याच्या थंडीत थांबते.
  • डिसेंबरचा दुसरा आठवडा ते जानेवारीचा दुसरा आठवडा या एका महिन्याच्या कालावधीत रात्रीचे किमान तापमान साधारणतः दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी असते.
  • परिणामी झाडांना नैसर्गिक ताण बसतो. यामुळे संत्रा मोसंबीच्या आंबिया बहराला नैसर्गिक बहार असे म्हणतात.

आंबिया बहाराकरिता संत्री व मोसंबी बागेला ताण देणे:

  • काळ्या जमिनीत झाडे ताणावर सोडताच झाडाच्या मुळ्या पाण्याच्या शोधात खोलवर जातात.
  • काळी जमीन ही उत्तम ओलावा टिकवून ठेवणारी असल्यामुळे झाडांना ओलावा मिळत राहतो. त्यामुळे झाडाला ताण बसत नाही.
  • संत्री व मोसंबी बागेला पाण्याचा ताण दिल्यामुळे झाडांची वाढ थांबून झाडे विश्रांती घेतात आणि त्यामुळे झाडाच्या फांद्यात, पानात अन्नद्रव्यांचा संचय होतो. आंबिया बहार घेण्याकरिता डिसेंबर महिन्याचा दुसरा आठवडा ते जानेवारीचा दुसरा आठवडा या कालावधीत संत्री व मोसंबी बागेचे ओलित बंद करून झाडांना ताणावर सोडतात.
  • पाच डिसेंबरच्या आसपास झाडाच्या ओळींमधून ट्रॅक्टरच्या साह्याने नांगरून झाडाच्या मुळ्या उघड्या कराव्यात. त्यामुळे टोकावरचे तंतूमुळे तुटल्याने झाडाला ताण बसतो.
  • तसेच ताणाच्या कालावधीत पाऊस पडल्यास 2 मिली क्लोरमेक्वाट क्लोडराइड प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे. हे कायिक वाढ रोखणारे संजीवक आहे.
  • आंबिया बहाराच्या ताणाचा कालावधी जमिनीचा पोत, झाडाचे वय आणि जमिनीमध्ये उपलब्ध असलेला ओलावा यावर अवलंबून असतो.
  • आंबिया बहारासाठी हलक्या जमिनीत 35 ते 45 दिवस, मध्यम जमिनीत 45 ते 60 दिवस आणि भारी जमिनीत 55 ते 75 दिवस ताण द्यावा.

बागेला ताण बसला आहे हे कसे ओळखावे?

  • ताण सुरू करण्यापूर्वी झाडावरील पूर्वीची फळे काढावीत.
  • फळे पूर्ण काढून झाल्यानंतर बागेला पाणी देणे बंद करावे.
  • ताण सुरु केल्यानंतर पानांचा मूळचा रंग कमी होऊन ती फिक्कट व नंतर पिवळी पडतात.
  • असे होत असताना पाने गळून पडेपर्यंत अन्न तयार करण्याची प्रक्रिया सुरूच ठेवतात.
  • साधारणपणे 25 ते 35 टक्के पानगळ झाल्यास झाडाला ताण बसला असे समजावे. अशा प्रकारे झाडांना ताण दिल्यास व नंतर ताण तोडल्यास एकाच वेळी फुलोरा येतो आणि ते व्यापारी दृष्ट्या फायदेशीर ठरते.

आंबिया बहारासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन (Fertilizer management in Ambia bahar):

  • आंबिया बहारात डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून झाडे ताणावर सोडावी.
  • झाडे ताणावर सोडल्यानंतर लगेच प्रत्येक झाडाला 40 ते 50 किलो शेणखत टाकून, बागेची आडवी उभी नांगरट व वखरणी करावी.
  • तसेच प्रत्येक झाडाला आळी बांधून, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा झाडाचा ताण तोडताना हलक्या ओलीता अगोदर प्रत्येक झाडाला 450 ग्रॅम नत्र, 300 ग्राम स्फुरद, 300 ग्रॅम पालाश प्रति झाड द्यावे.
  • त्यानंतर पाच ते सात दिवसांनी दुसरे पाणी द्यावे. तिसऱ्या पाळीला भरपूर पाणी द्यावे.
  • ताण सोडल्यानंतर 20 ते 25 दिवसांनी फुले येतात. त्यानंतर उरलेल्या नत्राचा (अर्धा) हप्ता एक ते दीड महिन्याने किंवा फळे वाटाण्याच्या आकाराची झाल्यावर द्यावा.
  • हलक्या जमिनीत नत्राची मात्रा तीन ते चार हप्त्यात विभागून दिल्यास जास्त फायदेशीर ठरते.

ओलित व्यवस्थापन (Water Management in Ambia bahar):

  • आंबिया बहाराची फळे उन्हाळ्यात झाडावर पोसली जातात. त्यामुळे पाण्याचा साठा उन्हाळ्यात उपलब्ध असणे जरूरी आहे.
  • जमिनीतील ओलावा कमी झाल्यास फळसड होते व फळांची आवश्यक प्रत खालावते. म्हणून आंबिया बहार घेतांना ओलीताकडे कटाक्षाने लक्ष देणे जरूरी आहे.
  • ओलीतासाठी ठिबक पद्धतीचा अवलंब केल्यास पाण्याची बचत होते.
  • जमिनिच्या पोताप्रमाणे पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

संत्री व मोसंबी झाडांचा वाफा गवताने आच्छादित करणे:

वाफ्यातील ओलावा टिकविण्यासाठी 6 से.मी. जाडीचा गवताचा थर देऊन आच्छादित करावा. त्यामुळे ओलावा टिकतोच पण फळांची गळसुद्धा कमी होते आणि जमिनीतील जिवाणू सक्रिय होऊन अन्नद्रव्य मुळांना सहज उपलब्ध होतात.

बहारात बागेची निगा कशी राखावी:

  • बहार आल्यानंतर सर्वच फुलांचे फळात रूपांतर होत नाही. बहारामध्ये बरीच फुले नर फुले असतात. त्यामुळे ही नर फुले गळून पडतात. त्यामध्ये फलन क्रिया होत नाही.
  • सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता, संजीवकांचा अभाव, हवामानाचा असमतोलपणा आणि किडींचा उपद्रव यामुळे फळांची गळ होते.
  • सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढण्यासाठी झिंक सल्फेट, कॉपर सल्फेट, मॅगनिज सल्फेट, फेरस सल्फेट आणि बोरिक ऍसिड यांची 0.2 ते 0.5% तीव्रतेची फवारणी करावी.
  • संजीवकांचा समतोल साधण्यासाठी 10 पीपीएम एनएएची मार्च महिन्यात फवारणी करावी. या बहारावर 'सिला' नावाच्या किडीचा प्रादुर्भाव असतो. यासाठी मॅलेथिऑन 10 मि.ली. 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

बहार धरतांना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे?

  • ताण देण्यापूर्वी झाडावरील पूर्वीची फळे, वाळलेल्या व रोगट फांद्या काढून टाकाव्यात.
  • किती काळ ताण द्यायचा हे जमिनीची प्रत व झाडाचे वय पाहून निश्चित करावे.
  • आवश्यकतेपेक्षा जास्त ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी.
  • झाडांची नियमित पाहणी करून कीड व रोग नियंत्रणाचे उपाय योजावेत.
  • सूत्रकृमीच्या नियंत्रणासाठी बागेभोवती झेंडूच्या रोपांची लागवड करावी.

तुम्ही तुमच्या संत्री, मोसंबी आंबिया बहारातील नवती व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. महाराष्ट्रात मोसंबी कुठे पिकते?

महाराष्ट्रामध्ये मोसंबीची लागवड प्रामुख्याने अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, जळगाव, औरंगाबाद जिल्ह्यात आढळते.

2. महाराष्ट्रात संत्री कुठे पिकते?

महाराष्ट्रामध्ये संत्री मुख्यतः नागपूर, अमरावती या भागात पिकवली जातात.

3. संत्री व मोसंबी बागेतील नवतीचा काळ?

संत्री व मोसंबी बागेला सप्टेंबर महिन्यात नवती फुटते. नवती पहिले १-२ महिने जुन्या पानांतील व फांद्यातील अन्नद्रव्यांवर जगते.

4. आंबिया बहार येण्याचा कालावधी?

आंबिया बहार हा साधरणतः फेब्रुवारी महिन्यात फुटतो. पण तो फुटण्याची क्रिया मागील सप्टेंबर, ऑक्टोंबर महिन्यातच सुरू झालेली असते.


38 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ