पोस्ट विवरण
सुने
पशु पालन
पशु ज्ञान
DeHaat Channel
7 Mar
Follow

जन्मानंतर नवजात वासराचा आहार कसा असावा? (Newborn Calf feed management)


जन्मानंतर नवजात वासराचा आहार कसा असावा? (Newborn Calf feed management)

नमस्कार पशुपालकांनो,

नवजात वासरे, कालवडींचे वैज्ञानिक पद्धतीने पालन पोषण केल्यास मृत्युदरावर नियंत्रण तर होतेच, शिवाय भविष्यात चांगली दुधाळ जनावरे तयार होतात. नवजात वासरांकडे लहानपणापासूनच लक्ष देणे गरजेचे असते. लहानपणापासून योग्य देखभाल आणि चांगले पोषण असेल तर मोठेपणी या कालवडींपासून चांगले उत्पादन मिळते. याकरिता वयोमानानुसार योग्य आहार व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. लहानपणापासूनच वासरांच्या आहाराचे व्यवस्थापन शास्त्रोक्त पद्धतीने केल्यास त्यांची निकोप वाढ होऊन ते उत्पादनक्षम होऊ शकतात. चला तर मग आजच्या लेखात जाणून घेऊया जन्मानंतर नवजात वासराचा आहार कसा असावा? याविषयीची माहिती.

नवजात वासरांच्या पोषणपद्धती (Methods of feeding newborn calves):

नवजात वासरांच्या पोषणाच्या मुख्यत्वे करून दोन पद्धती आहेत.

  1. पारंपरिक पद्धत : या पद्धतीमध्ये वासरांना आई सोबत ठेवले जाते. आवश्यकतेनुसार व मर्जीनुसार आईचे दूध पिण्यासाठी सोडले जाते. सर्वत्र मोठ्या प्रमाणावर ही पद्धत अवलंबली जाते, परंतु ही पद्धत अवैज्ञानिक आहे.
  2. वैज्ञानिक पद्धत : ही पद्धत आजकाल प्रगत डेअरी फार्मवर अवलंबली जाते. वासरु जन्मल्यानंतर आईपासून वेगळे केले जाते. त्यांना कृत्रिम साधनांद्वारे आईचे दूध निश्चित मात्रेत व निश्चित वेळेवर पाजतात. याशिवाय अन्य आहार देखील निश्चित मात्रेत दिला जातो.

आता जाऊन घेऊया वैज्ञानिक पद्धतीचे फायदे:

  • वासराला दिला जाणारा आहार योग्य मात्रेत स्वच्छ, गुणवत्तापूर्ण व संतुलित मिळतो.
  • गाई किंवा म्हशीचे दूध उत्पादन अचूकपणे मोजता येते.
  • वासरांकडून गाईच्या सडांना होणाऱ्या­ इजा टाळता येतात.
  • गाईकडून संक्रमित होणा­ऱ्या आजारांपासून वासरांचा बचाव करता येतो.
  • वासरांचा आकस्मितपणे मृत्यू जरी झाला तरी गाईच्या दूध उत्पादनावर विपरित परिणाम होत नाही.
  • या पद्धतीद्वारे पशुपोषणावर होणाऱ्या खर्चाचे अचूक आकलन होते. म्हणून अधिक नफ्यासाठी कालवडींना वैज्ञानिक पद्धतीने पोषण द्यावे.

चीक म्हणजे काय?

गाय व्यायल्यानंतर पहिले 2 ते 3 दिवस घट्ट व पोषक दूध देते त्याला चीक असे म्हणतात.

वासरांना चीक पाजण्याचे फायदे:

  • नवजात वासरांना जन्मानंतर दोन तासाच्या आत चीक पाजावा. त्यानंतर पुढील तीन ते चार दिवस त्यांच्या वजनाच्या दहा टक्के (साधारणत: 2 ते 2.5 किलो) चीक प्रतिदिवस द्यावा.
  • चीक गरम न करता ताजाच द्यावा.

चीक पाजल्याने कालवडी/वासरांना खालील लाभ होतात:

  • चिकामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते म्हणजेच साधारणपणे 17 टक्के एवढे असते. या प्रथिनांमध्ये मुख्यत्वेकरून ग्लोब्युलिन असते, ज्यामध्ये संक्रामक आजारापासून बचाव करणारे तत्त्व म्हणेजच अँटिबॉडीज असतात.
  • नवजात वासरांच्या शरीरात ही तत्त्व नसतात, त्यामुळे त्यांना चीक पाजलाच पाहिजे.
  • चीकामध्ये जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतात जी कालवडी/वासरांना वाढीसाठी आणि रोगप्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी आवश्यक असतात.
  • चीक पचण्यास अवघड असतो, परंतु नवजात वासरांचे पहिले शेण बाहेर पडण्यास चीक मदत करतो, त्यामुळे वासरांचे पोट साफ होते.
  • जर चीक पाजल्यानंतरही वासराने शेण टाकले नाही तर एक लिटर कोमट पाण्यात एक चमचा खाण्याचा सोडा टाकून एनिमा करावा.
  • चौथ्या दिवसापासून ते चौदाव्या दिवसापर्यंत वासरांना वजनाच्या दहा टक्के दूध पाजावे. दूध पाजण्यासाठी वापरात येणारे भांडे नेहमी गरम पाणी व साबणाने स्वच्छ करावे.

चीक पाजण्याचे प्रमाण:

  • वासरू जन्मल्यानंतर पहिल्या तासात दीड-दोन लिटर चीक पाजणे आवश्यक आहे व पुढील चार ते पाच तासांनी पुन्हा एक ते दीड लिटर चीक पाजावा. सुरवातीच्या 24 तासात वासराच्या वजनाच्या 10 टक्के चीक पाजावा.
  • चिकयुक्त दूध जास्त प्रमाणात पाजू नये, कारण त्यामुळे अपचन होऊन अतिसार होण्याचा धोका संभवतो.
  • बहुतांश शेतकऱ्यांचा असा समज आहे की, वार पडेपर्यंत चीक पाजणे चुकीचे आहे परंतु असे न करता वासरू उभे राहिले की लगेच चीक पाजावा.
  • पारंपारिक पद्धतीनुसार चीक गायीच्या कासेला पाजले जाते. वासरू जर सरळ कासेतून चीक पीत असेल तर गाईस पहिला माज येण्यास उशीर होतो म्हणून शक्यतोवर चीक निप्पल असलेल्या बाटलीने पाजावा.
  • बाटलीने चीक पाजत असताना चिकाचे तापमान शरीराइतके असले पाहिजे. त्यामुळे चीक काढल्यानंतर लगेच वासरांना पाजावा.

आहार व्यवस्थापन (Dietary Management):

  • चांगली वाढ आणि अधिक प्रतिकारशक्ती येण्यासाठी दूध आणि खुराक यांचा वासरांच्या आहारात समावेश अत्यंत गरजेचे असते.
  • वजन लवकर वाढण्यासाठी रवंथ प्रक्रिया लवकर सुरू होणे आवश्यक आहे.

दुधाचे फायदे (Benefits of Milk):

  • वासराची सुरवातीची वाढ चांगली होण्यासाठी योग्य प्रमाणात दूध पाजणे गरजेचे आहे. सुरवातीच्या दिवसात वासरामध्ये चारा किंवा इतर आहार पचवण्याची क्षमता नसते. सुरवातीच्या दिवसात वासराच्या पोटाची रचना ही खास दूध पचवण्यासाठी बनवलेली असते.
  • वासराच्या शारीरिक वाढीसाठी लागणारे सर्व घटक दुधामध्ये योग्य प्रमाणात असतात.
  • सुरवातीचे 21 दिवस वासराच्या वजनाच्या 10 टक्के दूध दिवसातून 2 ते 3 वेळा विभागून पाजले गेले पाहिजे.
  • वयाच्या दुसऱ्या महिन्यापासून दूध हळूहळू कमी करून 3 महिने होईपर्यंत बंद करावे आणि सुका चारा मुबलक प्रमाणात द्यावा.
  • पारंपारिक पद्धतीनुसार दूध गायीच्या कासेतून पाजले जाते. परंतु, दुग्धव्यवसायात असे करणे शक्य नसल्यामुळे अशा वेळेस दूध रबरी निप्पल असलेल्या बाटलीने पाजावे. कासेला दूध पाजल्यास नैसर्गिक भावना जागृत होऊन वासराच्या तोंडात भरपूर प्रमाणात लाळ तयार होते. दूध सरळ पोटाच्या चौथ्या कप्प्यात जाते. परंतु, या पद्धतीत वासराला दूध मोजून देता येत नाही व गाईला वासराची सवय लागते.
  • रबरी निप्पल असलेल्या बाटलीने दूध पाजल्यास दूध सरळ चौथ्या कप्प्यामध्ये जाते. वासराला नैसर्गिकरित्या दूध पिल्याची जाणीव होते. या पद्धतीत दूध मोजून पाजता येते, गाईला व वासराला एकमेकांची सवय होत नाही.
  • जमिनीवरून बादलीने किंवा टोपल्याने दूध पाजल्यास ते पोटाच्या पहिल्या कप्प्यात (रूमेन) मध्ये जाते व दुधाचे योग्य पचन होत नाही म्हणून दूध निप्पल असलेल्या बाटलीनेच तोंडा एवढ्या उंचीवरून पाजल्यास ते पोटाच्या चौथ्या कप्प्यामध्ये जाते,तेथे त्याचे योग्य पचन होते.

पाण्याचे नियोजन (Water management):

  • बरेचसे पशुपालक वासरांना पहिले 2 ते 3 महिने पाणी पाजत नाहीत. वासरांच्या वाढीसाठी आणि कोठी पोटातील किण्वन प्रक्रिया सुरळीत सुरू राहण्यासाठी पाचव्या दिवसापासून पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
  • पाणी व दूध हे वासराला वेगवेगळ्या भांड्यातूनच पाजावे जेणेकरून वासराला पाणी व दूध यामधील फरक वासराला कळेल, वासरू गरजेपेक्षा जास्त पाणी पिणार नाही.
  • दूध पाजण्याअगोदर एक तास पाणी देऊ नये. दूध पाजल्यानंतर पाणी दोन तासांनी द्यावे.
  • पाण्याचे तापमान हे वासराच्या शरीराच्या तापमानाएवढेच असावे. त्यासाठी हिवाळ्यात पाणी थोडे कोमट करून द्यावे. उन्हाळ्यात थंड पाणी द्यावे.
  • पाणी आणि पिण्याचे भांडे दोन्हीही स्वच्छ असावे, जेणेकरून घाण वासराच्या पोटात जाणार नाही व वासराला आजार होणार नाही.

मिल्क रिप्लेसर:

  • वासराला पिण्यासाठी दुधाला पर्याय म्हणून किंवा काही प्रमाणात दुधाची मात्रा कमी करून दुधाऐवजी दूध भुकटी आणि इतर अन्नघटक एकत्रित करून तयार केलेल्या कोरड्या व पावडर स्वरूपातील मिश्रणाला मिल्क रिप्लेसर असे म्हणतात.
  • मिल्क रिप्लेसर पाण्यात मिसळून वासरांना दिले जाते.
  • मिल्क रिप्लेसर दुधासारखेच पौष्टिक असते.
  • वासरांच्या पचनसंस्थेची भौतिक व शारीरिक वाढ चांगली होण्यासाठी मिल्क रिप्लेसर उत्तम असते.
  • मिल्क रिप्लेसर दुधाच्या किमतीपेक्षा स्वस्त असल्यामुळे दुधाची बाजारात विक्री करून पशुपालकास आर्थिक फायदा होतो.

सुका चारा:

  • वयाच्या दुसऱ्या आठवड्यापासून वासरांना सुका चारा दररोज देण्यास सुरवात करावी.
  • हळूहळू चाऱ्याचे प्रमाण वाढवावे.
  • सुक्या चाऱ्यात तंतुमय पदार्थ अधिक असल्याने पचनासाठी कोठीपोटातील स्नायूंची कार्यक्षमता वाढून रवंथ प्रक्रिया लवकर सुरू होण्यास मदत होते.
  • सुका चारा हा उच्च प्रतीचा, रंग व चव चांगली असलेला असावा. त्यात धूळ, काळेपणा किंवा बुरशी नसावी व लुसलुशीत काड्या असाव्यात.
  • वासरांना मेथीघास, बरसीम सारखा गवताचा सुका चारा वासरे आवडीने खातात.

हिरवा चारा:

  • वासरांना वयाच्या तिसऱ्या आठवड्यापासून थोडा हिरवा चारा देण्यास सुरवात करावी. वयानुसार हिरव्या चाऱ्याचे प्रमाण वाढवावे.
  • सहाव्या महिन्यात प्रती दिन 5 ते 10 किलो हिरवा चारा देता येईल.
  • चांगल्या प्रतीचा एकदल आणि द्विदल चारा द्यावा, जेणेकरून वासरांची वाढ जोमाने होईल.

आरोग्य व्यवस्थापन:

  • गोचीड निर्मूलन आणि थंडी व वाऱ्यापासून वासरांचा बचाव करावा.
  • यासोबतच पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार वासरांना लिव्हर टॉनिक, जीवनसत्त्व टॉनिक, जंतनाशक औषधे द्यावीत. तसेच गोठ्यात खनिज मिश्रणांच्या चाटण विटा वापराव्यात, जेणेकरून त्यांचे आरोग्य निरोगी राहील.
  • वासरांच्या वजनाची नियमित नोंद घ्यावी.

या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. अशा प्रकारे जन्मानंतर नवजात वासराच्या आहाराची योग्य काळजी घेतल्यास वासरे सशक्त राहतील व पशुपालकाच्या उत्पन्नात वाढ होईल. तुम्ही तुमच्या नवजात वासरांची काळजी कशी घेता? याविषयीची माहिती इतर पशुपालकांसह शेयर करा. या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, अशा अजून माहितीसाठी "पशु ज्ञान" चॅनेलला फॉलो करा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. चीक म्हणजे काय?

गाय व्यायल्यानंतर पहिले 2 ते 3 दिवस घट्ट व पोषक दूध देते त्याला चीक असे म्हणतात.

2. नवजात वासरांच्या पोषणपद्धती कोणत्या?

पारंपरिक पद्धत, वैज्ञानिक पद्धत या दोन नवजात वासरांच्या पोषणपद्धती आहेत.

3. वासरांना जन्मतः पाणी पाजावे का?

वासरांच्या वाढीसाठी आणि कोठी पोटातील किण्वन प्रक्रिया सुरळीत सुरू राहण्यासाठी वासरांना पाचव्या दिवसापासून पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

36 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ