पोस्ट विवरण
सुने
प्याज
कृषी ज्ञान
DeHaat Channel
24 May
Follow

कांदा प्रगत लागवड तंत्र (Onion Cultivation Techniques)


नमस्कार शेतकरी मित्रांनो,

कांदा हे व्यापारिक दृष्ट्या जगभरात मोठ्या प्रमाणावर लागवड केले जाणारे भाजीपाला पीक आहे. कांद्याची लागवड साधारणपणे रब्बी हंगामात मैदानी आणि मध्य डोंगरी भागात केली जाते परंतु अनेक भागात हे पीक खरीप हंगामातही घेतले जाते. भारतीय कांद्याची मागणी परदेशातही चांगली आहे, त्यामुळे ते एक महत्त्वाचे व्यावसायिक पीक आहे. कांदा पिकविणा-या राज्यात क्षेत्र व उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र अग्रस्थानी आहे. महाराष्ट्रामध्ये अंदाजे 1 लाख हेक्टरवर कांद्याची लागवड केली जाते. महाराष्ट्रामध्ये नाशिक, पुणे, सोलापूर, जळगांव, धुळे, अहमदनगर, सातारा हे जिल्हे हेक्टरी कांदा पिकविण्यासाठी प्रसिध्द आहेत. तसेच मराठवाडा, विदर्भ व कोकणात सुध्दा काही जिल्हयांमध्ये कांद्याची लागवड केली जाते. नाशिक जिल्हा हा महाराष्ट्रात नव्हे तर सबंध भारतात कांदा पिकविण्यात प्रसिध्द आहे. एकूण उत्पादनापैकी महाराट्रातील 37 टक्के तर भारतातील 10 टक्के कांद्याचे उत्पादन एकटया नाशिक जिल्हयात घेतले जाते. चला तर मग आजच्या भागात जाणून घेऊया कांदा लागवडीबाबतची माहिती.

जमीन (Soil for onion farming) :

  • पाण्याचा उत्तम निचरा होणारी हलकी ते मध्यम भारी जमीन निवडावी.
  • जमिनीच्या सामू 6.5 ते 7 च्या दरम्यान असावा.
  • हलक्या, मुरमाड जमिनीत सेंद्रिय खतांचा वापर केल्यास चांगले उत्पादन मिळते.
  • खरीप लागवडीसाठी भारी जमीन निवडू नये.
  • भारी चिकणमाती असलेल्या, पाण्याचा निचरा न होणाऱ्या तसेच चोपण किंवा खारवट जमिनीत रोपांची वाढ खुंटते, पीक चांगले पोसत नाहीत, अशा जमिनीत लागवड करू नये.

हवामान (Climate for onion farming) :

  • कांदा हिवाळी हंगामामध्ये घेतले जाणारे पीक असून महाराष्ट्रातील सौम्य हवामानात कांद्याची दोन ते तीन पिके घेतली जातात.
  • कांदा लागवडीपासून एक-दोन महिन्यांमध्ये हवामान थंड असणे गरजेचे आहे.
  • कांदा मोठा व्हायला लागला की, तापमानातील वाढ कांद्यासाठी उपयुक्त ठरते.

कांदा लागवड हंगाम (kanda lagwad hangam) :

कांद्याची लागवड खरीप हंगामात - जून ते ऑक्‍टोबर, रब्‍बी हंगामात - नोव्‍हेंबर ते फेब्रूवारी आणि उन्‍हाळी हंगामात - जानेवारी ते जून महिन्‍यात करतात.

पूर्वमशागत (Onion Land preparation) :

  • कांदा पिकाच्या लागवडीसाठी जमिनीची उभी-आडवी नांगरणी करून घ्यावी आणि कुळवाच्या पाळ्या देऊन जमिनीतील ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी.
  • त्याचप्रमाणे जमिनीमध्ये एकरी 10 ते 15 टन शेणखत मिसळावे.
  • शेणखत मिसळताना त्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश जिवाणू - 1 लिटर आणि ट्रायकोडर्मा 1 लिटर मिसळावे.

सुधारीत वाण (Onion best variety) :

खरीप : फुले समर्थ, बसवंत 780, अ‍ॅग्रीफाऊंड डार्क रेड

रांगडा : बसवंत 780, फुले समर्थ, एन-2-4-1

उन्हाळी : एन.-2-4-1, ॲग्रीफाऊंड लाईट रेड, अर्का निकेतन

बियाणे निवड :

  • खरिपाच्या जातीचे बी दोन खरीप हंगामाकरिता वापरता येते.
  • बियाणे साधारणपणे एप्रिल - मे महिन्यात तयार होते.
  • ते लगेच जून महिन्यात वापरले जाते.
  • काही कारणाने बी विकले गेले नाही तर पुढच्या वर्षी खरीप हंगामात वापरता येते.
  • रब्बीच्या जातीचे बियाणे फक्त एकाच रब्बी हंगमासाठी वापरता येते.
  • बियाणे एप्रिल - मे महिन्यात तयार झाल्यानंतर ते येणाऱ्या रब्बी हंगामासाठी वापरावे लागते.
  • पुढचा रब्बी हंगाम 18 महिन्यानंतर येतो.
  • बियाणे जर चांगले ठेवले नसेल तर ते उगवत नाही.

बियाणे (प्रति एकरी) (seeds) :

ठिबक किंवा तुषार सिंचनावर रोपवाटिका तयार केली तर एकरी 2 किलो बियाणे पुरते. नेहमीच्या पद्धतीमध्ये 3.5 किलो बी लागते.

कांदा नर्सरी व्यवस्थापन (Onion nursery management) :

  • एक एकर कांदा लागवड साठी 5 गुंठे जमीन रोपवाटिका करण्यासाठी लागते.
  • रोपवाटिकेसाठी जागा विहिरीजवळ असावी. म्हणजे वेळच्या वेळी पाणी देणे सोपे होते.
  • लव्हाळा, हरळी असणारी तसेच पाणी साचणारी सखल जमीन रोपवाटिकेसाठी निवडू नये.
  • रोपवाटिका नेहमी स्वच्छ सूर्यप्रकाश मिळेल अशा जागी करावी.
  • तणाची वाढ होण्याची शक्यता असल्यास किंवा शेणखतांमधून तण येण्याची शक्यता असल्यास बियाणे पेरण्यापूर्वी वाफे भिजवून घ्यावेत.
  • तणाचे बी उगवून आल्यानंतर खुरपणी करून बियाणे पेरावे.
  • रोपे गादी वाफ्यावर तयार करावीत.
  • गादीवाफ्यावर रोपांची वाढ एकसारखी होते.
  • मुळांच्या भोवती पाणी फार काळ साचून राहत नाही. त्यामुळे रोपे कुजत नाहीत. लागवडीच्या वेळी रोपे सहज उपटून काढता येतात. रोपांच्या गाठी जाड व लवकर तयार होतात.
  • गादी वाफे एक मीटर रुंद, तीन ते चार मीटर लांब करावेत. वाफ्याची उंची 15 सेंमी ठेवावी. 5 गुंठा नर्सरी साठी 5 बेड तयार करावेत.
  • दोन  बेडच्या मध्ये 60-70 सेमी अंतर ठेवावे.
  • गादीवाफे नेहमी उताराला आडवे करावेत.
  • वाफे तयार करताना प्रत्येक वाफ्यात दोन घमेली चांगले कुजलेले शेणखत आणि 50 ग्रॅम मिश्र खत मिसळावे, तसेच अर्धा ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति वर्गमीटर या प्रमाणात वाफ्यात चांगल्या कुजलेल्या शेणखता बरोबरीने मिसळावे.
  • खते आणि वाफ्यातील माती मिसळून त्यावरील दगड किंवा बारीक ढेकळे वेचून घ्यावीत. वाफा सपाट करावा.
  • रुंदीशी समांतर चार बोटे अंतरावर रेघा पाडाव्यात. त्यात बियाणे पातळ पेरून मातीने झाकावे.
  • नंतर झारीने पाणी द्यावे. पाणी जेमतेम वाफ्यावर फिरेल अशा पद्धतीने द्यावे.
  • बी पेरल्यानंतर जमिनीचा वरचा थर सात ते आठ दिवसापर्यंत ओला असणे आवश्यक आहे. त्यामुळे बियांची उगवण चांगली होते. त्यानंतर पाणी बेताने 7 ते 8 दिवसांच्या अंतराने द्यावे.
  • तण असल्यास खुरपणी करावी.
  • रोपांच्या ओळीमधील माती हलवून घ्यावी म्हणजे रोपांच्या मुळांभोवती हवा खेळती राहील.
  • पुनर्लागवडीच्या आगोदर पाणी कमी करावे. त्यामुळे रोपे काटक बनतात. मात्र रोपे उपटण्यापूर्वी 24 तास अगोदर पाणी द्यावे त्यामुळे रोप काढणे सोपे होते.
  • खरीप हंगामात 40 ते 50 दिवसात तर रब्बी हंगामात 50 ते 55 दिवसात रोप तयार होते.

बीज प्रक्रिया:

लागवडीपूर्वी बियाण्यास ट्रायकोडर्मा व्हीरीडे 5 मिली किंवा बाविस्टीन 2 ग्राम प्रति किलो बियाणे या प्रमाणे चोळावे.

पेरणी:

  • बियाणे 2-3 सेमी खोल खोचावे व मातीने झाकावे.
  • बियाणे पेरणीनंतर लगेच तणनाशक पेंडीमिथॅलीन 1.5 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी व लगेच पाणी द्यावे.
  • रोपं 6 ते 7 आठवड्यात काढायला तयार होतील.

पुनर्लागवडीसाठी रानबांधणी (Land preparation for onion transplanting) :

  • वाफ्याची लांबी-रुंदी जमिनीच्या उतारावर अवलंबून असते.
  • 1.5 ते 2 मीटर रुंद आणि 4 ते 6 मीटर लांबीचे सपाट वाफे तयार करावेत.
  • वाफ्याची लांबी जमिनीच्या उताराच्या आडव्या दिशेने असावी.
  • जमीन जास्त चढ - उताराची असल्यास 1.5 बाय 3 मीटर आकाराचे लहान वाफे तयार करावेत.
  • ठिबक व तुषार सिंचन या पद्धतीने पाणी देण्यासाठी रान बांधणी वेगळ्या प्रकारे करावी लागते.
  • 120 सें.मी. रुंद, 40 ते 61 मीटर लांब आणि 15 सें.मी. उंचीचे गादीवाफे ट्रॅक्‍टरला जोडता येणाऱ्या सरी यंत्राने तयार करावेत.

रोपांवर बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची प्रक्रिया (Onion seedling treatment) :

  • बाविस्टीन 1 ग्रॅम + कॉन्फिडोर 0.5 मिली प्रतिलिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे.
  • या द्रावणात पुनर्लागवडीपूर्वी रोपांची मुळे 15 मिनिटे बुडवावीत. यामुळे लागवडीनंतर 20 ते 25 दिवस किडींपासून संरक्षण होते.

पुनर्लागवड (Onion transplanting) :

  • खरीप हंगामात 10 सें.मी. बाय 15 सें.मी. आणि रब्बी हंगामात 10 सें.मी. बाय 10 सें.मी. किंवा 10 सें.मी. बाय 15 सें.मी. अंतरावर पुनर्लागवड करावी.
  • रोपे लागवड करताना ती अंगठ्याने दाबू नयेत, यामुळे माना वाकड्या होऊन वाढीस वेळ लागतो.
  • ठिबक किंवा तुषार सिंचनावर लागवड करताना संच रोप लागवडीअगोदर सुरू करावा.
  • सरासरी चार सें.मी. खोलीपर्यंत ओल राहील इतपत पाणी द्यावे. दुसऱ्या दिवशी वाफ्यावर लागवड करून त्यानंतर पाणी द्यावे.

रासायनिक खते (Onion fertilizer management) :

  • शिफारस केल्याप्रमाणे रासायनिक खत एकरी 40 किलो नत्र, 25 किलो स्फुरद व 25 किलो पालाश पैकी अर्धा नत्र व संपूर्ण स्फुरद व पालाश लागवडीपूर्वी वाफ्यात मातीमध्ये मिसळून द्यावे.
  • राहिलेले  नत्र 30 व 45 दिवसांनी एक खुरपणी करून द्यावे.
  • या खतांसोबतच मायक्रोनुट्रीएंट 10 किलो आणि सल्फर 8 किलो प्रति एकरी वापर करावा.
  • साठ दिवसांनंतर कांदा पिकास कोणतेही वर खत देऊ नये.

पाणी व्यवस्थापन (Onion water management) :

  • कांदा पिकाला नियमित पाणी देणे महत्‍वाचे असते.
  • खरीप हंगामात 10 ते 12 दिवसाच्‍या अंतराने तर उन्‍हाळी रब्‍बी हंगामात 6 ते 8 दिवसांनी जमिनीच्‍या मगदुराप्रमाणे पाणी द्यावे.
  • काढणीपूर्वी 3 आठवडयां अगोदर पाणी बंद करावे म्‍हणजे पानातील रस कांद्यामध्‍ये लवकर उतरतो आण माना पडून कांदा काढणीस तयार होतो.

रोग व कीटक:

करपा रोग, फुलकिडे आणि रसशोषक किडी

कापणी :

  • कांद्याचे शेल्फ लाइफ वाढवण्यासाठी काढणीपूर्वी 30 दिवसांपर्यंत कार्बेन्डाझिम 1000 पीपीएमवर 200 पीपीएमवर सायकोसेल फवारणी करा.
  • कापणी साधारणपणे झाडे खेचून केली जाते जेव्हा शेंडा खाली पडतो परंतु तरीही हिरवा असतो.
  • उष्ण दिवसात जेव्हा माती कडक असते तेव्हा बल्ब हाताने बाहेर काढले जातात.

अशा प्रकारे योग्य रित्या, आपल्या शेतातील मातीनुसार योग्य हवामानानुसार कांद्याची लागवड केल्यास भरपूर उत्पादन मिळू शकते. तुम्ही तुमच्या कांदा पिकाची लागवड कशी करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. कांदा लागवडीसाठी जमीन  कशी असावी?

कांदा लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी हलकी ते मध्यम भारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू 6.5 ते 7 च्या दरम्यान असावा.

2. कांदा पिकाची लागवड कधी करावी?

कांदा पिकाची लागवड खरीप हंगामात जून ते ऑक्‍टोबर, रब्‍बी हंगामात नोव्‍हेंबर ते फेब्रूवारी आणि उन्‍हाळी हंगामात जानेवारी ते जून महिन्‍यात करावी.

3. कांदा लागवडीसाठी किती बियाणे लागते?

कांदा लागवडीसाठी एकरी 2 किलो बियाणे पुरते. नेहमीच्या पद्धतीमध्ये 3.5 किलो बी लागते.

29 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ