डाळिंब - हस्त बहारातील खत व्यवस्थापन (Pomegranate - Fertilizer Management in Hast Bahar)
![](/_next/image?url=https%3A%2F%2Fdehaat-kheti-prod.s3.amazonaws.com%2Fdjango-summernote%2F2024-11-28%2Fe7e73639-6731-4754-b202-aaa8566c7bb7.webp&w=3840&q=75)
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
महाराष्ट्र राज्यात गेल्या दोन दशकांपासून डाळिंब हे एक महत्वाचे नगदी पीक बनले आहे. डाळिंब हे एक प्रमुख कोरडवाहू फळपिक असून हलक्या जमिनीत आणि कमी पाण्यावर घेता येणारे एक महत्वाचे पीक आहे. महाराष्ट्रात साधारणपणे सद्यपरिस्थितीत एक लाख वीस हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र डाळिंब फळपिकाखाली लागवडीस आले आहे. राज्यात सध्या सोलापूर, नाशिक, अहमदनगर, पुणे, सांगली, सातारा, धुळे, बुलढाणा, उस्मानाबाद आणि लातुर जिल्ह्यांमध्ये डाळिंबाची लागवड व्यापारी तत्वावर केली जाते. डाळिंबात प्रामुख्याने तीन बहार घेतले जातात मृग बहार, हस्त बहार आणि आंबे बहार. आजच्या लेखात आपण कमी खर्चात घेतला जाणारा बहार म्हणून ज्याची ओळख आहे अशा हस्त बहारातील व्यवस्थापनाविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.
डाळिंबामध्ये बहाराचे नियोजन करताना डाळिंब बागायतदारांनी पुढील बाबी विचारात घ्याव्यात:
- डाळिंबाचा पहिला बहार दोन वर्षांनंतरच धरावा.
- वर्षांतून फक्त एकच बहार घ्यावा.
- बहार घेतल्यानंतर बागेला 3 ते 4 महिने विश्रांती द्यावी.
हस्त बहार का महत्वाचा?
- हस्त बहारात भरपूर फुले येतात, फळांचा रंग आणि प्रत अतिशय चांगली असते.
- या बहारात कीड आणि रोगांचे प्रमाण अतिशय कमी असते.
- उत्पादन चांगले मिळते.
- संरक्षित पाणी असल्यास हस्त बहार धरणे फायद्याचे ठरते.
चला आता जाणून घेऊया, ताण आणि पानगळ याविषयी:
- डाळिंबाला एकाच वेळी फुले आणि फळे येण्यासाठी झाडांना विशिष्ट कालावधीसाठी विश्रांती, पाणी तोडणे, पानगळ करून छाटणी करणे या बाबी महत्त्वाच्या असतात.
- जमिनीच्या मगदुराप्रमाणे डाळिंबाच्या झाडांना किती दिवस ताण द्यायचा ते ठरवावे.
- बहार धरताना साधारणतः जमीन जर हलकी असेल तर बहार धरण्याअगोदर 30-45 दिवस पाणी तोडावे.
- तसेच मध्यम ते भारी जमिनीत 40-50 दिवस पाणी बंद करावे. झाडांना ताण दिल्यानंतर छाटणीच्या तीन आठवड्यांनी इथ्रेलची (बायर) फवारणी 1 - 2 मिली प्रति ली पानी प्रमाणात करून पानगळ करावी.
- डाळिंबाची 50 टक्क्यांपर्यंत जूनी पाने गळणे व शेंड्याची वाढ पूर्ण थांबणे हे झाडाला नैसर्गिक ताण देण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते. परंतु या अवस्थेच्या पूर्वी जर पानगळ केली तर फुलांऐवजी शेंडे निघतात व सेटिंग लांबते, यासाठी नैसर्गिक पानगळ झाल्यानंतरच इथ्रेलची फवारणी घ्यावी.
- नैसर्गिक पानगळीनुसार 1 ते 2.5 मिली प्रति लिटर इथ्रेल व 5 ग्रॅम प्रति लिटर 00:52:34 (देहात-MKP) घेऊन सायंकाळच्या वेळी फवारणी करावी.
- इथ्रेल ऐवजी इतर कोणत्याही रसायनाने पानगळ करू नये. इथ्रेल फवारणी नंतर कमीत कमी 80 टक्के पानगळ होणे आवश्यक असते, त्यानंतरच बागेला पाणी चालू करावे.
छाटणी:
- डाळिंबात छाटणी न केल्यास फळे टोकाला लागतात. त्यामुळे पानगळ केल्यानंतर डाळिंबाची हलकीशी छाटणी करावी.
- छाटणी करताना रोगट, तेलकट डाग रोगाच्या फांद्या काढून टाकाव्यात.
- भरपूर सूर्यप्रकाश, हवा खेळती राहील आणि फळे सावलीत राहतील अशा प्रकारे छाटणी करावी.
- छाटणी करताना झाडाचा वरचा समतोल बिघडणार नाही याची काळजी घेऊनच छाटणी करावी.
- छाटणी केल्यानंतर लगेच 1 टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.
अन्नद्रव्ये व्यवस्थापन:
- सर्वप्रथम जमिनीची आडवी उभी नांगरणी करून झाडालगतची जमीन चांगल्या प्रकारे चाळून घ्यावी.
- माती परीक्षण करून डाळिंब झाडाच्या वयानुसार रासायनिक खतांचा आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा.
- चुनखडीयुक्त जमिनीमध्ये कॅल्शिअमयुक्त खते म्हणजे जिप्सम, कॅल्शिअम क्लोराईड, कॅल्शिअम नायट्रेट, इत्यादी खते टाकू नयेत.
- रासायनिक खतांचा अतिरेक टाळावा. त्यामुळे डाळिंब रोगास जास्त बळी पडू शकतात तसेच जमिनीचे स्वस्थही बिघडते.
- डाळिंबाचा बहार धरताना प्रति झाड 20 किलो शेणखत, 2 किलो निंबोळी पेंड, 1 किलो गांडूळ खत, 25 ग्रॅम ट्रायकोडर्मा प्लस, 15 ग्रॅम पीएसबी आणि 15 ग्रॅम ऍझोटोबॅक्टर द्यावे.
- कळ्यांचे प्रमाण कमी असल्यास अन्नद्रव्यांचा साठा वाढविला पाहिजे त्यासाठी फ्लुसिलाझोल 12.5% + कार्बेन्डाझिम 25% एसई (कोरोमंडल इंटरनॅशनल-फेंटाक प्लस) 200 मिली प्रति 200 लीटर पाण्यातून एकरी डाळिंब पिकावर फवारावे.
- नवतीचे प्रमाण जास्त असल्यास मंजुरांच्या सहाय्याने आधी त्या कमी कराव्यात व नंतर 0:52:34 (देहात-MKP) 1000 ग्रॅम + कॅल्बोर 200 ग्रॅम प्रति 200 लीटर पाण्यातून एकरी डाळिंब पिकावर फवारावे.
- फुलगळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मुळी सुरू करणे गरजेच आहे त्यासाठी ह्युमिक अॅसिड 1 किलो या प्रमाणात ड्रिप वाटे सोडू शकता यानंतर 3 ते 4 दिवसांनी 0:52:34 (देहात-MKP) 3 किलो + कॅल्बोर 200 ग्रॅम एकत्र मिसळून ड्रिप वाटे बागेला सोडायचे. सोबतच डायमेथोएट 30% ईसी (गोदरेज अग्रोवेट-अनारिका) 200 मिली 200 लीटर पाण्यात मिसळून एकरी फवारल्यास फुलगळ रोखता येईल.
पाणी व्यवस्थापन:
- डाळिंब हे उष्ण कटीबंधातील फळपीक असून, फार कमी पाणी लागते.
- डाळिंबाचे झाड ताणावर असताना दीड महिना पाणी पूर्णपणे बंद करावे.
- त्यानंतर ताण सोडताना डाळिंबाला पहिले पाणी पाच ते सहा तास ठिबक सिंचनने द्यावे.
- डाळिंबाच्या झाडाला अति पाणी दिल्यास सूत्रकृमी, मर आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
- पाण्याचे व्यवस्थापन कसे करावे हे लक्षात येत नसेल तर बागेतील काही झाडांजवळ मका टोकावी. मका सुकलेली दिसल्यासच झाडांना पाणी द्यावे. मका हे पिक पाण्यासाठी अतिशय संवेदनशील असल्याने जमिनीतील ओलाव्याचा पिकावर लगेच परिणाम दिसून येतो.
अशा प्रकारे योग्य रित्या, आपल्या शेतातील मातीनुसार योग्य हवामानानुसार डाळिंबाचा योग्य बहार घेतल्यास भरपूर उत्पादन मिळू शकते. तुम्ही तुमच्या डाळिंब पिकात कोणता बहार घेता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “बागायती पिके” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. डाळिंब पिकास कोणते हवामान उपयुक्त आहे?
डाळींब पिकास थंड व कोरडे हवामान उपयुक्त आहे.
2. डाळिंबाचे पीक कोणत्या जमिनीत घेता येते?
डाळिंबाचे पिक कोणत्याही जमिनीत घेता येते.
3. डाळिंब पिकात कोणती आंतरपिके घेता येतात?
डाळिंबाच्या लागवडीनंतर सुरुवातीची दोन वर्षे बागेत दोन ओळींमध्ये कांदा, काकडी, मुग, चवळी, सोयाबीन यासारखी कमी उंच वाढणारी पिके आंतरपिके म्हणून घेता येतात.
4. डाळिंब पिकात किती बहार घेता येतात?
डाळिंब पिकात प्रामुख्याने तीन बहार घेतले जातात मृग बहार, हस्त बहार आणि आंबे बहार.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
![फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ](/_next/image?url=%2F_next%2Fstatic%2Fmedia%2Fget-help.47979653.webp&w=384&q=75)
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
![download_app](/_next/image?url=%2F_next%2Fstatic%2Fmedia%2Fdownload-app-bannerv2.c11782c9.webp&w=1920&q=75)