पोस्ट विवरण
बटाटा - सुधारित लागवड तंत्र (Potato Crop Cultivation with Improved Techniques : Batata Lagvad)
नमस्कार शेतकरी बंधूंनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
बटाटा हे रब्बी हंगामातील महत्वाचे पीक असून, या पिकाची लागवड पुणे, सातारा, नाशिक, अहमदनगर, बीड, औरंगाबाद आणि नागपूर या जिल्ह्यात केली जाते. बटाटा पिकामध्ये आधुनिक लागवड पद्धती, बियाणे निवड प्रक्रिया या बाबींकडे प्रामुख्याने लक्ष दिल्यास पिकापासून मिळणाऱ्या नफ्यात वाढ होऊ शकते. भारतात रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात बटाटा लागवड केलेली पाहायला मिळते. आजच्या आपल्या या भागात आपण सुधारित तंत्रज्ञानाद्वारे बटाटा लागवड कशी करावी याविषयी जाणून घेणार आहोत.
बटाटा लागवडीसाठी योग्य हवामान (Suitable Temperature for Potato Cultivation):
- बटाटा हे थंड हवामानातील पीक आहे.
- ऑक्टोबर - नोव्हेंबर या महिन्यात बटाटा लागवडीचे नियोजन करावे.
- बटाटा लागवडीच्या वेळी उष्ण व पोसण्याच्या वेळी थंड हवामान आवश्यक असते.
- बटाटा पिकासाठी हलक्या थंड वातावरणाची गरज असते.
- बटाट्याच्या योग्य वाढीसाठी 22 ते 24 अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते.
- बटाट्याची वाढ व विकास जमिनीच्या अंतर्गत होतो.
- शाकीय वाढीनंतर बटाटा कंदाची निर्मिती होण्यासाठी 18 - 20 अंश सें. तापमानाची गरज असते. यास ट्युबरलायझेशन असे म्हणतात.
बटाटा लागवडीसाठी योग्य जमीन (Suitable Soil for Potato Cultivation):
- बटाटा पिकाची वाढ आणि विकास जमिनीच्या आत होत असतो. त्यामुळे बटाटा पीक यशस्वी होण्यासाठी जमिनीची निवड अत्यंत महत्त्वाची ठरते.
- पाण्याचा योग्य निचरा होणारी व भुसभुशीत, पोयट्याची जमीन बटाटा लागवडीसाठी निवडावी.
- जमिनीमध्ये पाणी साचून राहत असल्यास बटाटा विकासाच्या काळात फळ सड होऊ शकते.
- जमिनीला पाणी दिल्यानंतर जमीन घट्ट बनत असल्यास बटाटा कंदाची वाढ योग्य प्रकारे होत नाही.
- जमिनीचा सामू 6 ते 8 दरम्यान असावा.
बटाटा लागवडीसाठी योग्य हंगाम (Suitable season for Potato Cultivation):
बटाट्याची लागवड खरीप हंगामात जून-जुलै महिन्यात तर, रब्बी हंगामात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात करावी.
महारष्ट्रासाठी बटाट्याची प्रमुख वाण (Varieties for Potato Cultivation):
- कुफरी ज्योती
- कुफरी लवकर
- कुफरी सिंधुरी
- कुफरी सूर्या
- कुफरी पुखराज
बटाटा पिकासाठी लागवड पद्धत आणि अंतर (Planting Method and Spacing for Potato Cro):
- योग्य वाढ व विकास होण्यासाठी लागवड ही गादी वाफ्यावर करावी.
- काही ठिकाणी सरी वरंबा पद्धतीचा वापरही केला जातो.
- दोन्ही ओळींमधील अंतर दोन फूट, तर झाडांमधील अंतर जमिनीचा मगदुर व जातीनुसार 30 सें.मी. किंवा 45 सें.मी. ठेवावे.
बटाटा पिकासाठी बियाणे निवड व प्रक्रिया (Potato seeds) :
- बियाणे लागवड करण्यासाठी, सुप्तावस्था पूर्ण झालेल्या कंदांची निवड करावी.
- काढणी केल्याबरोबर बियाणे ताबडतोब लागवडीसाठी निवड करू नये.
- बटाट्यामध्ये सुप्तावस्था असल्यामुळे काही काळ साठवणूक केल्यानंतर, कार्यक्षम डोळ्यांची संख्या असलेल्या बियाण्याची निवड करावी.
- साधारणतः एक एकर लागवडीसाठी 6 - 8 क्विंटल बियाणे आवश्यक असते.
- बियाणे साधारणतः 30 - 35 ग्रॅम वजनाचे व कार्यक्षम डोळे असणारे आवश्यक असते.
- बियाणे 30 - 35 ग्रॅम वजनापेक्षा जास्त असल्यास अशा बियाण्याची दोन चार भागांमध्ये कापणी करावी. परंतु कापणी करत असताना कार्यक्षम डोळ्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
- कापणी केल्यानंतर बियाण्याचे वजनदेखील साधारणतः 35 ग्रॅम असावे.
बटाटा पिकासाठी पूर्वमशागत:
- जमीनीची 20 ते 25 सें.मी. नांगरट करावी.
- 1 महिनाभार जमिनीस ऊन द्यावे.
- पुन्हा एक आडवी नांगरट करावी.
- ढेकळे फोडण्यासाठी व जमीन समपातळीत आणण्यासाठी कुळवाच्या दोन-तीन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.
- जमिनीत एकरी 2 गाड्या चांगले कुजलेले शेणखत पसरावे.
बटाटा पिकाची लागवड कशी करावी (Potato Cultivation):
- सरासरी बियाण्याचे वजन जास्तीत जास्त 50 ते 100 ग्रॅम असावे.
- बियाण्याचा आकार मध्यम असावा.
- बटाट्याचे आकारमानानुसार दोन ओळीतील अंतर 45 ते 60 सें.मी. आणि दोन बियाण्यातील अंतर 15 ते 20 सें.मी. ठेवावे.
- ट्रॅक्टरच्या सहाय्याने सरी वरंबा पद्धतीने लागवड केल्यास 20 × 20 सें.मी. अंतरावर लागवड करावी.
खत व्यवस्थापन (Fertilizer Management in Potato):
बटाटा पिकास एकरी 20 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाशची आवश्यकता असते.
पाणी व्यवस्थापन (Water Management in Potato):
- बटाट्याची मुळे जमिनीत वरच्या थरात वाढत असल्यामुळे या पिकास पाण्याच्या पाळीच्या वेळेस कमी पाणी द्यावे.
- लागवडीनंतर पहिले पाणी हलके द्यावे.
- जमिनीलगतच्या फांद्या वाढून त्यांची टोके फुगीर होऊ लागल्यावर व बटाटा पोसण्याच्या वेळेस 6 ते 8 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
- पिकाची वाढ पूर्ण झाल्यावर पाण्याच्या पाळ्या कमी कराव्यात.
आंतरमशागत:
- बटाट्याच्या आंतरमशागतीत तण काढणे व खुरपणी या बरोबर भर देणे देखील महत्त्वाचे आहे.
- तीन चार वेळा खुरपणी करून जमीन भुसभुशीत ठेवावी.
- खतांचा दुसरा हप्ता देताना झाडांना मातीची भर द्यावी.
बटाटा पिकातील रोग व किडी (Pests and Diseases in Potato) :
- करपा रोग
- खोक्या रोग
- देठ पोखरणारी अळी
- मावा
- तुडतुडे
- बटाट्यावरील पतंग
काढणी आणि उत्पादन (Harvesting and Production of Potato) :
सर्व सुधारीत तंत्राचा उपयोग करून बटाट्याचे पीक घेतल्यास लवकर तयार होणाऱ्या जातीचे उत्पादन एकरी 80 क्विंटल तर उशिरा तयार होणाऱ्या जातीचे उत्पादन एकरी 100 ते 120 क्विंटल पर्यंत येऊ शकते.
अशा प्रकारे योग्य रित्या, आपल्या शेतातील मातीनुसार योग्य हवामानानुसार बटाटा लागवड केल्यास भरपूर उत्पादन मिळू शकते. तुम्ही तुमच्या बटाटा पिकाच्या लागवडीकरता कोणते तंत्र वापरता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. बटाटा पिकाची लागवड कधी करावी?
बटाटा पिकाची लागवड खरीप हंगामात जून, जुलै महिन्यात व रब्बी हंगामात ऑक्टोंबर, नोव्हेंबर महिन्यात करावी.
2. बटाट्याचे पीक किती दिवसात येते?
बटाट्याचे पीक 90 ते 100 दिवसांत कापणीसाठी तयार होते.
3. बटाटा पिकात आढळून येणारे मुख्य रोग कोणते?
करपा व खोक्या रोग हे बटाटा पिकात आढळून येणारे प्रमुख रोग आहेत.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ