पोस्ट विवरण
सुने
योजनाएं
शेतकरी योजना
DeHaat Channel
15 June
Follow

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (Pradhan Mantri Krishi Sinchan Yojana)

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

शेती हा व्यवसाय अधिक फायदेशीर व्हावा, शेतकऱ्यांची जोखीम कमी व्हावी तसेच आधुनिक कृषी तंत्राला प्रोत्साहन मिळावे यासाठी खात्रीपूर्वक व संरक्षित सिंचन व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. म्हणूनच केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेमध्ये सन 2015-16 पासून ‘‘प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना’ समाविष्ट केली आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात पाण्याची उपलब्धता करून देणे आणि पाण्याची कार्यक्षमता वाढवून पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जास्तीत जास्त पीक उत्पादन मिळविणे हे या योजनेचे उद्देश आहे. चला तर मग जाणून घेऊया या विशेष योजनेविषयीची माहिती.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – प्रती थेंब अधिक पिक (सूक्ष्म सिंचन घटक)

ठिबक सिंचन:

झाडाच्या किंवा पिकाच्या मुळाशी लहान नळीद्वारे थेंबा थेंबाने पाणी देण्याची आधुनिक सिंचन पद्धती म्हणजे ठिबक सिंचन होय. या पद्धतीमुळे पाणी हे मुळापर्यंत जाऊन त्या पिकाची पाण्याची पुरेपूर गरज भागवली जाते. त्यामुळे अतिशय कमी पाण्यात सुद्धा पीक चांगले वाढते. म्हणूनच या योजनेच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासन अग्रेसर आहे. संपूर्ण भारताच्या 60% ठिबक सिंचन हे फक्त महाराष्ट्रातच केले जाते.

तुषार सिंचन:

ॲल्युमिनियम किंवा पीव्हीसी पाईपला जोडलेल्या स्प्रिंकलर नोझलद्वारे पाण्याच्या दाबाचा वापर करून पाणी पावसाप्रमाणे पिकावर एकसारखे फवारणे याला तुषार सिंचन पद्धत असे म्हणतात. या प्रणालीमध्ये नोझल ठराविक वेगाने एकसारखे वर्तुळाकार फिरवण्याची सोय केलीली असते. या सिंचन प्रणालीचा उपयोग शेतीबरोबरच औद्योगिक क्षेत्रात ही केला जातो. या पद्धतीमध्ये पिकावर पावसाप्रमाणे लहान लहान पाण्याचे थेंब पडले जातात, यामुळे पाण्याची बचत तर होतेच आणि हे पाणी थेट पिकाच्या मुळाशी जाते.

PMKSY प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचे लाभार्थी कोण?

या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील सगळ्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारने सर्व शेतकऱ्यांसाठी ही योजना राबवली आहे.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना देय असलेले अनुदान खालील प्रमाणे असेल:

 • अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी – 55 टक्के
 • इतर शेतकरी- 45 टक्के
 • अवर्षणप्रवण क्षेत्राबाहेरील सर्वसाधारण भूधारक – 35 टक्के
 • अवर्षणप्रवण क्षेत्रातील सर्वसाधारण भूधारक – 45 टक्के
 • अवर्षणप्रवण क्षेत्राबाहेरील अल्प व अत्यल्प भूधारक – 45 टक्के
 • अवर्षणप्रवण क्षेत्रातील अल्प व अत्यल्प भूधारक – 60 टक्के

PMKSY प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना योजनेसाठी पात्रता:

 • खालील पात्रता धारक शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
 • शेतकऱ्याकडे स्वतःचे आधार कार्ड असणे गरजेचे आहे.
 • अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
 • अर्जदार शेतकऱ्याकडे सातबारा उतारा आणि 8- अ प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
 • शेतकरी कास्ट कॅटेगिरी मधून अर्ज करत असेल तर त्यांच्याकडे जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
 • अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विहीर, शेततळे, बोरवेल किंवा इतर पाण्याचा साठा असायला हवा की ज्याची नोंद सातबारावर असावी.
 • पाणीसाठ्याची नोंद नसेल तर जवळच्या तलाठी कार्यालयामध्ये जाऊन करू शकता कारण या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या शेतात पाणीसाठा आवश्यक आहे.
 • सामुहिक सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास इतर संबधितांचे सहमती/ करारपत्र असावे.
 • शेतकऱ्याकडे विद्युत पंपासाठी विद्युत जोडणी संच असणे आवश्यक आहे, यासाठी शेतकऱ्यांना वीज बिलाची सध्याची प्रत जोडावी लागेल.
 • सोलर पंपाची व्यवस्था केली असेल तर तो पंप बसवून घेतल्या बाबतचे पत्र व त्या सोलर पंपासंबंधित सर्व कागदपत्रे प्रस्तावासोबत जोडण्यात यावीत.
 • सूक्ष्म सिंचन प्रणाली फक्त कंपनीच्या प्रतिनिधींनी तयार केलेली असावी.
 • शेतकऱ्याला पूर्व-मंजुरी मिळाल्यानंतर, त्याने अधिकृत विक्रेता किंवा वितरकांकडून सिंचन संच विकत घ्यावे, ते शेतामध्ये जोडावेत आणि पूर्व-मंजुरी मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत खरेदी केलेल्या पावत्या ऑनलाईन अपलोड कराव्यात.

PMKSY प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेची उद्दिष्ट्ये:

 • शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात ठिबक व तुषार सिंचन सुविधा बसवण्यासाठी आर्थिक अनुदान देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
 • आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्रात वाढ करणे.
 • खात्रीपूर्वक तसेच संरक्षित सिंचन व्यवस्था निर्माण करणे.
 • जलवापर कार्यक्षमतेची वाढ करणे.
 • कुशल व अर्धकुशल बेरोजगारासाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे.
 • एकूणच शेती क्षेत्राला प्रोत्साहन देणे.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचे फायदे (Benefits of PMKSY) :

 • या योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सिंचनासाठी पुरेसे पाणी पुरवले जाईल आणि त्यासाठी सरकारकडून सिंचन उपकरणासाठी अनुदान दिले जाते.
 • शेतकऱ्यांना कमी पाण्यात शेती करणे शक्य होईल, पाण्याअभावी पिकाचे नुकसान होणार नाही.
 • कृषी उत्पादन आणि पर्यायाने शेतकऱ्यांचे सरासरी उत्पादन यामध्ये वाढ होईल.
 • आधुनिक तंत्रज्ञानाच्या या वापरामुळे कमी खर्चात व जलदगतीने शेतीची कामे होतील.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2024 अंतर्गत आवश्यक कागदपत्रे (Important documents for PMKSY) :

 • आधार कार्ड
 • रहिवाशी दाखला
 • ई-मेल आयडी
 • मोबाईल नंबर
 • पासपोर्ट आकाराचे फोटो
 • जमिनीचा 7/12  व 8-अ
 • मागील 3 महिन्याचे वीज बिल
 • खरेदी केलेल्या संचाचे बिल
 • पूर्वसंमती पत्र
 • बँक खात्याचा तपशील

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत (Online application process for PMKSY) :

 • अर्जदाराने सर्वात प्रथम https://mahadbt.maharashtra.gov.in/ या अधिकृत पोर्टल वर जावे.
 • होम पेज वर ‘शेतकरी योजना’ वर क्लिक करावे.
 • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला वापरकर्ता आयडी वर क्लिक करावे लागेल.
 • त्यानंतर तुमच्यासमोर लॉगिन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा Username, Password आणि Captcha Code टाकून लॉगिन करावे लागेल.
 • त्यानंतर एक नवीन पेज उघडेल, त्यामध्ये तुम्हाला सिंचन साधने व सुविधा समोर बाबी निवडा वर क्लिक करावे लागेल.
 • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल , त्यामध्ये तुम्हाला सिंचन स्रोत बद्दल विचारलेल्या माहितीची योग्य निवड करायची आहे आणि जोड बटनावर क्लिक करायचं आहे.
 • आता तुमच्यासमोर एक सिंचन साधने व सुविधा चा अर्ज उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती (गाव, तालुका, मुख्य घटक इत्यादी) भरायची आहे व जतन करा वर क्लिक करायचे आहे.
 • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला 23/- रुपये भरायचे आहेत.
 • अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची  प्रक्रिया पूर्ण होईल.

तुम्ही प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा लाभ घेतला का? तुमची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला पाठवा. याशिवाय, आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून देखील तुम्ही देहातच्या कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवू शकता. अशाच इतर योजनांच्या माहितीसाठी देहातशी कनेक्टेड रहा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका. यासारख्या विविध योजनांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी योजना” चॅनेलला फॉलो करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी अधिकृत वेबसाईट कोणती?

https://mahadbt.maharashtra.gov.in/ ही सरकारची अधिकृत वेबसाईट आहे. यावर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज भरू शकता.

2. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना किती अनुदान दिले जाते?

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दिले जाणारे अनुदान पुढीलप्रमाणे:

 • अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी – 55 टक्के
 • इतर शेतकरी- 45 टक्के
 • अवर्षणप्रवण क्षेत्राबाहेरील सर्वसाधारण भूधारक – 35 टक्के
 • अवर्षणप्रवण क्षेत्रातील सर्वसाधारण भूधारक – 45 टक्के
 • अवर्षणप्रवण क्षेत्राबाहेरील अल्प व अत्यल्प भूधारक – 45 टक्के
 • अवर्षणप्रवण क्षेत्रातील अल्प व अत्यल्प भूधारक – 60 टक्के

3. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचे उद्देश काय?

प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात पाण्याची उपलब्धता करून देणे आणि पाण्याची कार्यक्षमता वाढवून पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जास्तीत जास्त पीक उत्पादन मिळविणे हे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचे उद्देश आहे.

48 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ