पोस्ट विवरण
सुने
कृषि
कद्दू
कृषि ज्ञान
कृषी ज्ञान
DeHaat Channel
26 Feb
Follow

भोपळा पिकाचे लागवड तंत्र व ड्रीपद्वारे खत व्यवस्थापन (Pumpkin cultivation techniques and fertilizer management through drip)


नमस्कार शेतकरी मित्रांनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

भोपळा ही वेलवर्गीय भाजी असून, भोपळ्याचा भाजी म्‍हणून आहारात उपयोग केला जातो. भोपळ्याच्या प्रत्‍येक वेलीवर नर आणि मादी अशी वेगवेगळी फूले असतात. त्‍यापैकी फक्‍त मादी फुलांनाच फळधारणा होते. महाराष्‍ट्रामध्‍ये या पिकाखाली सरासरी 566 हेक्‍टर क्षेत्रावर लागवड केली जाते. विशेषत: पितृपंधरवडा व नवरात्रीतील उपवासासाठी भोपळ्याला भरपूर मागणी असते. हा कालावधी साधून भोपळ्याची लागवड केल्यास तसेच योग्य खत व्यवस्थापन केल्यास त्यापासून चांगला आर्थिक लाभ मिळतो. म्हणूनच आजच्या या भागात आपण भोपळा लागवडी विषयीची माहिती जाणून घेणार आहोत.

भोपळा लागवडीसाठी योग्य हवामान (Suitable weather for Pumpkin cultivation):

  • भोपळा पिकाच्या वाढीसाठी उष्ण व कोरडे हवामान चांगले मानवते.
  • या पिकाच्या वाढीसाठी 18 अंश से. ते 29 अंश से. तापमान, भरपूर व स्वच्छ सूर्यप्रकाश पोषक असतो.
  • जास्त थंडीमुळे फळधारणा व्यवस्थित होत नाही.

भोपळा लागवडीसाठी योग्य जमीन (Suitable Land for Pumpkin cultivation):

  • भोपळा हलक्या ते मध्यम चांगल्या निचऱ्याच्या जमिनीत उत्तम पोसतो. तसेच नदीकाठच्या व नदीतील रेताड जमिनीत देखील चांगल्या प्रकारे येतो.
  • मात्र चोपण, क्षारपड जमिनीत येत नाही.
  • जमिनीचा सामू 6 ते 7 पर्यंत असल्यास अशा जमिनीत भोपळा उपयुक्त ठरतो.
  • उन्हाळी हंगामात हलक्या जमिनीत भोपळा घेऊ नये कारण पाण्याचा ताण पडल्यावर फळे तडकण्याचा संभव असतो.

भोपळा पिकासाठी योग्य हंगाम (Suitable Season for Pumpkin cultivation):

भोपळा पिकासाठी खरीप व उन्हाळी हंगाम योग्य मानला जातो.

खरीप हंगामासाठी जून-जुलै तर उन्हाळी हंगामाकरिता फेब्रुवारी- मार्चमध्ये लागवड करावी.

रानबांधणी:

  • जमिनीची खोल नांगरट करावी.
  • नांगरण्यापूर्वी किंवा शेवटच्या कुळवणी अगोदर प्रति अडिच एकरच्या जवळपास 5 ते 30 टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे.
  • जमिनीत सुत्रकृमींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दोन टन निंबोळी पेंड मिसळावी.
  • पुर्नमशागत करून जमीन चांगली पोतावर आल्यावर दोन ओळीत 2 ते अडीच मीटर अंतर ठेवून रूंद सरी पाडावी.
  • सरीमध्ये एक ते दीड मीटर दोन रोपांमध्ये अंतर ठेवून आळी तयार करावीत.
  • आळी तयार करताना त्यामध्ये एक पाटी शेणखत टाकून एकरी 40 किलो नत्र, 20 किलो स्फुरद व 20 किलो पालाश सर्व आळ्यात विभागून टाकावे.

लागवड:

  • लागवड बी टोकण पध्दतीने करतात.
  • सरीमध्ये तयार केलेल्या आळयात 2 ते 3 बिया टाकाव्यात.
  • बी टोकण्यापूर्वी बाविष्टीनची बीजप्रक्रिया करावी.
  • बी लागवडीपूर्वी ओल्या फडक्यात 24 ते 48 तास बांधुन ठेवल्यावरनंतर लागवड केल्यास उगवण उत्तम होते.
  • प्रति एकर 300-350 ग्रॅम बियाणे आवश्यक आहे.

सुधारीत जाती (Varities):

  • अंकुर पेपो
  • अंकुर भीम
  • व्ही.एन.आर पी 6
  • डी.एच.एस - 4006

आंतरमशागत व पाणी व्यवस्थापन :

  • बी उगवण झाल्यावर एका आळ्यात एकच रोप ठेवून बाकी रोपे उपटून काढावीत.
  • खुरपणी करून आळी स्वच्छ करावीत व नत्रांची दुसरी मात्रा द्यावी.
  • वेल दोन ओळीच्या मधल्या जमिनीवर पसरावेत.
  • पाटामध्ये वेल वाढू देऊ नयेत.
  • पाण्यामुळे फळे खराब होणार नाहीत याची काळजी घ्यावी.
  • पिकाची उगवण होईपर्यंत बेताचे हलके पाणी द्यावे. त्यानंतर खरीपात आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.
  • उन्हाळ्यात 6 ते 7 दिवसांनी पाणी द्यावे.
  • जमिनीचा प्रकार व पिकाच्या वाढीची अवस्था यानुसार पाण्यात अंतर ठेवावे.

भोपळा पिकात ड्रीप द्वारे करावयाचे खत व्यवस्थापन (Pumpkin fertilizer management through drip):

  • लागवडी नंतर 0 ते 30 दिवसांमध्ये 19:19:19 (देहात- न्यूट्री NPK) @ 2 किलो + 12:61:00 (देहात- न्यूट्री MAP) @ 3 किलो 6 ते 7 दिवसाच्या अंतराने कमीत कमी 4 वेळेस द्यावे.
  • पिकाच्या जोमदार वाढीसाठी 11:44:11 (Generic Zetol Sure) हे खत 4 ते 5 किलो एकरी ड्रीपद्वारे द्यावे.
  • सोबतच 8-10 दिवस आड कॅल्शिअम व बोरॉन युक्त खते ड्रीप द्वारे द्यावीत यामुळे फर्टीगेशन योग्य रित्या होते.
  • शेंडा छाटल्यानंतर सेटिंग कालावधीत 00:52:34 (देहात- न्यूट्री MKP) @ 3 किलो + 13:0:45 (देहात- न्यूट्री KNO3) @ 4 किलो किंवा
  • 13:40:13 (देहात- न्यूट्री NPK) @ 4 किलो + 0:0:50 (देहात- न्यूट्री SOP) @ 3 किलो अशी पोटॅश व फॉस्फरस युक्त खते द्यावीत.
  • त्यानंतर 4 ते 5 दिवसांचे अंतर ठेऊन कॅल्शिअम नायट्रेट (देहात- न्यूट्री CaNO3) @5 किलो प्रति एकर द्यावे.
  • फळधारणा चालू झाल्यानंतर कॅल्शिअम नायट्रेट (देहात- न्यूट्री CaNO3) @3 किलो + मॅग्नेशिअम सल्फेट (देहात- न्यूट्री MgSO4) @2 किलो प्रति महिना द्यावे.

भोपळा पिकावर आढळून येणारे रोग व कीटक (Pumpkin crop Pests and disease):

  • भोपळ्यावर खरीपात जास्त पावसामुळे वेलीवर केवडा व भुरी रोगाचा प्रादुर्भाव होतो.
  • भोपळ्यावर प्रामुख्याने लाल भुंगेरे, फळमाशी व सुत्रकृमींचा प्रादुर्भाव दिसून येतो.

काढणी व उत्पन्न:

  • भोपळा पुर्ण पक्व झाल्यावर काढणी करतात.
  • पक्व झालेली फळे रंग बदलून पिवळसर होतात. तसेच देठ सूकलेले दिसतात.
  • पक्व होण्यासाठी सरासरी 160 ते 180 दिवस लागतात.
  • फळांची काढणी करताना ती देठासह करावी आणि बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवावीत.
  • वरीलप्रमाणे योग्य व्यवस्थापन करून भोपळ्याचे सरासरी 140 ते 160 क्विंटलपर्यंत प्रति एकरी उत्पादन मिळू शकते.

अशा प्रकारे योग्य रित्या, भोपळ्याची लागवड केल्यास व योग्य वेळी योग्य खते दिल्यास भरपूर उत्पादन मिळू शकते. तुम्ही तुमच्या भोपळा पिकाच्या लागवडीकरता कोणते तंत्र वापरता व ड्रीप द्वारे कोणती खते देता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. भोपळा पिकास कोणते हवामान उपयुक्त आहे?

भोपळा पिकाच्या वाढीसाठी उष्ण व कोरडे हवामान चांगले मानवते. या पिकाच्या वाढीसाठी 18 अंश से. ते 29 अंश से. तापमान, भरपूर व स्वच्छ सूर्यप्रकाश पोषक असतो.

2. भोपळा लागवडीसाठी योग्य जमीन कोणती?

भोपळा हलक्या ते मध्यम चांगल्या निचऱ्याच्या जमिनीत उत्तम पोसतो. तसेच नदीकाठच्या व नदीतील रेताड जमिनीत देखील चांगल्या प्रकारे येतो.

3. भोपळा पिकासाठी योग्य हंगाम कोणता?

भोपळा पिकासाठी खरीप व उन्हाळी हंगाम योग्य मानला जातो. तसेच खरीप हंगामासाठी जून-जुलै तर उन्हाळी हंगामाकरिता फेब्रुवारी-मार्चमध्ये लागवड केली जाते.

47 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ