पोस्ट विवरण
सुने
कृषि
कृषि ज्ञान
गुलाब
कृषी ज्ञान
DeHaat Channel
19 Apr
Follow

गुलाब लागवड तंत्रज्ञान (Rose Cultivation)

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

महाराष्ट्रात फुलशेतीचा प्रसार झपाट्याने होत आहे. गुलाबाच्या फुलांची शेती हा अनेक वर्षांपासून भारतातील सर्वात किफायतशीर शेती व्यवसायांपैकी एक आहे. या फुलांचा मोठ्या प्रमाणावर सजावटीच्या उद्देशाने वापर केला जातो आणि गुलाब हे सुंदर रंग, सुगंध आणि आकार यासाठी लोकप्रिय आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गुलाबाच्या वाढत्या मागणीमुळे, भारतातील अनेक शेतकऱ्यांसाठी गुलाबाची लागवड हा एक फायदेशीर व्यवसाय बनला आहे. महाराष्ट्रातील हवामानात गुलाब वर्षभर फुलते. तथापि, गुलाब शेतीमध्ये यशस्वी होण्यासाठी, एखाद्याला योग्य ज्ञान आणि कौशल्ये असणे आवश्यक आहे. चला तर मग आजच्या लेखात जाणून घेऊया गुलाब लागवड तंत्राविषयीची माहिती.

हवामान (Weather) :

 • पाच ते सहा तास स्वच्छ सूर्यप्रकाश असलेल्या ठिकाणी गुलाबाची चांगली वाढ होऊन चांगली फुले मिळतात.
 • गुलाबाच्या झाडांची वाढ सावलीत नीट होत नाही म्हणून गुलाबाच्या लागवडीसाठी निवडलेल्या जागेच्या आजूबाजूस उंच इमारती किंवा झाडी असू नये.
 • अतिवेगवान वारे वाहणाऱ्या ठिकाणी गुलाबाची लागवड करावयाची असल्यास लागवडीपूर्वी वारा प्रतिबंधक पट्टा (विंड ब्रेक) तयार करावा. यासाठी शेताच्या पश्चिम आणि दक्षिण दिशेकडून 3 ते 4 दाट ओळींत शेवरी किंवा सुरू यांसारखी उंच वाढणारी झाडे लावावीत.
 • गुलाबाचे पीक उष्ण तसेच समशीतोष्ण हवामानात चांगले येत असले तरी उत्तम दर्जाची फुले मिळविण्यासाठी दिवसाचे सरासरी तापमान 25 ते 32 अंश सेल्सिअस आणि रात्रीचे सरासरी तापमान 15 ते 17 अंश सेल्सिअस इतके असावे; तर सापेक्ष आर्द्रता 60 ते 65% असावी. अशा प्रकारचे हवामान महाराष्ट्रात नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत असते.
 • पावसाळ्यात जरी असे हवामान असले तरी रोग आणि किडींचा उपद्रव जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे दर्जेदार गुणवत्तेची फुले नोव्हेंबर ते मार्च या काळातच मिळतात.
 • या काळात युरोपात अतिथंड हवामान असल्यामुळे गुलाबाच्या फुलांचे उत्पादन अजिबात होत नाही. मात्र या काळात युरोपात ख्रिसमस (नाताळ), नवीन वर्ष, इस्टर, इत्यादी महत्त्वाचे सण असतात. त्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात फुले आयात करावी लागतात.
 • अशा वेळी आपल्याकडील हवामानाचा फायदा घेऊन आपण नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत गुलाबाची फुले पैदास करून परदेशी पाठवून परकीय चलन मिळवू शकतो. मात्र त्यासाठी फुलांची गुणवत्ता आंतरराष्ट्रीय स्तराची असावी लागते.

जमीन (Soil) :

 • गुलाबाला हलकी ते मध्यम जमीन मानवते.
 • हलक्या ते मध्यम जमिनीत पाण्याचा योग्य निचरा होतो. परंतु या जमिनी कसदार नसतात. म्हणून अशा जमिनींमध्ये हिरवळीची खते किंवा शेणखताचा भरपूर वापर करावा.
 • भारी आणि दलदलीच्या जमिनीतून पाण्याचा निचरा नीट होत नाही आणि त्याचा झाडाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. झाडाची पाने पिवळी पडून पानांवर काळे ठिपकेही पडतात. शेवटी पाने गळून जातात, त्यामुळे फुलांचे उत्पादन कमी होते.
 • चुनखडी असलेली जमीन गुलाबाच्या पिकास मानवत नाही. अशा जमिनीत झाडाची पाने पिवळी पडतात आणि उत्पादन खुंटते.
 • साधारणपणे जांभ्या दगडापासून तयार झालेली आम्लयुक्त आणि 5.6 ते 6.8 इतका सामू असलेली जमीन गुलाबाच्या लागवडीसाठी उत्तम आहे.
 • पाणथळ व चोपण जमिनी गुलाबाच्या लागवडीसाठी निवडू नयेत.

सुधारित वाण :

लागवडीसाठी जुमेलिया, टॉप सिक्रेट, अवलांचे, फर्स्ट रेड, नोबलीस, स्काय लाईन, ग्लॅडिएटर, टेमेंटेशन, पॅशन, गोल्डन स्ट्राइक बोर्डो, सुपरस्टार, सामुराई या सुधारित वाणांची निवड करावी.

लागवडीची वेळ :

जुलै ते ऑगस्ट दरम्यान गुलाब रोपांची लागवड 45 बाय 20 सेमी अंतरावर करावी.

खताची मात्रा :

 • 5 ते 10 किलो शेणखत, 30 ग्रॅम नत्र, 30 ग्रॅम स्फुरद आणि 20 ग्रॅम पालाश प्रति चौरस मीटर लागवडीच्या वेळी द्यावे.
 • त्यानंतर 400 मिलीग्राम नत्र 200 मिलीग्रॅम स्फुरद आणि 200 मिलीग्रॅम पालाश प्रति झाड प्रति आठवडा द्यावे.

आंतरमशागत :

 • वेळोवेळी वाळलेली रोगट पाने काढावीत.
 • गादी वाफे खुरपून भुसभुशीत ठेवावेत.

अभिवृद्धी आणि लागवड पद्धती (Rose Plantation) :

 • गुलाबाची अभिवृद्धी बी, फाटे कलम, गुटी कलम आणि डोळा भरून करता येते.
 • यापैकी फाटे कलमाने गुलाबाच्या खुंटाची निपज केली जाते.
 • गुटी कलमाने वेलवर्गीय गुलाबाची अभिवृद्धी केली जाते तर व्यापारी जातीची अभिवृद्धी करण्यासाठी डोळा भरून कलमे केली जातात.

बिया :

 • गुलाबाला फुले येऊन गेल्यानंतर त्याला छोटी गोल फळे (हीप्स) लागतात.
 • ही फळे पिकल्यानंतर आत लहान आकाराच्या बिया असतात.
 • या बिया गादीवाफ्यावर पेरून गुलाबाची रोपे तयार करतात. परंतु या बियांची उगवण होण्यास बराच काळ लागतो.
 • गुलाबाच्या बियांवर शीतक्रिया केल्यास त्यांची उगवण लवकर होते. त्यासाठी गुलाबाच्या बिया ओल्या नीत किंवा शेवाळामध्ये बांधून त्या शीतगृहात 4 ते 5 अंश सेल्सिअस तापमानाला एक ते दोन महिने ठेवून नंतर बाहेर काढून रेतीत अथवा थंड ठिकाणी ठेवल्यास उगवण लवकर होते.
 • गुलाबाच्या फळातून बिया बाहेर काढल्यानंतर त्या सुकू देऊ नयेत.
 • पेरणी होईपर्यंत बिया ओलसर राहण्यासाठी त्या ओल्या शेवाळात अथवा ओल्या रेतीत ठेवाव्यात.
 • बिया पेरून गुलाबाची अभिवृद्धी केल्यास तयार होणारी रोपे मातृवृक्षासारखी निपजत नाहीत. म्हणून सर्वसाधारणपणे कलमी गुलाबाची अभिवृद्धी बिया पेरून न करता शाखीय पद्धतीने केली जाते.
 • मात्र गुलाबाच्या संकरित जाती तयार करण्यासाठी गुलाबाची अभिवृद्धी बिया पेरूनच केली जाते.

फाटे कलम :

 • गुलाबाच्या काही ठरावीक जातींची अभिवृद्धी फाटे कलमाने केली जाते.
 • जंगली गुलाब, वेली गुलाब, मिनिएचर गुलाब यांची अभिवृद्धी फाटे कलमाने केली जाते.
 • मात्र ही पद्धत प्रामुख्याने गुलाबाची खुंटरोपे वाढविण्यासाठी वापरली जाते. गुलाबाच्या पक्क्या फांदीपासून फाटे कलम तयार करतात.
 • फाटे कलमे पावसाळ्यात केल्यास अधिक यशस्वी होतात. इतर काळात फाटे कलमे करावयाची असल्यास त्यांना मुळे येण्यासाठी संजीवकांचा वापर करावा लागतो.
 • फाटे कलमासाठी 15-20 सेंटिमीटर लांबीची, पेन्सिलइतक्या जाडीची, 3- 4 रसरशीत डोळे असलेली फांदी निवडावी.
 • निवडलेली फांदी अतिजून अथवा अतिकोवळी असू नये.
 • फांदी कापताना तीक्ष्ण कात्रीने तिरकस काप घ्यावा.
 • कलमांना लवकर मुळे येण्यासाठी फांदीचे एक टोक सिरॅडिक्ससारख्या संजीवकात थोडा वेळ बुडवून नंतर पाण्यात बुडवावे. त्यानंतर या फांद्या जमिनीत अथवा पॉलिथीन पिशवीत लावाव्यात.
 • काड्या 10-12 सेंटिमीटर खोलीवर लावाव्यात.
 • काड्या जमिनीत लावताना त्या 15 सेंटिमीटर अंतरावर लावाव्यात आणि लगेच पाणी द्यावे. नंतर नियमितपणे रोपांना पाणी द्यावे.
 • साधारणपणे 4 ते 6 महिन्यांत रोपे डोळे भरण्यासाठी चांगली तयार होतात.

दाब कलम :

 • गुलाबाच्या वेलीसारख्या वाढणाऱ्या प्रकारातील जातींची अभिवृद्धी लांब आणि नरम फांद्यांवर दाब कलम करून केली जाते.
 • लांब, नरम आणि मध्यम आकाराची जमिनीजवळची फांदी घेऊन तिच्यावरील 2-3 सेंटिमीटर लांबीची साल काढून ओलसर जमिनीत हा कापलेला भाग दाबतात.
 • दाबलेली फांदी वर येऊ नये यासाठी त्या भागावर दगड अथवा वीट ठेवून फांदी दाबलेल्या स्थितीत ठेवावी.
 • एक ते दीड महिन्यांनी कंझलेल्या जागेवर मुळे तयार होतात. त्यानंतर मुळे आलेल्या जागेपासून 5 ते 6 सेंटिमीटर अंतरावर मागच्या बाजूला फांदी कापावी.
 • मुळे आलेली फांदी जमिनीत तशीच राहू द्यावी.
 • फांदीपासून रोप तयार होऊन त्याला पाने फुटतात. नंतर ते तयार रोप काढून पॉलिथीन पिशवीत अथवा दुसऱ्या जागी लावावे.

गुटी कलम :

 • गुलाबाच्या फांद्यांवर गुटी कलम करणे सोपे असून अशा प्रकारच्या कलमांना लवकर मुळे फुटतात. परंतु काही ठरावीक जातींमध्ये अभिवृद्धीसाठी ही पद्धत वापरली जाते.
 • गुटी कलम करण्यासाठी 15 सेंटिमीटर लांबीच्या पक्व काडीवरील पाने, काटे आणि नवीन पानांच्या फुटी काढून टाकून तेथे 3 ते 4 सेंटिमीटर रुंदीची गोलाकार साल काढून टाकावी.
 • साल काढलेल्या भागावर ओले शेवाळ गुंडाळून त्यावर पॉलिथीन कागद सुतळीने घट्ट बांधावा. त्यानंतर दीड महिन्यांनी साल काढलेल्या जागी मुळे येतात. नंतर कलम मातृवृक्षापासून वेगळे करून स्वतंत्र जागी लावावे.

डोळे भरणे :

 • ही गुलाबाची अभिवृद्धी करण्यासाठी वापरली जाणारी सर्वांत महत्त्वाची व्यापारी पद्धत आहे.
 • सर्वसाधारणपणे इंग्रजी टी पद्धतीने गुलाबावर डोळे भरले जातात.
 • गुलाबावर डोळे भरताना जमिनीत वाढलेल्या झाडाच्या फांद्यांवर डोळे भरून इनसिटू बडिंग करतात अथवा पॉलिथीन पिशवीत अथवा वाफ्यात स्वतंत्र खुंटरोप तयार करून त्यावर डोळे भरतात.

पाणी व्यवस्थापन :

 • व्यवस्थित वाढ व विकास सुनिश्चित करण्यासाठी गुलाबांना नियमित पाणी देण्याची आवश्यकता असते.
 • गुलाबाला ठिबक सिंचनाद्वारे पिकाच्या वाढीनुसार पाणी द्यावे.

गुलाबामधील कीड व रोग (Rose Insects and Disease) :

शेंडेमर, भुरी, मावा, फुलकिडे, काळे ठिपके, करपा हे रोग प्रामुख्याने गुलाब पिकावर आढळून येतात.

काढणी व उत्पादन :

लागवडीनंतर सहा महिन्यांनी फुले काढणीस येऊन प्रती चौरस मीटर प्रति वर्षे 190 ते 230 फुले मिळतात.

अशा प्रकारे योग्य रित्या, आपल्या शेतातील मातीनुसार योग्य हवामानानुसार गुलाबाची लागवड केल्यास भरपूर उत्पादन मिळू शकते. तुम्ही तुमच्या गुलाब पिकाच्या लागवडीकरता कोणते तंत्र वापरता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. महाराष्ट्रात गुलाबासाठी योग्य हवामान कोणते?

महाराष्ट्रातील हवामानात गुलाब वर्षभर फुलते.

2. गुलाबासाठी कोणती जमीन योग्य असते?

गुलाबाला हलकी ते मध्यम जमीन योग्य असते.

3. गुलाबाची अभिवृद्धी कशी करता येते?

गुलाबाची अभिवृद्धी बी, फाटे कलम, गुटी कलम आणि डोळा भरून करता येते.

54 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ