अशा प्रकारे करा रस शोषक किडींचे प्रभावी व्यवस्थापन! (Sap-sucking insects Management in Crops!)

नमस्कार शेतकरी बंधूंनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
टोमॅटो, मिरची, भेंडी, वेलवर्गीय पिके तसेच केळी, पपई अश्या विविध पिकांमध्ये विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो. रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर यावर उपाययोजना करणे अशक्य असल्याने पिकाचे संपूर्ण नुकसान होते. तसेच विषाणूजन्य रोगांचे वहन पिकांमध्ये रस शोषणाऱ्या किडींमुळे होते. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पिकात रस शोषक किडींचे वेळीच नियंत्रण करणे महत्वाचे असते. म्हणूनच आपण आजच्या लेखात रस शोषक किडी आणि त्यांच्या व्यवस्थापनाविषयी जाणून घेणार आहोत.
पिकात आढळून येणाऱ्या रस शोषक किडी:
फुलकिडे (Thrips), पांढरी माशी (Whitefly), मावा (Aphids) आणि तुडतुडे (Jassid) या सारख्या रसशोषक किडी पिकांमधील पानाचा रस शोषून (sap sucking insects) पिकाला नुकसान पोहचवतात. तसेच हे व्हायरस ग्रस्त रोपातून निरोगी रोपांमध्ये मोझॅक आणि लीफ कर्ल व्हायरसचे वहन करून संपूर्ण वनस्पतीमध्ये व्हायरस पसरवतात.
रस शोषक किडी (Sap Sucking Insects):
फुलकिडे (Thrips) :
फुलकिड्यांची ओळख:
- फुलकिडे आकाराने अतिशय लहान म्हणजेच 1 मीली. पेक्षा कमी लांबीचे असतात.
- फुलकिड्यांचा रंग हा फिकट पिवळा असतो.
फुलकिड्यांची लक्षणे (Symptoms):
- फुलकिडे पानातील रस शोषून घेतात व पानांचे नुकसान करतात.
- कीड नवीन पाने आणि खोड या भागांना नुकसान करते.
- पाने गुंडाळलेली दिसतात आणि नंतर फिकट पिवळी होऊन हळूहळू सुकून जातात.
- तीव्र प्रादुर्भावामुळे नवीन पाने कोरडी होऊन पडतात.
फुलकिडे कोणत्या पिकांमध्ये कोणत्या विषाणूजन्य रोगांचे वहन करतात?
- टोमॅटो: टोमॅटवरील तिरंगा व्हायरस
- कलिंगड: बड नेक्रोसीस
उपाय (Remedy):
- या कीडीच्या नियंत्रणासाठी निळे चिकट सापळे लावावी.
- नीम तेल (अझेडरेक्टिन) @30 मिली
- बायो आर 303 (वनस्पती अर्क) @30 मिली
- थायोमिथोक्सम 25% डब्ल्यूजी (देहात-असेर) 100 ग्रॅम किंवा
- इमिडाक्लोप्रिड 17.8% एसएल (बायर-कॉन्फिडोर) 100 मिली किंवा
- फिप्रोनिल 5% एससी (धानुका-फॅक्स) - 400 मिली किंवा
- फिप्रोनिल 40% + इमिडाक्लोप्रिड 40% डब्ल्यूजी (घरडा - पोलीस) 40-60 ग्रॅम किंवा
- एसीफेट 50% + इमिडाक्लोप्रिड 1.8% एसपी (युपीएल- लान्सर गोल्ड) 300 ग्रॅम किंवा
- स्पिनोसॅड 45% एससी (बायर- स्पिनटोर) 100 मिली किंवा
- स्पिनेटोरम 11.7 % एससी (डाव-डेलिगेट) 160-200 मिली किंवा
- प्रोफेनोफॉस 40% + फेनपायरॉक्सिमेट 2.5% ईसी (सुमिटोमो-एट्ना) 300-400 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी.
पांढरी माशी (Whitefly) :
पांढऱ्या माशीची ओळख:
- पांढरी माशी या किडीचा आकार 0.5 मिमी पेक्षा कमी असतो.
- रंग भुरकट पांढरा व डोळ्याचा रंग लाल असतो.
- या किडींच्या पंखावर पांढरी भुकटी असते.
- कोश व किडींचा आकार फुगीर, गोलाकार असतो.
- पिल्ले व प्रौढांच्या शरीरावर केस असतात.
पांढऱ्या माशीची लक्षणे (Symptoms):
- पांढरी माशी या कीटकाची पिल्ले व प्रौढ माशी पानातील रस शोषतात. त्यामुळे पानांचा रंग पिवळसर होतो.
- या किडीच्या जास्त उद्रेकामुळे फुलगळ होते व फल धारणा होत नाही आणि पांढऱ्या माशीचे नियंत्रण (whitefly control in chilli) करणे खूप जास्त आवश्यक बनते.
- झाडाची पाने लहान आकार घेऊन चुरडली जातात. उत्पादनात घट येते.
- या माशीमुळे विषाणूजन्य रोगाचा प्रसार होतो.
पंढरीमाशी कोणत्या पिकांमध्ये कोणत्या विषाणूजन्य रोगांचे वहन करते?
- टोमॅटो: बोकड्या किंवा पिवळा पर्णगुच्छ रोग (टीवायएलसीव्ही)
- कारली, खरबूज, कलिंगड, भोपळा : यलोव्हेन मोझॅक
उपाय (Remedy):
- प्रति एकर शेतात 20-25 पिवळे चिकट सापळे वापरा.
- कीटकाचा प्रभाव दिसून आल्यास एसीटामिप्रिड 20% एसपी (धानुका-धानप्रीत) 100 ग्रॅम किंवा
- याशिवाय इमिडाक्लोरपीड 70% डब्ल्यू जी (देहात-कॉन्ट्रोपेस्ट) 40 ग्रॅम किंवा
- किंवा थायोमिथोक्सम 25% डब्ल्यूजी (देहात-असेर) 100 मिली किंवा
- पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस 50% ईसी (पीआय इंडस्ट्रीज - करीना) 400 मिली किंवा
- थायामेथोक्सम 12.6 + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 9.5% झेडसी (देहात-एन्टोकिल) 100 मिली किंवा
- बुप्रोफेझिन 15% + एसीफेट 35% डब्ल्यूपी (अदामा-टापझ) 400 ग्रॅम किंवा
- इंडोक्साकार्ब 14.5% + एसीटामिप्रिड 7.7% डब्ल्यू/डब्ल्यू एससी (घरडा-काईट) 160 ते 200 ग्रॅम किंवा
- डिनोटेफुरन 20% एसजी (पीआय इंडस्ट्रीज -ओशीन) 50 ग्रॅम ते 80 ग्रॅम प्रति एकरी 200 लिटर पाण्यातून फवारावे.
मावा कीटक (Aphid) :
मावा कीटकाची ओळख:
- मावा कीटक हा अतिशय लहान असतो.
- मावा कीटक हिरव्या किंवा तपकिरी रंगाचा असतो.
मावा कीटकाची लक्षणे (Symptoms):
- हे कीटक कोवळी पाने आणि शेंड्यातील रस शोषून घेतात.
- त्यामुळे नवीन पालवी येणे बंद होते.
- ही कीड सोंडेद्वारे झाडातील अन्नरस शोधते.
- मावाच्या अधिक प्रादुर्भावामुळे झाडे वाळतात.
मावा कीटक कोणत्या पिकांमध्ये कोणत्या विषाणूजन्य रोगांचे वहन करतो?
माठ, रानपोपटी, कांगुणी गवत तसेच टोमॅटो, मिरची, वांगी, पालक, चवळी, गाजर, कारली, खरबूज, कलिंगड, भोपळा - मोझॅक विषाणू
उपाय (Remedy):
- निंबोळी अर्क (5%) - 400 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी.
- इमिडाक्लोप्रिड 17.8% एसएल (बायर-कॉन्फिडोर) 100 मिली किंवा
- डायमेथोएट 30% ईसी (टाटा-टॅफगोर) 160 मिली किंवा
- इमिडाक्लोप्रिड 70% डब्ल्यूजी (देहात-कॉन्ट्रोपेस्ट) 40 ग्रॅम किंवा
- फेनप्रोपॅथ्रिन 30% ईसी (सुमिटोमो- मियोथ्रिन) 100 मिली किंवा
- बीटा-सायफ्लुथ्रिन + इमिडाक्लोप्रिड 300 ओडी (8.49 + 19.81% डब्ल्यू/डब्ल्यू) (बायर-सोलोमोन) 80 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी.
तुडतुडे (Jassid):
तुडतुडे कीटकाची ओळख:
- किडीची 4 ते 5 मि. मी. लांबी, रंग हिरवट करडा असून, आकार पाचरीसारखा असतो.
- डोक्यावर तपकिरी रंगाचे तीन ठिपके असतात.
- तुडतुडे चालताना तिरपे चालतात ही त्याची प्रमुख ओळख आहे.
तुडतुडे कीटकाची लक्षणे (Symptoms):
- तुडतुडे ही कीड पानातील रस शोषून घेते तसेच तुडतुडे आणि त्यांची पिल्ले पानाच्या खालच्या बाजूला राहून त्यातील रस शोषून घेतात.
- तुडतुड्यांच्या शरीरातून स्त्रवणाऱ्या गोड चिकट मधासारख्या पदार्थामुळे मिरचीवर, पानांवर काळ्या बुरशीची वाढ होते.
- प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेमध्ये अडथळा येतो.
- या किडीचा जास्त प्रादुर्भाव झाल्यास पाने मुरगळतात व परिणामी झाडांची वाढ खुंटते.
- तुडतुड्यांमुळे 50 ते 70% पर्यंत उत्पादनात घट येऊ शकते.
तुडतुडे कीटक कोणत्या पिकांमध्ये कोणत्या विषाणूजन्य रोगांचे वहन करतात?
- कलिंगड: कुकुरबीट फायलोड
उपाय (Remedy):
- या किडीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोरपीड 70% डब्ल्यू जी (देहात-कॉन्ट्रोपेस्ट) 40 ग्रॅम किंवा
- थायोमिथोक्सम 25% डब्ल्यूजी (देहात-असेर) 100 ग्रॅम किंवा
- डायमेथोएट 30% ईसी (टाटा-टॅफगोर) 160 मिली प्रति एकर 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
लाल व पिवळा कोळी (Red and Yellow Mite) :
लाल व पिवळा कोळी ओळख:
- रसशोषक किडींपैकी कोळी हा पिकाला लागणार एक महत्वाचा कीटक आहे.
- लाल कोळी पानांच्या खालील बाजूस जमावाने आढळतात.
लाल व पिवळ्या कोळी कीटकाची लक्षणे (Symptoms):
- पानांतील रस शोषून घेतात. त्यामुळे पाने पिवळी पडतात.
- झाडाची पाने खालच्या बाजूने झुकून चुरगळली जातात व पानांना उलट्या होडीचा आकार येतो.
- झाडाची वाढ खुंटली जाते, फुलगळ होते व फळांच्या देठावर आणि पानांवर लालसर तपकिरी रंगाचे डाग पडतात व नंतर गळ होते.
- कधीकधी झाडावरील पिकणार्या फळांच्या पृष्टभागावर ही कीड आढळते. त्यामुळे फळाची साल खडबडीत व अनैसर्गिक तपकिरी रंगाची दिसते.
- कीड इतकी लहान असते की, ती केवळ भिंगातून दिसते.
लाल व पिवळ्या कोळी साठी यजमान पिके:
भाजीपाला आणि फळपिकांमध्ये ऊदा. मिरची, वांगी, भेंडी, टोमॅटो, गुलाब, वेलवर्गीय पिके, कापूस, द्राक्षे, नारळ, डाळिंब, लिंबूवर्गीय फळपीक तसेच फुल व फळ पिकांमध्ये लाल व पिवळ्या कोळीचा जास्त प्रादुर्भाव दिसून येतो.
उपाय (Remedy):
- प्रॉपरगाईट 57% इ.सी. (धानुका-ओमाइट) 30 मिली प्रति 15 लिटर पंप एकरी फवारावे किंवा
- अबामेक्टिन 1.9% ईसी (क्रिस्टल-अबासिन) 150 मिली किंवा
- इटोक्साझोल 10% एससी (बोर्निओ-सुमिटोमो) 120-140 मिली किंवा
- स्पायरोमेसिफेन 22.9% एससी (बायर-ओबेरॉन) 160-200 मिली किंवा
- सल्फर 80% डब्ल्यूडीजी (ऍग्रोस्टार-सल्फर फास्ट एफडब्ल्यूडी) 700-1000 ग्रॅम प्रति 200 लीटर पाण्यातून एकरी फवारावे.
सर्व रसशोषक किडींचे (Sucking Pest) सुरुवातीच्या अवस्थेमध्ये नियंत्रण करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पिवळे चिकट सापळे - 10 नग + निळे चिकट सापळे - 10 नग प्रति एकरी लावावेत. पांढरी माशी, मावा आणि तुडतुडे पिवळ्या रंगाकडे आकर्षित होतात तर थ्रिप्स निळ्या रंगाकडे आकर्षित होतात.
फवारणी करताना घ्यावयाची काळजी:
- फवारणीसाठी गढूळ पाणी वापरू नये. स्वच्छ पाणीच वापरावे.
- फवारणी द्रावण प्लास्टिक बकेटमध्ये करावे.
- शक्य झाल्यास फवारणीच्या वेळेस आपण स्वतः शेतात हजर राहावे.
- फवारणीच्या दिवशी ढगाळ वातावरण असल्यास शक्यतोवर फवारणी करू नये व केल्यास बेस्ट स्टीकरचा वापर अवश्य करावा. तरीही ताबडतोब पाऊस पडल्यास फवारणीचा फायदा होत नाही.
- औषध तयार करताना प्रथम थोड्या पाण्यात घेऊन नंतर जास्त पाण्यात मिसळावे व व्यवस्थित ढवळून घ्यावे.
- फवारणी शक्यतोवर सकाळी व दुपारी 4 नंतर करावी. जास्त उन्हामध्ये कृषी रसायनांचे विघटन होते व पाहिजे तसे परिणाम दिसत नाहीत.
- तणनाशकांचा पंप फवारणीसाठी शक्यतोवर वापरू नाही.
- एकाच औषधाचा किंवा एकाच गटातील औषधांचा सतत वापर करू नये. त्यामुळे किडींमध्ये प्रतिकारशक्ती वाढते.
- कीटकनाशके, बुरशीनाशके, संजीवके, एकत्र फवारताना त्यांची सुसंगतता पडताळून पाहावी. द्रावण घट्ट झाल्यास, फाटल्यास किंवा न विरघळल्यास फवारू नये.
- फवारणीसाठी तयार करून ठेवलेल्या द्रावणाचा ताबडतोब वापर करावा, ते जास्त काळ ठेवू नये.
- फवारणी सर्व झाडावर खालीवर पानांच्या मागे-पुढे एकसमान होईल याची काळजी घ्यावी.
तुम्ही तुमच्या पिकांमधील रस शोषक किडींचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी डॉक्टर” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. रसशोषक किडी पिकाचे काय नुकसान करतात?
रसशोषक किडी पिकांमधील पानाचा रस शोषून (sap sucking insects) घेऊन पिकाला नुकसान पोहचवतात.
2. फुलकिडे कसे ओळखावे?
फुलकिडे आकाराने अतिशय लहान म्हणजेच 1 मीली. पेक्षा कमी लांबीचे असतात व फुलकिड्यांचा रंग हा फिकट पिवळा असतो.
3. तुडतुड्यांची प्रमुख ओळख काय?
तुडतुडे चालताना तिरपे चालतात ही त्याची प्रमुख ओळख आहे.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
