पोस्ट विवरण
सुने
खरपतवार
ईख
कृषि ज्ञान
तण व्यवस्थापन
DeHaat Channel
22 Sep
Follow

ऊसातील मोथा गवताचे व्यवस्थापन (Sugarcane Crop Motha Grass Management)

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

ऊस उत्पादनाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे एक महत्वाचे राज्य आहे. ऊस हे सर्वात मोठे नगदी पीक आहे. (Sugarcane crop) महाराष्ट्रात ऊसाचे पीक हे तीन हंगामात घेतले जाते. यामध्ये आडसाली, पूर्वहंगामी आणि सुरू हंगामी असे प्रकार आहेत. ऊसाचे पीक हे वर्षभर शेतात उभे असते, त्यामुळे ऊसात तणाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. ऊस लागवडीनंतर ऊस उगवायला साधारण 12 ते 15 दिवस लागतात परंतु तण हे तीन ते पाच दिवसातच उगवतात. वाढत्या तणामुळे उत्पादनात 40 ते 50 टक्के घट येते. तणांमुळे होणारे ऊस पिकाचे नुकसान हे कीड व रोग यांमुळे होणाऱ्या नुकसानी एवढेच आहे. ऊस वाढीच्या अवस्थेत तणांचा बंदोबस्त करणे आवश्यक असते. ऊसामध्ये सर्वसाधारणपणे हराळी, लव्हाळा, शिंपी, चिमणचारा, कुंदा, केना ही अरुंद पानांची गतवर्गीय तणे मोथा, घोळू, माठ, गाजरगवत, चांदवेल, दुधानी, उंदीरकानी, गोखरू ही रुंद पानाची गवतवर्गीय तणे आढळतात. ऊस बागायती पीक असल्यामुळे पिकाला वारंवार पाणी पाणी दिलं जातं पाण्याचे प्रमाण जास्त झाल्यास तिथे बेसुमार तणांची वाढ होत राहते. आजच्या आपल्या या भागात आपण यातीलच एका म्हणजे मोथा ताणाविषयी व त्याच्या व्यवस्थापनाविषयी जाणून घेणार आहोत.

मोथा गवत, ज्याला "सायपेरस रोटंडस" देखील म्हणतात, ही एक बारमाही वनस्पती आहे जी सुमारे 140 सेंटीमीटर (55 इंच) पर्यंत वाढू शकते. त्याचे कंद, ज्यांना "नट ग्रास" आणि "नट सेज" देखील म्हणतात. मोथा गवत 5-20 सेमी (2-8 इंच) लांब असते. त्याची फुले उभयलिंगी असतात.

मोथा गवत कसे ओळखावे? (How to Identify Motha Grass):

मोथा गवत, ज्याला तण म्हणून ओळखले जाते, त्याची ओळख पटणे शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण आहे. हे तण ओळखण्यासाठी पुढील गोष्टी मदत करू शकतात :

  • मोथा गवताची पाने लांब, पातळ आणि मोठी असतात, त्यांची उंची सुमारे 2 ते 6 फूट असते. त्याचा आकार त्यांची सहज ओळख करून देतात.
  • मोथा गवत गडद हिरवट-निळे किंवा फिकट तपकिरी रंगाचे असते आणि ते हळूहळू संपूर्ण शेतात पसरते, ज्यामुळे ते ओळखणे सोपे होते.
  • मोथा गवताची मुळे भूमिगत रूट नेटवर्क बनवतात, मोथा गवताची खोली आणि रुंदी समजून घेणे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आहे.
  • मोथा गवत हे शेताच्या बांधांवर, मातीवर आणि पिकांच्या दरम्यान पसरते. ज्यामुळे शेतकऱ्यांना याचा प्रसार स्थितीचा अंदाजा येऊ शकतो.
  • मोथा गवताच्या बिया पांढऱ्या आणि लहान असतात, ज्या कीटकांमार्फत आणि वाऱ्याने सहज पसरू शकतात, त्यामुळे त्यांच्या बाबतीत जागरूकता असणे महत्वाचे आहे.

मोथा तण नियंत्रण (Motha Weed Control):

  • उन्हाळ्यात शेताची खोल नांगरणी करावी.
  • नांगरणीनंतर मोथा गवताची झाडे काढून ती जाळून टाकावीत.
  • पिकात वेळेत भांगलण आणि खुरपणी करा.
  • पिकातील तण वेळेवर काढत रहा.
  • पिकामध्ये मोथा गवताची समस्या लक्षात आल्यास त्वरित तणनाशकाची फवारणी करावी.
  • वेगवेगळ्या प्रकारचे पिक चक्र वापरून मोथा गवत नियंत्रित करता येते.
  • पिकाला आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.
  • पिकाला जास्त प्रमाणात खते देऊ नये.

मोथा तणाचे नियंत्रण:

  • रासायनिक तणनाशकांचा वापर करून मोथा तणाचा बंदोबस्त करता येऊ शकतो.
  • तणनाशकाची पहिली फवारणी ऊस लागवडीनंतर जमिनीच्या वापश्यावर 3 ते 5 दिवसांनी व दूसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर 30 दिवसांनी करावी.
  • तणनाशकाची फवारणी करण्यासाठी खालील पैकी कोणत्याही एका तणनाशकाची फवारणी करावी.
  • ऊस आणि मका पिकातील मोथा तणासाठी हॅलोसल्फुरॉन मिथाइल 75% डब्ल्यूजी (धानुका-सेम्प्रा) 36 ग्रॅमची प्रति एकर 200 ली पाणी प्रमाणात फवारणी करावी.


तणनाशके फवारताना खालील गोष्टींची काळजी घ्या (Herbicide) :

  • तणनाशके खरेदी करताना अंतिम वापराची मुदत तपासावी. मुदत संपलेली तणनाशके वापरू नयेत.
  • तणनाशकाचा वापर शिफारशीनुसार व वेळेवर करावा.
  • तणनाशकांच्या फवारणीसाठी स्वतंत्र व पाठीवरचा पंप वापरावा.
  • तणनाशक फवारताना द्रावण सतत ढवळावे. संपूर्ण क्षेत्रावर एकसारखे तणनाशक फवारावे.
  • तणनाशकांची फवारणी सर्व ठिकाणी एकसमान दाबाखाली करावी. फवारणीसाठी फ्लॅट फॅन किंवा फ्लडजेट नोझल वापरावेत.
  • तणनाशक फवारल्यानंतर तीन ते चार दिवस जमिनीची कोणतीही मशागत करू नये.
  • रासायनिक तणनाशकांचा वापर हा तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.
  • तणनाशके फवारताना जमीन ढेकळेरहित, भुसभुशीत असावी. जमिनीमध्ये ओल असावी.
  • तणनाशकांची फवारणी करण्यापूर्वी वाऱ्याचा वेग, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि पाऊस येण्याची शक्यता या बाबी विचारात घ्याव्यात.
  • फवारणीवेळी फवारा मारणाऱ्या व्यक्तीने मागे सरकत जावे. जेणेकरून तणनाशके फवारलेल्या जागी पावले पडणार नाहीत.
  • उभ्या पिकांमध्ये फवारणी करताना द्रावण मुख्य पिकांवर किंवा इतर पिकांवर जाणार नाही याची काळजी घ्यावी. यासाठी हूडचा वापर करावा.
  • तणनाशकांचा आवश्यकतेनुसार शिफारशीत प्रमाणात वापर करावा. तणनाशकांचा वारंवार आणि अतिरेकी वापर करणे टाळावे.
  • तणनाशके वापरलेल्या जमिनीत दरवर्षी शेणखत, कंपोस्ट खत किंवा गांडूळ खताचा वापर करावा.

तुम्ही तुमच्या ऊस पिकाचे मोथा तणांपासून संरक्षण कसे करता? आणि कोणती तणनाशके वापरता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “तण व्यवस्थापन” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. ऊसाची लागवड महाराष्ट्रात कोणत्या हंगामात करतात?

महाराष्ट्रात ऊसाचे पीक हे तीन हंगामात घेतले जाते. यामध्ये आडसाली, पूर्वहंगामी आणि सुरू हंगामी असे प्रकार आहेत.

2. ऊस पिकातील प्रमुख तण कोणते?

ऊसामध्ये सर्वसाधारणपणे हराळी, लव्हाळा, शिंपी, चिमणचारा, कुंदा, केना ही अरुंद पानांची गतवर्गीय तणे मोथा, माठ, गाजरगवत, चांदवेल, दुधानी, उंदीरकानी, गोखरू ही रुंद पानाची गवतवर्गीय तणे आढळतात.

3. महाराष्ट्रातील सर्वात जास्त ऊस उत्पादक जिल्हे कोणते?

पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर आणि औरंगाबाद हे प्रमुख ऊस उत्पादक जिल्हे आहेत.

50 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ