ऊस पिकातील पाचट व्यवस्थापन! (Sugarcane Crop: Trash Management)
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
भारतात ऊसाला नगदी पिकाचा दर्जा देण्यात आला आहे. ऊस उत्पादनाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे एक महत्वाचे राज्य आहे. (Sugarcane crop) महाराष्ट्रात ऊसाचे पीक हे तीन हंगामात घेतले जाते. यामध्ये आडसाली, पूर्वहंगामी आणि सुरू हंगामी असे प्रकार आहेत. भारतातील ऊस पिकाच्या 13 टक्के क्षेत्र महाराष्ट्र राज्यातील असून देशातील ऊस उत्पादनाच्या 15 टक्के उत्पादन राज्यात होते. ऊस तोडून गेल्यानंतर जी वाळलेली पाने शेतात पडतात, त्यास पाचट असे म्हणतात. आज आपण ऊस पिकातील याच पाचट व्यवस्थापनाविषयी जाणून घेणार आहोत.
जाणून घेऊया ऊस पिकातील पाचटाविषयी (Sugarcane Trash):
- ऊस पाचटातील पोषक घटक जाळून नष्ट करण्याऐवजी त्याचे जमिनीवर आच्छादन केल्यास अधिक फायदा होतो.
- पाचटाचे योग्य प्रकारे व्यवस्थापन केल्यास, पाचट जमिनीच्या सुपीकता व सजीवतेसाठी उपयुक्त ठरतात.
- बहुतांश शेतकरी शेताच्या स्वच्छतेसाठी म्हणून पाचट जाळतात.
- पाचट हाताळण्यात येणाऱ्या अडचणी, पाचटाने झाकले गेल्यास खोडव्याची कमी होणारी उगवण आणि नंतर आंतरमशागतीमध्ये येणारे अडथळे यामुळे शेतकऱ्यांना पाचट जाळणे ही पारंपरिक पद्धत अधिक सोयीची वाटते. मात्र, पाचटाचे आच्छादन जमिनीवर केल्यास होणारे फायदे तुलनात्मकदृष्ट्या अधिक असल्याचे संशोधनात आढळले आहेत.
पाचट जाळण्याचे दुष्परिणाम:
- पाचट जाळल्याने खोडव्याची उगवण क्षमता 68 टक्के राहते; तर पाचट न जाळता केलेल्या योग्य व्यवस्थापनामुळे ती 82 टक्के राहत असल्याचे संशोधनात आढळले आहे.
- पाचट जाळल्याने पर्यावरणात प्रदूषण होते.
- जमिनीच्या वरील थरातील सुक्ष्मजीवांचे प्रमाण कमी होते; तसेच सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होते. परिणामी, जमिनीची सुपीकता व भौतिक स्थिती बिघडते.
- पाचटामध्ये असलेले सेंद्रिय कर्ब आणि मूलद्रव्ये जळून जातात. त्यांची अत्यंत अल्प प्रमाणात राख शिल्लक राहते.
एक एकर मधून आपल्याला किती पाचट मिळते?
- ऊस तोडून गेल्यानंतर जी वाळलेली पाने शेतात पडतात, त्यास पाचट असे म्हणतात.
- पाचटामध्ये लिग्रिनचे प्रमाण 15 टक्के असते.
- पाचटावर टोकदार केसासारखी कुसे असल्यामुळे जनावरे ते पाचट खात नाहीत.
- पाचट लवकर भरभर जळून राख होते. त्यामुळे पाचटाचा उपयोग जाळण्यासाठी करता येत नाही.
- सर्वसाधारणपणे एक एकर शेतातून 3 ते 4 टन पाचट उपलब्ध होते व त्यापासून 1 ते 2 टन सेंद्रिय खत मिळते.
ऊस पाचट व्यवस्थापन (Sugarcane Trash Management):
शेतामध्ये करावयाची खत निर्मिती -
- ऊसाच्या पाचटात 0.5 टक्के नत्र, 0.2 टक्के स्फुरद आणि 0.7 ते 1 टक्के पालाश आणि 32 ते 40 टक्के सेंद्रिय कर्ब असते.
- ऊस तोडणीच्या वेळी पाचट ओळीत न लावता जागच्या जागी ठेवावे. शेतात एखाद्या ठिकाणी पाचटाचा ढीग राहिल्यास तो पसरून द्यावा. शक्य असल्यास पाचट कुट्टी मशीन किंवा रोटावेटर ने पाचट बारीक करून घ्यावे. त्यानंतर ऊसाच्या बुडख्यावर असलेले पाचट बाजूला करून ऊसाचे बुडखे मोकळे करावेत.
- ऊसाचे बुडखे मोठे राहिल्यास ते जमिनीलगत धारदार कोयत्याने छाटून घ्यावेत. त्यामुळे जमिनीखालील कोंब फुटण्यास वाव मिळतो व फुटव्यांची एकूण संख्या वाढते.
- शेतात पसरलेल्या पाचटावर प्रति एकरी 40 किलो युरिया, 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ऊसाचे पाचट 45 दिवसांच्या आत कुजवायचे असले तर पाचट कुजविणारे जिवाणू डॉ. बेक्टो 5 जी फास्ट डी 2 कॅप्सूल प्रति एकरी फवारणी करावी. त्यानंतर ऊसास पाणी द्यावे.
- जमीन ओली असताना सरीतील पाचट (sugarcane trash management) पायाने थोडे दाबून द्यावे किंवा शेतात जनावरे मोकळी सोडावीत. जनावरांच्या पायाने पाचट दबण्यास मदत होतेः
- पाचटाचा मातीशी संबंध येऊन ते हळूहळू कुजण्याची क्रिया सुरू होते. ऊस तुटून गेल्यावर पहिल्या 15 दिवसात ही क्रिया करावी.
शेताच्या बाहेर करावयाची खत निर्मिती -
- शेताच्या बाहेर सेंद्रिय खत तयार करण्यासाठी एक टन पाचटासाठी 2 मीटर रुंद व 1 मीटर खोल आणि 5 ते 6 मीटर लांबीचा खडा घ्यावा तसेच शक्य झाल्यास त्या पाचटाचे लहान तुकडे करावे. त्यामुळे पाचट लवकर कुजण्यास मदत होते.
- पाचटाच्या सुरुवातीला 20 ते 30 सें.मी. जाडीचा थर देऊन या थरावर एक टन पाचटासाठी 8 किलो युरिया व 10 किलो सिंगल सुपर फॉस्फेट व 100 लिटर पाणी शिंपडावे. त्यानंतर 1 किलो पाचट कुजविणाऱ्या जिवाणू संवर्धनाचे मिश्रण असलेल्या शेणकाला समप्रमाणात पाचटावर टाकावे. तसेच आवश्यकता वाटल्यास जास्त पाणी शिंपडावे.
- रासायनिक खतांचे द्रावण व जिवाणू संवर्धनाच्या द्रावणांचे एकत्रित मिश्रण न वापरता स्वतंत्रपणे वापरावे. अशारितीने पाचटाचे वरचा भाग शेणमातीने झाकून घ्यावे.
- एक ते दीड महिन्याच्या अंतराने खड्याची चाळणी करावी व आवश्यकतेनुसार खड्यामध्ये ओलावा टिकून राहण्यासाठी पाणी शिंपडावे.
- साधारणतः 60 टक्के ओलावा राहील या बेताने पाण्याचा वापर करावा. अशाप्रकारे चार ते साडेचार महिन्यात पाचटापासून उत्तम प्रतीचे सेंद्रिय खत तयार होते.
शेतातील पाचट लवकर का कुजत नाही त्याची कारणे:
- ऊसाच्या पाचटामधील कर्ब: नत्र यांचे गुणोत्तर हे 122:1 असे असते. यातील कर्बाचे प्रमाण अधिक असले तरी नत्राची उपलब्धता कमी असल्याने जिवाणूंना अधिक वेळ लागतो.
- कर्बामुळे जिवाणूंना उर्जा मिळते; तर नत्रापासून प्रथिने मिळतात. जिवाणूंच्या चांगल्या वाढीसाठी पिकांच्या अवशेषांतील कर्ब: नत्र गुणोत्तर 24:1 असे असावे. असे गुणोत्तर शेणखत किंवा कंपोस्ट खतामध्ये असते. त्यामुळे त्यामध्ये जिवाणूंचे प्रमाण अधिक असते.
पाचट आच्छादनाचे फायदे:
- एकरी सुमारे 3-4 टन पाचट तयार होते. त्यात भरपूर प्रमाणात सेंद्रिय कर्ब व मूलद्रव्ये असतात. प्रतिटन पाचटामध्ये 5.4 किलो नत्र, 1.3 किलो स्फुरद व 3.1 किलो पालाश व अन्य सूक्ष्म मूलद्रव्ये असतात. ती व्यवस्थित कुजल्यानंतर खोडव्याला उपलब्ध होतात.
- आच्छादनामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होऊन मातीतील ओलावा टिकून राहतो. पाण्याच्या पाळ्यातील अंतर वाढवणे शक्य होते. खोडव्याला कमी पाण्यात व दुष्काळी परिस्थितीतही तग धरणे शक्य होते.
- जमिनीचे तापमान एका पातळीपर्यंत स्थिर राहते. ते उन्हाळ्यात फार वाढत नाही, तर हिवाळ्यात फार थंड होत नाही.
- तण नियंत्रणाचा खर्च कमी होतो.
- ओलावा, भरपूर सेंद्रिय कर्ब यामुळे शेतात गांडुळांची संख्या वाढते.
- सेंद्रिय कर्ब वाढल्याने जमिनीची सुपीकता वाढते. पिकाला मिळणाऱ्या मूलद्रव्यात वाढ झाल्याने उत्पादनात 12 ते 13% वाढ होते.
- हिरवळीसाठी किंवा शेणखतासाठी लागणाऱ्या खर्चात बचत होते.
पाचट जाळल्यामुळे होणारे तोटे:
- पाचट जाळल्यामुळे सेंद्रिय कर्ब, नत्र, स्फुरद व पालाश या अन्नद्रव्यांचा नाश होतो.
- जमीन तापल्यामुळे नत्र व इतर अन्नघटकांचा थोड्याफार प्रमाणात वायुरुपात नाश होतो.
- पाचट जाळल्यामुळे 100 टक्के नत्र व 75 टक्के इतर अन्नघटक वाया जातात.
- पाचटावर असलेल्या मित्र कीटकांचा सुध्दा नाश होतो.
तुम्ही ऊस पिकात पाचट व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. ऊसाची लागवड महाराष्ट्रात कोणत्या हंगामात करतात?
महाराष्ट्रात ऊसाचे पीक हे तीन हंगामात घेतले जाते. यामध्ये आडसाली, पूर्वहंगामी आणि सुरू हंगामी असे प्रकार आहेत.
2. महाराष्ट्रातील सर्वात जास्त ऊस उत्पादक जिल्हे कोणते?
पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर आणि औरंगाबाद हे प्रमुख ऊस उत्पादक जिल्हे आहेत.
3. ऊसातील पाचट म्हणजे काय?
ऊस तोडून गेल्यानंतर जी वाळलेली पाने शेतात पडतात, त्यास पाचट असे म्हणतात.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ