पोस्ट विवरण
सुने
कृषि
कृषि ज्ञान
शेतकरी डॉक्टर
DeHaat Channel
3 Dec
Follow

थंड हवामानात पिकांमध्ये तणावाची लक्षणे आणि प्रतिबंध (Symptoms and prevention of stress in cold weather crops)


नमस्कार शेतकरी बंधूंनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांमध्ये माती, हवामान, आणि पाणी उपलब्धतेनुसार पिकांची विविधता आढळून येते. हिवाळी हवामानातील दंव, धुके पिकांवर नकारात्मक परिणाम करून त्यांची गुणवत्ता आणि उत्पादन प्रभावित करते. या ऋतूतील कोरडेपणामुळे जिवाणूजन्य रोग होऊ शकतात, ज्यामुळे फळांवर डाग पडतात. त्यांची प्रत कमी होते, बाहेरील कवच आणि चव देखील कमी होते. पिकांवर तापमानाचा अनिष्ठ परिणाम होतो. याच बदलत्या हवामानापासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी आजच्या आपल्या या भागात आपण थंड हवामानात पिकांमध्ये दिसून येणारी तणावाची लक्षणे आणि प्रतिबंध याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.

कोणत्याही वनस्पतींच्या वाढीवर हवामानातील फरकाचा कमी जास्त प्रमाणात परिणाम होतच असतो. विविध फळपिकांमध्ये मुख्यतः तापमान बदलाचा परिणाम होतो. हिवाळ्यामध्ये तापमान 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाले तर त्याचा पिकांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. अति थंड हवामान, थंडीची लाट (Cold wave), धुके, थंड वारे आणि गारा आदी कारणांमुळे झाडांना इजा होते. परिणामी फळझाडांचे मोठे नुकसान होते. अशा प्रतिकूल हवामानात फळझाडांवर होणारा अनिष्ट परिणाम होतो. जाणून घेऊया लक्षणे:

  • कमी तापमानामुळे झाडांची वाढ मंदावते, जमिनीचे तापमान कमी होते, वनस्पतींच्या पेशी मरतात, फळपिकांमध्ये फळे तडकतात यामध्ये प्रामुख्याने द्राक्षे, केळी, डाळिंब, बोर, अंजीर, पपई इत्यादी फळपिकांना हे प्रमाण जास्त असते. अशा फळांना योग्य बाजारभाव मिळत नाही. केळी पिकांमध्ये घड बाहेर पडत नाही. रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव वाढतो.
  • थंड हवामानामुळे फुले, फळे, पाने, खोड आणि मुळ्या यांवर प्रतिकूल परिणाम होतो. अति थंड हवामानात पेशींमधील पाणी गोठून पेशीकणातील पाणी नष्ट झाल्यामुळे त्या शक्तिहीन होऊन पेशी मरू लागतात. पाणी गोठण्याच्या तापमानात झाडाची पाने, खोड यांच्या पेशीमधील पाणी गोठण्याची प्रतिकारशक्ती ज्या प्रमाणात असेल त्या प्रमाणात झाडे अशा थंड हवामानाला प्रतिकार करू शकतात.
  • अति थंड तापमानामुळे खोड आणि फांद्या यांच्या आतील भाग काळा पडून ठिसूळ बनतो. विशेषतः रोपवाटिकेतील कोवळी कलमे यास बळी पडतात. कोवळी पाने, फूट आणि फांद्या सुकतात.
  • तापमान कमी झाल्यास खोडाच्या सालीला इजा होऊन साल फाटते. कधी कधी ही इजा खालील मुळ्यापर्यंत पोहोचते. अशावेळी सालीचा इजा झालेला भाग खरडून जखमेला बोर्डोपेस्ट लावून त्यात बुरशीचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होते.
  • उष्ण हवामानात वाढणाऱ्या फळझाडांच्या मोहराला थंड लहरीमुळे जास्त नुकसान पोहोचते. आंब्याचा मोहोर जळतो. सदाहरित झाडे ही पानगळ होणाऱ्या झाडांपेक्षा लवकर आणि जास्त प्रमाणात नाजूक असून ती थंडीच्या दुष्परिणामास बळी पडतात. तापमान २ अंश सेल्सिअसच्या खाली गेल्यास पपईची वाढ थांबते. फळांची प्रत बिघडते. जास्त थंडीमुळे झाडे मरतात.
  • तापमान 4 ते 5 अंश सेल्सिअसच्या खाली गेले तर केळी झाडांची वाढ मंदावते. पाने पिवळी पडतात, केळफूल बाहेर पडत नाही. फळांना चिरा पडतात. द्राक्ष वेलीच्या वाढीच्या आणि फुलोऱ्याच्या काळात कडक थंडीचा वाईट परिणाम होतो. द्राक्षाची फळे गळतात, फळांची प्रत खराब होते. द्राक्षाची कोवळी फूट, पाने आणि मणी यांची नासाडी होते.
  • संत्रा, मोसंबीत 10 अंश सेल्सिअसच्या खाली तापमानात वाढ थांबते. फलधारणा होत नाही. डाळिंब व लिंबू फळांची साल तडकते.

उपाययोजना :

  • थंडी, उष्ण तापमान आणि वारा यांच्यापासून संरक्षण करण्याकरिता वाऱ्याच्या बाजूने वारा प्रतिबंध झाडांची (सुरू, बोगनवेल, बांबू, घायपात मलबेरी, शेवगा, शेवरी, खडसरणी, पांगारा, ग्लिरीसिडीया इ.) रांग लावावी.
  • बागेच्या सभोवार मध्यम उंच कुंपण घालून झाडांची लागवड करावी. उदा. शेवरी, मेंदी, चिलार, कोयनेल, एरंडी, घायपात इ. झाडांची सतत निगा व छाटणी करावी.
  • मुख्य फळझाडे लहान असल्यास रब्बी हंगामात दोन झाडांतील मोकळ्या जागेत, उघड्या जमिनीवर दाट पसरणारी आंतरपिके घ्यावीत. उदा. हरभरा, वाटणा, घेवडा, पानकोबी, फुलकोबी, मुग, मटकी इ.
  • केळी, पपई व पानवेलीच्या भोवती दाट शेवरी लावावी.
  • फळझाडांच्या ओळीत किंवा बांधावर पहाटेच्या वेळी मध्यम ओलसर पालापाचोळा पेटवून धूर करावा. बागेत रात्रभर धूर व उष्णता राहील याची काळजी करावी.
  • बागेस रात्री पाणी द्यावे. यामुळे जमिनीचे तापमान वाढते. पर्यायाने बागेतील तापमान वाढीस मदत होते.
  • थंडीची लाट येणार हे लक्षात येताच सायंकाळी फळझाडांना विहिरीचे हलके पाणी द्यावे. विहिरीच्या पाण्याचे तापमान कालव्याच्या पाण्यापेक्षा थोडे जास्त असते, अशी ओली जमीन लवकर थंड होत नाही.
  • झाडांच्या खोडाजवळ व आळ्यात गवत, कडबा पाचोळा, गव्हाचे तूस इ. आवरण घालावे.
  • केळीच्या बागेस रात्रीच्या वेळेस पाणी द्यावे. प्रती झाड 100 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. केळीच्या घडाभोवती व खोडाभोवती त्याच झाडांची पाने गुंडाळावीत.
  • द्राक्ष बागेस सभोवती गोणपाट किंवा इतर कापडांचे पडदे लावावेत. याचा उपयोग म्हणजे बागेत थंड हवेची लाट अडवली जाते.
  • डाळिंबाची फळे तडकू नयेत म्हणून नियमित पाणी द्यावे.
  • रोपवाटिकेतील रोपे, कलमे, रोपांचे वाफे यावर रात्री आच्छादन घालावे व सकाळी ते काढावे. त्यासाठी काळे प्लॅस्टिक, पोती यांचा उपयोग करावा.
  • सल्फर 90% WDG (देहात-न्यूट्री) - 3 किलो प्रति एकर या प्रमाणात पाण्यावाटे द्यावे.
  • झाडावरील ताण दूर करण्यासाठी अकिलिस GA (देहात-न्यूट्री) ची 2 मि.ली. प्रति लीटर या प्रमाणात द्यावे.
  • पालाशयुक्त वरखत किंवा राख खत म्हणून दिल्यास झाडांची जल व अन्नद्रव्य शोषणाची आणि वहनाची क्षमता वाढून पेशींचा काटकपणा वाढतो.

हिवाळ्यातील पिकांची योग्य पद्धतीने काळजी घेतल्यास शेतकऱ्यांना उत्पादन वाढवता येते आणि त्याचबरोबर आर्थिक लाभही मिळू शकतो. थंडीत पिकांना विशिष्ट प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागतो, जसे की कमी तापमान, दंव, गारपीट, आणि जमिनीतील ओलाव्याची कमी होणारी पातळी. या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी योग्य जमिनीची तयारी, मल्चिंग, सिंचनाच्या पद्धतींचा वापर, पोषण व्यवस्थापन, आणि रोग व कीड नियंत्रण यांचा समावेश असलेले एक समग्र दृष्टिकोन आवश्यक आहे.

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांतील भौगोलिक आणि हवामानाच्या गरजांनुसार पिकांचे व्यवस्थापन करून शेतकरी उत्पादन आणि गुणवत्ता वाढवू शकतात. तुम्ही थंड हवामानात तुमच्या पिकांची काळजी कशी घेता? काय उपाययोजना करता? याविषयीची माहिती इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी डॉक्टर” चॅनेलला फॉलो करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. हिवाळ्यामध्ये साधारणतः किती तापमानामुळे पिकांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो?

हिवाळ्यामध्ये तापमान 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाले तर त्याचा पिकांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो.

2. हिवाळ्यामध्ये पिकांवर काय परिणाम झाल्याचे दिसून येते?

हिवाळ्यातील कोरडेपणामुळे जिवाणूजन्य रोग होऊ शकतात, ज्यामुळे फळांवर डाग पडतात. त्यांची प्रत कमी होते, बाहेरील कवच आणि चव देखील कमी होते.

3. हिवाळ्यात थंड हवामानामुळे कोणती पिके तडकतात?

हिवाळ्यात द्राक्षे, केळी, डाळिंब, बोर, अंजीर, पपई इत्यादी फळपिके थंड हवामानामुळे तडकतात.

40 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ