पोस्ट विवरण
सुने
पशु ज्ञान
DeHaat Channel
4 Jan
Follow

थंडीमध्ये जनावरांचे करा या पद्धतीने नियोजन

नमस्कार पशुपालकांनो,

सध्या हिवाळा ऋतू सुरु असून थंडीच्या प्रमाणात वाढ होत आहे. हिवाळ्यात गाई-म्हशी विण्याचे प्रमाण जास्त असते. थंड वातावरणामुळे नवजात वासरांची विशेष काळजी घेणे महत्वाचे असते.तसेच थंडीमुळे दुधाळ गाई म्हशींवर त्याचे विपरीत परिणाम दिसून येतात नवीन ऋतूमध्ये जनावरांना त्या वातावरणाशी जुळवून घेणे थोडे अवघड जाते. हवामान बदलाचे जनावरांच्या शरीरावर विपरीत परिणाम दिसून येतात. म्हणूनच आजच्या या लेखात आपण थंडीमध्ये जनावरांचे कशा पद्धतीने नियोजन करावे याविषयी जाणून घेणार आहोत.

कडाक्याच्या थंडीमुळे जनावरांवर होणारे परिणाम:

 • थंडी जास्त असल्याने जनावरे पाणी कमी पितात.
 • जनावरे चारा जास्त प्रमाणात खात नाहीत त्यामुळे दूध कमी देतात.
 • जनावरांना संतुलित आहार न मिळाल्याने जनावरे अशक्त होतात.
 • हिवाळ्यात त्वचेला भेगा पडून दूध काढताना रक्त येते.
 • जनावरांची त्वचा खडबडीत होते व त्वचेला खाज सुटते.
 • जनावरांचे स्नायू आखडतात, काही जनावरे लंगडतात तसेच जनावरांना उठता येत नाही.
 • अतिथंडीमुळे जनावरे तसेच अशक्त वासरे मृत्युमुखी पडतात.

लहान वासरांसाठी उपाययोजना:

 • लहान वासरांना थंड पाणी किंवा दूध पिण्यास देऊ नये. ते कोमट स्वरूपाचे असावे.
 • नवजात वासरांना गुळाचे कोमट पाणी दररोज पाजावे जेणेकरून त्यांना ऊर्जा मिळेल आणि वासरे सदृढ राहतील.
 • नवजात वासराचे कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून वासराच्या बसण्याच्या जागेवर गव्हाचे काड, वाळलेले गवत, लाकडाचा भुसा, ऊसाची पाचट कुट्टी टाकावी जेणेकरून वासरांना त्यातुन ऊब मिळेल.
 • लहान वासरांच्या छातीचा भाग संरक्षित करावा. जेणेकरून वासरांचा न्यूमोनिया पासून बचाव होईल.
 • वासरांचे थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून अंगावर कपडा किंव्हा गोणपाटाचे पोते शरीराच्या आकारमानानुसार शिवून घ्यावे. शक्य नसल्यास विकत घ्यावे.
 • हिवाळ्यामध्ये गोठ्यात कुठल्याही प्रकारचा थंडावा निर्माण होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी.
 • वासरे बांधण्याचा गोठा किंवा कंपार्टमेंट स्वच्छ व निर्जंतुक ठेवावे.

गाई-म्हशींसाठी करावयाच्या उपाययोजना:

 • जनावरांना मुक्त गोठ्यामध्ये थंडीत ठेवू नये त्यांना शेड मध्ये बांधावे व कडेने कापडाचे किंव्हा गोणपाटाचे जाड पडदे बसवून घ्यावेत.
 • गोठ्यात गाई, म्हशी, मोठ्या कालवडी धुवू नयेत.
 • जनावरे स्वच्छ राहण्यासाठी जास्तीत-जास्त परिसर कोरडा ठेवावा.
 • जनावरे जास्त खराब झाली असतील आणि धुवायचीच असतील तर ती गरम कोमट पाण्याने दुपारी ऊन पडल्यावर धुवावीत.
 • रात्री गोठ्याच्या खिडकीस पोत्यांचे किंवा गोणपाटांचे पडदे लावावेत. तसेच ते पडदे सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत उघडे ठेवावेत.
 • गोठ्यातील तापमान समजण्यासाठी तापमापी लावावी जेणेकरून तापमान कमी जास्त झाले तर समजून येईल.
 • गोठ्यामध्ये विजेचे बल्ब लावावेत तसेच इलेक्ट्रिक हिटर लावावे. जेणेकरून गोठ्यात ऊब निर्माण होईल. शक्य नसल्यास शेकोट्या पेटवाव्यात.
 • हिवाळ्यात जनावरांना सिमेंट काँक्रीटवर बसण्यापासून रोखावे.
 • जनावरांना बसण्यासाठी चांगली गादी व्यवस्था असली की ताण निर्माण होत नाही परिणामी शरीर गरम राहते.
 • जनावरांना बसण्यासाठी वाळलेले गवत, भुसा, भाताचे, गव्हाचे काड, उसाची पाचट कुट्टी यांच्या सहाय्याने गादी तयार करावी
 • गादीमुळे जनावरांच्या छाती व पोटाला ऊब मिळून त्यांचे संरक्षण होते.
 • शेडची दिशा दक्षिण-उत्तर असावी जेणेकरून सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात गोठ्यात येऊन जनावरांना ड जीवनसत्व मोठ्या प्रमाणात मिळेल. त्यामुळे हाडाचे व खुरांचे विकार होणार नाहीत जनावरे निरोगी राहतील.
 • थंडीमुळे गाईच्या सडांना चिरा पडू नयेत म्हणून एरंडेल तेल, ग्लिसरीनचा किंवा पेट्रोलियम जेलचा वापर करावा.
 • दूध काढताना जनावराची कास धुण्यासाठी तसेच लवकर पान्हा सोडण्यासाठी गरम-कोमट पाण्याचा वापर करावा. नंतरच धार काढावी किंव्हा क्लस्टर लावावे.
 • हिवाळ्यात जनावरांना सिमेंटच्या टाकीतील पाणी पिण्यासाठी देऊ नयेत त्यासाठी प्लास्टिकचे ड्रम वावरावेत. पाण्याचे तापमान जनावराच्या शरीराच्या जवळपास म्हणजे 37 ते 40 अंश सेल्सिअस असावे.
 • शारीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी जास्त प्रमाणात ऊर्जा वापर होत असल्याने, जनावरांना जास्त ऊर्जा मिळेल असे खाद्य द्यावे उदा, मका, ज्वारी गहू, बाजरी भरडा, दररोज पाण्याबरोबर काळा गुळ द्यावा. जेणेकरून खर्च झालेली ऊर्जा भरून निघेल.
 • हिवाळ्यात वातावरणात गारठा जास्त असल्याने जनावरे पाणी कमी पितात त्यामुळे दूध उत्पादनात कमतरता जाणवते तर जनावरांना भरपूर पाणी पाजावे,
 • हिवाळ्यातील जनावरांच्या गरजेनुसार पशुखाद्य कंपनीकडून आहार बनवून घ्यावा.
 • जनावरांच्या आहारात ज्वारीचा कडबा किंवा मकेच्या मुरघासाचा वापर करावा.

तुम्ही थंडीमध्ये आपल्या जनावरांचे संरक्षण कसे करता? याविषयीची माहिती इतर पशुपालकांसह शेयर करा. या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, अशा अजून माहितीसाठी "पशु ज्ञान" चॅनेलला फॉलो करा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.


57 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ