पोस्ट विवरण
सुने
पशु पालन
पशु ज्ञान
DeHaat Channel
12 Dec
Follow

थंडीमध्ये जनावरांची घ्यायची काळजी

नमस्कार पशुपालकांनो,

डिसेंबर महिना मध्यावर आला आहे थंडीचे दिवस सुरु झाले आहेत. माणूस थंडीपासून बचाव करण्यासाठी विविध गोष्टींचा उपयोग करीत असतो. मात्र मुक्या जनावारांचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आपल्यालाच त्याप्रमाणे काळजी घेणे आवश्यक असते. म्हणूनच आजच्या या लेखात आपण थंडीमध्ये जनावरांच्या घ्यावयाच्या काळजीविषयी जाणून घेणार आहोत.

थंडीमुळे होणारे दुष्परिणाम :

  • थंडीमुळे जनावरांचे स्नायू आखडतात. काही जनावरे लंगडतात. तसेच त्यांची त्वचा खरबरीत होते.
  • बऱ्याच वेळा जनावरांचे पोट गच्च होऊन रवंथ करणे कमी होते.
  • सडावर भेगा पडून दूध काढताना रक्त येते किंवा जनावर दूध काढू देत नाही, अस्वस्थ होतात.
  • ऊर्जेची गरज वाढते त्यामुळे जनावरांना या काळात चाऱ्याची जास्त गरज असते. चारा कमी पडल्यास जनावर अशक्त दिसते.
  • दुधाळ जनावरे पान्हा व्यवस्थित सोडत नाही त्यामुळे दूध उत्पादनात घट होऊन दुधाच्या प्रतिवरही परिणाम होतो.
  • शेळ्यांची करडे आणि म्हशीची वासरं अतिथंडीमुळे गारठून मृत्युमुखी पडतात.
  • हिवाळ्यात पाणी कमी पिण्यामुळे जनावरांच्या दूध उत्पादनात घट होते.
  • गोठा लवकर कोरडा होत नाही. त्यामुळे दुर्गंधी उद्‌भवू शकते. दुधाळ जनावरांना दुग्धज्वर आजार होण्याची शक्यता वाढते.

उपाययोजना :

  • हिवाळ्यात उघड्या गोठ्याच्या चारही बाजूने, खिडक्यांना पोत्याचे पडदे तयार करून बांधावेत. हे पडदे रात्रभर किंवा जास्त थंडीमध्ये बंद ठेवावेत व सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत उघडे ठेवावेत. जनावरांना एकदम उघड्या गोठ्यामध्ये ठेवू नये. गोठ्यामध्ये जनावरांना उबदारपणा मिळेल यासाठी प्रयत्न करावेत. उबदारपणासाठी गोठ्यात जास्त वॅटचे बल्ब लावावेत. गोठ्यामध्ये जनावरांना बसण्यासाठी भाताचे किंवा गव्हाचे काड वापरून गादी तयार करावी.
  • जनावरांना थंडीच्या काळात दुपारी ऊन असताना धुवावे. जनावरांना धुण्यासाठी शक्यतो गरम-कोमट पाण्याचा वापर करावा.
  • सकाळचे व सायंकाळचे ऊन येईल अशी गोठ्याची रचना करावी.
  • सडाची त्वचा मऊ राहावी, भेगा पडू नयेत, यासाठी ग्लिसरीनचा वापर करावा. सडाला भेगा पडल्यास तात्काळ उपचार करावेत.
  • दूध दोहनावेळी कास धुण्यासाठी गरम-कोमट पाण्याचा वापर करावा.
  • हिवाळ्यातील जास्तीच्या ऊर्जेची गरज भागवण्यासाठी जनावरांना पोषक चारा जास्त प्रमाणात उपलब्ध करून द्यावा. जास्त ऊर्जायुक्त खाद्य पदार्थांचा आहारात वापर करावा. संरक्षित स्निग्ध पदार्थांचा जनावरांच्या आहारात वापर करावा. जेणेकरून जास्तीच्या ऊर्जेची गरज पूर्ण होऊन जनावरातील अपचन टाळता येईल.
  • जनावराने व्यवस्थित पान्हा सोडण्यासाठी कास धुण्यासाठी आणि वासरांना धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा. दुधाळ जनावरांना शक्यतो एकदम थंड वारे लागणार नाही अशा ठिकाणी ठेवावे.
  • करडांना उबदारपणा मिळण्यासाठी लाकडी डालीखाली गव्हाचे काड, भाताचे तूस पसरवून किंवा पोत्यावर ठेवावे. शेडमध्ये जास्त वॅटचे बल्ब लावावेत किंवा रुम हिटरचा वापर करावा. सायंकाळी शेडमध्ये थंड हवेचा वासरांशी प्रत्यक्ष संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी. गायी-म्हशीच्या वासरांनांही ऊबदार ठिकाणी ठेवावे.
  • हिवाळ्यात हवामान थंड असल्यामुळे तसेच पाणीही थंड असल्यामुळे जनावर पाणी कमी पिते. जनावरांनी भरपूर पाणी प्यावे, यासाठी कोमट पाणी उपलब्ध करून द्यावे. शक्यतो दुपारच्या वेळी जनावरांना उन्हात राहता येईल अशी सोय करावी व दुपारच्या वेळेस पाणी पिण्यास द्यावे.
  • बहुवर्षीय चारा पिकांची वाढ अति थंडीमुळे हळूहळू होत असल्यामुळे या काळात लसूणघास, बरसीम किंवा चवळी या हिवाळ्यात वाढणाऱ्या पिकांची लागवड करून चारा उत्पादन घ्यावे. आहारात कडबा किंवा मुरघासाचा वापर करावा.
  • गोठ्यातील सांडलेले पाणी, मूत्र निघून जावे यासाठी गोठ्यातील जमिनीला उतार देऊन नाली काढावी व गोठा कोरडा करावा. सकाळी पडदे उघडून हवा खेळती राहील अशी सोय करावी.

या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. या गोष्टींचे पालन करून तुम्ही तुमच्या जनावरांना थंडी पासून वाचवू शकाल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

49 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ